ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.750

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५०

पृथ्वी आडणी आकाश हे ताट । अमृत घनवट आप तेज ॥१॥ नित्य हें जेवितां तेज प्रकाशत । सर्वही गोमटी ब्रह्मद्वारें । जेवणार भला जेऊनियां घाला । योगी जो निवाला परमहंस ॥२॥ चांदणा वोगरू दिसे परिकरू । नवनीत घातलें व्योमी बरवें । निळिये परवडी शाक जालें निकें । अंबट घाला तिखें प्रेम तेथें ॥३॥ गंगा यमुना तिसरीये सागरी । म्हणौनी प्रकारी क्षीर जाली । सोज्वळ ब्रह्मतेजें साखर सांजोरी । जेवितो हे गोडी तोची जाणे ॥४॥ इडा क्षीर घारी पिंगळा गूळ वरी । त्यामाजी तिसरी तेल वरी । सुषुम्नेचे रूची तूर्या आतुडली । अहनिर्शीं जाली जेवावया ॥५॥ सितल भीनला चंद्र अंबवडा । सूर्य जो कुरवडा खुसखुसित । तया दोहीं संगे भाव हेचि मांडे । मग जेवा उदंडें एक चित्ते ॥६॥ पवित्र पापडु मस्तकीं गुरुहस्त । म्हणऊनी अंकित तयातळीं । सौरसाची गोडी जयासी लाभलीसे । उपदेशितां जाली अमृतफळे ॥७॥ कपट वासनेची करूनियां सांडाई । शेवा कुरवडई गोमटी कीजे । गुरुचरणीं लाडु करूनिया गोडु । मग जेवी परवडु योगिराजु ॥८॥ गुरूपरमार्थे ग्रासूनियां भूतें । क्षेम अवकाशातें आच्छादुनी । जेवणे जेवितां ध्वनी उठे जरी अंबारी । ते सुख अंतरीं प्रेम वाढे ॥९॥ षड्रसाची उपमा देऊं म्हणों जरी । ब्रह्म रसापरते गोड नाहीं । येणे दहिभातें जेवणे हे जालें । तिखटही आलें प्रेम तेथे ॥९॥ अमृत जेविला अमृते आंचवला । सेजे विसावला निरालंबी । मन हें तांबूल रंगलें सुरंग । नव जाये अभंग कव्हणीकडे ॥११॥ कापुर कस्तुरी शुद्ध परिमळू । गोडियेसी गुळु मिळोनी गेला । सुमनाची मूर्ति सुमनी पूजिली । सुमनीं अर्चिली कनकपुष्पीं ॥१२॥ ऐसें नानापरी जेवण जालें । बापनिवृत्तीयोगियांने वाडिले । ज्ञानदेव म्हणे धणिवरी जेविलो । बापरखुमादेविवरे विठ्ठले सुखिया केलों ॥१३॥

अर्थ:-

पृथ्वीची आडणी करून त्यावर आकाशाचे ताट ठेवले आणि सारभूत आप, तेज हे अमृत वाढले. असे दिव्य जेवण जेवित असता तेज प्रकाशून ब्रह्मप्राप्तीची द्वारे जी सर्व इंद्रिये ती प्रसन्न झाली. या प्रकाराने जो परमहंस योगी जेवणारा तो जेऊन तृप्त झाला. ज्या योगाच्या ताटांत सुंदर चांदणे हेच कोणी लोणी असून

त्या आकाशाच्या निळा रंग हेच कोणी रूचकर भाजी, लोणची आहे. आणि त्यांत

अंबट तिखटाच्या जागी प्रेम आहे. गंगा यमुना व सरस्वती या एकत्र होऊन क्षीर झाल्या आहेत. शुद्ध ब्रह्मस्वरूप ते ज्याची साखर आहे. त्यामुळे जेवण्याची गोडी त्याला विशेष लागते. इडा नाडी हीच कोणी क्षीर किंवा धारणा, पिंगळा नाडी ही त्यावरील गुळ सुषुम्ना ही वेलची, त्या सुषुम्नेच्या रूचीची तूर्या सापडली.त्यामुळे रात्रंदिवस आनंदाचे जेवण झाले. शीतल चंद्र हाच वडा, व सूर्य हा खुसखुसीत कुरूडया या दोन्हीच्या बरोबर भाव भक्तीचे मांडे, एवढी भोजनाची तयारी झाल्यावर एकचित्ताने मनसोक्त जेवा. श्रीगुरूच्या कृपेचा मस्तकावरील हात हाच कोणी पवित्र पापड प्राप्त झाला. म्हणून त्याच्या चरणाचा मी अंकीत झालो. ही प्रेमाची गोडी ज्याला प्राप्त झाली आहे. त्याला गुरूनी उपदेश केला तर अमृतासारखे फळ प्राप्त होते. कपट वासनेचा परित्याग करून जीवभावाने गुरूंची सेवा करावी. श्रीगुरूचरणाच्या लाडूची गोडी करून तो योगीराज आवडीने जेवण जेवतो. श्रीगुरू परमात्मविचाराने भूतांचा ग्रास करून क्षमा अवकाशाने त्याला आच्छादन करून जेवण करणारा जेवित असता अंतर आकाशांत सोहं असा ध्वनी उत्पन्न होतो.त्यामुळे अंतःकरणात प्रेम वाढते. तर या जेवणाला षड्रसाची उपमा देऊ म्हटले तर ते ब्रह्मरसापेक्षा गोड नाही. च अशा रितीने दहिभाताचे जेवण झाले असता रूचकर म्हणजे अत्यंत प्रेमाचे तिखट तेथे प्राप्त झाले.अमृत जेवला म्हणजे परमात्मा प्राप्त झाला व त्या अमृतरूपी परमात्म प्राप्तीने अनात्मपदार्थ नष्ट झाले.आणि निरालंब जो परमात्मा त्याच्या शेजेवर विसावा घेतला. मन रूपी विडा तो परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी चांगला रंगून गेल्यामुळे त्याचा तो रंग केंव्हाही नाहीसा होत नाही. त्या विड्यांत अंगाला लावलेला कापूर कस्तुरीचा परिमळ गुळासारखा मिळून गेला म्हणजे एकरूप झाला अशा त-हेची सुमनाची मुर्ति सुमनाने पुजिली व सुमनरूपी कनकपुष्पाने अर्चन केली. बाप योगी जो निवृत्तिराय याने वाढलेले नाना प्रकारचे जेवण जेऊन मी तृप्त झालो. परंतु ही सर्व कृपा माझे पिता व रखुमाईचे पती पांडुरंगाची आहे. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *