ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.458

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५८

हे नव्हे आजिकालिचे । युगा अठ्ठाविसांचे । मज निर्धारितां साचें । हा मृत्युलोकुचि नव्हे ॥ हाची मानी रे निर्धारू । येर सांडी रे विचारू । जरी तूं पाहासी परात्परु । तरी तूं जायें पंढरीये ॥१॥ बाप तिर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी । भक्त पुंडलिकाचे द्वारी । कर कटावरी राहिला ॥२॥ काशी अयोध्या कांची । अवंती मथुरा माया गोमती । ऐशी तीर्थे इत्यादिकें आहेती । परी सरी न पवती ये पंढरी ॥३॥ हाचि मानीं रे विश्वासु । येर सांडी रे हव्यासु । जरी तूं पाहासी वैकुंठवासु । तरी तूं जाये पंढरींये ॥४॥ आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैलथडीये परमात्मा । मध्यें राहिला पुंडलिकु ॥५॥ या तिहींचे दरूशन । प्राण्या नाही जन्ममरण । पुनरपि आगमन । येथें बोलिलेंचि नाही ॥६॥ पंढरी म्हणजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेंचि दिसताहे नीट । या हरिदासासी वाळुवंट । जागरणासी दिधलें ॥७॥ म्हणोनी करा करारे क्षीरापति । नटा नटा किर्तनवृत्ति । ते नर मोक्षाते पावती । ऐसें बोलती सुरनर ॥८॥ हें चोविसा मूर्तीचें उद्धरण । शिवसहस्र नामासी गहन । हेंचि हरिहराचे चिंतन । विश्ववंद्य हे मूर्तीतें ॥९॥ तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेविवरू पंचविसावाचोविसा मूर्तिवेगळा ॥१०॥

अर्थ:-

पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभे असलेले हे परब्रह्म आज कालचे नसुन अठ्ठावीस युगाचे आहे.भगवंताचा अवतार मृत्युलोकांत पंढरीत झाल्यामुळे विचार करतांना मला असे वाटते की हा मृत्युलोक च नव्हे तर वैकुंठच आहे. व तूंही तसाच निश्चय कर आणि बाकीचा विचार न करता जर तुला परात्पर परमात्मा पहावयाचा असेल तर तूं पंढरीस जा. धन्य धन्य पंढरी क्षेत्र या पृथ्वीवर ते वैकुंठ असून भक्तराज जो पुंडलिक त्याच्या द्वारात कटेवर कर ठेऊन विठोबाराय उभा राहीला आहे. या भूलोकांत काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा, माया, गोमती वगैरे पुष्कळ तीर्थे आहेत परंतु पंढरीची योग्यता त्यांना नाही. हाच पक्का विश्वास ठेव आणि बाकीच्या क्षेत्रास जाण्याचा हव्यास करू नये तुला जर वैकुंठवासी पाहावयाचा असेल तर तूं पंढरीला जा. तेथे जड जीवाला तारण्या करीता भीमा आडवी वाहात आहे. अलिकडच्या बाजुला जीवात्मा, पलिकडच्या बाजुला परमात्मा, मध्ये पुंडलिक आहे. या तिघांचे ज्याला दर्शन घडेल त्या प्राण्याला जन्ममरण नाही. परमात्मदर्शनानंतर पुन्हा संसारात येण्याची गोष्ट बोलावयासच नको. अहो पंढरी म्हणजे साक्षात् भूवैकुंठ असून तेथे परब्रह्म तर नीट उभे राहिलेले दिसते. हरिदासांना जागरण करण्याकरीता भगवतांनी वाळवंट दिले आहे. म्हणून मी म्हणतो क्षीरापती करा कीर्तनाच्या वृत्तीत नटा असे जे करतील ते प्राणी मोक्षाला पावतील असे देवश्रेष्ट सांगतात. केशव नारायणादि नाम ही त्याचे मूर्त स्वरूप आहे. त्या नामाने सर्वांचा उध्दार होतो शिवसहस्त्रनामा पेक्षाही हे फार मोठेआहे. हे मुळ स्वरूप हरिहरांच्या चिंतनाचे स्थान असूनहि पांडूरंगरायांची मूर्ति जगवंद्य आहे. असा हा देवादिदेव साक्षात कृष्ण पांडुरंग असून सदाशिवाचा निजठेवा आहे.मा झे पिता व रखुमादेवीचे वर जे श्रीविठ्ठल हे सांख्यशास्त्रांनी मानलेल्या चोविस तत्त्वाहून निराळे असून शुद्ध सच्चिदानंदरूप पंचविसावा पुरूष आहेत. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *