ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.964

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९६४

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके आंधळा-पांगुळ अभंग ९६४

अंध पंगु दृढ जालों मायापडळ भ्रांती । कर चरण विव्हळ गेले तंव भेटले निवृत्ति । ज्ञान मज उपदेशिलें नेलें अज्ञानक्षिती । वृक्ष एक तेथें होता त्या तळीं बैसविलें रीती ॥१॥ धर्म जागो निवृत्तीचा हरिनामें उत्सावो । कर्म धर्म लोपले माझे माझा फिटला संदेहो । धर्म अर्थ काम पूर्ण दान मान संमोहो । नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामी टाहो ॥२॥ कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं । चिंता हे हरपली माझी नित्य अमृताची वाटी । मन हें निमग्न झालें नित्य वसे वैकुंठी । तापत्रयें ताप गेले नाना दोषांचे थाटी ॥३॥ अनंत हे मायामय लोपलें जिवाचिया साठीं । हरपल्या योनीमाळा चिंतामणी कसवटी । सिद्धि बुद्धि समसरल्या जीवशिव एकदाटी । आत्माराम मन जालें एकतत्त्व शेवटीं ॥४॥ आत्माराम निर्गमले वेदशास्त्रगुह्यज्ञानें । वासनेचि मोहजाळी ते विराली नाना स्थानें । फुटले नाना घट तुटली नाना बंधनें । सुटल्या जीवग्रंथी ऐसें केलें त्या दानें ॥५॥ मोक्ष हे ठेले मागें मुक्तिमार्ग निमाला । वृत्ति हे बुडाली माझी निवृत्ति गळाळा पाजीला । सत्रावी वोळली बाळा आत्माराम दाता जाला ॥६॥ बुद्धि बोध संवगडे सजीव करचरण । नयनी नयन जाले चक्षु मी समाधान । दिव्य देह अमृत कळा दशदिशा परिधान । सर्व हें ब्रह्म झालें फळद फळलें विज्ञान ॥७॥ निवृत्ति गुरू माझा अंधपण फेडिलों । सर्वत्र दृष्टि जाली एकतत्त्वीं राहिलों । निरसली माया मोहो श्रीराम अंजन लेईलों । ज्ञानदेव ज्ञानगंगे निवृत्तीनें बुडविलों ॥८॥

अर्थ:-

माझ्या बुद्धिरूपी डोळ्यावर मायेचा पडळ आल्यामुळे मी आंधळा म्हणजे आत्मज्ञानशून्य झालो. परमार्थप्राप्तीचा मार्ग चालण्यास मी पांगळा झालो. हातापायाची शक्ति गेली अशा स्थितीत दयाळू श्रीगुरूनिवृत्तीराय भेटले.त्यांनीआत्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानाचा नाश करून परमात्मरूपी वृक्षा खाली बसविले.अशा श्रीगुरूंचा जयजयकार असो हरिनामाच्या गजरांत माझा सर्व कर्म धर्माचा लोप होऊन आत्मस्वरूपाविषयी संदेह नाहीसा झाला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे पुरूषार्थरूपी दान मला प्राप्त झाले. ह्यामुळे मी इंद्रिय विषयांच्या नादी न लागता फक्त हरिच्या नामाचा टाहो फोडीत राहीन.कल्पवृक्षाप्रमाणे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा जो परमात्मा त्याने माझ्या सर्व कल्पना नाहीशा केल्या. तसेच चिंता नाहीशी झाली. कारण हरिनामरूपी अमृताची वाटी तोंडास लावली आहे. मन हरिनामांत रंगून गेले. त्यामुळे नित्य वैकुंठ जो परमात्मा तेथे वास झाला आणि अनंत दोषांचे समुदाय व अध्यात्मादि तीन तापही नाहीसे झाले.माझ्या अध्यात्मदृष्टीने मायामय जगतांच्या राशी नाहीशा झाल्या.अनेक योनींचा फेरा चुकला. चिंतामणी जो आत्मा तो माहित झाला व त्यात रिद्धिसिद्धि लय पावल्या जीवशिवाचे ऐक्य झाले. आणि अद्वितीय तत्त्व जो आत्माराम तद्रुपच मन झाले. वेदशास्त्रांच्या गुह्यज्ञानाने शुद्ध आत्मस्वरूप अनुभवास आले. त्यामुळे अनेक विषय वासना, अनेक जन्माची बंधने शुद्ध सच्चिदानंद आत्मा आणि अनात्मा अंतःकरण यांचे ऐक्य समजून अनेक जन्म मारलेली जी गाठ, श्रीगुरूपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने सुटली. कल्पित बंधासंबंधी आत्मस्वरूपावर आरोपित मोक्ष किंवा मुक्ति हा व्यवहारही संपला प्रवृत्ति नष्ट झाली. सतरावी आत्मानंदाची कळा प्राप्त करून देण्यास श्रीगुरू दाता भेटला बुद्धि आणि आत्मबोध यांची मैत्री जमली. हातपाय सजीव झाले. आत्मस्वरूपाविषयी आंधळा होतो. त्या मला डोळे आले. सर्व दश दिशा आनंदरूप झाल्या श्रीगुरूंनी फलद्रुप ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यामुळे हे सर्व ब्रह्म झाले. माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझे आंधळेपणा नाहीसा केल्यामुळे एक परमतत्त्वांच्या ठिकाणी दृष्टि राहिली.डोळ्यांत श्रीरामरूपी अंजन घातल्यामुळे माझा मायामोह नष्ट झाला. श्रीगुरूनिवृत्तिरायांनी मला ज्ञानगंगेतच बुडवून टाकिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *