ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.452

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५२.

जयातें पाहतां परतला आगमु । निगमा नाकळे दुर्गुमु । सिद्ध साधक निरूतें वर्मु । न पडे ठायीं सर्वथा ॥१॥ तें या पुंडलिका ओळलें । प्रेम प्रीतीनें घोळलें । भक्तिमातेने चाळविलें । आधीन केले आपणया ॥२॥ जे माये अविद्ये वेगळे । गुणत्रया नातळे । काळे गोरें ना सांवळे । निर्धारित नेणवे ॥३॥ जें द्वैताद्वैताहूनी परतें । जे सुखांते वाढवितें । योगी लक्षी लक्षित ज्यातें । परि नेणवे सर्वथा ॥४॥ जें रूपा अरूपा वेगळे । सहस्रनामांहूनि आगळे । परम कृपेचे कोवळे । क्रिया कर्माविरहित ॥५॥ जे ब्रह्मरसाचें गोठलें । ते पंढरिये प्रगटलें । बापरखुमादेविवरू विठ्ठले । नामें आथिलें चोखडें रया ॥६॥

अर्थ:-

ज्या श्रीविठ्ठलाचा विचार करू गेले असता, तो श्रीविठ्ठल वेदशास्त्रालाही कळणे कठीण आहे. म्हणून ‘नेति नेति’ असे म्हणून वेद परत फिरला. सिद्ध साधकांनाही त्याचे वर्म सापडले नाही.असा तो परमात्मा पुंडलिकरायांच्या भक्तिभावाने सहज प्राप्त झाला. त्या भक्ति मातेने त्याला स्वकीय स्वरूपापासून चाळवून आपले स्वाधीन करून घेतले. ज्या परमात्मतत्त्वाचा विचार करू गेले असता त्याचे स्वरूप माया व अविद्या याहून वेगळे असून गुणत्रयांत सापडत नाही त्याच्यात काळे गोरे किंवा सावळे या वर्णाचा निर्धार करता येत नाही. तो द्वैत व अद्वैत याहूनही पलीकडे आहे. तरीपण त्याचे नाव घेतले असता मनाला सुख वाटते. योगी लोक ज्याचे ध्यान करतात पण त्यांनाही त्याचे स्वरूप कळत नाही. तो रुपवान नाही रुपरहितही नाही असा तो सहस्त्रनामा हुन वेगळा आहे तो श्री विठ्ठल कृपावंत क्रियाकर्माहुन वेगळा आहे. असे ते ब्रम्हरसाचे गोठलेले ते रूप श्रीक्षेत्र पंढरी येथे श्री विठ्ठल नावाने सुंदर, सर्वगुणसंपन्न, शुद्धस्वरूप प्रगट झाले आहे. असे ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *