ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.914

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके सौरी अभंग ९१४

कर्मास्तव झालों सौरा । गेलों पंढरपुरा । संतसनकादिका मेळी डौर वाईला पुरा ॥१॥ चाल रामा घरा करूं प्रपंचेसी वैरा ॥धृ॥ द्वैतभाव कल्पना खोडी सांडी याची आशा । विठ्ठलनाम हेंची सार जिन्हें प्रेमठसा ॥२॥ अद्वैत भरीन मन भारीन तोडीन भवपाशा । क्षमा दया धरीन चित्तीं सर्वभूती महेशा ॥३॥ ज्ञान ज्ञेय हाची विचार सर्वमय हरी । दुजेपण न पडे दृष्टि एकपण घरोघरीं ॥४॥ वासना खोडी वेगीं टाहो करीन रामनामें । पुंडलीक पेठ संताचें माहेर तेथें नाचेन मनोधर्मे ॥५॥ विज्ञान हरि आपणची क्षरला दुजेपणे छंदु थोरु । निष्काम स्वरुप सूत्रधारी खरा एकरुपें हरिहरु ॥६॥ त्रिकाळ ध्यान त्रिकाळ मन हरपले जेथ । पुरली मनकामना वैकुंठ प्रगट आपणची नाथ ॥७॥ देहुडा पाउलीं वेणु वाहे विटेवरी नीट । वोळली कामधेनु युगे अठ्ठावीस वाट ॥८॥ एक वृक्ष क्षरला आपणची जग सर्वघटी आत्मारामु । ज्ञानदेवो म्हणे आम्हां पंढरपुरी जाला विश्रामु ॥१०॥

अर्थ:-

मी प्रारब्धाधीन पुण्यकर्माने संसार परित्याग करुन स्वच्छंदाने पंढरपुरास गेलो. तेथे जाऊन सनकादिकांप्रमाणे संताच्या मेळ्यांत मिसळून भगवन्नामाचा परिपूर्ण गोंगाट केला. मी म्हटले चला, परमात्म्याला आपल्या घरांत बसवू किंवा परब्रह्माच्या घरांत आपण जाऊ आणि प्रपंचासी वैर करू. द्वैताची खोटी कल्पना टाकून त्याचप्रमाणे प्रपंचाची आशा सोडून प्रपंचात सार जे विठ्ठलनाम ते जीभेवर प्रेमाने ठसवू. अद्वैतज्ञानाचा मनांत उदय झाला म्हणजे त्या जोराने, संसाररुपी भवपाश तोडून टाकून, क्षमा, दया, सर्व भूतांच्या ठिकाणी, परमात्मभाव चित्तात धरु. ज्ञान ज्ञेयाच्या विचाराने सर्व हरिमय होऊन दुजेपण दृष्टिसही पडणार नाही. मग सर्व घरोघरी एक परमात्मस्वरुपच होते. विषयवासना हीच खोडी तिला जोरांने परत वळवून मी रामनामाचा टाहो फोडीत आणि पुंडलिकाच्या पेठेत असणाऱ्या संतांच्या माहेर घरांत म्हणजे पंढरीत मनःपूर्वक मोठ्या प्रेमाने नाचेन. विज्ञानरुप हरि आपणच भाविक विकार पावल्यामुळे त्याचा मी दुजेपणाने भक्तिचा मोठा छंद घेतला आहे. निष्काम स्वरुप हरि खरा, सूत्रधार असूनही हरिहरादिरुपांनी एकरुपच आहे.. त्रिकालस्नान गमनादि क्रिया माझ्या ठिकाणच्या जाऊन माझी मनकामना पूर्ण झाली. वैकुंठरुप परमात्मा जो श्रीहरि तो प्रगट होऊन.आपणच वाकड्या पावलांने विटेवर नीट उभा राहून वेणु वाजवीत असता अठ्ठावीस युगे कामधेनुप्रमाणे वळली म्हणजे अठ्ठावीस युगे होऊन गेली.. तोच परमात्मा जगत् वृक्षरुपाने क्षरण पाऊन म्हणजे विकार होऊन आपण सर्व जीवमात्रांमध्ये त्याचा आत्मा बनला आहे. याप्रमाणे त्या श्रीकृष्णाची पंढरपूरात वस्ती असल्यामुळे आम्हांला तेथेच विश्रांति झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *