संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १०१ ते १०५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

वैकुंठदैवत देवामुकुटमणी अभंग क्र.१०१

वैकुंठदैवत देवामुकुटमणी । ऐकिजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥
तो हरि बाळक गोपिका कौतुक । गोपाळ सकळिक सवंगडे ॥
आदि शिवाजप जपतु अमुप । ते प्रत्यक्ष स्वरुप नंदाघरी ॥
निवृत्ति समाधी उगवली सकळिकां । तारि तिन्ही लोकां एक्यानामे ॥

अर्थ: सर्व देवांचा मुकुटमणी असलेला तो वैकुंठाचा देव त्याची कीर्ति सर्व पुराणे उच्चारवाने ऐकवतात.त्या देवाचे संवगडी गोपाळ असुन गोपीका त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. ज्याचे नाम महादेव शंकर सतत जपत असतात तो नंदा घरी कृष्ण होऊन आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या नामाने तिन्ही लोक तारले जातात ते नाम मला व सर्वांना समाधीचा अर्थ समजवते.

गगन घोटीत उठि पृथ्वी सगळी दाटी अभंग क्र. १०२

गगन घोटीत उठि पृथ्वी सगळी दाटी । आपणची पाठी कूर्म जाणा ॥
कासवितुसार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥
उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरी ॥
निवृत्ति सादर हरिरुप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥

अर्थ: समुद्र मंथनावेळी पर्वताचा व घुसळणीचा भार सहन न झाल्या मुळे पृथ्वी खाली गेली तेंव्हा कासव रुप धरुन पाठीवर पृथ्वी घेऊन तिला आधार दिला. जशी कासवी आपल्या अमृतच्या नजरेने पिल्लांचे पोषण करते तसेच पाठीचा अमृतमय आधार पाठीवर घेऊन पृथ्वीला समुद्रात बुडण्या पासुन वाचवले. तोच कच्छ रुप परमात्मा नंदाघरी कृष्णरुपात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, चराचरात विस्तारलेला तो श्रीधर हरिरुप घेऊन गोकुळात आहे.

गगनीचा गगनी तेज पूर्ण धरणी अभंग क्र.१०३

गगनीचा गगनी तेज पूर्ण धरणी । आपणचि तरणी जगा यया ॥
ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती । वेद वाखाणिती ज्याची महिमा ॥
लोपती त्या तारा हारपे दिनमणी । तो खेळे चक्रपाणी गोपाळ माजी ॥
निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु । गोपिकासी मातु हळु हळु ॥

अर्थ: चिदाकाशात आकाश व पृथ्वी यांच्या मध्ये तो कृष्ण सूर्यनारायण बनुन तळपत आहे व जगाला प्रकाशित करत आहे. वेद ज्याची महती गातात तो कृष्णरुप धरुन गोपाळांत वावरत आहे. तो त्या गोपाळांबरोबर खेळण्यात येवढा मग्न आहे की सुर्य व तारे कधी मावळतात याचे भान त्याला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, तो खेळगडी बनलेला कृष्ण गोपाळांची खेळता खेळता गौवळींची मन जिंकत आहे.

निरपेक्षता मन अनक्षर मौन्य अभंग क्र.१०४

निरपेक्षता मन अनक्षर मौन्य । प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥
ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा । सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥
नित्यता अढळ नित्यपणे वेळे । विकाश आकळे नित्य तेजे ॥
रूपस सुंदर पवित्रआगर । चोखाळ साकार पवित्रपणे ॥
नेणे हे विषय आकार न माये । विकार न साहे तया रूपा ॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार । ऊँतत्सदाकार हरि माझा ॥

अर्थ: सर्व ब्रह्मांडात प्रकाश आहे. तो प्रकाश निरपेक्ष आहे काही न बोलता तो जगताला प्रकाशीत करत असतो. असे जे प्रकाशमय ब्रह्म कृष्ण रुप घेऊन आले असलेल्या मुळे तेच रुप दशदिशा व्यापुन टाकत आहे. ते प्रकाशरुप ब्रह्म आपल्या स्वरुपात कोणताही बदल न करता नित्य प्रकाश देण्याचे कर्म करत आहे.जे रुप प्रसंगानुसार शुध्द व निर्दोष रुप घेते ते सुरेख असुन सर्व शुध्दतेचा जनक आहे. कोणता ही विकार नसलेले ते अकार नसलेले रुप निर्गुण प्रकाशमय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात,ज्या ब्रह्माचे स्वरुप ॐ तत् सत् असे आहे तोच कृष्णरुप घेऊन साकारला आहे.

अद्वैत अमरकंदु हा घडला अभंग क्र.१०५

अद्वैत अमरकंदु हा घडला । ब्रह्मांडी संचला ब्रम्हसाचे ॥
ते रूप कारण कृष्ण तेजाकार । सर्व हा आकार त्याचा असे ॥
विराट विनटु विराट दिसतु । आपणचि होतु ब्रम्हसुख ॥
निवृत्ति कोवळे आपण सोविळे । त्यामाजी वोविले मन माझे ॥

अर्थ: त्या ब्रह्मांडाला व्यापुन राहिलेली आपल्या अद्वैत व अमरत्वाने ब्रह्मत्व घेऊन आलेला हा जगताचा ठेवा आहे. जगताचे सर्व आकार आपल्या अंगे दाखवणारा हा जग निर्मिती करणारा कृष्णच आहे. अत्यंत विराटरुप जगतस्वरुपात निर्माण करणारा तेच विराट रुप आपल्या अंगात बाळगुन आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या पवित्र, कोवळ्या व सर्वापासुन वेगळ्या असणाऱ्या रुपाने माझे मन बांधले आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading