*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*
*🍃प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन:🍃* *☘️भाग-१ माऊलींचे कार्य ☘️*
ज्ञानेश्वर माऊलींनी तीर्थयात्रा करून कित्येक जीवांचा उद्धार केला. नेवास्याला शिवालयात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ लिहून पूर्ण केले. अभंग, हरिपाठादी लिहून किर्तन पंरपरेची मुहुर्तमेढ रोवली आणि भागवत धर्माचा पाया घातला. त्यालाच वारकरी संप्रदाय असे म्हणतात. आता कुठलेच कार्य शिल्लक राहीले नाही. वैकुंठाहून पृथ्वीतलावरील जीवांचा उद्धार करण्याचे सर्व मार्ग तयार केले. ज्या कार्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी मनुष्यदेह धारण केला ते सर्व कार्य सिद्ध झाले. त्याचे वर्णन नामदेव महाराज पुढील प्रमाणे करतात – एक दिवस ज्ञानेश्वर माऊलींनी पंढरपुरात विठ्ठलासी हितगुज केले आणि आपले मनोगत व्यक्त केले. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचे वयाचे एकवीस वर्ष पूर्ण होवून बावीसावे सुरू होते.
पांडुरंग परमात्म्याला मोठे कौतुक वाटले. ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगदेवांना म्हणाले, “देवा, आमच्या मनाचे समाधान तुम्हीच आहात. म्हणून मी तुमच्या पायाजवळ येथेच पंढरपुरात समाधी घेईन. मला भक्ति मुक्ती काहीच नको, मला तुमच्याच चरणाची आस आहे”. ह्यावर विठ्ठलदेव म्हणाले, “ज्ञानदेवा, हे तुमचे बालणे ऐकूनच माझ्या मनाला विसावा वाटला. तुम्ही तर साक्षात ज्ञानाचे, स्वानुभवाचे सागर आहात. ज्ञानरूपच आहात. तुमच्या मनाची कळकळ मला समजली”, ज्ञानदेवांनी विठुरायांच्या चरणी मस्तक ठेवले. नामदेव महाराज तेथे उभेच होते. विठ्ठलांनी सांगीतले की तुमचे मनोरथ पूर्ण होतील. नामदेव महाराजांना माऊलींचा समाधी घेण्याचा वृतांत ऐकून खूप दुःख झाले. मनातच पुटपुटले प्रत्यक्ष ज्ञानांजन संजीवन समाधी घेत आहे तेही एवढ्या लहान वयात.
ज्ञानेश्वर माऊलींना आता निजधामाचे वेध लागले. प्रत्यक्ष विठ्ठलस्वरूपच दिसायला लागले. विठ्ठलदेव ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले, “कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपुरची यात्रा करावी. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला अलंकापुरी समाधी घ्यावी”. मग कार्तिक शुद्ध एकादशीची यात्रा करून व्दादशीला क्षीरापतीचा काला केला.
#क्रमश…..
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील
🌼#संतशिरोमणी🚩 ॥#श्रीनामदेवमहाराजचरिञ॥
प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन: #भाग-२ आळंदी महिमा
काल्याच्या महोउत्सवानंतर निवृत्तीनाथादी सर्व संत दिंड्या पताका घेवून अलंकापुरीला (आळंदी) ला निघाले. देव आळंदीचे महात्म्य सांगतात. “ज्ञानदेवा, ही इंद्रायणी म्हणजेच तीर्थ भागीरथी आहे. जी तुम्हाला नित्य स्नानासाठी दिली आहे. भागीरथी, मणिकर्णिका ह्या दोन्ही नद्या गुप्तरूपाने दक्षिणवाहीनी इंद्रायणीला मिळालेल्या आहेत. त्यामुळे ही भूमी पुण्यपावन झाली आहे. येथे स्नान केल्याने जीव वैकुंठास जातो. या सिद्धेश्वराची जो पुजा करीत तो माझा अंतरंग भक्त होईल”. सनकादिक मुनींनी पाच दिवस विधिपुर्वक मंत्रघोष केला. प्रत्यक्ष पांडुरंग आळंदीला आले. सर्व देव चहुकडे उभे होते. नारद तुंबरु वीणावादन करायला लागले. सर्वांनी जयजयकार केला. विठ्ठलांनी ज्ञानदेवाचा हात धरून आपल्या जवळ बसवले. त्याना म्हणाले, “ज्ञानदेवा तुम्ही लिहीलेले ग्रंथ वाचून लोकांची दारूण महापापे जळून जातील. तुमचे नामस्मरण जो करेल तो पूर्णत: समाधान पावून विरक्त होईल”. सर्वजण स्नानविधी आटोपून नाममंत्राचा जप करून विठ्ठलाजवळ आले. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, चांगदेव, गोरा कुंभार, आदि सर्व संतांनी विठ्ठलाची पुजा केली. सर्वजण इंद्रायणीच्या काठावर आले. तेवढ्यात नामदेव महाराजाचे पुत्र नारायणाने (नारा) आळंदीचे महात्म्य विचारले. तेव्हा नामदेवांनी प्रत्यक्ष पांडुरंगालाच अलंकापुरीचे महात्म्य विचारले. देवांनी त्या सर्व संतांना सांगीतले “एकुण अठरा आहेत. त्यातील एक म्हणजे अलंकापुर हे आहे. ह्या पवित्र पंचक्रोशीची पुरातनता फक्त ब्रह्मदेवालाच माहीत आहे. वैवस्वत मनुने इथेच हजारो वर्षे तप केले. दक्ष राजाने हजारो यज्ञ याच भुमीवर केले. कित्येक ऋषिमुनींनी येथे तप केले व मुक्त झाले”. मग सर्वत्र ज्ञानेश्वर माऊलींचा जयजयकार झाला. उपस्थित सर्व संतांना आनंदमिश्रित दुःख झाले. नामदेव महाराज व्याकुळ झाले. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताईने माऊलींची गळाभेट घेतली. निवृत्तीनाथ शांत होते. सोपानदेव व मुक्ताबाई म्हणाले, “निवृत्तीदादा जेव्हा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतांना हरवले, आई बाबांनी देहान्त प्रायश्चिता घेतले तेव्हा ज्ञानदेवांनीच आम्हाला आमचे आईबाबा होवून सांभाळीले. आम्ही ज्ञानदेवांच्या सहवासाने कृतकृत्य झालो”. ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला. सर्व संतांचे हे भावपुर्ण दृश्य पाहून डोळे भरून आले.
क्रमश…..
मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील
🌼#संतशिरोमणी🚩 ॥#श्रीनामदेवमहाराजचरिञ॥
प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन: #भाग-३ आळंदी हे गाव
ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णु, महादेव, इंद्र चंद्र, बृहस्पति यांनी आपापली विमाने घेवून अंतरिक्षात दाटी केली. यम, वरूण, गरुड, रूक्मिणी, सत्यभामा, राही माता, गोपी, प्रजापती होते. कित्येक ऋषिमुनी, गंधर्व, पिशाच्च, गुह्यक, धृव, अंबरीषादी , सर्व आले. भुमीवरील सर्व संताचा अपार मेळा इंद्रायणीच्या दोन्ही काठावर जमला. सर्व स्तुतीस्रोत्रे गाऊ लागले. . जयजयकार करत होते. नगारे, सनई, भेरी आदी मंगल वाद्यांचे वादन सुरू होते. सर्व तीर्थ हात जोडून उभे होते. ज्ञानेश्वर माऊलींना कौतुकाने व्याहाळीत होते. रुक्मिणी, सत्यभामा, राही आदि मातांनी व गोपीनी आरती ओवाळीली. नक्षत्र गायन करू लागले. चहूबाजूंनी व आकाशातून देवानी पुष्पवृष्टी केली. परिसा भागवत आदि संत आनंदाने डोलत होते. नामदेव महाराज शोकाकुलित झाले. ज्ञानेश्वर माऊलींसारखे रत्न पुढे होणे नाही हे पाहून रूक्मिणीदेवींनी ज्ञानेश्वर माऊलींचा महिमा विठ्ठलाला विचारला तेव्हा देवांनी त्यांना सांगीतले, “देवी, ञैलोक्यात हा एकच योगी व ज्ञानाची संजीवनी आहे. त्यांच्या वास्तव्याने ही वसुंधरा पावन झाली आहे. जो यांचे दर्शन घेईन तो मृत्युनंतर वैकुंठात येईल.
‘जो करील याची यात्रा । तो तारील सकळी गोत्रा |
सकळही कुळे पवित्रा | याचे दर्शने पै होता ।
जो ज्ञानेशांचे दर्शन घेईल व आळंदी यात्रा करेल त्याचे कुळ पवित्र होईल, तो सकळ कुळाचा तारक होईल. हे अलंकापुर म्हणजे फार प्राचीन, पुरातन शिवपीठ आहे. येथे भगवान शंकर सिध्देश्वर म्हणून वास्तव्यास आहेत. ब्रह्मादिकांनी येथेच तप केले. इंद्राने अमरावतीहुन (स्वर्ग) येऊन येथेच यज्ञ केले. इंद्रायणी पासून इंदोरी पर्यंत पावन पंचक्रोशीचा विस्तार आहे. येथे भागीरथी, मणिकर्णिका या गुप्तरूपाने व इंद्रायणी नदी आहे म्हणूनच हा त्रिवेणी संगमसुद्धा आहे. पूर्व दिशेला वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष जगन्माता पार्वतीदेवींचे वास्तव्य आहे. या भुमीच्या पावित्र्यामुळे येथील वृक्षराजीवर देव पक्षी रूप धारण करून क्रिडा करतात. येथे या इंद्रायणीमध्ये मानवी अस्थीं विसर्जित केल्या असता त्यांचा सुद्धा नाश होतो,
क्रमश…..
मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)|
संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील
🌼#संतशिरोमणी🚩 ॥#श्रीनामदेवमहाराजचरिञ॥
प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन: #भाग-६ बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ
देव निवृत्तीनाथांना म्हणाले, “तुम्ही त्र्यंबक शिखरासी जावे. तेथेच समाधी घ्यावी. सोपानदेवांनी कन्हेपठारी, संवत्सर ग्रामी (सासवड) समाधी घ्यावी”. मग सर्वतीर्थांना देवाने आज्ञा केली की आळंदीस इंद्रायणीला मिळावे. म्हणून मग गंगा, यमुना, सरस्वती, भागीरथी, कृष्णा, तुंगभद्रा इंद्रायणीस मिळाल्या. देव म्हणाले, “जो भक्त इंद्रायणीचे स्नान करेल। त्याला पवित्र करून वैकुंठात घेऊन यावे”. सर्व तीर्थांनी होकार दिला. मग व्यास, वाल्मिकऋषी बोलावले. त्यांचे विठ्ठलांनी पूजन केले. सर्वांनी मोठ्याने जयजयकार केला. या आवाजाने पाताळीचा शेष दचकला. विष्णु किर्तन ऐकुन त्याला स्फुरण चढले तो मग रामकृष्ण उच्चारत मृत्युलोकी आला. सहस्त्र वदनांनी स्तुती करायला लागला. सर्व स्वर्गवासी देव स्तुती करायला लागले. जयजयकार करून पुष्पवृष्टी केली. ज्ञानदेवांना म्हणाले, “धन्य धन्य विष्णुभक्ता, लोहगिरी सुवर्णाचळ त्यावरी हे अलंकापुर बसवले आहे. येथील लोक धन्य आहेत. येथे जो किर्तन करेल तो चतुर्भुज विष्णु होवून वैकुंठात निवास करेल”. देव इंद्राला म्हणाले, “देवराज इंद्र पूर्वी तुम्ही येथेच राहत होता”. इंद्र म्हणाले, “हे थोर विष्णुभक्त प्रत्यक्ष हरिहरच आहेत. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर हेही हरिचेच अवतार आहेत. ज्ञानदेवा, जोवर सूर्य, चंद्र, तारे राहतील तोपर्यंत तुमची समाधी स्थिर राहील. देव म्हणती ज्ञानेश्वरा । जोवरी चंद्र सूर्य तारा | तोवरी तुझी समाधी स्थिरा | राहो राहो रे निरंतर ॥’ तुम्ही भगवान कृष्णांनी सांगीतलेल्या गीतेची भावार्थदिपिका नावाची टिका लिहीली. कलियुगात भक्त या ग्रंथाच्या वाचन श्रवणानेच मुक्त होतील. अमृतानुभवा सारखा भक्तीची परिसिमा सांगणारा ग्रंथ लिहून भक्तांवर फार मोठी कृपा केली. तुमचे अभिनंदन असो’. विठ्ठलाचे हे बोलणे ऐकुन ज्ञानेश्वर माऊलींना गहिवरून आले. त्यांनी विठ्ठलाची स्तुती केली. नंतर सर्व संत, ऋषी, देव, सिद्धेश्वराजवळ आले. नंदी सरकवून विवराची शिळा काढली. मृगाजिनाचे आसन टाकले. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. तीन वेळा तेव्हा माऊलींनी हात जोडले. विठ्ठल व निवृत्तीनाथांनी स्वहस्ते समाधी दिली. निवृत्तीनाथ म्हणाले, *”निवृत्ती म्हणे सांगतो या वाचे । राहणे चौघांचे एकरूप”,* नामदेव महाराज समाधी प्रसंगाचे वर्णन करतात,
“देत निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर । जाती ज्ञानेश्वर समाधीसी ।। नदिचिया माशा घातले माजवण | तैसे जनवन कालवले ।। दाही दिशा धुंद उदय अस्ताविण । तैसेची गगन कालवले ।। जाउनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा । पादमदमी ठेवा निरंतर ॥ तीन वेळ तेंव्हा जोडली करकमळे । झाकियेले डोळे ज्ञानदेवे ॥
भीममुद्रा डोळा निरंजन मैदान | जाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥ नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ।”
अशा प्रकारे अवघ्या तरूणवयातच माऊलींनी आपले अवतार कार्य संपवले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण त्रयोदशी, शके १२१५, गुरूवार. अलंकापुर म्हणजेच आळंदीचा महिमा नामदेव महाराज सांगतात,
क्रमश…..
मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील
·
🌼#संतशिरोमणी🚩 ॥#श्रीनामदेवमहाराजचरिञ॥ #प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन: #भाग- ७ देव ते संत
“आळंदी हे गांव पुण्यभुमी ठाव । दैवताचे नांव सिद्धेश्वर ।। चौन्यांशी सिद्धांचा सिध्दबेटी मेळा । तो सुख सोहळा काय सांगू ।।
विमानाची दाटी पाहती सुरवर | वर्षताती भार सुमनांचे ॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांती घ्यावया कल्पवरी ।।” माऊली समाधिस्त झाले. नामदेवांना काही करमेना. इतक्या दिवसाचा सहवास नुसता सहवासच नाही तर माऊलींचे सोबत असणे म्हणजे ब्रह्मरसाची मेजवानी. फार वात्सल्य, प्रेम, आदर आणि उर्जा होती त्यांच्या सानिध्यात तहानभुकेने व्याकुळ व्हावे किंवा माशाने जळाशिवाय तळमळावे तसे नामदेव महाराज माऊलींच्या विरहाने कासाविस झाले. डोळे त्यांच्या आठवणीने भरून आले. पांडुरंग परमात्मा ज्ञानदेवांना म्हणाले, “नामदेवा चला आता पंढरपुरला परत जाऊ. ज्ञानेश्वर समाधिस्त झाले. आता यानंतर एक एक करून या इहलोकीची यात्रा संपवतील”. परंतु नामदेव महाराजांना पंढरपुरला परत जायची इच्छाशक्ति नव्हती. आळंदीला त्यांचे जसे काही अमूल्य रत्न हरवले. ज्ञानेश्वर माऊली एक संतरत्नच तर होते. म्हणून त्यांना संत शिरोमणी म्हणतात. नामदेव महाराज पांडुरंगदेवाला म्हणाले, “देवा, माझी इच्छा नाही. मी ज्ञानेश्वराशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही. तुम्ही त्यांना एकदा तरी मला दाखवा. माझा जीव कासाविस होत आहे. मी त्यांच्या भेटीशिवाय इथून निघणार नाही”. नामदेव महाराज लहानमुला सारखा हट्ट धरून बसले. पांडुरंगदेवांनी नामदेव महाराजांना समजावले. .
“देव म्हणे नाम्या पाहे।ज्ञानदेव मीच आहे॥
तो आणि मी नाही दुजा।ज्ञानदेव आत्मा माझा।
माझ्या ठायी ठेवी हेत।सोड खंत खंडी व्दैत॥
नाम्या उमज मानसी।ऐसे म्हणे हृषीकेशी॥
नामदेवा मलाच तु ज्ञानदेव रूपाने पहा. माझा आत्मा ज्ञानदेव आहे. संत हे देवरूपच आहे. “यावर नामदेव महाराजांचे काही समाधान झाले नाही. ते पांडुरंगरायाला म्हणाले, देवा तुमचे ब्रह्मज्ञान तुमच्यावळच ठेवा देवा । ब्रह्मज्ञान पोटी ठेवा || मला ज्ञानदेव दाखवाच”. रूक्मिणी देवींनी देवाला समजावले, “देवा नामदेव तुमचा लाडका भक्त आहे. तुमचे लेकरूच आहे. श्रीमंत आईवडील जसा लाडक्या लेकराचा हट्ट पुरवतात तसा तुम्ही नामदेवाचा हट्ट पुरवा”. प्रत्यक्ष पांडुरंग ज्याचा पिता व रूक्मिणी ज्यांची माता त्या नामदेव महाराजांचा हट्ट पुर्ण होईलच. मग पांडुरंगपरमात्मा गरूडाला म्हणाले, “पक्षीराज भक्त पुंडलिकाला जाऊन सांगा नामदेव ज्ञानदेव भेटीसाठी व्याकुळ झालेले आहेत. त्यांना विमानात बसून घेऊन या”. भक्त पुंडलिक ज्ञानदेवरायांना घेऊन आले. नामदेवमहाराज आणि माऊलींची गळाभेट झाली. समाधिस्त झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली व नामदेवांची भेट देवांनी घडवून आणली. नामदेव महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी चरणस्पर्श केला. कितीतरी वेळ अश्रृंचा पूर वाहत होता. काय बोलावे काही सुचेना. नामदेव महाराजांनी आपले मनोगत माऊलीपुढे व्यक्त केले. ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांना म्हणाले, “नामदेवा तुम्ही विठ्ठलाचे प्रिय भक्त आहात. भक्त श्रेष्ठ आहात. हरिदासामाजी होसी तू आगळा | प्रेमाचा पुतळा नामदेव ||” नामदेव महाराजांचे माऊलींच्या दर्शनाने समाधान झाले.
क्रमश…..
मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील
