श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 6 ते 10

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

_6) श्री गजानन महाराज, शेगाव_

जन्म: ज्ञात नाही, माघ वद्य ७, १८०० म्हणजेच दिनांक २३-२-१८७८ रोजी शेगाव मध्ये प्रकट झाले,

आई/वडील: ज्ञात नाही

वेष: दिगंबर

कार्यकाळ: १८७८ ते १९१०

समाधी/निर्वाण: ऋषीपंचमी ८-९-१९१०, भाद्रपद शुक्ल पंचमी

चरित्र ग्रंथ: श्री गजानन विजय चरित्र ग्रंथ (लेखक: दासगणू महाराज )

_गजानन महाराजांचे प्रकटीकरण_ 

                 वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. “गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

                कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.

               श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्रीगजाननविजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत.

                एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळीअक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले. 

              त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करुन लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले. येथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिरामबाबांजवळ आले व ४- ५ दिवस तेथे राहिले. गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेच्यावेळी मणिरामबाबांनी संत गजाननास आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले. दोघांनीही अंतरज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले कि, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थाजवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तू माझे किर्याकर्म करून शेगांवला भक्तांचा उध्दार करण्याकरिता जावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिध्दीप्राप्ती शिकविली व आपल्या काही शक़्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशाप्रकारे गजानन नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगांवला आले.

              सुमारे  ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले.  महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

               ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली.  दि. ०८ सष्टेबर १९१० रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले आहे.

_संदर्भ- माहीती व आंतरजाल_

_संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839_

_✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_

_इति सुर्यार्पणमस्तु_

_श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 7 वे- “प. पु. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती महाराज (टेंबे स्वामी)”_

_7) प. पु. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती महाराज (टेंबे स्वामी)_

जन्म: आनंद नाम  संवत्सर. श्रावण वद्य ५ अग्निहोत्री कऱ्हाडे ब्राम्हण कुळात.

आई/वडील: रमाबाई /गणेशभट्ट.

कार्यकाळ: १८५४-१९१४.

विवाह: २१व्या वर्षी १८७५ ला अन्नपूर्णबाईशी विवाह, १८९१ पत्नीचे निधन. 

संन्यास: पत्नीचे निधनानंतर १३ व्या दिवशी.

गुरु: मंत्रोपदेश- गोविंदस्वामी (नरसिह सरस्वती), संन्यास दीक्षा- श्री नृसिंहसरस्वती स्वामी.

समाधी: १९१४ आषाढ शुद्ध प्रतिपदा, गरुडेश्वर येथे.  

शिष्य: श्री रंग अवधुत, श्री गांडा महाराज, योगीराज श्री गुळवणी महाराज.

_जन्म व बालपण_ 

              एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. 

             कोकणातील श्री क्षेत्र माणगाव येथे श्री हरिभट टेंबे या दत्तोपासकाचे वास्तव्य होते. त्यांचे थोरले चिरंजीव श्री. गणेशपंत टेंबे हे मुळचेच विरक्त होते. वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा श्री. गणेशपंतांनी उचलला होता. ते दररोज श्री दत्तपादुकांची पूजा व श्रीगुरुचरित्राचे वाचन करीत असत. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीदत्तरूपाने श्री गणेशपंत टेंब्यांच्या घरी अवतार घेतला. नवजात बालकाचं बाराव्या दिवशी थाटात बारसं झालं आणि बाळाचं नाव ‘वासुदेव’ ठेवण्यात आलं. 

             बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचं अध्ययन त्याने केलं होतं. वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले. 

                श्रीवासुदेवशास्त्रीबुवांचा विवाह त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी श्रीबाबाजीपंत गोडे यांची कन्या अन्नपूर्णाबाईशी झाला व तद्नंतर त्यांनी ‘स्मार्तागी’ उपासना सुरू केली. त्या सोबत श्रीगायत्री पुरश्चरण आणि ज्योतिषाचा अभ्यास चालू होताच. वडिलोपार्जित दत्तभक्तीचा वारसा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांकडे आला होताच. अखंड वेदाध्ययन, वैयक्तिक साधना आणी त्यासोबत पीडितांना मार्गदर्शन यांची त्याला मिळालेली जोड, यामुळे ते लहान वयातच उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी बनले. परिणामस्वरूप त्यांना स्वप्नदृष्टांतासह श्रीदेवांची (भगवान श्रीदत्तात्रेय) वाणी ऐकू येत असे. संत नामदेवांबरोबर ज्याप्रमाणे श्रीविठ्ठल बोलत असे, त्याप्रमाणे भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांचं संपूर्ण जीवन त्या पथप्रदर्शक श्रीदेववाणीच्या प्रकाशातच व्यतीत झालं, एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्या त्या सर्वांचं जीवन त्यांनी त्या वाणीसामर्थ्याद्वारे उजळून टाकलं. 

             कोकणातील माणगाव येथील ही घटना आहे. एका गृहस्थाच्या घरी दुभती गाय होती. ती त्या दिवशी काही केल्या दूध काढू देईना. ती गाय लाथा झाडीत असे. त्या गृहस्थाला कुणी तरी गावातील श्री गणेशभट टेंबे यांच्या मुलाचे नाव सुचविले. त्याचे नाव वासुदेव. वासुदेवाला  (श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज) मंत्रांची माहिती होती. गाय दूध दईनाशी झाली होती, तीच्यावर मंत्राप्रयोग करण्यासाठी टेंब्यांच्या वासुदेवाला आमंत्रण देण्यात आले. वासुदेव त्या गृहस्थाच्या घरी उपस्थित झाला आणी त्याने त्या धिंगाणा घालणाऱ्या गायीवर मंत्रप्रयोग केला. मंत्रप्रयोग केल्यानंतर, लाथा झाडणारी ती गाय अगदी शांत झाली होती; मग ती दूध काढू द्यायला तयार झाली. वासुदेव हा एकपाठी होता. एकदा वाचलेली गोष्ठ त्यांची तोंडपाठ होत असे. वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने ऋग्वेद संहिता, पदे, घन, इत्यादीचा अभ्यास केला होता. याच वेळी तो दशग्रंथी ह्या नावाने प्रसिध्यी पावला. गुरुचारीत्राचा पाठ तो प्रतिदिनी वाचत असे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून लोक टेंब्यांच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले. त्या वेळी उज्जैनीला जाण्यासाठी म्हणून शास्त्रीबुवा नर्मदा तीरावरच्या मंडलेश्वर ह्या गावी आलेले होते. तेथे कैवल्याश्रम नावाचे थोर सत्पुरुष वास्तव्य करीत होते. शास्त्रीबुवांनी स्वामींची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी स्वामींनी मी तुम्हाला दंड देतो असे सांगितले. त्यामुळे शास्त्रीबुवा उज्जैनीला न जाता मंडलेश्वरलाच राहिले. त्याच रात्री श्रीदत्त भगवान हे शास्त्रीबुवांच्या स्वप्नात गेले व त्यांना विचारू लागले की तुम्ही माझी आज्ञा उल्लंघन करणार की काय? दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शात्रीबुवानी स्वप्नातली सारी हकिकत कैवल्याश्रमस्वामींच्या कानावर घातली. हे ऐकल्यावर स्वामींनी शास्त्रीबुवाना दंड दिला नाही.

                 नंतर शास्त्रीबुवा तेथून निघून उज्जैनीला येऊन पोचले. तिथल्या दत्त मंदिरात जाऊन शास्त्रीबुवांनी नारायणस्वामींची भेट घेतली व त्यांना नमस्कार करून मंडलेश्वर गावी, कैवल्याश्रमस्वामींकडे घडलेली हकिकत निवेदन केली. त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले, अनिरुद्धस्वामी हे माझे सद्गुरूमहाराज आहेत. त्यांनी जर जर का आज्ञा केली तर मला तुम्हाला दंड देता येईल. एरवी दंड देता येणार नाही. शास्त्रीबुवा अनिरुद्धास्वमींकडे गेले व त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून आपली सारी हकिकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा ते म्हणाले, फार उत्तम. नंतर स्वामींनी नारायणस्वामींना बोलावून घेतले आणि शास्त्रीबुवाना दंड देण्या विषयी आज्ञा केली. जेष्ठ वद्य द्वितीयेच्या दिवशी शास्त्रीबुवाना दंड देण्याचा विधी झाला, आणि त्यांचे नाव वासुदेवानंदसरस्वती असे ठेवण्यात आले. त्या दिवसापासून सारे लोक शास्त्रीबुवांना, वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज म्हणू लागले. त्या दिवशी वासुदेवानंदानी नारायणस्वामींबरोबर भिक्षा केली. श्री दत्तमहाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही. वासुदेवानंदांना ओकाऱ्या सुरु झाल्या. कितीही उपाय केले तरी त्या थांबत नव्हत्या. नारायणस्वामी घाबरून गेले. श्री दत्तमहाराजांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे हा सारा प्रकार झाला असे कळताच नारायणस्वामींनी. श्री दत्तमहाराजांना वंदन करून त्यांची प्रार्थना केली. दत्तमहाराज! हा आपला शिष्य आहे. व मीही आपलाच शिष्य आहे. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. आणि ह्या आपल्या शिष्याला आपण बरं करा. ह्या पुढे आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही कार्य यांना कधी सांगणार नाही व त्यानंतरच वासुदेवानंदांच्या ओकाऱ्या थांबल्या.

           नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय.

              श्रीक्षेत्र माणगाव येथे श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी स्थापन केलेलं श्रीदत्तमंदिर, हा त्या श्रीदेववाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे. यापुढील सात वर्षे आपण माणगावमध्ये राहणार आहोत, ह्या शब्दांमध्ये श्रीदत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केलं आणि माणगावात श्रीदत्तमंदिराची स्थापना करवली. ते वर्ष होतं सन १८८३ भगवान श्रीदत्तात्रेय आणि श्रीवासुदेवशास्त्रीबुवा, ह्या देव-भक्ताच्या आल्हाददायक लीलांना साक्षी होण्याचे भाग्य माणगावकरांना लाभले. तसेच हजारो भक्तांनी श्रीदत्तात्रेयांच्या तेथील सान्निध्याचा अनुभव घेत आपले लौकिक आणि पारलौकिक कल्याणही साधून घेतले. माणगावचे श्रीदत्तमंदिर हे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचाच एक भाग आहे, अशी धारणा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांची होती. 

                 अशाप्रकारे सात वर्ष गेल्यानंतर एके दिवशी वासुदेवशास्त्रीबुवांनी माणगाव सोडण्याची श्रीदेवांची आज्ञा झाली. जितक्या आत्मीयतेने श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी ते दत्तस्थान उभारलं आणि वाढवलं होतं, तितक्याच निरपेक्षेतेन आणि तत्परतेने त्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह पौष मासात सन १८८९ मध्ये श्रीक्षेत्र माणगाव सोडले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला. 

                 तीर्थयात्रेदरम्यानच ह्या दंपतीला एक पुत्र झाला होता, परंतु तो जन्मत:च मृत झाला. त्या नंतर गंगाखेड इथे सन १८९१ मध्ये त्यांना सतत साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींचे अल्प आजारानंतर देहावसान झाले. प्रापंचिक असले, तरी मुळात वृत्तीने संन्यासीच असणाऱ्या श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी पत्नीचं और्ध्वदेहिक उरकल्यावर चौदाव्या दिवशी विधिपूर्वक संन्यास ग्रहण केला. त्याच वर्षी श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्यांनी उज्जयिनी येथील श्रीनारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंड ग्रहण केला आणि त्यांनी त्यांचे नाव ‘वासुदेवानंद सरस्वती’ असे ठेवले. 

           टेंब्ये स्वामींचे संन्यास घेतल्यानंतरचे नाव श्री वासुदेवानंद सरस्वती असे होते. धर्माशास्त्राचे सारे नियम ते काटेकोरपणे पाळीत. भिक्षाटन करीत. त्यांचे अखंड भ्रमण चाले. स्वामी गावागावांतून प्रवचने करीत. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली, अनेक तीर्थयात्रा केल्या. अति-अवघड अशी व्रते केली आणि अनुभूती व अनुभवातून जे ज्ञान प्राप्त झाले ते उपदेशरूपाने साधकांना सांगत असत. 

         श्री दत्तमाहात्म्य, श्रीगुरुदेव चरित्र, शिक्षात्रयम्, श्री दत्तचंपू, श्रीसत्यदत्त पूजाकथा, नित्य उपासनाक्रम अशी श्री महाराजांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे.

                ‘सर्व भरतखंडात पायीच संचार करून उपदेश करावा, ईश्वरनिष्ठा व स्वधर्मनिष्ठा जागृत करावी,’ हा श्रीदत्तात्रेयांचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी भारतभर तेवीस चातुर्मास केले. संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर भारत आणि गुजरात क्षेत्रात त्यांचा विशेष संचार होता. नर्मदाकिनारीचा प्रदेश आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे त्यांचे अधिकांश कार्य घडले. त्यांच्या तपोनिष्ठ जीवनात देहकष्ट, हालअपेष्टा, उपेक्षा आणि मानहानीचे अनेक प्रसंग आले. परंतु कोणत्याही संकटात लोकोद्धाराच्या कार्यापासून आणि सद्गुरुनिष्ठेपासून ते तसूभरही ढळले नाहीत, इतकी वज्रासारखी अभेद्य कणखरता त्यांच्याकडे होती. ते जिथे जात तिथे भक्तांची प्रचंड गर्दी होत असे. श्रीस्वामी महाराजांच्या पुढ्यात फळे, प्रसाद आणि पैशांचा ढीग पडत असे. रोज सर्वांना पक्वान्नाचं भोजन दिले जात असे परंतु स्वत: श्रीस्वामी महाराज मात्र केवळ भिक्षान्न घेत असत.  

                   संन्यास ग्रहणानंतर त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून राजमहेंद्रीपर्यंत भारत-भ्रमण केले आणि शास्त्राचरणाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली, दत्तोपासनेचा प्रचार केला आणि उपासनेला सदैव प्रेरक ठरेल अशा मौलिक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी सर्व प्रवास पायी केला. त्यांची ही पदयात्रा केवळ दोन छाट्या, दोन लंगोट्या व एक कमंडलू एवढ्याच साहित्यानिशी चालू असे. उज्जयिनी, ब्रह्मावर्त, बदरीकेदार, गंगोत्री, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर नरसी, बढवाणी, तंजावर, मुक्ताला, पवनी, हाबनूर, कुरगड्डी, गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी संन्यस्त जीवनातील चातुर्मास काढले. यावरून त्यांच्या संचाराची व्याप्ती समजून येईल. गरुडेश्वर येथे असतानाच आषाढ शु. प्रतिपदा शके १८३६ या दिवशी रात्री श्रीदत्तात्रेयाच्या समोर उत्तराभिमुख अवस्थेत त्यांनी निजानंदी गमन केले. गरुडेश्वराला त्यांचे समाधीमंदिर आणि दत्तमंदिर बांधलेले असून तेथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. 

                 श्रीस्वामी महाराजांचा शेवटचा, म्हणजे तेविसावा चातुर्मास श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे झाला. तिथे वैशाखामध्ये त्यांची प्रकृती बिघडली. ‘औषध घ्या’ असं सांगणाऱ्यांना ते म्हणाले, “या देहाला दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे. त्या वेळी कोणी औषध दिले ? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो याही वेळी आहेच. त्याची इच्छा असेल तसे होईल.” 

                 श्रीस्वामी महाराजांची श्रीनर्मदामातेवर अपार श्रद्धा होती. मातेन कुमारिकेच्या रूपात स्वामींना वेळोवेळी दर्शन दिलं होतं. ‘श्री स्वामी महाराजांनी आपल्या तीरावर वास करून आपल्याला धन्य करावे, ही मातेची इच्छा तिनेच पूर्ण करवून घेतली. मायलेकरातील हे मर्मबंध शेवटपर्यंत अतूट राहिले. आषाढ शुद्ध प्रतिपदा, मंगळवार दि. २३ जुन १९१४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीस्वामी महाराजांनी  श्रीनर्मदामातेच्या कुशीतच चिरविश्रांती घेतली. 

_संदर्भ- माहीती व आंतरजाल_

_संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839_

_✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_

_इति सुर्यार्पणमस्तु_

_🌺श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 8 वे- “श्री माणिकप्रभु”🌺_

_8) श्री माणिकप्रभु_

जन्म: २२/१२/१८१७, मोगलाईत, निजाम राज्यात लाडवन्ती कल्याण गावी, अश्वलायन देशस्थ ब्राह्मण, 

आई/वडील: बायजाबाई/मनोहर नाईक

कार्यकाळ: १८१७ ते १८६५

संप्रदाय: सकलमत संप्रदाय            

गुरु: दत्तावतार

समाधी: मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १८६५,  २९ नोव्हेंबर १८६५, गिता जयंतीच्या दिवशी माणिक नगर येथे.

_जन्म व बालपण_

                  माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, शके १७३९ या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात. माणिकप्रभूंचा हा दत्तावतार हिंदू व मुसलमान धर्मात सारखाच लोकप्रिय आहे. दोन्ही धर्माच्या लोकात त्यांचे अनेक भक्त आहेत. हा अवतार मोगलाईत निजाम (हैदराबाद) राज्यात, कल्याण गावी मनोहर नाईक व बायजाबाई या दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. श्रीदत्त भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना तीन मुलगे झाले.

१) हणमंत (दादासाहेब

२) माणिकप्रभु व

३) नरसिंह (तात्यासाहेब)

                 मनोहर नाईकांना दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रुपाने या दांपत्याच्या पोटी सन १८१७ मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी त्या बालकाचे नाव ‘माणिकप्रभु’ ठेवण्यात आले. त्याचे अनुपम तेज पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दर्शनाला येत असत. कल्याण गावातील अधिकारी नबाब साहेबांची मनोहपंतांच्या कुटुंबावर पूर्ण कृपादृष्टी होती; त्यामुळे माणिकप्रभूंची व्यवस्था लहानपणापासून एखाद्या राजयोग्याप्रमाणे होती. त्यांच्या अंगावर हजारो रुपयांचे हिरे माणकांचे दागिने असत. त्यांच्या रक्षणासाठी पाच सहा अरब रोहिले शिपाई नबाबांनी ठेवले होते. पाचव्या वर्षानंतर श्रीप्रभूंची खेळकर वृत्ती वाढत गेली. कल्याण गावात माणिकप्रभू नावाचा दत्ताचा अवतार झाला आहे अशी बातमी गावभर पसरली. दर गुरुवारी लोक दर्शनाला येऊ लागले. सातव्या वर्षी श्रीप्रभूंची मुंज मोठ्या थाटाने झाली. सर्व ब्रह्मकर्म श्रीप्रभूंना मुखोद्गत होते. हा चमत्कार पाहून शास्त्री, पंडितही थक्क होत असत.

               प्रभु कधी शाळेत गेले नाहीत; परंतु लहानपणापासूनच त्यांना तेलगू, कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत आणी मराठी इतक्या भाषा लिहिता, वाचता व बोलता येत असत. चार वेद, सहा शास्त्रे व उपनिषदे यातही ते पारंगत होते. हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, अशी त्यांच्याविषयीची श्रद्धा त्यांच्या लहानपणापासूनच पसरत चालली होती. त्यांचे दर्शन, स्पर्शन आणि भाषण अमोघ असल्याचा प्रत्यय अनेकांना येत असे. त्यांना कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत व मराठी या भाषा उत्तम तर्‍हेने अवगत होत्या. शास्त्रचर्चेंत पंडितही त्यांच्यापुढे फिके पडत. ‘जणू वयसेचिया गावां न जातां’ बाळपणीच सर्वज्ञतेने त्यांना वरले होते. अभिजात सिद्धींचा प्रत्यय अगदी लहानपणापासूनच येऊ लागल्यामुळे त्यांच्या साधुत्वाचा डंका लवकरच सर्वत्र झडू लागला. भालकी गावाजवळील एका जंगलांतील गुहेत ते एक वर्षभर समाधी लावून बसले होते. हुमणाबादेजवळील अरण्यात त्यांनी एका बेलाच्या झाडाखाली निवास केला. तिथेच त्यांच्या नावाने ‘माणिकनगर’ वसले.

                  श्री समर्थ अक्कलकोट स्वामी एकदा प्रभूंच्या भेटीला आले. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली, चर्चा झाली. नंतर एकदा शृंगेरीचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीप्रभूंच्या भेटीस आले होते. जगद्गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवली. त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभही मोठ्या थाटाने झाला, त्यांना निरोप देताना श्रीप्रभू त्यांना पोहोचवण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.

              श्रीप्रभूंनी पुष्कळ प्रवास केला व चमत्कार केले. मुधोळ गावच्या पहाडातील गुहेत ते समाधी लावून बसत असत. मुधोळ संस्थानात फिरत असता एकदा एका वडार्‍याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. श्रीप्रभूंनी आपल्या कृपाशीर्वादाने त्याचे प्राण वाचवले. एक ब्राह्मण कुटुंब श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत चोरांनी त्यांना लुटले. ते श्रीप्रभूंची प्रार्थना करू लागले. चोरांनी ब्राह्मणाला मारण्यासाठी शस्त्र उगारले. पण त्यांचे हात वरचे वर थिजले. चोरांनी श्रीप्रभूंची प्रार्थना केली. ते श्रीप्रभूंना शरण आले. नंतर त्यांचे हात मोकळे झाले. श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाचे कोटकल्याण केले.

               यानंतर श्रीप्रभु तेथे एका शिवालयात राहू लागले. सरकारी अधिकार्‍यांनी तेथे येऊन शिवालय व आजूबाजूची जागा स्वच्छ केली. श्रीप्रभूंच्या राहण्याची व्यवस्था केली. पाच दिवस मोठा समारंभ झाला. सरकारने कोठी लावून दिली. आलेल्या भक्तांची व्यवस्था केली. अशा रीतीने ‘माणिकनगर’ ची रचना झाली. कल्याणहून मातोश्री व तात्यासाहेब तेथे राहण्यासाठी आले, पण प्रभूंनी त्यांना परवानगी दिली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी किंवा गुरुवारी येण्याची आज्ञा दिली. इतर आंधळे, पांगळे, यात्रेकरु, सेवेकरिता राहिलेले रुग्ण यांची व्यवस्था भांडारखान्यातून केली. भक्तांनी श्रीप्रभूंची गादी स्थापन केली. भक्तांच्या आग्रहाखातर श्रीप्रभू त्या गादीवर बसू लागले. जवळच दत्तगादीही स्थापन केली होती. तेथेही नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन होत असे.

               श्रीप्रभूंचे आंधळ्या पांगळ्यांवर, गरिबांवर जास्त प्रेम असे. हिंदू-मुसलमान दोन्ही भक्तांवर ते सारखेच प्रेम करीत. एके दिवशी कोणालाही न सांगता प्रभू घराबाहेर पडले. हुमणाबादपासून २० कोस दूर असलेल्या ‘मंठाळ’ गावात ते पोहोचले. हे कळताच श्रीप्रभूंचे वडील व आई तात्यासाहेबांना बरोबर घेऊन श्रीप्रभूंना भेटले. श्रीप्रभु आईवडिलांना म्हणाले की, श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपर्यत तुमच्या जवळ राहिलो. आता आम्हास सर्वत्र संचार करून भक्त जनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. तरी आमच्याविषयी दु:ख न करता घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत ते गुप्तरीतीने राहिले. ही गुहा अद्याप तेथे असून तिला माणिकप्रभूंची गुहा असे म्हणतात.

               नंतर श्रीप्रभु घरी आले लोकांना ही बातमी कळताच लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीप्रभूंपुढे रुपयांचा ढीग पडू लागला. श्रीप्रभू ते सर्व पैसे गोरगरीबांना वाटून टाकत. पुढे पाच वर्षांनी श्रीप्रभूंच्या वडिलांचे मनोहरपंताचे निधन झाले. श्रीप्रभूंनी दादासाहेबांकडून उत्तरक्रिया करविली. नंतर मैलार गावी जाऊन त्यांच्या कुलदैवताची खंडोबाची महापूजा केली, त्याचे दर्शन घेतले व हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले. मैलारहून पुन: आपल्या गावी कल्याणला आले. त्या वेळी धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न लावून दिले.

              या उदार समन्वयदृष्टीने माणिक प्रभूंच्या अनुयायी वर्गात हिंदूंबरोबर मुसलमानांचाही मोठा भरणा होता. हिंदूंतील लिंगायत पंथही त्यांना मानीत असे. ‘‘अतिथि-पांथस्थ, तडी-तापडी, पंगु- रोगी या सर्वांना प्रभूंचे संस्थान हे एक विश्रामस्थान झाले होते. गरिबांचे दारिद्र्य जावे, निपुत्रिकांस संततिलाभ व्हावा, रोग्यांना आरोग्य प्राप्त व्हावे, संसारक्लान्त जीव समाधान पावावे,’’ असे त्यांच्या परिसरांतील वातावरण होते. असे योगेश्वर कृष्णासारखे दिव्य जीवन व्यतीत करून माणिकप्रभूंनी मार्गशीर्ष शु. ११, श. १७८७ या दिवशी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या अवतारकार्यामुळे दत्त संप्रदायाच्या प्रसाराला आणि प्रगतीला फार मोठी गती मिळाली. समन्वयाच्या वृत्तींतून निर्माण झालेली दत्तदेवता जणू समन्वयाचे प्रात्यक्षिक आचरण्यासाठी या भूतळावर माणिक प्रभूंच्या रूपाने अवतरली आणि तिने योग व भोग यांचा सुमेळ साधून दाखविला.

_संदर्भ- माहीती व आंतरजाल_

_🌺संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839🌺_

_✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_

_🙏🏼इति सुर्यार्पणमस्तु🙏🏼_

_श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 9 वे- “श्री जंगली महाराज, पुणे”_

_9) श्री जंगली महाराज, पुणे_

जन्म: ख्रिस्ताब्द १८०३

आईवडिल: ज्ञात नाही

कार्यकाळ: १८०३-१८९०

गुरु: नाथपंथीय स्वरूपनाथजी 

समाधी: चैत्र शु.१४ दि.४-४-१८९० पुणे येथे

_जन्म व बालपण_

           महाराजांचा जन्म वैशाख शुद्ध ५ या दिवशी कर्नाटकात झाला. हुबळीजवळ एका खेड्यात त्यांचे वडील अध्यात्म चिंतनात आपला काळ घालवीत होते. ब्राह्मणोचित अशा आठव्या वर्षी त्यांचे उपनयन झाले. लवकरच माता व पिता यांच्या वियोगाचा प्रसंग त्यांच्यावर आला. तेव्हा आपल्या नातेवाईकाकडे ते राहू लागले. पण एका संध्याकाळी कोणी एक योगीपुरुष आला आणि त्याने महाराजांना घराबाहेर बोलाविले ते कायमचेच. त्यानंतर महाराज पुन्हा त्या घरातच काय पण गावातही गेले नाहीत. त्या पुरुषाने महाराजांना आपल्याबरोबर नेले. पदयात्रा करीत हे दोघेही माहेश्वर येथे गेले. त्याठिकाणी विश्वरूपानंद महाराज नांवाचे एक मोठे योगी होते. त्यांच्या स्वाधीन महाराजांना करुन तो पुरुष अदृश झाला. श्री विश्वरूपानंद महाराज यांच्याकडे त्यांनी योगाभ्यास केला. त्यात त्यांना पूर्णत्व आल्यावर श्री महाराजांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. केवळ एक वस्त्र व कमंडलु हे त्यांचे या यात्रेतील सहायक होते. नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ते हिमालयात गेले. तेथे १२ वर्षेपर्यंत त्यांनी वास्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी नाथसंप्रदायाची दीक्षा घेतली. तेंव्हा त्यांचे दीक्षा नाव ‘जागरनाथ’ असे ठेवले गेले. त्यानंतर त्यांनी नाथसंप्रदायी लोकांबरोबर बराच प्रवास केला.

               सद्गुरू श्रीजंगलीमहाराजांचा जन्म ख्रिस्ताब्द १८०३ मध्ये बडोदे येथील झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याशी संबंधित असलेल्या जहागीरदार घराण्यात झाला असेही काहींचे मत आहे. लहानपणापासून त्यांना व्यायामाची आवड असल्याने तरूणपणात त्यांनी चांगली शरीरसंपदा मिळविली होती. पन्नाशी उलटलेले वय, पण अंगपिंडाने सशक्त, उंचनिंच, देखणा, गोरा, अपूर्व तेजाने चमकणारे डोळे ही तर वैशिष्ट्ये होतीच पण चटकन नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे विशाल कान आणि अजानुबाहुत्व. मानेवरून कमरेपर्यंत रुळणारा पिंगट काळसर जटाभार, अर्धोन्मीलित दृष्टी, दणकट आणि सतेच देहयष्टि, कंबरेला फक्त लंगोटी आणि गुडघ्याच्या खाली पोहचतील असे उभय बाहुदंड असे ते स्वरूप. अत्यंत कमी निद्रा ही एक योगातील स्थिती असुन अत्यंत कमी निद्रेमुळे दिवसच्या दिवस आणि रात्रीच्या रात्री म्हणजे जवळ जवळ सदैव जागृत अवस्थेत धुनीपुढे बसून ध्यानमग्न राहणे ही महान योगसाधना आहे. अशा अवस्थेला पोहोचणारे फारच थोडे असतात. महाराज अशांपैकीच एक असल्याने त्यांना ‘योगी जागरनाथजी’ असे नांव मिळाले. अंगावरची वेशभूषाही तशीच विचित्र. रामदासी म्हणावा तर रामदासी नव्हे, फकीर बैरागी म्हणावा तर संन्यासीही नव्हे. त्याहूनही आश्चर्यात भर टाकणारी आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांच्या उजव्या पायात असलेला सोन्याचा तोडा राजघराण्याशिवाय पायात सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार कुणालाही नसतो. कोणी म्हणतात जंगलीमहाराज बडोद्याच्या बाजूचे तर कोणी म्हणतात साताऱ्याकडील रेठरे गांवाचे तर कोणी म्हणतात विजापूर नजीकच्या बागलकोटचे. ते नेमके कुठले या वादात पडू नये. त्यांचा जन्म कुठलाही असो, ते अचानक भांबुर्ड्याला (पुण्याला) आले आणी अलौकिक कार्य करुन समाधिस्त झाले हे सत्य आहे.  

              १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात एक सैनिक म्हणूनही त्यांनी कार्य केले. स्वातंत्र्य समरानंतर सर्व भारतात त्यांनी परिभ्रमण केले. महाराष्ट्रात आल्यावर ते कृष्णेच्या काठी कऱ्हाडजवळील रेठरे हरणाक्ष या गावी स्थायिक झाले. तेथे गावाजवळ असलेल्या नदीतीरावरील शंकराचे मंदिरात प्रतिदिनी सकाळी ५-६ तास ध्यान करीत. नंतर गावात भिक्षा मागून नदीच्या वाळवंटात भोजन करीत. कृष्णेला पूर आला म्हणजे पाण्यावर घोंगडे टाकून व त्यावर बसून ते परतीराला जात. ह्याचे तेथील जनतेला आश्चर्य वाटे. त्यांचे औंध येथील भक्त श्री. कृष्णराव कदम यांनी महाराजांची भेट रेठरे या गावी झाली असे लिहून ठेवले आहे. 

               यानंतर रेठरे येथून महाराज पुणे येथे आले व त्यांनी भांबुर्ड्यात (शिवाजी नगर) रोकडोबाचे मंदिर बांधून तेथे वास्तव्य केले. प्रतिदिनी नियमाने ते रोकडोबाचे दर्शन घेत व पहाटे नदीवर स्नान करुन पाताळेश्वराजवळील टेकडीवर निवडुंगाच्या बनात ध्यान करीत. माध्यान्हपर्यंत त्यांचे ध्यान संपवून ते भांबुर्डे गांवात येत व भिक्षा मागून चरितार्थ चालवीत. त्यांची योग्यता कळल्यावर लोक त्यांना रोकडोबाच्या मंदिरातच प्रतिदिनी भोजन आणून देत. दोन प्रहरी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आदि गंथांचे वाचन ते करीत. त्यावेळी ते लोकांच्या शंकांचे निरसन करीत. ते अधूनमधून बाहेरगावी प्रचारालाही जात. त्यांची किर्ती ऐकून दूरदूरचे लोक धार्मिक विषयावर त्यांच्याशी संवाद करण्यास येत. त्यामुळे रोकडोबाचे धर्मशाळेत भाविकांची सतत रीघ लागलेली असे. प्रसिद्धीचा त्यांना तिटकारा असे. यामुळे ते स्वत: जे अभंग करीत ते लिहून घेण्यास त्यांचा विरोध असे. त्यांचे अभंग एकदा एक शिष्य कागदावर लिहून घेत असता त्यांनी तो कागद त्याच्या हातातून घेऊन पेटत्या पणतीवर जाळून टाकला. कित्येक छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

                महाराजांनी प्रचार कार्यार्थ ठिकठिकाणी हिंडून कारजगे, रेठरे आदि गावी मठ स्थापना केली. एकदा ते मिरज येथे गेले असता रखमाबाई गाडगीळ या नांवाच्या एका बाईंनी आपणास महाराजांनी शिष्य करून घ्यावे अशी विनंती केली. तेंव्हा महाराजांनी त्या बाईस संसारत्याग करुन मिरजेत भिक्षाटन करण्याची आज्ञा दिली. अशा तऱ्हेने सतत बारा वर्षे त्या बाईंनी मिरज येथे भिक्षाटन केल्यावर महाराजांनी त्यांना गुरूपदेश दिला. त्यानंतर रखमाबाई पुण्यास येऊन राहिल्या. तरी आठवड्यातून एक दिवस त्यांना भिक्षाटन करून आपला चरितार्थ चालविण्याची महाराजांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या जन्मभर आचरण करीत. रखमाबाई पुण्यात आल्या तेंव्हा त्यांच्या बरोबर महाराजांचे शिष्यत्व पत्करून दुसऱ्या बाई आल्या, त्यांचे नांव तुळसाक्का. महाराज जेंव्हा समाधिस्त झाले तेंव्हा त्यांचा संप्रदाय चालविण्याची योग्यता असलेल्या रखमाबाई व तुळसाक्का या दोघींनी त्यांचे कार्य त्यांच्यानंतर दहा वर्षे चालविले. रखमाबाईंनीच खटपट करून रोकडोबा मंदिरासमोर राम मंदिर बांधून घेतले व रामाचा उत्सव, पारणे नऊ दिवस पहारा, कथाकीर्तन आदि कार्यक्रम सुरु केले. रखमाबाईंना गावातले लोक आईसाब म्हणत. रखमाबाईंच्या मृत्यूनंतर तीनच दिवसांनी तुळसाअक्काने देह ठेवला. रोकडोबा मंदिराच्या समोरील राममंदिराचे आवारात या दोघींच्या समाध्या आहेत. 

               महाराज हे योगातील अधिकारी पुरुष होते. त्या बाबतीत त्यांनी पुष्कळ चमत्कार केले आहेत. एकदा महाराज आजारी पडले असता मिरजेच्या राजेसाहेबांनी त्यांना औषध देण्यासाठी, यांची प्रकृती तपासण्यासाठी आपल्या राजवैद्यास पाठविले. ते राजवैद्य आले तेंव्हा महाराजांनी समाधि लावली. वैद्यबुवांना वाटले की अशक्तपणामुळे महाराजांना ग्लानी आली आहे. म्हणून त्यांनी महाराजांना तपासण्यास प्रारंभ केला. परंतु नाडीचे ठोके, ह्र्दयाचे ठोके यांचा त्यांना पत्ताच लागेना. तेंव्हा वैद्यराज व महाराजांची शिष्यमंडळी चिंतातुर झाली. इतक्यात महाराजांनी समाधि उतरविली व हसून वैद्यराजांना म्हणाले, काय रोगनिदान झाले का? वैद्यराजांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवून आपला अधिकार फार मोठा आहे असे त्यांना सांगितले. एखाद्या सुगंधित फुलाचे अस्तित्व जसे त्याचा सुगंध दाखवून देतो तसेच या सिद्धपुरुषाचेही झाले.

                एकदा अमरनाथ यात्रेत त्यांची गोरक्षनाथांबरोबर प्रत्यक्ष भेट झाली व गोरक्षनाथांनी त्यांना असा आदेश दिला की आपल्या संप्रदायांपैकी एक मोठा भाग श्री ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रात चालवीत आहेत. तेथे त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बसले आहेत तेव्हा त्यांच्या सान्निध्यात आपण आता पुढील वास्तव्य करावे व म्हणूनच महाराजांचे वास्तव्य पुण्यास झाले अशी मान्यता आहे.

               महाराज योगी होते तसेच ते मंत्रशास्त्रार्थातही निष्णात होते. जांगलिक पंथातील लोकांना विषारी प्राण्याचे विष नष्ट करण्याचे व विष उतरविण्याचे मंत्रज्ञान असते. पण महाराजांनी मंत्रशास्त्राचाही अभ्यास करुन ते शरीरातील योगिनी व शक्ती यांचा संयोग घडविणारे अनेक प्रयोग करू शकत होते. शरीर अतिशय हलके करण्याच्या वेळी ते अदृश्य करणे किंवा अतिशय जड करणे ही क्रिया ते सहज करीत असत. मंत्रशास्त्राचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यवर्गाला करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिष्यात या परंपरा अद्याप चालू आहेत. महाराज ब्राह्म मुहुर्तावर उठून आपले शरीर हलके करीत व योगमार्गाने ते काशीस जात असत. तेथे मनकर्णिका घाटावर स्नान करुन गुप्तशिवलिंगाचे दर्शन घेत. भैरवाचेही दर्शन घेत असत. रोज एक बिल्वदल वाहण्याचा त्यांचा नियम होता. येतांना एक निर्माल्यदल ते घेऊन परत येत असत. कलशाचे दर्शन करुन त्र्यंबकेश्वरास जात. तेथे त्र्यंबकेश्वर भगवंताचे व निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन आळंदीला श्रीज्ञानेश्वर महाराज व श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे अदृश्य रूपानेच राहत असत. त्यानंतर विविध भक्तांच्या उद्धाराचे कार्य ते दिवसभर करीत असत. ही त्यांची दिनचर्या ध्यानात घेतल्यावर महाराज कोण व त्यांचा सांप्रदाय व आचार काय हे सहज ध्यानात येते व त्यांच्या संबंधीच्या सर्व विपरित भावना आपोआप विरून जातात. 

                शुक्रवार ४ एप्रिल १८९० चैत्र शुद्ध चतुर्दशी रोजी सायंकाळी ५•३० वाजले होते. महाराजांनी अष्टांगयोग धरणेच्या साधनेत डोळे मिटून अत्यंत गहन ध्यान लावले आणि नाडी बंद झाली. महाराज समाधिस्थ झाल्याच्या तारा सगळीकडे पाठवण्यात आल्या ही वार्ता सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली हजारो भाविक आपल्या या साक्षात्कारि आजानुबाहु संताच्या अखेरच्या दर्शनासाठी येऊ लागले पुष्पांचा खच पडला. पुष्पहारांना आणखीनच टवतवी येऊ लागली. गुलाल, बुक्का हजारोच्या मुठीनी उधळला जावू लागला. “श्री सद्गुरू जंगली महाराज की जय” अशा जायघोषांनी दिशा निनादून गेल्या. भांबुर्ड्यातला प्रत्येक जण पोरका होऊन म्लान मुख करून महाराजांकडे पाहत होता. 

                भावी तयारीसाठी आम जनते कडून सुवासिक वस्तुंचा, अंबीर, बुक्का कापुर वगैरे वस्तुंचा पाऊस पडू लागला. एक सुंदर असे भव्य पुष्पांकित विमान तयार करण्यात आले. टेकडी वरील समाधीची जागा महाराजांनी पूर्वीच शिष्य मंडळाना दाखवून ठेवली होती. सायंकाळ पासून लोकांनी दर्शन घेता घेता दूसरा दिवस उगवला. त्या नंतर तयार केलेल्या विमनातून समाधी कडे नेण्यासाठी महाराजांची स्वारी मठातून बाहेर पडली. पुष्कळ भजनाच्या दिंडया कर्तव्यकर्मात निमग्न होत्या. पुष्कळ मिस्लिम बांधव पवित्र कुराण वाचत होते. पाऊल ठेवण्यास रस्ता कोणास मिळेना. इतकी गर्दी झाली असून कुणी लोक सोन्या-रुप्याची फुले, कोणी चवल्या पवल्या, खारीक खोबरे असे उडवीत होते. भजनाच्या दिंडया व कुराण वाचन एकाचवेळी चालू होते. विमानासा सर्व जातीचे लोक खांदा देत होते. पुष्पांचे सडे पडत होते. मठातून समाधी टेकडी जवळ असता पोचण्यास ५-६ तास लागले. हिन्दू-मुस्लिम धार्मिक विधी व भजन, पठण आशा रितीने शिष्यानी महाराजांना गुहेत जड अंत:कारणाने ठेवले. प्रकाश झोत इतके तळपत होते की, रात्र का दिवस हेही कळत नव्हते. गुहेत आच्छादना साठी ८ पल्ले अंबीर, ४ पल्ले कपूर चारी बाजूस दाटीने अंथरण्यात आले. समोर पोथी ठेवली. दोन्ही बाजूस समया लावून ठेवण्यात अल्या. “श्री सद्गुरू जंगली महाराज की जय” असा जयघोषणा करून व आरती करून शिष्य मंडळी गुहेच्या बाहेर आली. त्या नंतर गुहेचे दार बंद करण्यात आले. महाराज निजानंद निमग्न झाले.

_संदर्भ- माहीती व आंतरजाल_

_संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839_

_✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_

_इति सुर्यार्पणमस्तु_

_श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 10 वे- “श्री गगनगिरी महाराज (श्रीपाद गणपतराव पाटणकर)”_

_10) श्री गगनगिरी महाराज (श्रीपाद गणपतराव पाटणकर)_

जन्म: १९०६, मणदुरे, ता. पाटण (महाराष्ट्र).

मुळ नाव: श्रीपाद गणपतराव पाटणकर

आई/वडिल: सौ. विठाबाई/श्री. गणपतराव पाटणकर.

कार्यकाळ: १९०६-२००८

संप्रदाय: नाथ संप्रदाय

समाधी: ४-२-२००८, खोपोली येथे.

विशेष: विश्व गौरव पुरस्कार 

_जन्म बालपण व साधना_ 

                सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मणदुरे नावाचे खेडे आहे. येथील श्री. गणपतराव व सौ. विठाबाई या वारकरी दांपत्याच्या पोटी एक पुत्र झाला व त्याचे नाव ‘श्रीपाद’ ठेवले गेले. लहानपणापासुन श्रीपादाला साधुसंतांच्या संगतीची ओढ लागली. वयाच्या आठव्या वर्षी श्रीपादने घराचा त्याग करून हिमालयाची वाट धरली व तेथे तपस्या केली. यानंतर चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे त्याने दर्शन घेतले व  त्यांच्याच आश्रमात श्रीपाद राहू लागला. नंतर हिमालयातील क्षेत्रे, अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी इत्यादी स्थानांना भेट देऊन श्रीपादने कोल्हापूर जवळच्या राधानगरीजवळ एका जंगलात तपश्चर्या केली आणी शेवटी जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले. अंगावर वस्त्र नाही, वाढलेल्या दाढी-जटा यामुळे प्रथम लोकांचा त्यांना उपद्रव झाला. पण थोड्याच दिवसांत त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली. पुढे ते गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणुन प्रसिद्ध झाले. त्यांनी शरीराला कष्ट देऊन उग्र तपस्या केली व जे मिळेल ते खाल्ले. नित्य पाण्यात बसून त्यांनी तपस्या केली. आपल्या सामर्थ्याने त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गास लाविले. आईवडील, कुलदैवत, इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवुन चिंतनात मग्न असावे, अशी त्यांची शिकवण आहे. अनेक भाविक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहेत.

                गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हठ योगी होते. ते चालुक्यसम्राट पहिला पुलंकेशीच्या घराण्यातील होते. लहान वयात घर सोडल्यावर सुरवातीलाच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायी बरोबर ते बत्तीस शिराळा येथे आले व तेथेच त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांना  चित्रानंद स्वामींची भेट झाली.

                एकदा बद्रीनाथ जवळील व्यासगुंफेत महाराज दमुन पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफानिधारी साधु आले व त्यांनी आपल्या कमंडलुतील पाणी श्रीपादांचे तोंडावर शिंपडले तसेच कमांडलुतील हिरवेगार कोथिंबीरीसारखे गवत  खाण्यास देवुन म्हणाले आजपासून तुला सिद्धवस्था प्राप्त होईल. तुझ्याकडून मानव जातीचे कल्याणाचे कार्य होईल. तू आता दक्षिणेकडे जा. यानंतर महाराज ह्रिषिकेशला येऊन पोहोचले व थोड्याच दिवसात लोक त्यांना स्वामी किंवा महाराज म्हणु लागले. पुढे ते भोपाळ पर्यंत गेले व एका तलावाचे काठी स्नान करून बसले असताना कोल्हापुरचे राजे व काही सरदार येऊन बसले व मराठीत बोलु लागले. महाराजही त्यांच्याशी मराठीत बोलु लागले. यानंतर कोल्हापुरचे महाराज ह्या बाल योग्याला घेऊन कोल्हापूरला आले.

_महाराजांचे तपाचरण_ 

              कोल्हापरला आल्यावर त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. सुरवातीस महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधुन राहिले. त्या अरण्यात कंदमुळे झाडपाला व वनस्पती भरपूर असल्याने ते तेथे रमले व झाडाच्या ढोलीत त्यांनी तप केले. भुतविद्या, जारण, मारणं, उच्चाटन विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचा शोध लागला. या तपात त्यांनी झोपण्यासाठी गवताची गादी केली होती व ती गादी झाडासारखी अंकुर फुटून वाढू लागली त्यामुळे विद्या पुर्णत्वास जात असल्याची खात्री झाली व ते सिद्ध होऊ लागले. पर्जन्य काळात अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक व आपट्याच्या सालीचा वाक तसेच पळसाच्या पानाचे इरले करून, पावसात हलते घरही बनवीत. पुढे गगनगडावर जलात उभे राहून तपश्चर्या केली व योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या. विमलज्ञान, शिवयोग उन्मनी अवस्था व विद्या, गोरक्षनाथीविद्या अशा अनेक विद्या त्यांनी आत्मसात केल्या.  

                महाराजांनी योगशास्त्राचा संदेश सर्वत्र पोहोचविला व हजारो भक्तांचे कल्याण करत त्यांना भक्ती मार्गाला लावले. महाराजांचे शिष्य महाराष्ट, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रामध्ये विखुरलेले आहेत. पुढे सिध्दयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे योगाश्रमात, पाताळगंगा तीर्थक्षेत्री आपल्या पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ रोजी पहाटे ३.३० वाजता देह ठेवला. तेव्हा ते १०३ वर्षाचे  होते.

            श्री गगनगिरी महाराज यांचे आश्रम गगनगड, खोपोली, मनोरीबेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणी आहेत. येथे दत्तमुर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळविले आहे व गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्र इत्यादी प्रसंगी या आश्रमात भजनपूजन थाटाने होत असते तसेच अन्नदानही मोठ्या प्रमाणावर होते.

_संदर्भ- माहीती व आंतरजाल_

_संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839_

_✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_

_इति सुर्यार्पणमस्तु_

दत्त संप्रदायातील सत्पुरुष सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *