326-10
हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा॥326॥
हे पाहण्याकरितांच असे मी थोडेसें बाह्यात्कारी बोललो; पण तुला विभूतीचा बोध उत्तम प्रकारे झाला हे समजून आलें.
327-10
येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥327॥
हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा ! आपलें आपण जाणां; पण सर्व जगांत तूच एक व्यापून भरला आहेस, असे मात्र मी पाहत आहे.
328-10
पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥328॥
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा ! तो पंडुसुत अर्जुन असा अभेद आणि अद्वैताचा अनुभव घेऊं लागला; परंतु संजयचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्तब्धच राहिला.
329-10
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें । हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तंव आंतुही आंधळा ॥329॥
हें पाहून, संजयला धृतराष्ट्राविषयीं थोडे दुःख झालें व तो म्हणू लागला की भगवंताचे मुखाने असा अद्वैताचा उपदेश ऐकण्याचें सद्भाग्य प्राप्त होऊनहि, हा त्या भाग्याला दूर लोटतो हें आश्चर्य नव्हे काय? हा धृतराष्ट्र आंधळा आहे; पण अंतःकरणातून आंधळा नसेल असे मला वाटत होतें, परंतु तो आंतहि आंधळाच आहे- म्हणजे त्याच्या अंतःकरणांत ज्ञानसूर्याची किरणें शिरत नाहीत असे मला आतां वाटू लागले.
330-10
परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥330॥
पण असो. याचे आपल्याला काय करायचें आहे. आर्जुन मात्र आपले वाढतें आत्मकल्याण करून घेण्याची इच्छा करूं लागला; कारण यानंतरहि त्याच्या अंतःकरणांत दुसर्या गोष्टीविषयीं भरंवसा वाटू लागला.
331-10
म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती । इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ॥331॥
संजय म्हणतो हा ह्रदयांतील अनुभव बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा आशा इच्छेच्या पावलाने त्याची बुध्दि उसळू लागली.
332-10
मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥332॥
अर्जुन हा थोर भाग्यवान होता, म्हणूनच याच दोन्ही डोळ्यांनी भगवंताच्या विश्वरूपाला मिठी मारावी अशी थोर हांव करीत होता.
333-10
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचि मुखा । तें तें साचचि करितसे येरु ॥333॥
प्रस्तुत अर्जुन कल्पतरूंची फांदी होता, म्हणूनच तिला वांझ फूल लागत नव्हतें. जी जी इच्छा त्याने बोलून दाखवावी ती ती भगवान पूर्ण करीत असे.
334-10
जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥334॥
जो प्रल्हादाच्या शब्दासाठी विषहि आपण झाला, तो श्रीकृष्ण भगवान, अर्जुनाला गुप्तरूपाने प्राप्त झाला होता.
335-10
म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे नि वृत्तीचा ॥335॥
म्हणून अर्जुन आतां विश्वरूपाच्या दर्शनाकरितां कोणत्या रीतीने प्रश्न करील हें निवृत्तिनाथांचे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढील अध्यायांत सांगणार आहे.
श्रीसद्गुरुकृपेने श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाचा मराठी अनुवाद संपन्न झाला तो श्रीसद्गुरुचरणीं समर्पण असो.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगोनाम दशमोऽध्यायः॥10॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 335 ॥
॥जय जय रामकृष्ण हरि॥
अध्याय दहावा समाप्त