ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.791

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१

तुज पासाव जन्मलों हरि पुढती सामावलों तुझ्या उदरीं । तुझीया व्यापकपणे चाले सत्कर्माची दोरी । सायीखडियाचें बाहुलें कैसे हावभाव धरी । सूर्यकांत वेधे अग्नींच प्रसवे सहजे समंधु ऐसा धरी रया ॥१॥ तुझें तुज देवा सांगतां निकें । समर्थेसी केवीं बोलावें रंकें ॥धृ॥ अहंकार महदादि भूतें तेणें गुणेंसी आली तें चैतन्य नयनीं अधिष्ठिलीं । सर्व शरीरीं वायो व्यापिला की पृथ्वीसी मिळोनी आकाशा भरोवरी जाली । ते हे स्थूळ लिंग कारण तिहीं तत्त्वेंसी प्रकृती अथिली रया ॥२॥ सर्व होणे तुज एकाचें । दुजेपण तेथे आणावें कैचें ॥धृ॥ चंद्रमा मनः चक्षुसूर्योदिशाश्रोत्रः अकार उकार मकार प्रणवो । मन बुद्धि चित्त अहंकार ब्रह्मा विष्णु महेश राजस तामस सात्त्विक माया ब्रह्मींचा दावी पा उपावो । तुजवेगळे काय आहे तें सांग पां तरी मज कां म्हणवितासी जिऊ रया ॥३॥ जेथें पाहें तेथें तूंचि दिससी । लपोनियां अबोला कासया धरिसी ॥धृ॥ रसना रस सेवावे हे तों जीव आत्म्याची स्थिति । श्रवणीं ऐकणें की नेंत्री देखणें हे तो तुझीच नादश्रुती । घ्राणासी परिमळ घेणें की हस्तपादादिकां चळणगती । हे तो तुझींच पांचैं तत्त्वं तरी तूं मज का भोगवितोसी यातायाती रया ॥४॥ लाजेसी ना तूं देवा माझें म्हणतां संन्याशासवें कैंची रे कांता ॥धु ॥ इंद्रियें दारूणें जीव आत्मयासी हे तो सुखदुःखप्राप्ती । तेणें हें कारण की आत्मा पावे यातायाती । इंद्रिये दंडून तप जें करावें ऐसें बोलती वेद श्रुती । साहीजणांसी तो वेवाद लाविला हें तो तुझीच करणी सांगती रया ॥५॥ दुजेंवीण एकला खेळतो स्वारी । कवणातें जय कवणा आली हरी ॥धृ॥ अंगें ब्रह्म जालासी उत्पत्ती करावया सृष्टी । ते समयीं ते रचिली विषयांची कसवटी । ऐसे तुझें वालभ मिरऊ जाय सृष्टी । तंव सुखदुःख लागतसे पाठीं । येथे काय माझा अपराध जाणसी तरी शस्त्रेंसी मान निवटीं रया ॥६॥ सगुण रचना वोजा विस्तारिली । भुजंगी व्याली तिची काय झाली पिलीं ॥धृ॥ वेद प्रमाण करावया कारण कीं कृष्णमूर्तिची बुंथी घेणें । अनंत ब्रह्मादिकांसी आदि वंद्य तो तूं राखसी गौळियाची गोधनें । अंबऋषीकारणें गर्भवास साहिले की अजामिळादिकांसी उद्धरणें । वैरियां भक्ता येकिची मुक्ती मा समर्थु नाहीं येणें माने रया ॥७॥ अनंत ब्रह्मांडे घडिसी मोडिसी । अकर्तेपणे जैसा तैसा अससी ॥धृ॥ एक वीरा माय मारावी की गणिका उद्धरावी हे कवण प्रवृत्ति । दशरथपिता रौरवीं की वैरिया सायुज्यता मुक्ती । कर्मभ्रष्ट पांडव सरते केले की अज्ञानासी मोक्षप्राप्ती । शास्त्रे पुराणें वारूं जाय तंव अधिक पडतसें गुंती रया ॥८॥ सुताचें गुंडाळे उगवीं पा वहिले । खंडूनियां सांडी देवा एकाचि बोले ॥धृ॥ मिथ्या हा प्रपंच की दर्पणींचें दुजे जळीं बिंब प्रकाशे । एक साचें दुजे दिसे तैसेंचि दुसरे कां प्रतिभासे । लटिकें म्हणों जाय तंव तेथें मन कां विश्वासे । सगुण निर्गुण हेतो तुझीच माया तुझी तुजमाजी दिसे रया ॥९॥ अर्धनारी सोंग पाहतां निकें । साच लपऊनी दावितो लटिके ॥धृ॥ सिद्धासी साधन हे तों कष्टचि वायांवीण अनंत प्रत्यक्ष जाणोन कायसें परिमाण । स्वयंभासी प्रतिष्ठा करणे हे तों देखतचि अज्ञानपण । निजबिंबामाजीं प्रतिबिंब बिंबलें तैसे सगुण निर्गुण तुजमाजी रया ॥१०॥ सहजसिद्ध ते तूं आपण मैं पाहीं बाहिजु भीतरी ये दोन्हीं नाहीं ॥धु ॥ विश्वरूप अळंकारलें कीं मुसें आटली भांगारें । अथवा घटमठादिकी अभावीं परीपूर्ण असिजे अंबरें । उदकी पडिला काश्मिरा तो नागवे निरा तो न सरे । दुसरेपणें तैसा आदि मध्य अंती हृदयींचा जाणोनी पूर्णबोधेवीण द्वैत न सरे रया ॥११॥ सच्चिदानंदरूप तत्त्वता । लटिकेंचि बंधन बंधना मुक्ता ॥धृ॥ म्हणसी माझा संकल्प फळला तरी म्यां दुःख नाहीं इच्छिलें । अवघा तुझा खेळ बहुरूप असें विस्तारलें । जाणसी तें करी देवातें तुझें तुज पुढा सांगितलें । तेथ काय माझा अपराध देखसी तरी देह का नाहीं खंडिले ॥१२॥ पुरे पुरे आतां जड जालें जिणे । उरी नाहीं देवा लाजिरवाणें ॥धु ॥ ऐसी इंद्रिये वासनेसी आणीजती ते तुझी तुजमाजी सामावती । समस्त जीव हे तो तुझे आकारलें येरी ते लटकीच भ्रांती । जाणसी तें करी देवा तेचि तें सांगों किती । दग्धबीज तरूबीजीं सामावला तैसा तुजमाजी श्रीगुरूनिवृत्तिरया ॥१३॥ ऐक्य जालें तेथें नित्य दिवाळी । सहज समाधी तेथें कायसी रे टाळी ॥धृ॥

अर्थ:-

हे श्रीहरि, तुझ्यापासून माझा जन्म होऊन पुन्हा तुझ्या स्वरूपात सामावलो. तुझ्या व्यापकपणाच्या आधारावर जीवाच्या कर्माकर्माची दोरी हालवण्याने सायिखड्याच्या बाहुल्याप्रमाणे जीव, कर्माचरण करतात. सूर्यकांतांच्या संबंधाने अग्नी उत्पन्न होतो. तसा तुझ्या स्वरूपाशी जीवाचा सहज संबंध आहे. हे तुझे तुझ्यापुढे खरे सांगून समर्थापुढे काय बोलावे.कारण तूं सर्वज्ञ आहेस अहंकार, गुणासह वर्तमान पंचमहाभूते ज्याच्यापासून झाली ते अधिष्ठान चैतन्य डोळ्यांतही व्यापलेले आहे. सर्व शरीरामध्ये वायु व्यापला, किंवा पृथ्वीसी ऐक्य पावून आकाशाची पूर्तता केली. त्याच्यापासून स्थूळ, सूक्ष्म व कारण या तीन तत्त्वाशी मिळून प्रकृतिच विकाराला पावली आहे. त्या प्रकृतिद्वारा हे सर्व विश्व तुंच बनला आहेस. त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणा कोठून आणावा. चंद्रमा तुमचेच मन, सूर्य तुमचे डोळे, दिशा हे कान, अकार उकार, मकार मात्रात्मक प्रणव मन, बुद्धि, चित्त, अहंकार, ब्रह्मा, विष्णु, महेश, राजस, तामस सात्त्विकादि भाव, धारण करणारी माया, ब्रह्मप्राप्तीचा उपाय दाखवून, वास्तविक विचार करता ती माया तुमचे स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुमचेहून भिन्न असे काय आहे.जर तुझ्याहून यत्किंचितही काही भिन्न नाही तर मला जीव काय म्हणून म्हणतोस. जिकडे पहावे तिकडे तूंच दिसत असता आपले स्वरूप लपवून माझ्याशी अबोला काय म्हणून धरतोस. रसनेने रस सेवावा, कानांनी ऐकावे, नेत्राने पाहावे.नाकांने सुगंध घ्यावा, हातापायाचे चलन व्हावे हा सर्व समुदाय ज्या पंचमहाभूताचा आहे. ती पंचमहाभूते तुमचे स्वरूप असता मी जीव तुमच्याहून वेगळा असे समजून माझ्याकडून यातायाती का भोगविता.अशा यातायाती भोगून पुन्हा जीव मद्रूप आहेत असे म्हणतांना तुम्हास कांही संकोच वाटत नाही का?संन्याशाची ही बायको आहे. असे म्हणण्यासारखे अयुक्त नाही काय. जीवात्म्याला ही बलवान विषयाभिमुख इंद्रिये, असल्यामुळे सुखदुःखप्राप्ती होते. याच कारणामुळे जीवात्म्याला यातायाती भोगावे लागते.म्हणून इंद्रियांचे दमन करून तप करावे, असे श्रुती सांगते.सहा शास्त्रांचा परस्पर वाद लावला ही तुमचीच करणी आहे. असे सांगतात. द्वैतसंबंधावांचून हा द्वैताचा विलास तुम्ही करता. यांत कोण चांगले, कोण वाईट असे कसे म्हणता येईल. सृष्टि उत्पन्न करण्याकरिता तुम्ही स्वतःच ब्रह्मदेव झालात त्यावेळी तुम्ही जीवाच्या परिक्षेकरिता विषयाची रचना करून ठेवली. असे तुमचे कौतूक जगांत वर्णन करावे तर जीवाच्या पाठीस सुखदुःखे लागली आहेत. त्यांत तुम्ही जीवाचा काय अपराध पाहिला बरे? अशी सुखदुःखे जीवाला विनाकारण भोगविण्यापेक्षा शस्त्राने त्यांची मान तोडून टाकणे हे चांगले. गुणांचा आधार घेऊन जगताची रचना केली आणि विनाकारण जीवांच्या पाठीमागे दुःखे लाविली. ज्याप्रमाणे सर्पिण आपली पिले वियून तीच खाऊन टाकते. त्याप्रमाणे ही स्थिती झाली. वेदाला प्रमाण करण्याकरिता तुम्ही हे कृष्णमूर्तिचे सोंग घेऊन ब्रह्मादि अनंत देवांना वंद्य असणारे जे तुम्ही ते येथे गोकुळांत गोधने राखिता. अंबऋषी करिता तुम्ही गर्भवास सोशिलेत आणि पापी अजामेळाचा उद्धार केला. वैरी किंवा भक्त याला तुम्ही एकच मुक्तिदान करता या करिता तुम्ही समर्थ नाही. असे कोणी म्हणावे. अनंत ब्रह्मांडे एका क्षणांत घडवून मोडित असताही तुमचा अकर्तेपणा जसाचा तसाच असतो. परशुराम होऊन आपल्या आईस मारावे आणि त्या गणिका वेशेला मुक्ति द्यावी, ही कोणती विलक्षण प्रवृत्ति ? साक्षात् आपला पिता जो दशरथ त्याला रौरव नरकवास आणि वैरी जो रावण त्यास सायुज्यमुक्ति, कर्मभ्रष्ट पांडवांना पुज्य केले, आणि अज्ञानी पूतनादिकांना मोक्षप्राप्ती. शास्त्रपुराणाचा विरोध नाहीसा करू जावे तर जीव अधिकच गुरफटून जातो. हा तुमचा काय गोंधळ आहे? तो प्रथम उलगडा करून काढून टाका. आणि एक काय ते खरे सांगा. दर्पणांत ज्याप्रमाणे बिंबाच्या सत्तेने दुसरे खोटे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी हा मिथ्या प्रपंच दिसतो. एक सत्य असता तेथे दुसरे कां दिसावे याचाच उलगडा होत नाही. बरे ते खोटे म्हणावे तर तेथे मन सत्य समजून विश्वास धरते. सगुण निर्गुण ही सर्व तुमची माया असून ती सर्व तुमच्याच मध्ये दिसते. अर्धनारी नटेश्वराचे सोंग आणणारा पाहिला तर तो आपले खरे स्वरूप लपवून खोटा आभास दाखवितो. प्रत्यक्ष दिसणारे अनंत परिच्छिन्न पदार्थ पाहून तुमचे मर्यादा करणे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे जीव स्वतः ब्रह्मरूप सिद्ध असता पुन्हा ब्रह्मप्राप्ती करिता साधन करणे फुकट श्रम आहे. तुमचे हे अनंत तत्त्वाचे रूप पाहता मोजमाप करणे व्यर्थ आहे. अशा स्वतःसिद्ध परमात्म्याची अंतःकरणांत प्रतिष्ठा करणे हा तर धडधडीत वेडेपणा आहे. कारण परमात्मस्वरूपामध्ये जीव प्रतिबिंबित झाला आहे. त्याप्रमाणे तुझ्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण हा विलास आहे. सहज सिद्ध जे तुझे रूप ते तूं पहा ते सहजसिद्धरूप तूं झालास म्हणजे मग अंतर्बाह्य असा भेद राहणार नाही. विश्वरूपाने परमात्मस्वरूपच अलंकृत झाले आहे. विश्व असा पदार्थच नाही. जसे अलंकार सर्व मुसीत आटतात. व नंतर एक सुवर्ण शिल्लक राहते. किंवा घटमठा नाश झाला असता जसे परिपूर्ण एक आकाशच राहते. वास्तविक विचार केला तर घट, मठ असतानासुद्धा आकाश परिपूर्ण नित्य आहेच. आकाशाला घटमठाचा संबंध कधीच लागत नाही. जसा उदकांमध्ये पडलेला स्फटिक उदकापासून नाश पावत नाही, किंवा विकार पावत नाही. त्याप्रमाणे जगताच्या आदि, मध्य, अंती नित्य असणारा परमात्मा तोच आपल्या हृदयांत आहे असे पूर्णबोधाने जाणले असता तेथे परमार्थतः द्वैत राहात नाही.सच्चिदानंदरूप वास्तविक त्याच्याठिकाणी खोटेच बंधन असल्यामुळे बंध किंवा मुक्तता नाहीत. तुम्ही असे म्हणाल की माझा संकल्पच जगतरूपाने फलद्रूप झाला तर मी दुःख भोगावे अशी मी इच्छा केली नाही. हा सर्व जगत् विस्तार तुझा खेळ असून बहुरुपाने वाढला आहे. असे तुम्ही म्हणता आणि आम्हाला तर दुःख होते अशी तुमच्या स्वरूपाची वास्तविक स्थिति तुमच्या पुढे सांगितली याउपर तुम्ही वाटेल ते करा असल्या जगत् व्यवहारात मला दुःख व्हावे असा तुम्ही माझा काय अपराध पाहिलात ? तुझा कांहीं अपराध नाही असे म्हणाल तर तुम्ही माझा देहसंबंध का निवृत्त करीत नाही. आतां हे माझे जगणेच फार जड झाले आहे. या देहापासून फार लाजिरवाणी स्थिति झाली आहे. वासनेसह वर्तमान ही इंद्रिये तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणीच ऐक्य पावतील कारण हे सर्व जीव तुझेच स्वरूप आहेत. त्यांना आपण भिन्न आहोत अशी भ्रांतिमात्र आहे. अशी वास्तविक स्थिति तुमच्यापुढे सांगितली. आतां जसे वाटेल तसे करा. तेच ते किती सांगत बसावे. दग्ध झालेल्या बीजांत जसा वृक्ष ऐक्यभावाला प्राप्त होतो.त्याप्रमाणे हे श्रीगुरूनिवृत्तिराया तुमच्यास्वरूपामध्ये माझी स्थिति आहे.असा ऐक्य भाव ज्याच्या अनुभवास आला असेल त्यांना नित्य दिवाळी आहे. अशा भक्तांची सहज समाधी केव्हाही भग्न होणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *