चलो देहू’- सत्याग्रहाची भूमिका पूज्य बंडातात्या कराडकर

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

चलो देहू’- सत्याग्रहाची भूमिका*
👇👇👇👇👇👇👇
ह.भ.प.बंडातात्या कराडकर

चलो देहू असा संदेश ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी दिला व वारकऱ्यांसह सर्वच जनमानसांत संदेहात्मक वातावरण तयार झाले.कोरोना रोगाचें थैमान चालू असतांना भाविकांना एकत्र येण्याचें आवाहन तसें विसंगतच वाटणार.परंतु या मागील उद्देश समजावून घेणेंही तितकेंच महत्त्वाचें आहे.
नेहमीप्रमाणें पोलीस खात्यानें आळंदीमध्यें कांहीं लोकांना एकत्र करून वारकरी क्षेत्रांत फूट पाडण्याचें पवित्र कार्य केलें व त्या ठिकाणीं व्यक्त झालेली मतें अवघ्या संप्रदायाचीं आहेत असें भासविलें.वारकरी संप्रदायांतील प्रमुख घटकांनीही याचें गांभिर्य लक्षात न घेता तटस्थतेची किंवा विरोधाची भूमिका घेतली आहे. वास्तविक समाजास भुलविणेची किंवा शासनास वेठीस धरण्याची आमची भूमिका नसून येत्या आषाढीचा महासोहळा थांबवला जाऊं नये याची ही पूर्वतयारी आहे. आपण अचानक ज्येष्ठ महिन्यांत सावध झालों तर शासन त्वरित निर्णय घेणार नाहीं व परवानगीही देणार नाहीं याचें भान ठेवून ही प्रथमची तयारी आहे. एवढ्यावरंच न थांबतां पुढे येणाऱ्या यात्रा , उत्सव व वाऱ्यांमध्यें ही भूमिका ठेवली तरच आषाढीचें ध्येय साध्य होणार आहे याची जाण असावी.


गतवर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण देशांत लाट उसळली. हे आंतरराष्ट्रीय संकट आहे याची जाणीव ठेवून पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी दिनांक 21 मार्च 2020 पासून संपूर्ण देशांतच जमावबंदीचा आदेश दिला व अवघ्या जनतेने तो शिरोधार्ह मानला.अवघ्या शतकांतील हा अभूतपूर्व ‘न भूतो न भविष्यति’ असा अनुभव जनतेनें घेतला. भारत ही त्याग व संयमाची भूमि असल्याने या ‘लॉक डाऊन’ चें कोणासही ओझें वा जुलूम वाटला नाहीं. सुमारे दोन-तीन महिन्यांचा हा एकांतवास जूनला संपून हळूहळू जनव्यवहार पूर्वपदावर येऊं लागलें. आर्थिक , औद्योगिक , शैक्षणिक इ. क्षेत्रें खुली झाली. मात्र हें सर्व होत असतांना अध्यात्म क्षेत्र व संप्रदायाच्या उपासना बंदच राहिल्या.सामान्य गावांतही प्रशासनानें पाच- दहा लोकांनाही भजन – हरिपाठ करूं दिला नाहीं. ‘नाम घेऊ नेदी देवाचें’ हें ब्रीदच जणू जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी जपले व भजन हेंच कोरोनाचें उगमस्थान मानलें.भाविकांनी हाही त्रास निमूटपणें सहन केला.

बंडातात्यांनी सरकारला नरकासुराची उपमा देत जेव्हां हिंदुंनी दिवाळीच साजरी न करण्याचे आवाहन केले तेव्हा उशिरा शहाणपण सुचून शासनानें मंदीरें खुली केलीं.मात्र त्या नजीक येणारी कार्तिक वारी व येणाऱ्या दिंड्या पूर्णपणें थांबविल्या. त्यानंतरचा ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा , सासवड , त्र्यंबकेश्वर अशाच पद्धतीने बंद ठेवले. आता बीज , षष्ठी , चैत्री वारी व त्यानंतर येणारा आषाढी सोहळा अशाच पद्धतीने बंद होण्याची ही नांदी आहे.
आतां सर्व शहरांतील लोकव्यवहार सुरळीत चालू आहेत.भाजी मार्केट , बाजार समित्या , हॉटेल , ढाबे , थिएटर्स , नाटक , इ. सह दारूची दुकानें व बियर बार ओसंडून वाहत आहेत.पुढाऱ्यांचें मेळावें , प्रचार सभा , बिनदिक्कत चालू असतांना वाऱ्या व यात्रा पूर्णपणे बंद आहेत ही विसंगती , पक्षपातीपणा का ?

कोरोना रोग अजिबात नाहीं , गर्दी टाळण्याची आवश्यकता नाहीं असें आमचें मूळिच मत नाहीं. मात्र गुलटेकडी मार्केटला रोज दहा-पंधरा हजारांची गर्दी चालते आणि देहूत मात्र अवघ्या पन्नास जणांनी यावें असा आदेश जिल्हाधिकारी कोणत्या निकषावर करतात ? बीजोत्सवाची परंपरा , त्यासाठीं पंढरपूरहून पायी येणारा वारकऱ्यांचा समूह , लळीतोत्सवासाठीं आठ दिवस सेवा करणारा फडकरी वर्ग या सर्वांना डावलून देहूकरांनी जिल्हाधिकाऱ्यांची तळी उचलावी हे काय आहे ? देहूत प्रतिवर्षाप्रमाणें लाखो लोक यावेत हा आमचा आग्रहच नाहीं. पण फक्त 50 लोकांमध्येच बीजोत्सव साजरा करावा असें म्हणतांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारांतच रोज 1000 माणसांची वर्दळ असते त्याचें काय ? आम्ही सांगितलेंप्रमाणे ‘अभी नही तो कभी नही’ हें विसरतां कामा नये. देहूचा विजय अंतिम विजय आहे. पुढें कोणतेंही आंदोलन करावेंच लागणार नाही. याचे भान ठेवून भाविकांनी निर्भिडपणे प्रचंड संख्येने यावे असे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *