ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.460

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६०

कल्पना वृक्षासी देखिले । चिंतामणीसी चिंतिले । कामधेनुसी अपेक्षिले । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये । धन्य कुळ धन्य जन्म । जयासी पंढरीचा नेम । चित्ती अखंड विठ्ठलप्रेम । ते धन्य भक्त भूमंडळीं ॥२॥ तोचि तीर्थरुपसदा । तया दोष न बाधिती कदा । जो रातला परमानंदा । तेथें सर्व सिध्दी वोळंगती ॥३॥ ऐशी वेदशास्त्रीं पुराणीं । जो रातला नामस्मरणीं । धन्य तया तीर्थ पर्वणी । धन्य वाणी तयाची ॥४॥ पंढरिसी कीर्तन करी । पुंडलिकासी नमस्कारी । विठ्ठल अंतरीं धरी । धन्य जन्म तयाचा ॥५॥ सकळ कुळाचा तारकु । तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगला निःशंकु । धन्य धन्य जन्म तयाचा ॥६॥ त्यासी अंती वैकुंठप्राप्ती । ऐसे शुकें सांगितलें परीक्षिती । जे जे हरिचरणीं भजती । ते ते पावती वैकुंठ ॥७॥ नामे स्फुदत नाचत रंगणीं । प्रेम विठ्ठल चरणीं । सर्व सुख खाणी । बापरखुमादेविवरु विठ्ठल ॥८॥

अर्थ:-

जसा एखाद्याला कल्पतरु लाभावा. किंवा चिंतिलेले देणारा चिंतामणी मिळावा, अथवा मनातील कामना पूर्ण करणारी, कामधेनु जसी लाभावी. त्याप्रमाणे जीवाला खरा अर्थ प्राप्त करुन देणारा तो श्रीहरि परमात्मा पंढरीक्षेत्रांत असून ज्याचे चित्तात विठ्ठला विषयी अखंड प्रेम असून ज्याचा पंढरीचे वारीचा नेम आहे. त्याचे कुळ धन्य त्याचा जन्म धन्य त्रैलोक्यात तोच एक धन्य समजावा. तोच तीर्थरुप

समजावा, निर्दोष पुरुष तोच समजावा, सतत भगवन्नामा मध्ये रंगलेल्या पुरुषाल कसलीही पातके लागू शकत नाही. इतकेच काय सर्व रिद्धीसिद्धी. त्याला लोटांगण घालीत त्याच्याकडे येत असतात.नामस्मरणांत रंगलेल्या पुरुषाचे वर्णन वेदशास्त्रांनी व पुराणांनी केलेले आहे. असा तो भगवद् भक्त वारकरी धन्य होय त्याची वाणी पवित्र समजावी.ज्याच्या मुखाने ती अक्षरे ऐकावयास मिळतील ती तीर्थपर्वणी समजावी. पंढरीला जाऊन वाळवंटात जो कीर्तन करतो व पुंडलिकरायांचे जो दर्शन करतो त्याचा जन्म धन्य होय. तो सर्व कुळांचा तारक असून पुण्यवान आहे तो पांडुरंगाशी पुर्ण रंगलेला आहे म्हणुन त्याचा जन्म धन्य होय. जे त्याच्या चरणांची सेवा करतील त् वैकुंठाला प्राप्त होतील असे शुक्राचार्यानी परिक्षिती राजाला श्रीभागवतात सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भगवत्भक्त कीर्तनात रंगन जाऊन आनंदाने नाचतात. व कंठ दाटून त्यांना आनंदाचे भरते येते असे माज़े पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगरायाचे चरणी प्रेम ठेवून समाधानांत राहातात. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *