श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष १६ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

16) ब्रम्हर्षी श्री दत्तमहाराज कवीश्वर

जन्म: २ मार्च १९१०, माघ वद्य ६ शके १८३१, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे.
आई/वडील: सरस्वती/धुंडिराज शास्त्री
पत्नी: लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह १९३० साली
कार्यकाळ: १९१० – १९९९
गुरु: 1) मंत्रदीक्षा- धुंडिराज शास्त्री,
2) शक्तीपात दीक्षा- प. पु. गुळवणी महाराज
विशेष: प्रकांड पंडित, भारताच्या चार राष्ट्रपतींच्याकडून सन्मानित.
निर्वाण: १ मार्च १९९९, पुणे येथे.
वांड्मय: श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे समग्र वांड्मय पुनर्मुद्रण.

जन्म, बालपण व कौटुंबीक पार्श्वभुमी

विसाव्या शतकातील संत परंपरेतील आणी या आधुनिक काळातील ऋषी म्हणता येईल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे, ‘ब्रह्मर्षी श्री दत्तमहाराज कवीश्वर’ हे होते. दत्तमहाराजांचा जन्म एका शास्त्री-पंडिताच्या घराण्यातच झाला होता. त्यांच्या पिताश्रीचे नाव धुंडिराज शास्त्री आणी मातोश्रींचे नाव सरस्वती होते. दत्त महाराजांचा जन्म ‘नृसिंहवाडी’ येथे झाला म्हणूनच त्यांचे नाव ‘दत्त’ ठेवण्यात आले. ‘शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।’ ह्या जगद्गुरु तुकारामांच्या उक्तीप्रमाणे प. पु. दत्त महाराजांचा जन्म पिढ्यान्पिढ्या निष्ठा ठेवणाऱ्या कवीश्वराच्या घराण्यात झाला व या कवीश्वरांचे मूळ आडनाव सप्तर्षी हे होय. प. पु. दत्तमहाराजांचे पणजोबा श्री. दाजी दीक्षित हे प्रकांड पंडित होते आणी त्यांचा रामायण-महाभारताचाही चांगला अभ्यास होता. नरसोबावाडीला ते रोज पाच श्लोक करुन श्री दत्तप्रभुंच्या चरणी अर्पण करीत असत. त्यांच्याजवळ असलेल्या प्रतिभासंपन्नतेमुळे लोक त्यांना ‘कवीश्वर’ नावाने ओळखू लागले. (ह्याच प्रतिभेचा अविष्कार पुढे प. पु. दत्तमहाराजांच्या ठायी झालेला दिसतो.) त्यांचे चिरंजीव श्री. वक्रतुंड महाराज ह्यांचाही रामायण-महाभारताचा व्यासंग होता व त्यावर ते प्रवचनेही करीत. त्यांच्या पत्नी सौ. सावित्रीबाई ह्यांची वीस बाळंतपणे झाली, पण फक्त दोन मुली जगल्या. नंतर श्री. गोविंदस्वामींच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले. ते म्हणजे प. पु. श्रीदत्तमहाराजांचे वडील श्री. धुंडिराज शास्त्री होत. त्यांचा न्यायशास्त्राचा अभ्यास होता. त्यांना सद्गुरू वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराजांचा सहवास खुप लाभला. त्यांच्या पत्नी सौ. सरस्वतीबाई वाडीला रोज प्रदक्षिणा घालत असत. अश्या या दांपत्यांच्या पोटी बुधवार दि. २ मार्च १९१०, माघ वद्य शके १८३१ रोजी प. पु. दत्तमहाराजांचा जन्म झाला.

पुढे श्रीदत्त महाराजांचे शिक्षण पिताश्री धुंडिराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यांच्याकडे त्यांचे वेदाध्ययन झाले. वेदविद्येखेरीज ते मंत्रविद्या, साहित्यशास्त्र, व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादि विषयांचाही त्यांनी व्यासंग केला. नंतर ते अनेक गुरूंकडे शिकले पं. शंकरशास्त्री जेरे, व्यंकटेशशास्त्री अभ्यंकर, नागेश्वर शास्त्री, सुब्बा शास्त्री, राजेश्वर शास्त्री द्रवीड यांच्यासारख्या गुरूजनांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले आणी त्यांची कृपा संपादन केली. श्री दत्त महाराजांची विद्वत्ता आणि नम्रता अतुलनीय होती. त्यांना अनेक शास्त्रांचे शाब्दिक ज्ञान प्राप्त झाले होते. कमी होती ती प्रत्यक्ष अनुभूती! त्यांना तेही भाग्य लाभले. ते गुळवणी महाराजांच्या सहवासात आले. थोड्याच दिवसांत एकमेकांचा स्नेह जुळला. गुळवणी महाराजांनी त्यांना शक्तिपातदीक्षा दिली. एवढेच नाही, तर त्यांना आपले उत्तराधिकारी नेमले.

यानंतर धारवाड इथे पं. नागेशशास्त्री उप्पन बेट्टीगिरी यांच्या साक्षेपी नजरेखाली प. पू. महाराजांनी न्यायशास्त्राचे धडे गिरवले. पुढे विद्वज्जनांच्या अनेक सभांमध्ये त्यांची विद्वता निखालसपणे सिद्ध झाली. कांची कामकोटीला सद्गुरू शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांनी आयोजित केलेल्या विद्वत सभेत प. पु. दत्त महाराजांनी वेदान्त विशद करून त्यांची वाहवा मिळविली. धारवाडच्या अद्वैत ब्रह्मविद्या परिषदेतील प. पु. दत्तमहाराजांनी केलेल्या वेदान्तावरील अप्रतिम विवेचनाचा वृत्तांत कांची कामकोटीच्या श्रीमद् शंकराचार्यांना कळल्यावर त्यांनी श्री दत्तमहाराजांसाठी आदरपूर्वक सुवर्णकंकण, वस्त्र आणी श्रीफळ पाठवले. यानंतर पुढे १९३० मध्ये बार्शी येथील श्री. भगवंतराव पाठक यांच्या कन्येशी (लक्ष्मीबाई) प. पु. दत्तमहाराजांच्या विवाह झाला. योगिराज गुळवणी महाराजांनी त्यांच्यावर अपरंपार प्रेम केले. त्यांचा सहवासही खूप दिला. १९३७ साली पुण्याला नातूंच्या वाड्यात प. पू. दत्तमहाराजांचे बिऱ्हाड झाले. पुढे १९५७ साली इन्फ्लूएंझाच्या साथीत प. पु. महाराजांची शोभा नावाची मुलगी दगावली. त्यावेळेस दत्तमहाराज औखाडला सप्ताहासाठी गेले होते. ह्या सर्व काळात प. पु. गुळवणी महाराजांनी कवीश्वर कुटुंबियांना अत्यंत ममतेने सांभाळले. मुलीच्या मृत्यूचा आघात प. पु. दत्तमहाराजांनी अत्यंत धीराने सहन केला. कसोटीचे प्रसंग संतांच्या आयुष्यातही येतात आणी तिथेच त्यांच्या स्थिर विवेकशील मनाचा प्रत्ययही येतो.

एकदा योगिराज गुळवणी महाराज गोवईकरांच्या चाळीत राहत होते. त्यावेळेस पानशेतचे धरण फुटले, पुण्यात हाहा:कार झाला आणी चाळीत पाणी शिरले. लोकांनी प. पु. गुळवणी महाराजांना बाहेर काढले परंतु त्यांचे देव, पोथी वगैरे बाहेर आणता आली नाहीत. दुसऱ्या दिवशी मातीतून लोकांनी देव बाहेर काढले. देवांसाठी आश्रमासारखी वास्तू असावी असे. प. पु. दत्तमहाराजांना वाटत होतेच आणी त्यांचा संकल्प पूर्ण झाला व ‘वासुदेव निवास’ ही वास्तु आकाराला आली. ह्या वास्तुला ‘वासुदेव निवास’ हे नावही प. पु. दत्तमहाराजांनीच सुचवले. अनेक नावे येत होती. पण हे नाव निश्चित करण्यामागे प. पु. दत्तमहाराजांचा काही विचार होता. त्यांनी सांगितले, ‘वासुदेव याचा अर्थ सर्वांना धारण करणारा असा आहे. ह्या आश्रमाचे कार्य व्यापक स्वरूपाचे असेल, सर्व जगाच्या कल्याणाचे कार्य इथून होईल.’ ह्या जाणिवेतून ‘वासुदेव निवास’ हे त्या वास्तूला नाव सुचवले गेले. या वासुदेव निवासात प. पु. गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार पहिला सप्ताह प. पु. दत्त महाराजांच्या भागवताचा झाला आहे. पुढे वाडीच्या पैलतीराला श्री दत्तअमरेश्वराचे जे स्थान आहे, त्याचा जीर्णोद्धारही त्यांनी केला.

प. पु. दत्तमहाराजांनी बरेच लेखनही केले. सद्गुरू टेंबे स्वामी महाराजांचे समग्र वांड्मय १९५४ मध्ये श्री. स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांनी १२ खंडांत प्रकाशित केले. १९६५ मध्ये टिळक विद्यापीठाने त्यांच्या द्वैताद्वैतवादी निम्बार्काचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याचा अनुवाद प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह ‘वेदान्तपारिजात सौरभ’ या नावाने प्रसिद्ध केला. श्री. वासुदेवानंद सरस्वतींचे चरित्र ‘गुरुदेवचरित्र’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केले. गुण गाईन आवडी, चांदणे कैवल्याचे, संतसंग, नारायण नमोस्तुते इ. पुस्तकातून प्रकाशित झालेली त्यांची प्रवचने साधकांना मार्गदर्शन करणारी आहेत. ‘विवेकचूणामणि’ हा त्यांच्या प्रिय ग्रंथ ! त्यातील १२५ श्र्लोकांचे त्यांनी केलेले विवरणही प्रसिद्ध झाले आहे.

एकदा सज्जनगडावरून प. पु. श्रीधरस्वामींनी दासनवमीच्या उत्सवाला प. पु. दत्तमहाराजांना बोलावले. त्यावेळी दत्तमहाराजांनी प्रकृती ठीक नव्हती. ताप येत होता तरी प. पु. गुळवणी महाराजांच्या आज्ञेवरून ते गेले, गडाच्या पायथ्याशी आल्यावर ‘प्रकृती अस्वस्थ आहे’ असा त्यांनी श्रीधरस्वामींना निरोप पाठवला तेंव्हा ‘डोली करून या’ असा उलटा निरोप आला. पण प. पु. दत्तमहाराज तसेच वरती गड चढून गेले आणी तिथेच पहाटे त्यांना शक्तिपात दीक्षा झाली. दीक्षा मिळाली तरी प. पु. गुळवणी महाराज सगुणात होते तोपर्यंत आपल्या गुरुविषयी अपरंपार प्रेमादराची भूमिका असणाऱ्या प. पु. दत्तमहाराजांनी इतर साधकांना दीक्षित केले नाही. १५ जाने. १९७४ ला प. पु. गुळवणी महाराजांची इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन प्रयागला झाल्यावर त्यांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली.

श्री दत्तमहाराजांनी आपल्या दैवी शक्तीचे किंवा अतींद्रिय शक्तीचे कधीही प्रदर्शन केले नाही. असे असले तरीही त्यांच्याकडे अनेक भक्त आणी अनुयायी यांची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांत श्रीदत्तमहाराजांनी केलेल्या चमत्कारांचा उल्लेख असे. शिवाय अशा प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अनेक भक्त त्या हकिकती ठासून सांगत असत. त्यात अनेक डॉक्टर, प्राध्यापक, प्राचार्य, चार्टड् अकाउंटंटस्, इंजिनियर आणी उच्च अधिकारी अशा उच्चविद्याविभूषित व्यक्तीही आहेत. श्री दत्तमहाराजांनी रोग कसे बरे केले, अपघातापासून भक्तांना कसे वाचवले, परीक्षेत यश मिळवण्यासाठी कशी मदत केली, दूर ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन देऊन मार्गदर्शन कसे केले अशा अनेक हकिकती ऐकायला मिळतात. त्या हकिकती सांगणारे जबाबदार व उच्चविद्याविभूषित असल्याने या हकीगती केवळ अंधश्रद्धा म्हणून दूर सारता येणार नाहीत. काही भक्तांना श्री दत्तमहाराजांचे स्वप्नात दर्शन झाले तर काहींना त्या स्वप्नात श्री दत्तमहाराजांनी कपाळावर भ्रुकुटीमध्याला बोटाने केलेला स्पर्श अनेक महिने जाणवत राहिला असे काही भक्त सांगतात. काही भक्तांना श्रीदत्तमहाराजांचे किंवा ताईमहाराजांचे दिवसाउजेडी प्रत्यक्ष दर्शन झाले आणी त्यामुळे शांती मिळाली किंवा अडचणीच्या वेळी मदत मिळाली असे काहीजण सांगतात. श्री दत्तमहाराज देहाने पुण्यातच असले तरी त्या भक्तांना परगावी आश्चर्यकारकरित्या मदत मिळाली असेही अनेक भक्त सांगतात. या चमत्कारांचा स्पष्ट व तपशीलवार उल्लेख अनेक पत्रांतुना आहे.

प. पु. महाराजांचे एक वैशिष्ठ होते की, ‘साधकांनी उपासना करूनच जीवनात इच्छित गोष्टींची प्राप्ती करून घ्यावी’, म्हणून ते साधकांना मंत्रउपदेश, श्रीगुरुचरित्राचे अनुष्ठान, देवी माहात्म्य इ. ग्रंथ वाचन किंवा जपाची उपासना सांगत. यावरून एकच समजते की, श्रीमद् नरसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर) यांनी ज्याप्रमाणे साधकांना, भक्तांना उपासना सांगून त्यांची कार्यसिद्धी केली. त्याप्रमाणे पु. महाराजांचे कार्य होते. ते साक्षात सिद्धपुरुषच होते. वास्तविक, महाराजांच्या सांगण्यात एक संकल्प शक्ती व संजीवन शक्ती होती, म्हणून साधकांची उपासना फलद्रुप होत असे. एकनाथ महाराजांच्या जीवनात जसा प्रपंच आणी परमार्थ यांचा समन्वय दिसतो, तसाच समन्वय प. पु. दत्त महाराजांच्या जीवनात होता. षड्दर्शनांचा अभ्यास केलेले, कोणत्याही विषयाची खोल जाणारी सूक्ष्म व मर्मग्रही दृष्टी असलेले, भक्तीमार्गाचे पुरस्कर्ते, नम्रता, विनयशीलता, ज्ञान, भक्ती आणी शास्त्रशुद्ध आचरण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची अंगे होती. आयुष्यभर महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून त्यांनी भागवत सप्ताह केले व अनेक भाविकांच्या आयुष्याचे कल्याण केले. अश्या या दत्तावतारी सत्पुरुषाने शेवटच्या आजारपणात महाभारत वाचुन घेतले व संपुर्ण लक्ष परमात्म स्वरूपावर स्थिर केले. प. पु. महाराजांनीही १३ फेब्रुवारीपासून मौन धारण केले ते अखेरपर्यंत सोडले नाही व १ मार्च १९९९ रोजी दत्तचरणी लीन झाले.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 17 वे- “श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर”

17) श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर

जन्म: श्रावण वद्य ८ शके १७७७, दिनांक ३ सप्टेंबर १८५५, रोहिणी नक्षत्र, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी.
जन्म नाव: दत्तोपंत कुलकर्णी.
आई/वडिल: गोदाक्का उर्फ सिताबाई/रामचंद्रपंत कुलकर्णी.
कार्यकाळ: १८५५ – १९०५
गुरू: श्री बालमुकुंद/बाळाप्पा (मुळ नाव श्री बाळाजी अनंत कुलकर्णी), दिक्षा – अश्वीन वद्य १२, शके १८७५.
संप्रदाय: अवधुत संप्रदाय
वांड्मय: गीतासार, अमृतानुभव, श्रीदत्त प्रेम लहरी
विवाह: मातुल घराण्यातील श्रीपादपंत यांची कन्या यमुनाक्का यांच्याशी दिनांक ४-५-१८८२ रोजी तर पत्नीचा मृत्यु ८-३-१९०४ रोजी.
निर्याण: अश्वीन वद्य ३ शके १८२७, दिनांक १६-१०-१९०५, (५१ व्या वर्षी)
विशेष: दत्त प्रेमलहरी

भारतात प्रचलित असलेल्या विविध उपासनामार्गात ‘दत्तसंप्रदाय’ हा अत्यंत प्राचीन आहे, किंबहुना इतर संप्रदायांवर त्याची छाप कमी अधिक प्रमाणात दिसून येते. अवधुतपंथ हा त्यापासून फारसा वेगळा नाही. दत्तसंप्रदायात अनेक महान लोकोत्तर विभुति निर्माण झाल्या आणी त्यांनी हा संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवला असुन त्याची परंपरा अखंड राखली आहे. अशा परंपरेत ‘श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर’ या श्रीदत्तावतारी सत्पुरुषाची गणना असुन, त्यांनी या पंथाची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे.

जन्म, बालपण व कौटुंबीक पार्श्वभुमी

श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत तर त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातुश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके १७७७ म्हणजे दि. ३-९-१८५५ रोजी रोहिणी नक्षत्रावर, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी त्यांच्या मातुलगृही झाला. हे गाव घटप्रभा नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मध्यात वसलेले असुन दत्तोपंतांच्या आयुष्याचा बराच काळ या गावांशी निगडित आहे. दत्तोपंतांचे वडील हे बेळगावनजीक बाळेकुंद्री या गावच्या कुलकर्णी घराण्यापैकी होत. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी या गावी व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांना आपला शिक्षणक्रम चालवावा लागला.

श्री पंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती व निवृत्तींचा संगम होता. त्यांचे घर सदैव अतिथी व शिष्यांनी भरलेले असे. जवळ जवळ बावीस वर्षे त्यांनी बेळगाव येथील मिशन हायस्कूलात शिक्षकाचे काम केले तर त्याहून अधिकच अध्यात्म व विद्यादानाचे कार्य केले. त्यांच्या पाचही बंधुंना त्यांनी शिक्षण देऊन पुढे आणले व त्यांच्या भरभराटीतच स्वत:चे समाधान मानले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पण ती फार काळ लाभली नाहीत. श्रीपंतांचे पाळण्यातील नाव श्रीकृष्ण असे ठेवले होते. पुढे दृष्टांत होऊन ‘दत्तात्रय’ असे दुसरे नाव ठेवण्यात आले. वडीलमाणसे त्याला प्रेमाने दत्तु म्हणून हाक मारीत. घरात प्रथम जन्मास आलेले अपत्य म्हणुन दत्तुवर सर्वांचे विशेष प्रेम होते.

बेळगावास इंग्रजी शिक्षण चालु असताना पंताचा मावसभाऊ गणु हा मारीहाळास आपल्या गावी राहत होता. हे गाव बाळेकुंद्रीच्या पुर्वेस ४/५ मैलांवर असुन तेथून एक मैल पुर्वेस कर्डेगुद्दी हे गाव आहे. त्या ठिकाणी श्री बालमुकुंदाची स्वारी पार्शवाडहून येऊन राहिली होती. त्यांचे मुळचे नाव ‘बाळाजी अनंत कुलकर्णी’ असे होते. ते परमार्थातील असामान्य योग्यतेचे तपस्वी व महायोगी असून परमहंस पदवीस पोचलेले होते. एकदा त्यांचा अनुग्रह पंताचे मावसभाऊ गणपतराव यांजवर होऊन त्यांनी दत्तुस त्यांचे दर्शनास येण्याबद्दल पत्र धाडले. त्यास दत्तुने उत्तर पाठविले ते असे की, “ब्राह्मणांना गायत्रीमंत्र व उपदेश याविना अन्य मंत्राची अगर गुरूची आवश्यकता काय? तू आपला उद्योग सोडून कोणा भोंदू, बैराग्याचे नादी लागला आहेस. ताबडतोब शुद्धीवर ये व आपल्या प्रपंचाकडे लक्ष दे.” हे दत्तुचे उत्तर बाळाप्पास समजताच त्यांनी “हे पत्र लिहिणाऱ्याला धक्का पोचून तो लवकरच मरतो बघ” असे उद्गार गणु व इतर शिष्यमंडळींपुढे काढले. ते ऐकून गणु रडु लागल्याचे पाहून बाळप्पा हसून म्हणाले की “तो इकडे येईलच. त्यानंतर पुढे काय होते ते पहा.”

त्यावेळी दत्तू दड्डीस होता. त्याला एकाएकी विषमज्वर येऊ लागला व त्यातच सान्निपात झाला. त्या भ्रमात “बाळप्पा, बाळप्पा” असे तो बडबडू लागला. घरची सर्व मंडळी घाबरली व त्यांनी देवास नवस मागितला की, ‘दत्तु बरा होताच त्याला बाळप्पांकडे पाठवुन देऊ. या दुखण्यातून कृपा करून त्याला बरा कर’. दत्तुस लवकरच आराम पडला व त्यानंतर त्यांची व बाळप्पांची गाठ पडून त्यांची त्याजवर पुर्ण कृपा झाली.

श्रीबालमुकुंदाचा अनुग्रह होताच दत्तुचा पुनर्जन्म होऊन तो श्रीपंत बनला, त्यांचा सहवास पंतांना फार तर दोन-तीन वर्षे लाभला असेल, पण तेवढ्या अवधीत इंग्रजी शाळेतील अभ्यास चोख करून, बेळगाव येथील आपल्या प्रपंच खर्चासाठी मदत म्हणून काही शिकवण्या धरून व बालमुकुंदाच्या कृपाछत्राखाली गुरुगृहीचे खेळ-खेळताच त्यांनी सर्व प्रकारची योगसिद्धी मिळविली ही अत्यंत नवलाची गोष्ट होय. कर्डेगुद्दीपासून ४/५ मैल पुर्वेस देसनूर येथे श्रीबालमुकुंदाचे वास्तव्य काही काल असताना तेथील एका देवालयात ते योगाभ्यासाठी बसत असत. ती जागा अद्यापही दाखविली जाते. कर्डेगुद्दीच्या डोंगरावर ‘अय्यन फडी’ या देवस्थानासन्निधही त्यांचेकडून बाळप्पांनी तप करविले. एकदा तीन दिवस अहोरात्र अखंड गुरूध्यान करीत बसण्याची व बिलकूल निद्रावश न होण्याची श्रीबालमुकुंदांनी आपल्या शिष्यमंडळींना आज्ञा केली. त्यात कोणी जेवताना झोपले, तर कोणी स्नान करताना गुंगी येऊन खाली पडले. एकटे पंत तेवढे अखेरपर्यंत टिकून राहिले. याप्रमाणे श्रीपंत सर्व प्रकारे योगारूढ झाले. पंतांना इ. स. १८७५ ते १८७७ अखेर, एवढाच काल काय तो बाळप्पांचा सहवास मिळाला. शके १७९९च्या कार्तिक महिन्यात बाळप्पांचा श्रीशैल्ययात्रेस जाण्याचा निश्चय ठरला. त्याचे अगोदर थोडे दिवस त्यांनी पंतांना गुरूमार्ग चालविण्याची आज्ञा केली होती. पंतांनी त्याबाबत पुष्कळ आढेवेढे घेतले पण बाळप्पांनी निक्षून सांगितले की, “हे काम तुला केलेच पाहिजे, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. अपात्रता वगैरे तुझी काही सबब चालणार नाही. तुला माझे पूर्ण वरदान आहे !” पंतांना ती आज्ञा स्वीकारणे भाग पडले. व श्रीबालमुकुंद ठरल्याप्रमाणे श्रीशैल्याकडे निघून गेले. ते पुन्हा काही परत आले नाहीत. यावेळी पंत मॅट्रीकची परीक्षा पास झाले नव्हते. परंतु अशा सर्व प्रकारे अडचणीत असताना त्यांचेवर गुरूमार्ग चालविण्याचा भार पडला. त्यावेळी त्यांचे वय फक्त २२/२३ वर्षाचे असेल. बाळप्पांच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सन्मार्गदर्शन करणे व गुरूमार्ग चालविणे हेच तेव्हापासून त्यांचे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसले.

सन १८८०च्या नोव्हेंबरमध्ये पंत मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील वर्षी त्यांनी आपला बंधु गोपाळ व मामेबंधु नाना यांना इंग्रजी शिकवण्याकरिता बेळगावास आणुन ठेविले व आपण शाळामास्तरची नोकरी पत्करली आणी कसाबसा बेळगाव येथील संसार चालवु लागले. पुढल्याच वर्षी म्हणजे शके १८०४ वैशाख व. १ तिथीस त्यांचे लग्न झाले व ते पूर्ण गृहस्थाश्रमी बनले पण त्यांचा संसार हा सामान्य माणसासारखा नसुन गुरूवचनांचा अनुभव घेण्याचे क्षेत्र बनून राहिला होता. त्या स्वरूपात त्यांचेकडून अखंड सद्गुरूसेवा घडली. प्रत्येक बाबतीत इतरांना आदर्शभुत असा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरून दाखविला. क्रमाने एकेक बंधु व आप्तेष्टांची मुले व गरीब विद्यार्थी त्यांचेकडे शिक्षणासाठी येऊन राहु लागले. त्या सर्वांवर कडक नजर ठेवून, त्यांचेकडून उत्तम अभ्यास व नीतिनियमांचे परिपालन कटाक्षाने करविले. अखेरपर्यंत त्यांनी उत्तम शिक्षक असे नाव मिळविले. संसार व परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना अनेक बाबतीत साहाय्य दिले. इतके असून कधीही ते द्रव्यास शिवले नाहीत. पगार हाती येताच ते आपला बंधुपैकी जो व्यवस्थापक असेल त्याचे हवाली करणे, हा त्यांचा प्रघात असे. शाळेतुन येताच ते आपल्या कोचावर बसून वेदांत ग्रंथाचे वाचन, चर्चा व मुमुक्षूजनांचे समाधान करणे यात निमग्न असत. सकाळ – संध्याकाळ नियमाने भजनपूजन व येणाऱ्याजाणाऱ्यांचे आतिथ्य यामुळे घडत असे.

सन १८८३ पासुन पंतांची वृत्ती योग्याभ्यासावरून भक्तीकडे वळली. मन भजनात रंगु लागले. सहज काव्य-स्फूर्ति होऊ लागली. त्यांचा काव्यसंग्रह ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ (पुष्प १ले) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काव्य नानाविध रसांनी व भावनांनी ओथंबलेले आणी त्याबरोबर तत्त्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. सन १८८३ पासून १८८५ चा काल संचार, प्रबोधन व संप्रदाय-प्रचार यात पंतांनी घालविला व शिष्यशाखा जोडली. भजन-पुजन, अध्यात्म चर्चा व हसत-खेळत उपदेश हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम, यात बालमुकुंदाचे स्मरण व पुनर्भेटीची तळमळ ही सतत अनुस्युत होती. सन १८८५ अखेर अंतर्मुख अवस्थेत त्यांना बाळप्पांचे निर्याण झाल्याचे कळून आले व जबाबदारीची जाणीव तीव्र झाली. त्यांनी बालमुकुंदांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यांसारखे उत्सव चालू केले. सन १८८९ पर्यंतच्या काळात अशा रीतीने पंथ-प्रचार-कार्याला चालना दिली. त्या वर्षाअखेर एक दत्तमंदिर बांधण्याचे कार्य त्यांनी पूर्ण केले. पुढे सन १८९१ साली त्यांनी आपला ‘गीतासार’ हा निबंध लिहिला. सन १८९४ चे सुमारास श्रीज्ञानेश्वरांच्या “अमृतानुभव”चा अनुवाद शुद्ध मराठीत करण्याचा उपक्रम केला, पण तो पूर्ण झाल्याचे दिसुन येत नाही. त्यांचे अनेक लहान मोठे लेख आहेत. ते प्रासंगिक व प्रासादिक आहेत. लिहावे म्हणुन लिहिलेला एकही नाही. सर्व स्वानुभवाचे बोल. पंतांच्या सर्व लेखांचा उल्लेख या अल्पशा मर्यादेत करणे अशक्य आहे. उपलब्ध असलेले सर्व वांड्मय, ‘श्री दत्तप्रेमलहरी’ या त्यांच्या पुस्तकमालेत प्रसिद्ध झालेले आहे.

पुढे इ. स. १९०३ पासून पंतांची प्रकृति ठीक राहिनाशी झाली तेंव्हा त्यांनी शिक्षकीपेशाचा राजीनामा देऊन अखंड अवधूत-चरण-सेवेला भरपूर सवड काढली व ते भजन, प्रवचनात रंगून राहु लागले. आश्विन वद्य ३ शके १८२७ हा पंतांच्या ऐहिक जीवनातील शेवटचा दिवस. त्या दिवशी आप्त-स्वकीयांच्या सान्निध्यांत, ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर करीत करीत, त्यांनी आपला देह ठेवला. पंतांची समाधी ‘बाळेकुंद्री’ येथे आहे. या स्थानाला आता तिर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे व तो गाव आता ‘पंत-बाळेकुंद्री’ म्हणुन ओळखला जातो. पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त दरसाल तीन दिवस उत्सव होतो व मोठी यात्रा जमते. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्दछायेत अत्यंत रम्य असे आहे. पंतांचे तत्त्वज्ञान संपुर्ण अद्वैतवादी, प्रवृत्ती-निवृत्तीचा समन्वय घालणारे असे आहे. त्यांनी प्रथम योगाभ्यास पुष्कळच केला पण भक्तीची ओढ अनावर ठरून, अवधूतमार्गातील साधनेत पराभक्तीची भर घातली.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 18 वे- “प. पु. श्रीरंग अवधुत स्वामी”

18) प. पु. श्रीरंग अवधुत स्वामी

जन्म: रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे सोमवार दि. २१ नोव्हेंबर १८९८, कार्तिक शुद्ध नवमी (कुष्मांड नवमी) दशग्रंथी ब्राम्हण कुटुंबात.
आई/वडील: रुख्मीणी/विठ्ठलपंत वालामे.
गुरु: श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी.
कार्यकाळ: १८९८-१९६८.
वांड्मय: गुरु लिलामृत, दत्तबावनी, श्रीगुरुमुर्ती चरित्र, गुरुचरित्र गुजराती मध्ये, वासुदेव सप्तशती, तसेच अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये.
विशेष: नारेश्वर तीर्थ क्षेत्र वसवले, संपूर्ण गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचा प्रसार.
समाधी: १९ नोव्हेंबर १९६८, संवत २०२५ च्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या मंगळवारी, दत्त चरणी हरिद्वारला देह ठेवला, अंत्येष्ठी व समाधी नारेश्वर येथे.

जन्म, बालपण व कौटुंबीक पार्श्वभुमी

श्रीरंग अवधुत महाराजांचे पुर्वाश्रमींचे नाव ‘पांडुरंग विठ्ठल वालामे’असे होते. श्रीमहाराजांचे वडील श्री. विठ्ठलपंत हे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान् ब्राह्मण असुन गुजरातमधील गोधरा या शहरात श्री. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरात देवपुजेसाठी ते ‘देवळे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी)’ या गावावरुन आले. पुढे श्री. विठ्ठलपंत व रुक्मिणी या भाग्यशाली मातापित्यांच्या पोटी सोमवार दि. २१ नोव्हेंबर १८९८, कार्तिक शुद्ध नवमी (कुष्मांड नवमी) रोजी श्रीरंग अवधुत महाराजांचा जन्म झाला.

बालपणापासुनच श्रीमहाराजांना जिज्ञासावृत्ती स्वस्थ बसु देईना. एकदा दारावरून प्रेत चालले असताना त्यांनी आपल्या वडीलांना अनेक प्रश्न विचारले व शेवटचा प्रश्न होता की, ‘ही जन्ममरणाची उपाधी दूर होण्यास उपाय कोणता?’ वडिलांनी सांगितले, श्रीराम नामामुळे उपाधी दूर होते व त्याचक्षणी श्रीमहाराजांनी मनाशी खुणगाठ बांधली आणी आपले संपुर्ण जीवन इश्वर सेवेला वाहीले. पांडुरंग ५ वर्षांचे व त्यांचे धाकटे बंधु नारायण २॥ वर्षांचे असतानाच श्री. विठ्ठलपंत प्लेगला बळी पडुन विठ्ठलचरणी विलीन झाले. पुढे पांडुरंग ८ वर्षांचे झाले असताना, देवळे गावी त्यांचा व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर श्री महाराज नृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले त्यावेळी श्रीटेंबेस्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ हे शब्द ऐकताच पांडुरंगांनी कपडयासकट श्रीचरणांवर मस्तक अर्पण केले आणी त्यानंतरच त्यांचा मार्ग स्पष्ट झाला व साधनेला धार चढु लागली.

श्रीरंग अवधुत महाराजांची बुद्धी तेजस्वी व स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पदरी लहान भाऊ, विधवा माता यांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती म्हणून बी. ए. च्या परीक्षेनंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली परंतु त्यात त्यांचे मन रमेना व साधनेसाठी हिमालयात जाण्यांची ईच्छा वारंवार होवु लागली. एके दिवशी धाकटा बंधु नारायण आता मातेचे पोषण करण्यास समर्थ झाला, हे पाहुन व रुक्मिणीमातेची आज्ञा घेऊन श्री पांडुरंग आध्यात्मिक तपाकरिता घराबाहेर पडले. तेंव्हा त्यांना मार्गदर्शन करताना काही अधिकारी संतांनी सांगितले होते की, “बाळ, तु उपासनेसाठी नर्मदा किनारीच जागा शोधुन काढ.” त्याचवेळी त्यांना एकाने नर्मदा किनारी नारेश्वराची जागा सुचवली.

अखेर १९२५ च्या डिसेंबर महिन्यात संवत १९८२ च्या मार्गशीर्ष वद्य चतुर्थीस ब्रह्मचारी पांडुरंगानी (बापजी) नारेश्वरात आसन स्थिर केले. नारेश्वराच्या निबिड जंगलात जेथे हिंसक पशुंचे भय आणी पिशाच्चयोनीचा त्रास होता तेथे साधना काळाच्या प्रारंभी अनेक अडचणी सहन करून व नर्मदातीरी मांडी ठोकुन त्यांनी ती भुमी हलवुन टाकली आणी सात गावांच्या स्मशानास नंदनवनाप्रमाणे सिद्ध तपोभुमीत रूपांतरित केले. ज्या निंबवृक्षाखाली चाळीस वर्षापर्यंत रक्ताचे पाणी करून तपश्चर्या केली आणी उघड्या डोळ्यांनी भगवान श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार प्राप्त केला, त्या निंबाने स्वत:चा कडुपणा सोडुन तो मधुर झाला व खाली झुकुन त्याने जमिनीला स्पर्श केला. पुढे प. पु. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराजांनी केलेल्या स्वप्नादेशानुसार त्यांनी दत्तपुराणाच्या १०८ पारायणांचे अनुष्ठान पुर्ण करून त्यांच्या उद्यापन रूपाने १०८ दिवसांत पायी श्रीनर्मदामैय्याची परिक्रमा केली. गृहत्यागानंतर अवधुतजींनी (बापाजी) कधीही द्रव्यास स्पर्श केला नाही आणी चुकुनसुद्धा जर कोणी त्यांच्यासमोर पैसे ठेवले तर ते स्वत: उपवास करीत. कधीही भाषण प्रवचन न करणे, प्रचार न करणे आणी देवाचे कार्य देवच करतो, “श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन् न मातु: परदैवतम् भक्तीर्दम्भी विना भावम् परस्परदेवो भवम्” सारख्या अनेक उच्च सिद्धांतांना जीवनात उतरवुन दाखविले. स्वत: उच्च कोटीचे सिद्ध संत असतानाही स्वत:च्या आईच्या आज्ञेशिवाय ते कोणतेही पाऊल उचलत नसत. पुढे त्यांनी मातेच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारेश्वरात मातृस्मृतिशैल स्मारकाची रचना केली व गुजराथमध्ये दुसरे मातृतीर्थ उभे केले.

अवधुतजींनी नारेश्वर आश्रम संपुर्णपणे वैदिक परंपरेचा ठेवला आणी निष्कामभक्तीचा मुक प्रचार केला. अनेक नास्तिकांना आस्तिक केले, कित्येकांची घरे केली, कित्येकांची घरे भंगताना वाचविली, कित्येकांना आधिव्याधि उपाधीमधून मुक्त केले, कित्येक आंधळ्यांचे डोळे आणी पंगुंची काठी झाले, कित्येकांची व्यसने सोडविली, कित्येकांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आरूढ केले. जिज्ञासु भक्तांचे पथदर्शक झाले. कित्येकांना दृष्टिमात्राने ज्ञानाची दिशा दिली, कित्येकांची जीवने सुधारलेली, कित्येकांचे मरण सुधारले, कित्येकांना असाध्य जीवघेण्या रोगांमधून वाचवुन जीवनदान दिले. अनेक स्त्रियांना संतानप्राप्ती करवुन वांझपणाच्या टोमण्यातून वाचविले. त्यांची प्रेरणा आणी आशीर्वादाने कित्येक डॉक्टर, इंजीनिअर, प्राध्यापकांनी अनेक सिद्धींचे सोपान सर केले. राजा किंवा रंक, अबुद्ध किंवा ज्ञानी सर्वांनाच त्यांनी भक्तीच्या रंगाने रंगविले. अवधुतजींचे उपास्य दैवत भगवान दत्तात्रेयांची लीला ग्रंथित करणारा १९००५ दोह्यांचा एक महाकाव्यासारखा वरद आणी औपासनिक ग्रंथ “श्रीगुरुलीलामृताची” रचना करून आपल्याला मृत तत्त्वातुन अमृत तत्त्वाकडे जाण्याची उपासना दिली आणी प्रत्यक्ष जीवन जगण्याची कला शिकविली. या महान पवित्र ग्रंथाचे पाठ पारायण नियमितपणे करून अनेक लोक स्वत:चे ऐहिक आणी पारलौकिक कल्याण साधत आहेत.

अवधुतजी संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी अनेक देवदेवींच्या प्रार्थनेची स्तोत्रे आणी संकीर्तने संस्कृतात रचली जी ‘रंगहृदयम्’ नावाने ग्रंथस्थ झाली. त्यांचे अनेक साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांच्या साहित्यात वेदान्ताचे तत्त्वज्ञान भरपूर भरलेले असुनही सामान्य मनुष्य या साहित्याचा आनंद घेऊ शकेल अशी अद्भुत सरलता त्यात आहे. संवत १९९१ च्या माद्य शुद्ध प्रतिपदेस सोमवारी ता. ४/२/१९३५ रोजी उत्तर गुजरातच्या कलोल तालुक्याच्या सईज गावी स्मशानाजवळील सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात श्री. कमलाशंकर त्रिपाठी नावाच्या एका भक्ताच्या धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबाईंना पिशाचपीडेतून मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी ५२ ओळींची जी स्तुती रचली तीच आपली “श्रीदत्तबावनी”. खरोखरतर सौ. धनलक्ष्मीबाईंना निमित्त करून अवधुतजींनी समस्त मानवजातीवर अहुतकी कृपा वर्षाविली आहे आणी आपल्याला हे अमोघ संकटविमोचनस्तोत्र प्राप्त झाले. जे आज श्रीरंगपरिवारात आधि-व्याधि-उपाधीच्या निवारणासाठी फलदायी स्तोत्र ठरले आहे.

पुढे श्रीगांडामहाराजांनी लिहिलेला ‘श्रीगुरुमूर्तिचरित्र ग्रंथ’ संशोधन करून भडोच शहरी छापला आणी तेथेच १०८ श्लोक असलेले ‘वासुदेवनामसुधा’ हे श्रीटेंबेस्वामींचे जीवनचरित्र संक्षिप्त रूपाने त्यांनी लिहिले. नारेश्वरी श्रीमहाराजांचा कीर्तिसुगंध आता दरवळु लागला होता. आर्त, मुमुक्षु यांची रीघ लागली आणी जंगलचे मंगल झाले. श्रीदत्तजयंतीकरिता हजारो लोक येऊ लागले. पण नारेश्वराला खरे महत्त्व प्राप्त झाले ते श्रीरंग अवधुत महाराजांच्या पुज्य मातोश्रींच्या करिता. संवत् १९९२ मध्ये पु. मातोश्री नारेश्वरी राहण्यास आल्या. धाकटे बंधु नारायणराव हेही आजारी अवस्थेत नारेश्वरी आले. परंतु दत्तप्रभुंची इच्छा निराळीच होती. अखेर नारायणरावांचा नश्वरदेह श्रीदत्तचरणी विलीन झाला तसेच संवत २०२३च्या ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध एकादशीस त्यांच्या मातोश्रीही ब्रह्मलीन झाल्या म्हणजे अगदी मुक्त झाल्या. पुढे नारेश्वरी दत्तकुटी तयार झाल्यावर बरेच आश्रम, धर्मशाळा बांधुन तयार झाल्या. महाराजांचे गुजराती भक्त त्यांना राजैश्वर्यात ठेवत होते पण महाराजांची वृत्ती अत्यंत विरागी अन् फक्त एक लंगोट हेच वस्त्र होते.

पुढे महाराजांनी काही गुजराती भक्तांबरोबर १९५० साली गाणगापुर, नृसिंहवाडी. औदुंबर, पंढरपुर, अक्कलकोट वगैरे तीर्थक्षेत्री यात्रा केली. यानंतर त्यांनी श्रीटेंबेस्वामींच्या जन्मग्रामी (माणगाव) मोठया प्रमाणात श्रीदत्तजयंती साजरी केली. श्रीटेंबेस्वामींच्या समाधिस्थानी-गरुडेश्वरी-तर दर आषाढ शुद्ध प्रतिपदेला उत्सवासाठी ते जात. श्रीमहाराज ज्या दिवशी हरिद्वारला समाधिस्थ झाले त्याचदिवशी पहाटे गरुडेश्वरी सदगुरूच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेले तेथील एका सेवकाने पाहिले होते. श्रीमहाराज भक्तांची कामना पूर्ण करण्यासाठी गुजरातेतील अनेक गावी जात. मुंबईला १९६५ साली मोठा दत्तयाग माधवबागेत झाला, त्यावेळेस ते तेथेच उपस्थित होते. १९६७ साली श्रीमहाराज आफ्रिकेतील भक्तांच्याकरिता नैरोबी, कंपाला या ठिकाणी ४-६ महिने जाऊन आले. भक्तांना दिलेली वचने पुर्ण करीतकरीत ते पुढे कपडवंजहून जयपुरला आले. जयपुरमध्ये ७१ व्या रंगजयंतीच्या वेळी आशीर्वादात्मक श्लोक रचुन सर्वांचे कल्याण इच्छिले व त्यांच्या प्रवचनात जपयोगपरायण व्हावयास सांगितले ज्यायोगे जन्ममरणाच्या फेऱ्यातुन मुक्त होता येईल. यानंतर महाराज जयपुरहुन हरिद्वारला आले व गंगाकिनारी आर्यानिवासात मुक्काम केला. संवत २०२५ च्या कार्तिक महिन्याच्या (अमावस्येच्या) मंगळवारी म्हणजेच ता. १९/११/१९६८ रोजी पूज्य अवधुतजींनी देहलीला आवरती घेतली आणी ॐ ॐ ॐ असा तीनवेळा उच्चार करून ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पार्थिव देहास नारेश्वरला आणण्यात आले आणी मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ता. २१ नोव्हेंबर १९६८ रोजी गुरुवारी रात्री अंत्येष्टि संस्कार झाले अन् योगानुयोगाने ती त्यांची जन्मतारीखच होती.

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 19 वे- “श्री दासोपंत”

19) श्री दासोपंत

जन्म: दत्तउपासक कुटुंबात, भाद्रभद व. अष्टमी इ.स.१५५१, बिदरच्या बहामनी शाहीत, नारायणपेठ या गावी झाला.
आई/वडिल: पार्वती/ शदिगंबरपंत देशपांडे (वतनदार)
कार्यकाळ: १५५१ ते १६१५
मुंज: मुंज ५ व्या वर्षी,
विवाह: विवाह १६ व्या वर्षी (गव्हाळ सावकाराची मुलगी जानकीशी)
शिष्य: सितोपंत देशपांडे
वाड्ग्मय: दासोपंतांची पासोडी, अवधुतगीता, दत्तसहस्त्रनाम, संतकवी रचनांची संख्या सुमारे ५ लाख.

जन्म, बालपण व कौटुंबीक पार्श्वभुमी

दासो दिगंबरपंत देशपांडे उर्फ दासोपंत हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत कवी होते. त्यांचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला. ते एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परमभक्त होते. त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात. १६ व्या १७ व्या शतकातले नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंद आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय. दासांनी वयाच्या ५ व्या वर्षात मुंज होताच चारी ही वेद मुखोद्गत म्हणून दाखवले.

बिदरच्या बहामनीशाहीतील नारायणपेठ नावाच्या गावी दिगंबरपंत देशपांडे यांच्या घरी भाद्रपद व. ८ शके १४७३ रोजी दासोपंतांचा जन्म झाला. घराण्यात चांगली श्रीमंती नांदत होती. याच वेळी प्रांतात मोठा दुष्काळ पडला म्हणुन दिगंबरपंतांनी आपल्या अधिकारात सरकारी कोठारातील धान्य भुकेलेल्यांना वाटून टाकले. या धान्याच्या रकमेची भरपाई वेळेवर खजिन्यात झाली नाही यामुळे बादशहा नाराज झाला आणी दासोपंतास ओलीस ठेवून दिगंबरपंतास बजावले की, ‘एक महिन्यात बाकी चुकती झाली नाही तर पोरास मुसलमानी दीक्षा देऊ.’ दिगंबरपंत व दासोपंत या उभयतांनी दत्तप्रभुंची करुणा भाकली. दत्ताजी पाडेवार नावाच्या एका दत्तस्वरूप विभुतीने रक्कम सरकारात भरून दासोपंतांची सुटका केली. दासोपंत मुक्त झाल्यामुळे सर्वांना आनंद वाटला. मात्र यामुळे खुद्द दासोपंतांची चित्तवृत्ती वैराग्याने उजळुन निघाली व त्यांना अस्वस्थता वाटत राहिली. ज्या दत्तप्रभूने आपणास वाचविले त्याचाच शोध घेण्यासाठी ते एकाएकी घरातून निघून बाहेर पडले.

हिलालपूर, डाकुळगी, प्रेमपूर, नांदेडवरून ते मातापूर तथा माहुर या क्षेत्री आले. येथील निसर्गरम्य परिसर, रेणुकामातेचे दर्शन, दत्त आणी अनुसयेचे दर्शन, मातृतीर्थावर स्नान इत्यादींत त्यांचे मन रमले. ध्यानधारणेस अतिशय अनुकूल अशा या ठिकाणी दासोपंतांनी दत्तभक्तीचा अनुभव घेतला. ते माहुर येथे सुमारे बारा वर्षेपर्यंत दत्तसेवेत रमून गेले. त्यानंतर ते पुन्हा संचारास निघाले. राक्षसभुवन येथील गोदामाईच्या वाळवंटात त्यांना दत्तपादुकांचा प्रसाद मिळाला. येथेच त्या एकांतवासात अवधुतांचे दर्शन झाले. त्यानंतर ते पुन: डाकुळगीस आले. कृष्णाजीपंतास येथे त्यांनी एक दत्तमुर्ती नित्याच्या उपासनेसाठी देऊन ते वाणीसंगमी आले. येथेच त्यांना त्यांच्या घरचा परिवार भेटला. बारा वर्षे पतीचा पत्ता नसल्यामुळे त्या काळच्या लौकिक रूढीप्रमाणे सौभाग्यचिन्हांचा विधिपुर्वक त्याग करण्यासाठी दासोपंतांची पत्नी आपल्या घरच्या लोकांसमवेत येथेच आली होती. अशा त्या नाट्यपूर्ण प्रसंगात सर्वांचे मीलन झाले. वाघेश्वराच्या मंदिरात दासोपंत आपल्या आईवडिलांना व पत्नीला भेटले. सर्वांना अतिशय आनंद झाला त्यावेळी श्री दासोपंतांनी नारायणपेठ येथील आपल्या वतनाचे दानपत्र करून ते कायमचे राहाण्यासाठी म्हणुन आंबेजोगाईस येऊन स्थायिक झाले.

पुढे श्री सितोपंत देशपांडे यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून आंबेजोगाईस दासोपंतांची सर्व व्यवस्था लावून दिली. या ठिकाणी दासोपंतांनी अखंडपणे लेखन करून मराठी शारदेस उत्कृष्ट नजराणे समर्पित केले. ‘गीतावर्ण’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ सव्वा लाख ओव्यांचा आहे. ग्रंथराज, वाक्यवृत्ती, पंचीकरण, पदार्णव, अनुगीता, महापूजा, वज्रपंजरकवच अशी त्यांची लहानमोठ्या प्रमाणावरची रचना विपुल आहे. दत्तात्रेयांचा महिमा तर त्यांनी अनेक पदांतून गायिला आहे. दासोपंतांच्या दत्तोपासनेची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दासोपंतांच्या परंपरेत दत्तात्रेयांचे सोळा अवतार प्रसिद्ध असून सतरावा अवतार म्हणजे स्वत: दासोपंत असून त्यांचा उल्लेख, ‘श्रीसर्वज्ञावत्तार’ म्हणून होतो. उपासनेची त्यांनी ठरवून दिलेली पद्धती अजून चालू आहे. ‘प्रत्येक दिवशीचा उपासनाविधी, सात वारांची वेगवेगळी भजने, पर्वकाळाची आणि उत्सवाची विशेष भजने, पदे, आरत्या, शेजारत्या, अष्टके, स्तोत्रे हे सर्व त्यांनी आखून व रचून ठेविले आहे. विशिष्ट प्रसंगी करावयाची लळिते, संगीत, टिपऱ्या यांचीही रचना केलेली आहे. नित्यासाठी दशनाम, शतनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये हीही तयार करून दिलेली आहेत… उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन यांचीदेखील शिस्त त्यांनीच घातलेली आहे… मूर्तीच्या नित्य स्नानासाठीही काही नियम आहेत. ‘आनंदें दत्तात्रेय देवदेव’ हा दासोपंत परंपरेतील जयघोष आहे’ (दासोपंतांची पासोडी : न. शे. पोहनेरकर, प्रस्तावना, पृष्ठ १७)

दासोपंतांनी वरीलप्रमाणे दत्तोपासना दृढ चालावी म्हणून दत्तात्रेयांवर अनेक प्रकारची स्फुट व प्रकरणात्मक रचना केली आहे. अवधुतराज, दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत), अवधुतगीता, दत्तात्रेयसहस्रनामस्तोत्र, दत्तात्रेयदशनामस्तोत्र, दत्तात्रेयषोडशनामस्तोत्र, शतनामस्तोत्र, द्वादशनामस्तोत्र, सिद्ध दत्तात्रेयस्तोत्र, गुरुस्तोत्र, दत्तात्रेयनामावली, षोडशअवतारस्तोत्र, षोडशअवतार प्रादुर्भावस्तोत्र, षोडश अवतारध्यानस्तोत्र इत्यादी प्रकरणे दासोपंतांच्या परंपरेत नित्य म्हटली जातात. दासोपंतांची पदे अतिशय नादमधुर व भक्तिरसपूर्ण आहेत. द्त्तांविषयी दासोपंतांना वाटणारी करुणा, आशा, भक्ती यांचे मूर्तिमंत दर्शन दासोपंतांच्या पदांतून व्यक्त होते.

श्री दासोपंतांचा दत्त व योगेश्वरी देवीच्या स्थानामुळे प्रसिद्ध असलेले अंबेजोगाईचे हे ठिकाण आद्यकवी मुकुंदराज व संत दासोपंत यांच्या वास्तव्यामुळेही पुनीत झालेले आहे. दत्त संप्रदायातील तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणी गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या पहिल्या पंथाचे अध्वर्यु होते. त्याच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमुखी व द्विभुजी दत्त हेच सद्गुरूंचे रूप मान्य केलेले आहे. दासोपंत हे एक महान दत्तभक्त होऊन गेले. दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिलेलें होते, असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले एक दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे देशपांडे गल्लीत असुन तेथे थोरले देवघर व धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्यांचा सु-संवाद येथेच चालत असे, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे त्यांचे अनुयायीही सांगतात. दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक हकीकत येथे सांगितली जाते. ती खूप रंजक आहे. औरंगजेबाची दासोपंतांवर खुप श्रद्धा होती. परंतु त्याचा संशयी स्वभाव आणी बादशहीचा गर्व म्हणुन त्यांने श्री दासोपंतांची दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. दासोपंतांच्या दर्शनाला जातांना एकेदिवशी त्यांनी दत्तात्रेयांचे समोर ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. या ताटात बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे होते. कपड्याने झाकलेले ते ताट बादशहाने दासोपंतासमोर ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनीं न घेता समंत्रक प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्याला दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास सांगितले आणी आश्चर्याचा धक्काच बसला. हे सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध संपुर्ण मंदिरात दरवळलेला होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला आणी त्यांनी तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली. या मंदिरात श्रीदत्तजयंती आणी दासोपंतांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे मंदिर क्षेत्र अतिशय पवित्र व श्रीगुरूंच्या आगमनाने परमपवित्र झालेले आहे.

पुढे सर्व व्यवहार मुलांवर सोपवुन दासोपंतांनी जप-तप अनुष्ठानात वेळ घालवावा, असे ठरवून रोज एका ढबू पैशाच्या वजनाएवढी शाई मोजून घ्यावी व ती काव्यलिखाणात आटवायची (संपवायची) या हेतुने काव्य लिहिले. त्यांचे बरेच महान ग्रंथ लिहुन झाले. ‘पदार्णव’, ‘गीतार्णव’, ‘पासोडीवर काव्यलेखन’, ‘सोळा दत्तावतारांची माहिती व पुजा-उत्सव पद्धत’ असे सर्व ग्रंथ तयार झाले. ही त्यांची भक्ती पाहुन श्रीदत्त प्रसन्न तर होतेच; पण त्यांचे रोजचे लिखाण होईपर्यंत ते स्वयं समोर येऊन उभे राहत.

एकदा काय झाले, श्रीएकनाथ महाराज पैठणहुन मुद्दाम त्यांचे काव्य पाहण्याकरिता आले. ते येऊन दहा ते पंधरा घटका झाल्या तरी दासोपंतांनी वर पाहिले नाही. त्यांना तशी चाहुलच लागली नाही. कारण ते एवढे तन्मय होत असत की, समोर दत्तप्रभू उभे असतील याचेसुद्धा त्यांना भान नसे. परंतु एकनाथ महाराजांचा गैरसमज होऊन आपण आल्याची जाणीव करून देत ते म्हणाले, समोर दत्त उभे आहेत, मी अतिथी येऊन ठाकलो. तुला जर का अतिथीचे, देवाचेही भान राहत नाही; तर ते काव्य कुणालाही ठाऊक होणार नाही.’ मग दासोपंतांनी त्यांचे पाय धरून क्षमा मागितली व म्हटले, ‘मी हे जाणूनबुजून दुर्लक्ष केले नाही. मला समजलेच नाही आपण आलेले, तरी शाप मागे घ्या.’ तेव्हा एकनाथ महाराज बोलले, ‘आता शाप मागे घेता येत नाही. पण उ:शाप देतो की, पाचशे वर्षानंतर एक श्रीदत्तावतारी महान् पुरूष येईल व त्या काव्याचे (प्रकटीकरण) भाषांतर करून देईल तेव्हाच समाजाला कळेल. जरी उत्सवात तुझे शिष्य ते पद गातील तरी त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. पण जेव्हा श्रीदत्तावतारी पुरूष येऊन त्याचे संस्कृत भाषांतर करील तेव्हाच अर्थ कळेल.’ पुढे फिरत फिरत प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी अंबेजोगाईला आले व त्यांनी सर्व माहिती काढुन जनकल्याणार्थ ते सर्व साहित्य सोप्या भाषेत लिहुन ठेवले आणी तेव्हापासुनच ते सर्व जनतेला कळु लागले.

श्री दासोपंतांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो लोकांना मार्गदर्शन करुन ईश्वरभक्तीला लावले. पुढे पंतांनी आपले कर्तव्य व जनतेला मार्गदर्शनाचे कार्य पुर्ण करून अंबेजोगाई येथील नृसिंहतीर्थ हे आपले समाधिस्थान निवडले. तिथे नृसिंहमंदिर असुन दोन महादेवांची मंदिरे आहेत शिवाय काही लेण्याही आहेत. समोर तीन तीर्थेही आहेत. अशा निवांतस्थानी त्यांनी समाधी घेतली. त्यांनी जरी समाधी घेतली असली तरी अजुनही जे कोणी भक्त निर्मळ मनाने भक्ती-सेवा करतील त्यांना ते दर्शन देतात अशी मान्यता आहे.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु
९/१२/२१, सकाळ ८:२१ – Pandhr Suraj Rakle: जय गुरुदेव

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 20 वे- “महीपती संत श्री दासगणु महाराज”

20) महीपती संत श्री दासगणु महाराज

नाव: श्री. गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे.
जन्म: पौष शु. एकादशी ६ जानेवारी १८६८
जन्म गाव: अकोळनेर, ता. जि अहमदनगर येथे.
शिक्षण: इंग्रजी ४ थी.
विवाह: जामखेड तालुक्यात बोरले आष्टीचे जहागिरदार श्री. नारायण रानडे यांची कन्या सरस्वती यांच्याशी १८९२ मध्ये.
महानिर्वाण: कार्तिक व. १३ रविवार २५ नोव्हेंबर १९६२ सकाळी ८ वाजुन ३६ मिनिटांनी महाराजांचे महानिर्वाण पंढरपुर येथे झाले.
व्यवसाय: १८९३ मध्ये पोलीस खात्यात भरती व १९०४ पर्यत नोकरीत सेवेत.
सदगुरु अनुग्रहकृपा: १८९६ मध्ये श्री वामनशास्री इस्लामपुरकर.
साईबाबांचे प्रथम दर्शन: १८९४ मध्ये नानासाहेब चांदोरकर यांचे समवेत.
पहिले किर्तन: १८९७ जामखेडच्या विठ्ठल मंदिरात.
आरती रचना: “शिर्डी माझे पंढरपूर”, शिर्डी येथील रत्नपारखी यांचे विठ्ठल मंदिरात, तसेच ‘साई रहम नजर करना’ व ‘रहम नजर करो अब मोरे साई’.
नारदीय पहीले किर्तन: १९०६ मध्ये श्री साईबाबांचे सांगण्यावरून.
श्री साईनाथ स्तवनमंजिरी या स्तोत्राची निर्मिती: ९ सप्टेंबर १९१८ मध्ये मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर क्षेत्री, श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवस.
साईबाबा संस्थानची स्थापना: सन १९२२, पहिले अध्यक्ष म्हणून दासगणु महारांजाची निवड व तेथुन पुढे १९४५ पर्यत अध्यक्षपद सांभाळले.
समाधी स्थळ: मु.पो. गोरटे ता. उमरी जि. नांदेड

महाराष्ट्राचे महिपती, श्री दासगणु महाराज

श्री. गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणु महाराज (१८६८-१९६२) हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते. श्री. दासगणु महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना’ आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म पौष शु. एकादशी ६ जानेवारी १८६८ रोजी अकोळनेर, ता. जि अहमदनगर या गावी झाला. १८९३ मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि १९०४ पर्यत नोकरी केली. महाराज पोलीस खात्यात नोकरीला असले तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. या दरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपुर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले व त्यांचे पहिले कीर्तन १८९७ साली जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले. श्री साईनाथ स्तवनमंजिरी या स्तोत्राची निर्मिती महाराजांनी ९ सप्टेंबर १९१८ रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवसांपूर्वी केली होती. पुढे सन १९२२ साली त्यांनी “साईबाबा संस्थान, शिर्डी” ची स्थापना केली आणी पहिले अध्यक्ष म्हणुन श्री दासगणु महारांजाचीछ निवड झाली. तेथुन पुढे १९४५ पर्यत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांचे महानिर्वाण, श्रीज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला (कार्तिक वद्य १३, १८८३) २६ नोव्हेंबर १९६२ मध्ये पंढरपुरात झाले तर त्यांचे समाधी स्थळ: मु. पो. गोरटे ता. उमरी जि. नांदेड येथे आहे.

संतकवी दासगणु महाराज यांची ग्रंथसंपदा°

अमृतानुभव भावार्थमंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्धवागमन, छात्रबोध, हितबोध, पासष्टीभावार्थदीपिका, पोवाडे, भक्तिरसायन, भजनावली, श्री गुरूचरित्र साराम्रूत, श्रीगोदामहात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीभक्तिलीलामृत (अर्वाचीन), श्रीभक्तिसारामृत, श्रीसंतकथामृत, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीशंकराचार्य चरित्र, श्रीशंडिल्य भक्तिसूत्र भावदीपिका, श्रीशनिप्रताप, सुबोध लघुकथा, श्रीगजाननविजय– शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ. आजतागायत या ग्रंथाच्या मराठीत ४९ आवृत्त्यातून २३,८२,००० इतक्या प्रती प्रकाशित झाल्या आहेत. तसेच श्रीदासगणु महाराजांनी जवळपास ८५ कीर्तनोपयोगी आख्याने रचली आहेत.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

दत्त संप्रदायातील सत्पुरुष सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *