श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 1 ते 5

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दत्त संप्रदायातील सत्पुरुष_

_आपल्या भारतभुमीत “श्रीदत्त संप्रदाय” हजारो-लाखों वर्षांपासुन अस्तित्वात असुन या संप्रदायाला अनेक सिद्ध, अधिकारी, साधु-संत व सत्पुरुषांनी वाढवण्यास मदत केली आहे मात्र यातील काही सत्पुरुष प्रकाशीत झाले तर काही अप्रकाशीत राहीले._ _अश्या या निवडक सत्पुरुषांची माहीती मी संकलीत केली असुन भगवान सुर्य नारायणाच्या कृपाशिर्वादाने व गुरुवर्यांच्या आज्ञेने, मी आजपासुन आपल्या ग्रुपवर दररोज एका सत्पुरुषांविषयीची माहीती प्रसारीत करत आहे. माझ्या अल्पमतीने मला जसे जमले तसे ही लेखमालिका तयार केली असुन सदरच्या कोणत्याही लेखात काही चुकभुल असल्यास क्षमस्व._

गुरुवर्य चरणरज- सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 1 ले- “श्री मच्छिंद्रनाथ”
1) श्री मच्छिंद्रनाथ

श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी “नऊ नारायण ” म्हणून प्रसिद्द असलेल्या नऊ मुलांनी जगदुद्धारार्थ अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि “श्री मत्स्येंद्र” हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात. जगात सर्वात प्रथम श्री शंकारकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मछिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही. तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ, स्वामी मछिंद्रनाथ होत. महादेव शंकर व दैत्यगुरु शुक्राचार्यानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हे, तर त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणी स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मछिंद्रनाथ होत. गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार, अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन, त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनःश्च शरण आणणारे जगातले पाहिले शिवशिष्य स्वामी मछिन्द्रानाथ होय. (मछिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला, त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रुपे धारण केली व तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळुन काढले पण त्यांना स्वामी मछिंद्रनाथ सापडले नाहीत). नवनाथांपैकि आद्यगुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजिवन समाधी मंदिर मायंबा (सावरगाव, जि. बीड) या ठिकाणी असुन नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो.

श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांची जन्मकथा

           एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.
         उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी बरेच बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

         मच्छिंद्रनाथांचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा पिता कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पित्यास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच प्रकारे ताडन करून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या बोलण्याने मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व आदिनाथानची स्तुति करताच आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले . त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास आदिनाथाचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले. बद्रिकावनात फिरत असताना भगवान शंकर व श्री दत्तात्रय यांनी मच्छिंद्रनाथास दर्शन देवुन सर्व सिद्धी दिल्या व लोकोद्धाराचा आशीर्वाद देवुन गुप्त झाले. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ व इतर नवनाथांतर्फे नाथ संप्रदायाची स्थापना करुन लोकोद्धार केला.
             एकदा मच्छिंद्रनाथ भगवान दत्तात्रयांना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले. मच्छिंद्रनाथास पाहुन महाराजांच्या नेत्रातून अश्रूपात होऊ लागला! हे पाहून मच्छिंद्रनाथांना गहिवरून आले व त्यांनी पळत जाऊन अनसूयात्मजाला कंठभेट दिली. काय वर्णावा तो क्षण? माय-लेकरू एकरूप झाले! थोड्या वेळाने दोघेही स्थिर झाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही. तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग व्हावे लागणार आहे. गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे! माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथाला मी इथेच गिरनार वर राहून आपली सेवा करण्याचा आदेश केला आहे. आम्हा नवनाथांचे देह कार्य समाप्त झाले आहे. आता आम्ही गुप्त रूपात कार्य करणार आहोत. आपली आज्ञा असावी."
          दत्त म्हणाले, "हृदयावर पाषाण ठेवून मला तुला निरोप द्यायला लागत आहे रे. ठीक आहे. जाऊन रहा गर्भगिरी वर. लोक तुला मायबा म्हणूनही ओळखतील. गर्भगिरी पर्वताला मी प्रती गिरनार असण्याचा वर देतो आहे! गिरनार व गर्भगिरी मध्ये काही फरक नाही. मच्छिंद्रा तु माझेच प्रतिरूप आहेस. तुझे दर्शन म्हणजे माझे दर्शन घेतल्या सारखे आहे. तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नऊही नाथांना व मला पोहोचेल. गिरनार वर तु नसूनही असशील माझ्या रूपात आणि गर्भगिरी वर मी नसूनही असेन तुझ्या रूपात, पण माझी तुला आज्ञा आहे की दर पौर्णिमेला तु गिरनार वर मला भेटायला ये." हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, "महाप्रभू आपली आज्ञा शिरसावंद्य! मी अजून काही दिवस गिरनार वर वास करून गर्भगिरी साठी प्रस्थान ठेवेन. जे भक्त गर्भगिरी वर येतील त्यांना आपल्या सांगण्या प्रमाणे गिरनार यात्रेचे फळ मिळेल. गिरनार मुळे जसा गुर्जरदेश (गुजरात) पावन झाला त्याप्रमाणे गर्भगिरी मुळे मराठदेश (महाराष्ट्र) पवित्र होईल. मी दर पौर्णिमेला गिरनार वर येईन आणी कोणत्याही रूपात माझ्या व आपल्या भक्तजनांना दर्शन देईन. गोरक्ष माझा प्रिय शिष्य आहे कृपया त्याला कधी अंतर देऊ नये. काही चुकले तर त्याला क्षमा करावे. गोरख शिखरावर तो निरंतर वास्तव्य करेल. त्यास कृपावलंकीत करावे."
          महाराज तथास्तु म्हणाले व मच्छिंद्रासोबत गुरूशिखरावर गेले. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ गर्भगिरी कडे निघाले. दत्ताने, गोरक्षाने व भर्तुहरीनाथ, गोपीचंदनाथ यांनी मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला. अशाप्रकारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ गर्भगिरी वर अजूनही वास्तव्यास आहेत व भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येत असते.

संदर्भ- माहीती व आंतरजाल
संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 2 रे- “श्री गोरक्षनाथ”

2) श्री गोरक्षनाथ

जन्म: सुमारे ११ वे शतक
आईवडिल: माहिती उपलब्ध नाही.
संप्रदाय: नाथ संप्रदाय
गुरु: मच्छिंद्रनाथ
शिष्य: गहनीनाथ

गोरक्षनाथ हे ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. त्यांचे मंदीर उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये असुन त्यांच्या नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे. येथे वैशाख पौर्णिमेला एक उत्सव होतो. नाथसिद्धांच्या ज्या विविध नामावली सध्या उपलब्ध आहेत त्यांत मत्स्येंद्रनाथांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख येतो. मत्स्येंद्रनाथांना म्हणजे आपल्या गुरुंना स्त्रीराज्यातून म्हणजेच वामाचारी पंथातून मुक्त करणारा एक थोर सिद्ध पुरुष म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. गोरक्षनाथांचा काल व त्यांचे जीवनवृत्त यांची विश्वसनीय माहिती उपलब्ध नसुन मत्स्येंन्द्रनाथ व गोरक्षनाथ यांचे कार्य अकराव्या शतकातले असावा, असा संशोधकांचा तर्क आहे.

श्री गोरक्षनाथांची जन्मकथा

श्री सदगुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत असताना बंगालात चंद्रगिरी गावास गेले. तेथे सुराज म्हणून एक राजा होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असुन तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी होती; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेले. त्यांनी अंगणात उभे राहून ‘अलख’ शब्द केला आणी भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यांस आसनावर बसविले आणी भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणी काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्यांच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्यांनी सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणी सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले. सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गाईच्या शेणाच्या गोठ्यात त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले. बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ”मुलगा कुठ आहे?” नाथांनी विचारले. ”मला मुलगा झालाच नाही.” तिने सांगितले. ”खोट बोलू नकोस! मी तुला १२ वर्षा पूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले?” नाथांनी प्रश्न केला. ”मी ते गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकले. असे ऐकल्यावर नाथांना क्रोध येतो. त्यावेळी ती स्ञी नाथांची माफी मागते. योगीराज, मला क्षमा करा!”. त्यावेळी नाथ म्हणतात, मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली. त्यावेळी सदगुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात, ”हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!”. ”गुरुराया, मी इथे आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा. ”मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. व गाईच्या शेणाच्या राक्षेतुन जन्म झाला म्हणुन त्यांचे गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश येथिल गोरखपुर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे उगम स्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी ९ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शीळा होय. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर मांजरसुंबा याठिकाणी गर्भागिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहे. या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते. हिरवाईने नटलेल्या डोंगरावर नाथांचे सुंदर मंदिर असुन येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मुर्ती आहे. याठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध ञयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो. एकदा स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने “कधीही भिक्षा मागायला या” असे सांगितले होते. गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणी ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणी ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. त्याचक्षणी पात्र पूर्ण भरले आणी परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले. वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणी पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणी म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला. आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, “गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते.” गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणी क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, “आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज.” गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, “गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध.” गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. “अलक्ष” शब्द गर्जून गोरक्ष त्यांना “आदेश” करते झाले. यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांचा हात भगवान दत्तात्रयांच्या हातात देवुन त्यांच्या सेवेत राहण्याची आज्ञा गोरक्षनाथास केली. अशी मान्यता आहे की सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत आहेत. गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम, आगम, मंत्र-तंत्र, वज्रयान, हनियान, सिद्धयोगी इ. चा समावेश होत असला तरी तिचे शुद्धीकरण करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न त्यांनी केला. वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकाण्ड त्यांनी वगळले. तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला. जारण, मारण, उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी, ध्यानयोग, कुंडलिनीजागृती यांनी त्यांनी आपला साधनेत महत्वाचे स्थान दिले. वैदिक कर्मकाण्डाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजाभिमुख केली. इंद्रियनिग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली. गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते!

।। श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः ।।

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 3 रे- “श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी”

3) श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी

जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, पिठापूर, आंध्रप्रदेश
आई/वडील: सुमती महाराणी /अप्पलराज शर्मा
निवास क्षेत्र: कुरगड्डी (कुरवपूर) (कर्नाटक राज्य)
संप्रदाय: दत्तावतारी
वेष: ब्रम्हचारी
कार्यकाळ: शके १३२० -१३५०
समाधी: अवतार समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर
चरित्र ग्रंथ: श्रीपाद चरितामृत

दत्तावतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांची जन्म पार्श्वभूमी

या कलीयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, श्री विष्णु व शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला. ब्रम्हदेव ‘चंद्र’ झाले, श्री विष्णू ‘दत्त’ झाले आणी महेश ‘दुर्वास’ झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, “आम्ही दोघे तपाला जातो, तिसरा ‘दत्त’ येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे असे समज.” अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून ‘दत्त’ तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परम्परेचे मुळं पीठ आहे. श्रीदत्तात्रेय यांचे पासून पुढे तीन अवतार झाले. प्रथम ‘श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज’ हा अवतार, द्वितीय ‘श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज’ व तिसरा अवतार ‘श्री स्वामी समर्थ महाराज’ हे तिन्ही अवतार श्रीगुरू दत्तात्रेय यांचेच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला. कृष्ण-यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारव्दाज गोत्री, अप्पलराज शर्मा आणी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती गुरुचरित्रात, पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. भगवान दत्तात्त्याांनी जगदोद्धारासाठी शके १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर नावाच्या गावात जन्म घेतला. या गावात अप्पलराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती तसेच तिच्या घरी श्राद्धही होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले,

“माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे॥

(“माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग.”)

श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, “भगवंता, आपण मला ‘जननी’ म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा.” सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, “माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही, तो जे सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल.” असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.

काही कामासाठी बाहेर गेलेला अप्पलराज घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून अप्पलराज अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, “तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तीला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. अप्पलराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले की, ‘हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.’ भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अप्पलराज व सुमती यांना समजुन ते अत्यंत आनंदाने श्रीपादाचे संगोपन करीत होते.

यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग अप्पलराजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पीठापुरास येऊ लागले. श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, “मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे.” हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु ‘तुला ज्ञानी पुत्र होईल. तो सांगेल तसे वागा.’ हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, “बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही.” आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, “तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल.” मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले. आणी त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. ‘आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.’ असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला.

“तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल.” मग ते आई-वडिलांना म्हणाले, “या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुजनानांना मी दीक्षा देणार आहे.” सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले. ‘श्रीगुरुचरित्र’ या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्रीनृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवतार चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद झाला.

पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालका ने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदांतात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले. पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तींच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत.

पुढील जन्माविषयी भविष्यवाणी, नृसिंहसरस्वती आणि स्वामी समर्थ अवतार जन्मसंकल्प

समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले ”तुझा संकल्प सिध्द होईल ! मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरिराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपांतच राहून त्या नंतर गुप्त होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या उध्दाराच्या निमित्ताने नृसिंहसरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन. ह्या दुसऱ्या अवतारात ८० वर्षे राहीन, या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात ३०० वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात (अक्कलकोट) स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिध्दपुरुषांच्या रूपाने, अपरिमित अशा दिव्यकांतीने, अगाध लीला, दाखवीन. साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून, त्या विषयी आसक्तीरहित करीन.” अश्या या भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी ‘अश्विन कृष्ण द्वादशीस’ अवतार समाप्त केला.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 4 थे- “श्री नृसिंह सरस्वती महाराज”

4)श्री नृसिंह सरस्वती महाराज

जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध व्दितीया इ. स. १३७८
आई/वडिल: आंबामाता / माधव
वेष: संन्यासी
मुंज: इ. स. १३८५
गुरु: कृष्णसरस्वती
संन्यास: इ. स. १३८८
तिर्थाटन: इ. स. १३८८ ते १४२१
औदुंबर चातुर्मास: इ. स. १४२१
नरसोबावाडी: इ. स. १४२२ ते १४३४
गाणगापुर: इ. स. १४३५ ते १४५८
कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५८
निजानंदीगमन: इ. स. १४५८
विशेष: दत्तावतार, धर्मसंस्थापनेचे कार्य चरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्र
शिष्यपरंपरा: १) माधव सरस्वती, २) बाळसारस्वती, ३) कृष्णसरस्वती, ४) उपेंद्र माधव सरस्वती, ५) सदानंद सरस्वती, ६) ज्ञानज्योति सरस्वती व ७) सिद्ध सरस्वती.

श्रींचा जन्म व बालपण

पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरूगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात, करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली. याही जन्मी तिचे नाव ‘अंबा’ असेच ठेवण्यात आले. पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मीसुद्धा शिवभक्ती करू लागली. त्याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला. विवाहोत्तर तिचे मूळचे ‘अंबा’ हेच नाव कायम ठेवण्यात आले. हे ईश्वर-निष्ठदाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्रीदत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती होत.

जन्म होताचि ते बालक । ॐ कार शब्द म्हणतसे अलौकिक
पाहून झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तये वेळी ॥

जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले.

याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली. सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली, ‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥’ (११.८३) वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले. पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याबरोबर ‘श्रीपादश्रीवल्लभ स्वरूपता । दिसतसे तो बाळक ॥’ (११.९३) या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले.

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त-स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले.

श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले; पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना. म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त, सर्वश्रेष्ठ, वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले.

पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना साक्षात श्री काशीविश्वेश्वरच वाटत. त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर जन त्रिभुवनवंद्य श्री नृसिंहसरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत. अत्यंत विनयाने, प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत. कृतार्थ होत. लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला. ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे तीन वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले. यांपैकी सात जणांना त्यांनी विधियुक्त संन्यासदीक्षा दिली. माधवसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती, कृष्णसरस्वती, आणि सिद्धसरस्वती हे सात शिष्योत्तम होत. मंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते. मानसपूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहात होते, ती श्रीगुरूंचीच म्हणजे नृसिंहसरस्वतींचीच आहे हे ध्यानात येताच त्यांनी श्रीगुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले. श्रीगुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रास आले. येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक ब्राह्मण पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. श्रीगुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला.

याच वेळी गंगास्नानास सायंदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला. त्याने श्रीगुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायंदेव आपस्तंब शाखेचा कौडिण्य गोत्री असून कडगंचीचा रहाणारा, पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता. त्याचा भाव पाहून श्रीगुरू त्याला म्हणाले, ‘या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे. तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल. त्याची व्यथा दूर होईल.’ सायंदेवाने श्रीगुरूंनाही आमंत्रण दिले. श्रीगुरू सायंदेवाच्या घरी आले. त्याच्या पत्नीने, जाखाईने श्रीगुरूंची मनोभावे षोडषोपचार पूजा केली. ‘तुला अनेक पुत्र होती. तुझ्या घरात गुरुभक्ती वाढेल’ असा तिला आशीर्वाद मिळाला. ब्राह्मणाचा पोटदुखीचा विकारही संपला.

‘कृष्णसरस्वती’ नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते केवळ ब्रह्मज्ञानी असून स्नेहभावाने सर्वांकडे पहात. या वृद्ध स्वामीची व इतरही संन्याशांची ही विनंती मान्य करून नरहरीने कृष्णसरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली. नरहरीस कृष्णसरस्वती गुरू झाले. या कृष्णसरस्वतींची गुरुपीठिकाही अत्यंत थोर प्रकारची होती. आदिपीठाचे शंकर हे पहिले गुरू. त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव हे मूळपीठ असून पुढे वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधीगिरिय, सिंहगिरिय, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, ज्ञानतीर्थ, मळियानंद, देवतीर्थसरस्वती, सरस्वतीयादवेन्द्र आणि शिष्य कृष्णसरस्वती असून त्यांचेकडून नरहरीने संन्यासदीक्षा स्वीकारली. ‘श्रीनृसिंहसरस्वती’ असे नवे नाव नरहरीने धारण केले.

श्री गुरूंचे तीर्थाटन

               उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. तब्बल तीस वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले. करंजग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता-पिता कमालीचे आनंदित झाले. त्यांनी मातापित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयतांची काया तेजाळून ते खऱ्या सुखाचे अधिकारी बनले. 
           काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरश: गराडा असे. ते लोकांच्या आधिव्याधी हरण करीत. निपुत्रिकांना सुपुत्र देत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक पतितांचा, पाप्यांचा त्यांनी लीलया उद्धार केला. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे एक वर्ष गुप्त राहिले. एकांतवासाचे सुख उपभोगू लागले. सेवेला सिद्धसरस्वती नावाचे शिष्य होते. श्रीगुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला; पण वर्षभर त्याला दर्शन झाले नाही. सिद्धसरस्वतींनी त्याला ‘गुरुचरित्र’ सांगितले. आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला. 
             एका वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातिरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीसन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले. तिथून ते कृष्णा-पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे बारा वर्षे म्हणजे एक तप वास्तव्य होते. ‘मनोहर पादुका’ स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला. 
           तिथून ते भीमा-अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे तेवीस वर्षे वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांतून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्तपरिवार वाढतच गेला. 
               गाणगापुर येथे श्रीगुरूंनी जवळजवळ तेवीस वर्षे वास्तव्य करून दीनदु:खितांचा उद्धार केला असल्याने गाणगापुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. अशा या गाणगापुरात राहून श्रीगुरूंनी अनेक लीला प्रकट करून भक्तजनांचा उद्धार केला. या गावाच्या एका ब्राह्मणाच्या वंध्या म्हशीचे दूध पिऊन श्रीगुरू संतुष्ट झाले. त्यांनी त्याचे दारिद्र्यही दूर केले. तेथील एका ब्रह्मराक्षसाचाही त्यांनी उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रमभारती नावाचा एक तापसी राहात असे. त्याने गाणगापूर येथील श्रीगुरूंच्या चमत्कारांची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्यांची त्याने थट्टाही केली. त्यास जाणीव देण्यासाठी ते कुमशीस निघाले. त्रिविक्रमभारती नरसिंहाचे उपासक असून त्याच्याच मानसपूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचेच दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमाच्या ध्यानी आला व तो श्रीगुरुंना शरण गेला. अनेक प्रकारे त्याने श्रीगुरूंची स्तुती केली. 
       श्रीपाद अवताराच्या वरदानानुसार एक रजक आता वैदुरी अथवा बिदर नगरीत म्लेच्छ जातीत जन्मास येऊन बादशहा झाला होता. पूर्वसंस्कारामुळे त्याच्या मनात हिंदूंबद्द्ल द्वेष नव्हता. ब्राह्मणांचा तो सन्मान करी. विप्रांच्या देवालयांचा तो मान राखी. एक दिवशी या राजाच्या मांडीस एक फोड झाला. कोणत्याही उपायाने तो बरा होईना. त्याला फारच यातना सहन कराव्या लागत होत्या. सत्पुरुषाची सेवा केल्यास हा फोड बरा होईल अशी त्याची खात्री झाली. गाणगापुरास एक यती सत्पुरुष असल्याचे त्याला समजले. त्याने गाणगापुरास जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेतले. ‘का रे रजका कोठे असतोस ? आमचा दास असूनही फार दिवसांनी भेटलास ?’ असे श्रीगुरूंनी म्हणताच म्लेछ राजास पूर्व जन्माचे स्मरण झाले. श्रीगुरूंना त्याने साष्टांग नमस्कार केला. श्रीगुरूंच्या कृपेने त्याचा फोड पूर्णपणे बरा झाला.
          सिंहस्थाच्या निमित्ताने श्रीगुरू नाशिक-त्र्यंबकेश्वराच्या यात्रेस निघाले. गौतमीत स्नान करून ते गाणगापुरास आले. परंतु या वेळी त्यांच्या मनात भलतीच कालवाकालव होत होती. 

‘प्रगट झाली बहुख्याति । आतां रहावें गौप्य आम्ही ॥’ (५०.२५४)

       असा विचार शिष्यांना बोलून दाखवला. कृष्णसरस्वती, उपेन्द्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती, सिद्धसरस्वती इत्यादी आणखी काही शिष्यांचा निर्देश मागे केलेला आहेच. सिद्धसरस्वतीस श्रीगुरूंचा सहवास पुष्कळच असून तोच त्यांच्या निजानंदगमनापर्यंत सान्निध्यात होता. यानेच श्रीगुरूंचे संस्कृत चरित्र तयार केले असावे व या संस्कृत चरित्राच्या आधाराने सिद्धनामधारकसंवादाच्या रूपाने पुढे सरस्वती गंगाधराने विख्यात असा ‘श्रीगुरुचरित्र’ नावाचा मराठी ग्रंथ लिहिला. नामधारक म्हणजे स्वत: सरस्वती गंगाधर व सिद्ध म्हणजे सिद्धसरस्वती असे मानावयास हरकत नाही. 
           श्रीगुरु नृसिंहसरस्वतींच्या काळासंबंधाने मतभेद आहेत. शके १३८० म्हणजे सन १४५८ हा सर्वसामान्य असणारा त्यांचा निजानंदगमनकाल कायम केला व श्रीगुरूंचे आयुर्मान ऐंशी वर्षांचे मानले तर त्यांचा जन्म अंदाजे शके १३०० म्हणजे सन १३७८ असा येतो. श्रीनृसिंहसरस्वतींनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थांना नवा उजाळा देऊन त्यांनी त्यांचे माहात्म्य वाढविले. लोकांना सन्मार्ग दाखविला.

सकळ येतील मनकामनी । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥ …पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन । समस्त येतील करावया भजन । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥’ (५०.२५७-६१)

याप्रमाणे निरोप घेऊन श्रीगुरू पर्वतयात्रेस म्हणजे श्रीशैल्यपर्वताला निघाले. भक्तजनांच्या अंत:करणास फारच वेदना झाल्या. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणांची मनोभावे पुन:पुन: प्रार्थना केली. शोक करणाऱ्या शिष्यांचे श्रीगुरूंनी परोपरीने सांत्वन केले. आम्ही या गाणगापुरातच आहोत असे त्यांनी पटवून दिले. सांगितल्याप्रमाणे शेवंती, कमळ, कल्हार, मालती इत्यादी पुष्पांचे एक सुरेखसे आसन शिष्यांनी कर्दळीपानावर तयार केले. गंगेच्या पात्रावर आसन ठेवून होताच श्रीगुरूंनी शिष्यांना परत जाण्यास सांगितले.

‘उठले श्रीगुरु तेथूनि ।पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ‘कन्यागती’ बृहस्पतीसी । ‘बहुधान्य’ नाम संवत्सरेसी । सूर्य चाले ‘उत्तर दिगंते’ सी । संक्रांति ‘कुंभ’ परियेसा ॥ ‘शिशिरऋतु’ माघ मासीं । ‘असित’ पक्ष ‘प्रतिपदेंसी’ । ‘शुक्रवारी’ पुण्यदिवशी । श्रीगुरू बैसले निजानंदी ॥’ (५१.३५-३७)

थोड्याच वेळाने त्यांची प्रसादपुष्पेही शिष्यांसाठी आली. ती सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या चार शिष्यांनी वाटून घेतली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून चालू होती, त्या काळात श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात ‘युगपुरुष’ म्हणून चिरंतन राहील. अश्या या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भक्तिभावपूर्वक कोटी कोटी प्रणिपात !

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प – 5 वे- “श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट”

5) श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट

जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले
प्रकट दिन: चैत्र शु. २
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: दिगंबर (अवधूत)
कार्यकाळ: १८५६ ते १८७८
संप्रदाय: दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार
गुरु: ज्ञात नाही
समाधी: चैत्र व. १३, इ.स. १८७८ अक्कलकोट येथे
चरित्रग्रंथ: श्री स्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत
शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज
खालील संतांवर विशेष प्रभाव: श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण, शंकर महाराज

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणी नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. “आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन (लग्नराशी),” असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. यांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते दाशरथी रामाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. विशाल उदर, रुंद खांदे, तीक्ष्ण भेदक नजर आणी पांढऱ्याशुभ्र भुवया ही त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. श्रींचा वर्ण गव्हाळ असून, कांती इतकी तेजस्वी होती की त्यांच्याकडे एकसारखे टक लावून पाहणे देखील शक्य होत नसे. त्यांच्या तीक्ष्ण नजरेत विलक्षण जरब होती. त्यांचा रागही असा भयंकर की, एकदा विश्वासराव मानेंसारखे शूर सरदार म्हणाले की, “प्रसंग पडल्यास आम्ही वाघाच्या अंगावर चालून जाण्यास भिणार नाही, परंतु श्रीसमर्थांपुढे उभे राहण्यासही आम्हांस धैर्य होत नाही, ते रागावल्यावर जाळून भस्मच करतील, असे भय वाटते!’ श्रींचे कर्ण मंगलमूर्तींप्रमाणे मोठे असून, त्यांची नाजूक पाळी श्रींच्या प्रत्येक हालचालींबरोबर मागे-पुढे हलत असत. हसताना पोट धरून हसण्याची सवय असून, बोलणे अल्प असे. बोलणे बहुधा मराठी किंवा हिंदीतून होई. त्यांची काया जुनाट वाटत असली तरी उत्साह तरुणाला लाजविणारा असा होता. त्यांचे एकंदर शरीर गुलाबपुष्पाप्रमाणे सुकोमल असून त्यांच्या पायास हात लावल्यावर असे वाटे की, यांच्या पावलास हाडे मुळीच नसावीत. त्यांच्या कपाळी चंदनाचा भव्य टिळा, गळ्यात तुळशी वा रुद्राक्ष यांच्या माळा असत. त्यांचे सेवेकरी त्यांना कौपीन नेसवीत. डोक्यावर जरीची कानटोपी घालीत आणि अंगावर शाल पांघरीत; परंतु कोणत्या क्षणी स्वामी महाराज या सर्व वस्तू फेकून देऊन दिगंबर बनतील याचा नेम नसे. असा हा अवधूत श्रीसमर्थांच्या रूपात जणू पुन्हा एकदा भूतलावर प्रकटला होता की काय कुणास ठाऊक !

मूळ पुरुष-वडाचे झाड-दत्त नगर-मूळ-मूळ’ अशा गूढ शब्दांत स्वतःची माहिती सांगणाऱ्या श्रीस्वामी समर्थांचे चरित्र असेच गूढ आणि अतर्क्य घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे. ते कोण, कोठले, त्यांचे आई-बाप कोण याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. मात्र हा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात काही निकटच्या भक्तांनी करून पाहिला असता त्यांना अपयश आले. स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली.

‘आपण कोठून आला?’ या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले, ‘प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदातटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत-हिंडत हैद्राबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे.’ (कै. ग.ब. मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र – पान ५) श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रकटले. याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे “शके सतराशे साठात । स्वामी जगदुद्धारार्थ । प्रकटले मंगळवेढ्यात । साक्षात दत्त अवतारे ॥” (अ.स्वा. ली.अ. १ ओवी १६) तेथून श्रीमाणिकप्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके १७७९च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजीराजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला.

स्वामींची वृत्ती पाहिली तर ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकांत वर्णिलेल्या कित्येक दत्तावतरांशी अधिक जुळतेशी दिसते. चरित्रकार भागवत लिहितात, ‘महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाचवृत्ती म्हणत. प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासधर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास. महाराजांस जेवण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत. परंतु महाराज अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’

एकदा स्वामी समर्थांनी स्वत:च्या सगुण देहाची कुंडली करण्याची आज्ञा श्री. नानाजी बापूजी रेखी (पिंगला) ज्योतिषी यांना केली व त्यांच्या हातावर हात ठेवून स्वहस्ते गंधाक्षता व तुळशीपत्रासह ती कुंडली नानाजींना दिली. त्यावेळी श्री रेखी यांच्या उजव्या हातावर विष्णुपद (आत्मलिंग) प्रसाद म्हणून उमटले. या कुंडलीत महत्त्वाचा उल्लेख म्हणजे धरणी दुभंग होऊन आठ वर्षाची बालमूर्ती हस्तिनापुरापासून १२ कोस दूर असलेल्या छेली खेडेगावात वडाखाली गणपतीच्या मूर्तीजवळ प्रगटली निराकार निर्गुण परब्रह्म (विश्वचैतन्य) देह धारण करून सगुणात येते व अवतार अवतार कार्य संपल्यावर पुन्हा निर्गुणात जाते. हा ईश्वर ज्या सगुण देहात प्रगट होतो त्या देहाची व जन्मकाळाची वैशिष्ट्ये त्यांचा कुंडलीत आढळतात. ही वैशिष्ट्ये स्वामींनीच मान्य केलेल्या व दिलेल्या पत्रिकेत आढळतात. स्वामी समर्थ ही विश्वशक्ती जेव्हा सगुणाकार देहात प्रगट झाली तेव्हाची वेळ व देहाची वैशिष्ट्ये विशेष आहेत. ती स्वामींनीच मान्य केलेल्या कुंडलीत प्रगट झालेली आहेत. जन्मकाल बहुधान्य संवत्सराचा (वैभवाचा) आहे. अश्विनी (सूर्यपत्नी) नक्षत्रावर चरणप्रीतीचा (ईश्वराचे चरणी भक्ती करण्याचे संस्कार होण्याचा) योग आहे. चैत्र मासातील द्वितीयेचा प्रहर आहे. आद्य पुरुषाचे स्पंदन-स्फुरण दाखवणारी नाडी आहे, देवगण आहे, ज्ञान यज्ञात चिंतनाच्या समाधीचे हवन करणारे ते यजुर्वेदी ब्राह्मण व नारसिंही चैतन्य स्वामी आहेत. राशी स्वामी मंगळ (मेष जन्मराशी तर मीन लग्नराशी) आहे. श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील ४० पैकी २१ वर्षे अक्कलकोट येथे घालवली. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. देहत्यागापूर्वी एक वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळीत सुरू केली होती. अवतारसमाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी ‘अखंड नाम-भजन’ सुरू ठेवले. देहप्रकृती ही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्नत्यागही केला. नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की, आपण बरे केव्हा व्हाल? तेव्हा स्वामी उत्तरले,

“जेव्हा पंढरी जळेल । अथवा डोंगर बोलतील । तेव्हाच आराम पडेल । दु:ख विव्हळ का होता”

म्हणजेच देहसमप्तीनंतर त्यांचे जगतोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे. भक्तांची समजूत घालून श्रीस्वामींनी त्यांना दु:खी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचा उच्चार केला.

‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’

अनन्यभावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवेन, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपल्या देहाचा त्याग केला. त्या दिवशी मंगळवार, शके १८०० (इ. स. 1878) बहुधान्य नाम संवत्सर चैत्र व. १३ दुपारी ३-३॥ चे सुमारास लौकिक दृष्ट्या पंचत्वात विलीन झाले.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 6 वे- “श्री गजानन महाराज, शेगाव”

दत्त संप्रदायातील सत्पुरुष सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

  1. […] दत्त संप्रदायातील सत्पुरुष १ ते ५दत्त संप्रदायातील सत्पुरुष ६ ते १०दत्त संप्रदायातील सत्पुरुष ११ ते १५दत्त संप्रदायातील सत्पुरुष १६ ते २०दत्त संप्रदायातील सत्पुरुष २१ ते २५ […]

  2. […] श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 1 ते 5श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 6 ते 10 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 11 ते 15 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 16 ते 20 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 21 ते 25 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 26 ते 30 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 31 ते 35 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 36 ते 40 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 41 ते 45 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 46 ते 50 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 51 ते 60 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 61 ते 65 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 66 ते 70 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 71 ते 75 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 76 ते 80 श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 81 ते 83 […]

  3. […] दत्त संप्रदायातील सत्पुरुष १ ते ५दत्त संप्रदायातील सत्पुरुष ६ ते १०दत्त संप्रदायातील सत्पुरुष ११ ते १५दत्त संप्रदायातील सत्पुरुष १६ ते २०दत्त संप्रदायातील सत्पुरुष २१ ते २५ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *