ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 802

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०२

आपुलिये खुणे आपणपा दावी । की सगुणबुंथी चोख मदवी । ऐसी सुंदर गोपवेषु । की तत्त्वमस्यादि सौरसु जेथें श्रुति नेति नेति ठेल्या पायीं । तो तूं सगुण निर्गुणी निजानंदें सहजचि कळे विदेहीं रया ॥१॥ एक म्हणतां दुजें नाहीं रे तेथें शून्यतूं सांगसी काई । निरशून्य तें असतां सगुण तें निराळले तेंथे हे कल्पना काई रया ॥२॥ नामरूपछंद गोडी ऐसी इंद्रियांची आवडी । परतोनी पाहे घडीघडी तोची तूं । तेथें आठऊना विसरू परी तोची गा तूं । थोरू ऐसा निर्धाराचा धीरू धरी ऐसें जाणोनियां जरी सांडी मांडी करिसी । तरी पावसी कोण येरझारी रया ॥३॥ तोची तूं जगदात्मा विसावा क्षण घडी न विसंबावा । हाची होऊनी रहावा प्राण माझा । म्हणोनी धीरू धीरू बापरखुमादेविवरू । विठ्ठला आतां प्रपंची न गुंते साचे आम्हां । जितांची मरणे कां मेलिया कल्पकोडी जिणें धरी या निवृत्तीची आंत रया ॥४॥

अर्थ:-
हे भगवंता, तूं आपल्या स्वरूपबोधाचे वर्म जे तुझे निर्गुण स्वरूप ते तूं दाखवितोस व लागलीच सगुण स्वरूपाचे मादवी म्हणजे उत्तम वस्त्र पांघरून तूं गोपवेषाने दिसतोस तुझ्या पायी तत्त्वमस्यादि श्रुति न इति, न इति म्हणजे जगत्कार्यही परमात्मा नव्हे व त्या जगताचे कारण जी माया तीही परमात्मा नव्हे असे म्हणून तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी लय पावल्या, तोच तूं सगुण निर्गुणरूप सहजानंद एकच विदेही आहेस असे कळून येते. ज्या तुझ्याठिकाणी दुसरेपणाचा संबंध नाही. तिथे एक म्हणणे तरी काय शोभणार? कांहीच म्हणणे शोभत नसेल तर शून्यवाद म्हणजे निरात्मवाद तरी कसा सांगता येईल? निरशून्य म्हणजे निर्गुण चिदाकाशस्वरूप परमात्मा तोच तूं सगुण झाला आहेस तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण ह्या कल्पना व्यर्थ आहेत. इंद्रियांना तुझ्या सगुण नामरूपाच्या आवडीमुळे छंद लागला आहे. पुन्हा वारंवार परतून पाहिले तर जो निर्गुण तोच तूं सगुण तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आठव किंवा विसरही तूंच अशा थोर निर्धाराचा धीर करून जाणले असतां संसारांत वाटेल तितकी सांडी मांडी उलाढाली केली तरी जन्ममरणाच्या येरझारीत कोण सापडणार ?जीवांना समाधानाचे ठिकाण तूं एक जगदात्मा आहेस.म्हणून तुला एक क्षणभरही विसंबणार नाही व तुझ्या चिंतनांत अंतर पडू देणार नाही.कारण तूं आमचा प्राण आत्माच आहेस असे समजून हळू हळू चिंतनाने, माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याच्याशी ऐक्य निश्चय केला तर आता प्रपंचात तूं खात्रीने गुंतणार नाहीस उलट तुला असे वाटेल की आम्हाला लोकदृष्ट्या जीवंतपणा हेच पारमार्थिक दृष्ट्या मरण आहे. किंवा लोकदृष्ट्या मेलो तरी कोट्यवधी कल्पपर्यंत आमचे जगणेच आहे. याचा अर्थ आपण अमर आहोत असा तुझा निश्चय होईल व असाच निश्चय श्रीगुरू निवृत्तीरायांचे मनांत निश्चित आहे. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *