ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.612

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१२

प्रथम नमूं तो गुरुदेवो । जेथें निमाले भावाभावो । अनादि स्वरूप स्वयमेवो । तो आदिदेवो नमियेला ॥१॥ जें हें मनाचे पैं मूळ । जेथें द्वैताचा दुष्काळ । स्वरुपी स्वरुप केवळ । तो अढळ नमियेला ॥२॥ हे जग जेणेंसि संचलें । परी कोठेही नाहीं नाडलें । जेवीं हालिया अंतराळे । तैसा सर्व मेळे असतांहि ॥३॥ ऐसा सर्वां अतीत । परी ऐसा जगभरीत । कनक कांकणी रहात । तैसा अविकृत निरंतर ॥४॥ जो मनबुद्धिसी अगोचर । तोचि झाला चराचर । हा आत्मसुखाचा विचार । आप विस्तार केला जेणें ॥५॥ तो जाणावा ज्ञप्तिरुप । निवृत्तिनाथाचे स्वरुप । एकदंत नामें ज्ञानदीप । बोधस्वरुप ज्ञानदेवा ॥६॥

अर्थ:-

ब्रह्मस्वरुप असलेल्या श्रीगुरुंच्या ठिकाणी भावाभाव मुळीच नाहीत. कारण भाव व अभाव सापेक्षिक धर्म आहेत. श्रीगुरुंच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे भाव भाव दोन्ही नाहीत. जो श्रीगुरु अनादि असून स्वतः सिद्ध जगत कारण अशा या आदिदेवास नमस्कार असो. व जो मनाचे मूळ आहे. ज्याचे ठिकाणी व्दैताचा दुष्काळ असून आपले स्वरुपाच्या ठिकाणी केवळ आपल्याच रूपानी असणारा त्यास नमस्कार असो. ज्याच्या स्वरूपांत हे सर्व जग संचले आहे. तरी त्याच्या स्वरुपात कोठेही धक्का नाही. ज्याप्रमाणे आकाशांत पुष्कळ शस्त्रे मारली तरी आकाशाचे स्वरुपात बदल होत नाही. तसा श्रीगुरुरुप परमात्मा सर्व अनात्म पदार्थात असला तरी तो सर्वाहून अतीत असून सुवर्णाच्या कंकणांत कनक राहते त्या प्रमाणे तो सर्व जगांत व्यापून असला तरी निरंतर अविकृत आहे. वस्तुतः जो मनबुद्धयादिकांना अगोचर असला तरी चराचर तोच बनला आहे. असा आत्मसुखाचा विचार ज्यानी केला आहे तोच ब्रह्मवेत्ता समजावा तो माझा निवत्तिनाथ असून प्रथमारंभी गणपतीचे वर्णन करणे आवश्य असल्यामळे मला ज्ञान देणारा बोधरूप गणपती श्रीगुरु निवृत्तिरायच आहेत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *