संत तुकाराम म. चरित्र १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-१०

परमेश्वराचे नामस्मरण करुन प्रत्यक्ष प्राप्ती करुन घ्यावी या उच्च ध्येयासाठी बाह्यगोष्टीतुन सर्व प्रकारे मन काढुन लोकांचा सहवास शक्यतो टाळून जास्तीत जास्त रानावनांत एकांतात वेळ घालवू लागले. भामनगर डोंगरावर जाऊन परमेश्वराच्या भेटीचा निश्चय करुन नामस्मरणाच्या भक्तीयुक्त अंतःकरणाने भगवंतास आळवले. तो भक्तवत्सल तुकोबांच्या साध्या सरळ भक्तीने वश होऊन त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. त्यानंतर ते शरीरानेच राहिले पण मनाने व कृतिने वेगळ्या जन्मात गेले. त्यामुळेच त्यांच्याकडुन भागवत धर्म प्रसाराचे व समाजोध्दाराचे महान कार्य झाले. सर्व संगपरित्यागानंतर त्यांनी अभंगाचे गाथे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवताचा अभ्यास, शक्य तेवढी पुराणे धुंडाळली. अंतःकरणाचे पावित्र्य, इश्वरभक्तीचे सहाय्य व जनहिताची खरी तळमळ यांची जोड मिळाल्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यामुळे समाजास मार्ग दाखवण्याचे कार्य करु लागले.

वर्णभेदाच्या विषारी विचारप्रणालीमुळे समाजात ऐक्य नवहते. जातीभेदाच्या चिखलांत समाज घट्ट रुतला होता. जातीची कृत्रिम उच्चनिचता धर्ममार्गात आडवी येत होती. इश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वांना खुला नाही असे शास्राज्ञेच्या नांवाखाली उघड उघड सांगीतल्या जाई. तुकोबांनी समाजऐक्यासाठी व धर्मप्रसारास्तव वर्णाभिमानाच्या तटास अभंगवाणीचे सुरुंग पध्दतशीरपणे पेरण्यास सुरुवात केली. त्यामुळे भागवतधर्माची सत्य तत्वें झपाट्याने प्रसार पावु लागली.

वर्णाश्रमधर्माचा जुलुम, कर्मठांची कठोर वृत्ती याबद्दल प्रतिकाराची भावना समाजांत रुजू लागली. उच्चनिचतेचा कृत्रीम भेदभाव गाडला जाऊन समाज एकसुत्रात येऊ लागला. परधर्माची लागलेली आग विझुन नकली खरी खोटी धार्मिक तत्वे पारखण्याचे खरे साधन समाजास लाभले. त्यामुळे महाराष्ट जनता श्रृतिस्मृतीचा चक्रव्युह, कर्मकांडाचा तट, वर्णाश्रमरुपी काटेरी कुंपण यांच्यातुन सुटु लागली. महाराष्टातील जनता नव्या दमाने, नव्या विचाराने भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेसे पाहुन कर्मठांस सहन होईना! कारण तुकोबांनी अभंगवाणीने खालच्या थरास हात घालुन संबंध महाराष्ट ढवळुन जागा केला.

महाराजांचे साधुत्व व किर्ती वाघोली येथील रामेश्वर भटांच्या कानी गेली. त्यांनी तुकोबांना बोलावुन, “तू शुद्र आहेस, अभंगात श्रृतीचा अर्थ स्पष्ट उमटतो म्हणुन यापुढे किर्तन करायचे नाही.” अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यासाठी आणायला लावल्यात. रामेश्वर भट्टांनी वह्या डोहात बुडवल्यावर तुकोबांनी अन्नपाणी सोडुन देवाचा धावा सुरु ठेवून, शरीरधर्मास रजा देऊन  तीथेच बसले. त्यांच्या आर्त हाकेला भक्तवत्सल धावुन आला. तेराव्या दिवशी बुडवलेल्या वह्या तरंगतांना दिसल्यात. त्या वह्या वाजत गाजत मंदिरांत आणुन ठेवल्यात. देवाची स्तुती करतांना  देवाची साऊली, माऊलीहुन मवाळ, चंद्राहुन शीतल, पाण्याहुन पातळ असा प्रेमाचा कल्होळ सुरु केला.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *