ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.474

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१४ वे, कर्मविधी निषेध अभंग ४७४

पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण । पंचभूतिकपण नातळे ज्यासी ॥१॥ ते स्वयंप्रमाणे घनावलेनपणें । द्वैताद्वैत की तैसें आहे ॥२॥ नामरुपाचा भेद तुटलासे संबंध । स्वये निजानंद भोगी बापा ॥३॥ सारूनी लक्ष लक्षण शास्त्राचा उगाणा । तेथ वेदादि षड्दर्शना नुमगे पाहीं ॥४॥ तयामाजीं तें असतसे निरूतें । न चोजवे पंथें नवल ज्याचें ॥५॥ म्हणोनियां परिसा चौंचिची उजरी । तेंचि निर्विकारी प्रकाशलें ॥६॥ निवृत्तिदास म्हणे हा निजभाव । बोलों नये ठाव तैसे जालें ॥७॥

अर्थ:-

त्या परमात्म्याचे स्वरूप सच्चिदानंदपदांनी बोधन करता येत नाही. त्याला वर्णावर्ण भेद स्पर्श करू शकत नाही. ते पाचमहाभूतापलीकडे आहे. ते स्वयंसिद्ध द्वैताद्वैताच्या पलीकडे आहे. त्याच्याठिकाणी नाम व रूप नसून ते केवळ सत्, चित्त, आनंदरूप आहे. हेच तुझे स्वरूप असल्यामुळे त्याचा आनंद भोगीत राहा. लक्ष, लक्षण, वगैरे विनाकारण शास्त्रांच्या खटपटी सोडून दे अशा कसोटीने ते स्वरूप चार वेद व सहाशास्त्रानांही उमगले नाही.खरोखर ते या सर्वांमध्ये आहे. परंतु यांनी ज्या मार्गानी शोध चालविला त्या मार्गानी ते सापडत नाही. हे आश्चर्य आहे. असे असूनही खरोखर चारी वेदांचा असा थोरपणा आहे की त्यांनी ते स्वरूप असे आहे असे जरी सांगितले नसले तरी ते निर्विकार आहे असे सांगितले. ते स्वरूपच आपण आहो.हे बोलून दाखविता येण्यासारखें नाहीच. परंतु याबद्दल बोलावयाचा झाले तर असे बोलावे लागते असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *