श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष 11 ते 15

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

11) श्री दत्त चिले महाराज

जन्म: १५ ऑगस्ट १९२२. पन्हाळा जवळ जेऊर येथे.
कार्यक्षेत्र: पैजारवाडी, कोल्हापुर.
गुरु: गराडे महाराज. पुढे सिद्धेश्वर महाराज.
विशेष प्रभाव: शंकर महाराज धनकवडी (यांना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानीत).

अगदी अर्वाचीन काळात कोल्हापूरजवळ पैजारवाडी येथे एक अवतारी पुरूष होवून गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरु चिलेमहाराज. ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा किल्याजवळील जेऊर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय बाबा चिले आणि आईचे नाव मंजाबाई असे होते. कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे गावाजवळ कोल्हापूर पासून २५ कि.मी वर पैजारवाडी हे गाव आहे. जन्मल्या बरोबर काही काळाने त्यांचे मातृछत्र हरपले तर ते मॅट्रीकला होते तेव्हा त्यांचे वडील निर्वतले. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे. या पाटिलबाबा समाधीजवळ ते २५ दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले.

त्यांच्या जिवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले. त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकळ्यात टाकणारे होते. ते प्रसंगी मद्यपान करीत आणि मांसाहार ही करीत. पैजारवाडी येथील गराडे महाराजांच्या समाधीवर ते मदिरेचा अभिषेक करीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असे. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकरमहाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थां प्रमाणे ते काहीवेळा अत्यंत अपशब्द बोलित असत. पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे. त्यांच्या लीला विलक्षण होत्या. ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे. अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत. त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात, विष्णू स्वरूपात, पांडुरंग रुपात दर्शन दिले आहे. त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजे पांढरा शर्ट आणि विजार असा आहे. ते अनवाणी चालत असत. त्यांचा सतत संचार सुरु असे. प्रसंगी ते ३० ते ४० कि.मी. चालत जात असत. सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते. त्यांच्या भक्तांच्या त्यांनी कठोर परीक्षा घेतल्या आहेत. शंकर महाराजांच्या रुपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे.

लौकिकार्थाने हे सत्पुरूष पृथ्वीतलावर जन्मल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात. श्री चिले महाराजांचे पहिले गुरू श्री गराडे महाराज. त्यांचेकडे फुले गंध कापूर यांची अगदी लहानपणी सेवा केली. चिले महाराजांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृध्दीचा देखावा कधीच केला नाही. भक्त लोक तसेच परिचितजन नेहमीच अचंबित होत असत. ते अत्यंत माफक पण अतिश मुद्देसूद बोलत असत. ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे. सदगुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले.

श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरूष. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर, सातारा, पुणे व नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांची समाधी पैजारवाडी येथे आहे. हे स्थान पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रिती होती म्हणुनच कासवाच्याच आकाराचे समाधी मंदीराचे बांधकाम केलेले आहे. मंदीर अत्यंत देखणे असून मंदीरात निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था आहे. मंदीर परिसर अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भारलेला असुन तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात.

चिले महाराजांना संगित आणि भजन प्रिय होते. ते भक्तांना अनेकदा चित्र विचित्र गोष्टी करायला सांगत असत. त्याचा अर्थ कुणालाही कळत नसे. त्यामुळे ते संभ्रमात पडत असत. पण त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत. ‘ ॐ दत्त चिले ’ असा त्यांचा तारक मंत्र आहे. समाजातील गोरगरिब व श्रीमंत तसेच सर्व प्रकारचे भक्त त्यांचेजवळ येत असत. चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे. सर्वसामान्यांच्या आकलन शक्तींच्या पलिकडचे त्यांचे बोलणे व कार्याची आजही श्रद्धाळू भक्तांना अनुभूती येते. त्यांचे जीवन कार्य पाहिल्यावर श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारापैकी “लीला विश्वंभर” या सहाव्या आणि “माया मुक्तावधूत” या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पटते.

त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणी करू शकणार नाही. पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली तर मात्र प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या आचरणाबद्दल, आहार विहाराबद्दल कितीही तर्क वितर्क केले तरी त्यांच्या अवतार दत्तात्रेयांचा अवतार होता याची खात्री पटते. पूर्ण ब्रह्मज्ञानी अवतारी पुरूष चारही आश्रमांच्या पलिकडे म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या आश्रमांपलिकडे असतात असे सांगितले जाते. त्याला अत्याश्रमी असे म्हटले आहे. चिलेमहाराज अत्याश्रमी अवताराचे उदाहरण आहेत. त्यांना कोणत्याही आश्रमाचे नियम लागू होत नव्हते. त्यांच्या सर्व कृतींमध्ये गूढ अर्थ भरला होता. त्यांचे जीवन कार्य, लीला आणि चमत्कार त्यांच्या अवतारीत्वाचे साक्षी आहेत. त्यांचे निर्वाण ७ मे १९८६ रोजी पुणे येथे झाले. मात्र आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 12 वे- “श्री दिक्षित स्वामी (नृसिंह सरस्वती)”

12) श्री दिक्षित स्वामी (नृसिंह सरस्वती)

जन्म: चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा इ.स.१८६६
आई/वडील: आईचे नाव ज्ञात नाही / वडील- लक्ष्मणशास्त्री दिक्षित.
संन्यासानंतरचे नाव: नृसिंहसरस्वती
गुरू: प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी)
कार्यकाळ: १८६६-१९२७

जन्म व कौटुंबीक पार्श्वभुमी

परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे अगणित महान व अधिकारी शिष्य झाले. त्यांत श्री दिक्षीतस्वामी तथा श्रीनृसिंह सरस्वतींचे नाव अत्यंत अग्रक्रमाने येते.

श्री गुरूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून जवळच (शंकरापूर) नावाचे एक गाव वेदगंगा नदीचे तीरावर आहे. याच गावातील एक सत्शिल ब्राह्मण यज्ञयागांमुळे दिक्षीत नावाने प्रसिद्धीस आले. दत्तभक्ती घराण्यातच होती. त्याचे नृसिंहवाडीस पौर्णिमा व शनिवारी पायी येण्याचा नियम होता. या दिक्षीत ब्राह्मणाच्या मुलाचे नाव होते लक्ष्मणशास्त्री व त्यांचा लहान मुलाचे नारायण होय व पुढे जाऊन हेच श्रीनृसिंह सरस्वती म्हणून प्रसिद्धी पावले. लक्ष्मणशास्त्री मुख्यत: भागवत कथन, पूजाअर्चा, व श्रीगुरूंच्या सेवेतच काळ घालवीत.

नारायण हा लहानपणापासून तल्लख बुद्धीमत्तेचा होता. एकपाठी होता. मिरजेत इंग्रजी शाळेत ५व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाहही पार पडला. पत्नीचे नाव वाराणसी होते. त्यांना पाश्र्चात्त्य पोशाखात विशेष रूची होती. एके दिवशी एका वृद्ध गृहस्थानी पोषाखाबद्दल नापसंती व्यक्त करून घराण्याच्या आदर्शाची आठवण करून दिली. व लक्ष्मण शास्त्रींचा दाखला दिला. नारायणावर त्यांचा सुप्त पण दूरगामी परिणाम झाला. त्यांनी विदेशी पेहराव व पुस्तके नाल्यात फेकून धोतर व शर्टसारखा देशी पोषाख घातला. यानंतर नारायण खिन्न व एकाकी बसू लागला. पत्नीला हे परिवर्तन मान्य नव्हते. पण नारायणाने सर्वांकडे दूर्लक्ष केले. त्यांनी गीता एकनाथ भागवत वाचण्यास प्रारंभ केला.

त्यांच्या वाचनात वेदेश्र्वरीचे सार आले. हे जगत् मिथ्या आहे आणी फक्त ईश्र्वर सत्य आहे. जीवनातील सत्य जाणायचे असेल तर गुरूची कृपा व अनुग्रह आवश्यक आहे. ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबली व ते संसारात अत्यंत विरक्त होऊ लागले. एक दिवसाचा प्रसंग माता पिता व पत्नी बाहेरगावी गेल्याने भगिनी यमुनाने तुरईची भाजी केली. नारायणाने सर्व भाजी पुन्हा पुन्हा घेऊन संपवून टाकली. भाजीचे दोन तुकडे यमुनाने खाल्ले तर अत्यंत कडू होती. तिने नारायणाला विचारले तर उत्तर आले आपण कारल्याची भाजी खात नाही का? यात एवढे काय?

श्री लक्ष्मणशास्त्रींचा श्री वासुदेवानंद सरस्वतीशी घनिष्ठ परिचय होता. वाडी मुक्कामी त्यांची अनेक वेळेस भेट व बोलणेही झाले होते. श्री टेंबेस्वामींनी माणगाव सोडून सपत्निक नृसिंहवाडीस स्थलांतरानंतर श्री लक्ष्मणशास्त्री त्यांना भेटले व नारायणाला यथायोग्य मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बुवांनी ती मान्य केली आणि प. प. टेंबे स्वामींच्या रूपाने त्यांना गुरू मिळाले. नारायण गुरूसेवेत रुजू झाले. स्नान, संध्या वैश्र्वदेव स्मर्ताग्नीसह सर्व ब्रह्मकर्म करू लागले. त्यांनी गुरु सान्निध्यात उपनिषद, जीवनमुक्ती विवेक यांचा अभ्यास केला. पण सर्व वेदांताचे सार दोन शब्दात सांगितले ते म्हणजे ‘दत्त’. त्यानंतर टेंबेस्वामींनी संन्यास घेतला व नारायणाने आदर्श गृहस्थाश्रम आरंभला. अतिथीपूजा अन्नसंतर्पण रोज होत होते. ते रोज ५ घरी जाऊन शुष्क भिक्षा मागत प्रथमत: त्यांच्याच गावी खूप उपहास झाला. पण कालांतराने लोक त्यांच्या भिक्षेला येण्याची प्रतिक्षा करू लागले. त्यांनी अन्न संतर्पण, यज्ञ, दान याच्यावर जादा खर्च सुरू केला. बरेच लोक त्यांच्याकडे शास्त्रार्थ समजून घेण्यासाठी येऊ लागले व काही लोक तर त्यांना छोटे टेंबे स्वामी म्हणू लागले.

एकदा गावात प्लेगची मोठी साथ आली. त्यात पत्नी व एकुलता एक मुलगा मरण पावला. नारायणालाही प्लेगची लागण झाली. दत्तगुरूंची इच्छा काही औरच होती. नारायण बरे झाले. पत्नीची अत्येष्ठी करून लगेचच त्यांनी कुरुंदवाडचे वैदीक ब्राह्मणाकडून संन्यास ग्रहण केला ते नारायणस्वामी झाले. संन्यास ग्रहणानंतर गुरू श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या सानिद्ध्यात काळ व्यतीत करण्याची इच्छा होती. पण आपण वाडी सोडू नये असा वासुदेवानंद सरस्वतींचा आदेश आला. नारायण स्वामींचा संन्यास झाला होता पण दंडग्रहण झाले नव्हते. तेही वासुदेवानंद सरस्वतींकडून व्हावे ही गुरुचरणी प्रार्थना होती. त्यासाठीही आदेश आला “मी वाडीस आल्यावर पाहू” पूर्ण १७ वर्षानंतर थोरल्या महाराजांचे वाडीत आगमन झाले व त्यांनी सांगितले की ‘दत्त महाराज म्हणाले तरच मी तुला दंड देईन’. यामुळे नारायण स्वामी दु:खी व व्यतीत झाले. तसे पाहिले तर नारायण त्यांचे ज्येष्ठ मानसपूत्र होते. पुढे श्रीदत्तप्रभुंच्या आज्ञेनेच टेंबेस्वामींनी नारायणस्वामींना दंड दिला व ते ‘नृसिंहसरस्वती’ झाले.

आपल्या सद्गुरूंबद्दल प्रेम कसे असावे याचे मूर्तिमंत आदर्श….दीक्षित स्वामी व थोरले महाराज

प. प. श्री दीक्षितस्वामी महाराज, हे प. प .श्री टेंब्येस्वामी महाराजांचे पट्टशिष्य. प. प. श्री टेंब्येस्वामी महाराज, शेवटच्या दिवसांत श्रीक्षेत्र गरुडेश्वरी मुक्कामाला होते. गरुडेश्वरी जाण्याच्या अगोदर, श्रीक्षेत्र वाडीला असताना! त्यांनी श्रीदीक्षितस्वामींना आपल्या पादुका दिल्या होत्या. आजही त्या पादुका वासुदेवानंद पीठांत श्री दत्तअमरेश्वर मंदिरांत पूजेंत आहेत. प. प. श्री दीक्षितस्वामी त्यांची अनन्यभावे पूजा करीत. पुढे, गरुडेश्वरला श्रीटेंबेस्वामी महाराजांची तब्बेत जेव्हा बिघडली, तेव्हा श्रीदीक्षितस्वामी निरनिराळे काढे, मात्रा, त्या पादुकांवर घालीत असत. एक भक्त अमरेश्वराहून गरुडेश्वरी गेले, तेव्हा त्यांनी श्रीटेंब्येस्वामी महाराजांच्या कानी ही गोष्ट घातली. श्रीस्वामी महाराजांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी त्या भक्ताजवळ निरोप दिला की, “त्यांना सांगा, तुम्ही इतके दिवस केलेल्या या अपूर्व सेवेमुळेच आमचे आयुष्य एक महिनाभर अधिक वाढलेले आहे. आता मात्र देवांची आज्ञा झाली आहे, तेव्हा देह सोडणे प्राप्त आहे. म्हणून आता ही सेवा पुरे करावी!” हा निरोप ऐकून, प.प.श्री दीक्षितस्वामी महाराजांनी पादुकांवर काढे घालणे बंद केले. गरुडेश्वरी औषधोपचार चालू नसताना देखील श्री टेंबेस्वामी महाराजांची तब्बेत ठीक राहू शकली होती, याचे रहस्य हे असे होते.

थोरले स्वामी म्हणजे वैराग्याची परमसीमा. देहबुद्धीच नष्ट झालेली. अनेक पुजारी भक्तजन जे गरुडेश्र्वरी जात त्यांना थोरले महाराज सांगत ‘श्री दिक्षीत स्वामींच्या आज्ञेचे पालन करा’ थोरल्या महाराजांच्या समाधीनंतर आपल्या गुरूचे एक मंदिर व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पाचवा आश्रम स्वीकारून अवधूत झाले. त्यांनी औरवाडला श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले.

तेथे थोरल्या महाराजांच्या पादुका स्थापन करून पूजाअर्चा सुरू झाली. त्यांनी हजारो भक्तांच्या समस्या सोडवल्या. त्यांना आध्यात्मिक व भौतिकही मार्गदर्शन केले. त्यांनी गरुडेश्र्वर नासिक, विदर्भ, अलाहाबाद, काशी येथे दौरा केला. यानंतर थोड्याच दिवसात अयोध्येत जाऊन राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथेच ते अश्र्विन वद्य ७ शके १९२७ मध्ये दत्तचरनी विलीन झाले.

थोरल्या महाराजांनी लहान वयापासून मार्गदर्शन करून नारायणाचे- नारायणस्वामी- व नंतर नृसिंहसरस्वती केले. याला कारण दिक्षीत स्वामींची निष्ठा आणी गुरूप्रेम. नृसिंह सरस्वती म्हणजे मूर्तीमंत गुरूनिष्ठा, उत्कठ, भावभक्ती, असलेले एक महान सिद्धयोगी. त्यांनी भक्तांसाठी अनेक चमत्कार दाखविले. पण ते त्यात कधीच अडकले नाहीत . अश्या या महान दत्तभक्त सिद्ध पुरूषाचे चरणी प्रणाम!

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 13 वे- “श्री शंकर महाराज, पुणे”

13) श्री शंकर महाराज, पुणे

जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७

श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही.

जन्म व पूर्व इतिहास

त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. शंकर महाराज यांच्या बाललीलांतून त्यांच्यातील दैवी गुणांची कल्पना त्यांच्या माता-पित्यांना येत होती. महाराजांना भजन कीर्तनाची गोडी होती. हिस्त्रपशूंच्या सान्निध्यात ते क्रिडा करीत. त्यांना वाचासिध्दीही प्राप्त झाली होती. त्याच वाचासिध्दीच्या बळावर त्यांनी आपल्या मातापित्यांना आशीर्वाद दिला की, तूम्हाला जुळी संतत होईल! तो आशीर्वाद पुढे खराही ठरला. नंतर शंकर महाराजिंनी सर्वत्र भ्रमंती सुरुकेली. हिमालयातील केदारेश्वर प्रयाग! इत्यादी तीर्थ क्षेत्रांतुन त्यांचा प्रवास झाल्यावर त्यांच पहिलं प्रकटन सोलापूर येथे शुभराय महाराजांच्या मठांत झालं तत्पूर्वी अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक हैद्राबाद तुळजापुर, औदुंबर, श्रीशैल अशा स्थानी त्यांनी भ्रमंती केली. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’ खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते!

श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानीत. हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते. ते म्हणत, ‘मला जाती, धर्म काही नाही. ते स्वत: खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? ‘अरे, तू नमाज पढत नाहीस. नमाज पढत जा. तुझी अडचण दूर होईल.’ ते काय शिकले होते कुणास ठाऊक! पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले, कुणास ठाऊक!

श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणी जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहेमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत. खूप वाढलेले केस, दाढी मिशी आणि त्यातून डोकांवणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखादया लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहेऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गांवढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवरपण होते,आलेल्या रशियन दांपत्याशी महाराजांनी अस्खलीत रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवंतच तो त्याला काय अशक्य! अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधीत. एक आख्याईका इकडे नमूद करावीशी वाटते.

आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले.त्या पिल्लाला बाण मारणार एवढयात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले. आणि महाराजांना म्हणाला ” कशाला मारतोस रे ह्याला, काय बिघडवले ह्याने तुझे”. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम “स्पर्शशिक्षा”. महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात.

पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वया विषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गब्रू जवाना प्रमाने वागत. एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच “महाराज! आपले वय काय असेल हो?” महाराज उत्तरले “अंदाजे १५० वर्षे. मी शनिवारवाडयात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे” ही घटना साधारण १९३५ ची आहे म्हणजे महारांजानी जेव्हा महासमाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वर्षांचे होते. पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.

शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत ” सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा” महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुर्वास्वामी, वाघोद मध्ये गौरीशंकर, मध्यप्रदेशात लाहिरी बाबा, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत. एवढेच काय पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत.

भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २४ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना ज्या-ज्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 14 वे- “श्री देव मामलेदार (श्री. यशवंतमहाराज भोसेकर/कुलकर्णी)”

14) श्री देव मामलेदार (श्री. यशवंतमहाराज भोसेकर/कुलकर्णी)

नाव: श्री यशवंत महादेव भोसेकर (कुलकर्णी)/ श्री देव मामलेदार
जन्म: भाद्रपद शुक्ल ९, १३ सप्टेंबर १८१५, पुणे येथे ओंकार वाड्यात, श्रीप्रवरी कश्यप गोत्र, अश्वलायन शाखा.
कार्यकाळ: १८१५ – १८८७
गुरु: स्वामी निर्मालाचार्य
गुरु गृहीचे नाव: श्री सिद्धपदाचार्य

जन्म व कौटुंबीक पार्श्वभुमी

सोलापुर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावी महादेवपंत देशपांडे नावाचे ॠग्वेदी त्रिप्रवरी अश्वलायनी शाखेचे एक ब्राम्हण गृहस्थ राहात होते. त्यांची पत्नी म्हणजे पुणे परगण्यातील जिवाजीराव सरकार पेशवे यांचे दिवाण माणकेश्वर यांचे कारभारी बाळाजी मकाजी बाजपे यांची कन्या हरीदेवी. दोघेही उभयता धर्माचरण करणारे, भाविक, संत व अतिथींची पूजा व सेवा करणारे होते. अशा या सदाचारी-संपन्न कुटुंबात शालीवाहन शके १७३७, भाद्रपद शुद्ध दशमी, सुर्योदयसमयी, बुधवारी, दि. १३/९/१८१५ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती. ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत. प. पू. देव मामलेदार १८ व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात.

महादेवपंत देशपांडे यांना दादा, यशवंत, मनोहर, आबा, रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव व बलराम ही आठ पुत्ररत्ने व सखू नावाची कन्या झाली. त्यांचे दुसरे पुत्ररत्न यशवंतराव हेच पुढे देव मामलेदार म्हणून ओळखले गेले. जन्मानंतर दोन वर्षातच यशवंतराव सज्ञानी माणसाप्रमाणे वागू लागले. त्यांचे तेज पाहून आई-वडिलांना यशवंतरावांमधील दैवी सामर्थ्याची ओळख पटली. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे शके १७४६ जेष्ठ वद्य प्रतिपदेला त्यांचे उपनयन केले गेले. यशवंतरावांचा विवाह टेंभूर्णी येथील जिवाजी बापुजी देशपांडे यांची मुलगी सुंदराबाई हिच्याशी शके १७४६ फाल्गुन वद्य सप्तमी, शुक्रवार रोजी झाला. त्यावेळी सुंदराबाई अवघ्या सहा वर्षाच्या होत्या.

पुढे यशवंतराव कोपरगाव येथे मामांकडे राहू लागले. इ. स. १८२९ मध्ये मामांनी खटपट करुन त्यांची ‘बदली कारकून’ म्हणून येवले येथे तात्पुरती नोकरी मिळवून दिली. १८३१ मध्ये त्यांचे चोख काम व मोत्यासारखे अक्षर पाहून त्यांची नियुक्ती कारकून म्हणून दरमहा दहा रुपये पगारावर झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी मिळालेली नोकरी जणू त्यांच्या योग्यतेची पावतीच होती. लवकरच यशवंतरावांना पाच रुपये पगार वाढ होवून पारनेर तालुका कचेरीत बदली झाली. पारनेर येथे त्यांनी पाच वर्षे जबाबनीस म्हणून चांगल्या प्रकारे काम केले. तेथील वास्तव्य त्यांच्या जीवनात क्रांतीकारक ठरले. नोकरीच्या निमीत्त नेहमी परगावी राहावे लागणार हे जाणून त्यांची पत्नी सुंदराबाई पारनेरला राहू लागली. यशवंतरावांना परमार्थ कार्यातही सुंदराबाईंची साथ मिळू लागली.

एके रात्री झोपेत असतांना यशवंतरावांना एक तेजस्वी महापुरुष समोर बसलेला दिसला. आजानूबाहू, दिगंबर, भव्य कपाळ, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली, पायांचे तळवे जमिनीला टेकलेले, डोळ्यात विलक्षण तेज आसलेली व्यक्ती त्यांना म्हणाली, “बेटा घबराओ नही. ये ले काम की चिज” पुढे यशवंतरावांच्या हातावर शाळीग्राम ठेवून ती व्यक्ती म्हणाली, इसकी भक्तीभावसे पूजा करना तुम्हारी मनोकामना पूरी होगी. असे म्हणून ती व्यक्ती अंतर्धान पावली. यशवंतरावांना लगेच जाग आली. जागृतावस्थेत त्यांनी पाहीले तर त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता. याला स्वप्न म्हणावे की सत्य हेच त्यांना उमजेना, स्वप्न म्हटले तर त्या दिव्य सत्पुरुषाने दिलेली वस्तू प्रत्यक्ष त्यांच्या हातात होती. हा एक साक्षात्कार होता आणी इथुनच पुढे त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. पुढे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी यशवंत महाराजांना सटाणा (जि. नाशिक) या गावी जाऊन कार्य सांभाळा अशी आज्ञा केली.

श्री यशवंत महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब, निराधार महिला व मुलेे, आजारी व व्याधीग्रस्त यांना मदत कारताना आपले सर्व आयुष्य वेचले. त्या सर्वांना ते आपले कुटुंबियाचा भाग मानीत असत. महाराजांनी इ. स. १८२९ ते १८७२ अशी तब्बल ४३ वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली. इ. स. १८७०-१८७१ मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी माणसे व जनावरे अन्नांन्न करून मृत्युमुखी पडत होती. श्री यशवंत महाराज त्यावेळी बाळगणं तालुक्यात तहसीलदार होते. गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली. मात्र दुष्काळ स्थिती पाहता हि रक्कम अगदीच कमी होती. त्यावेळी देव मामालेदार हे तालुका तहसीलदार होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. हि रक्कम थोडी नव्हती, ती होती १२७००० त्याकाळी. हि वार्ता त्यांचे वारिष्ठांना कळली व ते ट्रेझरीत तपासणीस आले. आणि काय अभिनव घडले? तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरितच मिळाली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच पण भगवान दत्तात्रयांनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले. त्यावेळी बाळगणं तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसीलदाराला “देवत्व” बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज हे “देव मामलेदार” याच नावाने ओळखले जाऊ लागले.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या. हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले. श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण ११. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात. हा सोहळा १५ दिवस चालतो. यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामालेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुष-पुष्प 15 वे- “प. पु. योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज”

15) प.पु. योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज

जन्म: मार्गशिर्ष वद्य १३, गुरुवार म्हणजेच २३ डिसेंबर १८८६ रोजी
आई/वडील: सौ. उमाबाई/श्री. दत्तभट गुळवणी
कार्यकाळ: १८८६ – १९७४
गुरु: १) प. पु . वासुदेवानंद सरस्वतींकडून (टेंबे स्वामी) अनंतचतुर्दशीला दिक्षा.
२) प. पु . लोकनाथतिर्थ स्वामींकडुन शक्तिपात दिक्षा अधिकार.
समाधी: पौष वाद्य ८, दिनांक १५ जानेवारी १९७४ ला दत्तचरणी विलीन.
विशेष: १) २७ जानेवारी १९६५ रोजी पुणे येथे श्री वासुदेव निवासचे निर्माण.
२) श्री वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे स्वामी) यांच्या समग्र लिखाणाचे पुनर्मुद्रण.
शिष्यवर्ग: १) श्री. दत्तमहाराज कविश्वर
२) श्री. मामासाहेब देशपांडे
३) गुरुताई सुगंधेश्वर
४) श्री. केशवराव जोशी
५) डॉ. हरिश्चंद्र जोशी आणी हजारो भक्त शक्तिपात दिक्षेने कृपांकीत.

जन्म व कौटुंबीक पार्श्वभुमी

गेल्या शतकातील अनेक साक्षात्कारी साधु-संतामध्ये दत्तसंप्रदायी प. पु. योगीराज श्री गुळवणी महाराजांचे विशेष स्थान आहे. त्यांचे जीवन व कार्य दोन्ही अविस्मरणीय आहेत. कोल्हापूर जवळील कुडुत्री या छोट्याश्या गावी श्री. दत्तात्रय नारायण गुळवणी व सौ. उमाबाई हे आचारसंपन्न व सात्विक कुटूंब राहात होते. सौ. उमाबाई यांच्या कडक उपासनेमुळे प्रसन्न होऊन श्री दत्तप्रभुंनी अष्टागंधयुक्त पादुका पुडीतून त्यांच्या ओटीमध्ये घातल्या. कालांतराने सौ. उमाबाईनां दिवस गेले व मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १८१८ म्हणजेच गुरुवार दि. २३ डिसेंबर १८८६ साली रात्री ८ वा. १९ मि. रोजी प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. सौ. उमामाता व श्री. दत्तोपंत भटजीनी श्री दत्त प्रभूंची जी अहर्निश सेवा केली त्या सेवेचा त्यांना कृपाशीर्वाद मिळाला. या बाळाचे नाव ठेवले ‘वामन’ व पुढे हेच “प. पु. योगिराज गुळवणी महाराज” या नावाने प्रसिद्ध झाले.

प. पु. योगिराज गुळवणी महाराजांचे प्राथमिक ४ थी पर्यंतचे शिक्षण तारळे या छोट्याशा गावी झाले व तालुक्यात पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाल्यामुळे वामनला ४ थी ची स्कॉलरशिप मिळाली. त्यांची बुद्धी एकाग्रचित्त व आकलनक्षम असून तिला तीव्र स्मरणशक्तीची जोड मिळाल्यामुळे एका प्रयत्नात सर्व कांही मुखोदगत होऊन जाई. पुढे कोल्हापूर येथील संस्कृत व्यासंगी जगदगुरु पंडित आपटे व वे. शा. सं. आत्मरामाशास्त्री पित्रे यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन झाले. विद्यार्थी दशेत असताना वामनराव पोहायला शिकले. व्यायामाची व चित्रकलेचीही त्यांना आवड होती. इयत्ता नववीत असताना त्यांच्या कलाशिक्षकांनी त्यांच्या ठायी असलेले कलागुण हेरले. यानंतर चित्रकलेची फर्स्ट ग्रेड व सेंकड ग्रेड परिक्षा वामनराव उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले व चित्रकलेची थर्ड ग्रेड परीक्षा देण्यासाठी वामनरावानी मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मॅट्रीकला पण ते प्रविष्ट झाले. पुढे ते “ड्रॉईंग चे मास्तर” म्हणून विश्वविख्यात झाले व याच कलागुणामुळे त्यांना प.पु. टेंबे स्वामींचे दर्शन घडले.

एकदा श्री गुळवणी महाराजांचे थोरले बंधु शंकरशास्त्री यांनी प. पु. सद्गुरु टेंबे स्वामीना आपल्या या बंधु विषयी सांगितल्यावर त्यांनी एक पत्र लिहले की, “येताना श्री दत्ताची प्रतिमा काढुन गळ्यात श्लोकबद्ध हार घातल्याचे दाखव आणी ते चित्र घेऊनच वाडीला यावे.” श्लोकबद्ध हारासाठी महाराजांनी श्लोक सुद्धा दिला. पत्रा प्रमाणे प. पु. गुळवणी महाराजानी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभुंच्या मुर्तीचे ध्यान केले. त्यावेळी त्यांच्या उत्कट भक्तीमुळे त्यांना एकमुखी दत्तप्रभुंचे हृदयात साक्षात दर्शन झाले. तेच चित्र त्यांनी कागदावर साकारले व प. पु. सद्गुरु टेंबे स्वामीनी दिलेल्या श्लोकाला एक सुंदर हाराचे स्वरुप प्रदान केले. फुलांच्या चार पाकळ्या व मध्यभागी पराग, प्रत्येक पाकळीमध्ये एक-एक अक्षर लिहून श्लोकबद्ध हार एकमुखी मुर्तीच्या गळ्यात घातला. असे विशुद्ध भक्तीने भारलेले ते चित्र जेव्हा प. पु. टेंबेस्वामीनी पाहिले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला व त्यांनी आपल्या परमशिष्यावर स्नेहदृष्टीने कृपावर्षाव केला. प. पु. टेंबे स्वामीनी गुळवणी महाराजांची ही सेवा रुजु करुन घेऊन वामनरावांना हातात बांधण्यासाठी एक यंत्र केले. ते यंत्र चांदीच्या पेटीत घालुन ती पेटी स्वत:च्या हाताने वामनरावांच्या हातात बांधली. एक संरक्षक कवच प. पु. टेंबेस्वामीनी आपल्या परमप्रिय शिष्याच्या हातात बांधले. हा दिवस होता गुरुव्दादशीचा व यादिवशी प्राप्त झालेल्या या अनमोल ठेव्याची (संरक्षक कवचाची) आठवण सदैव रहावी म्हणून प. पु. गुळवणी महाराजांनी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता-भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळुन मग प. पु. गुळवणी महाराजांनादेखील ओवाळत असत त्यावेळी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत.

प. पु. योगीराज गुळवणी महाराजांनी वंदनीय अशा नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिर व परिसरातील अनेक मंदिर व वास्तुंचे जीर्णोद्धार केले. जुन्या ओवऱ्या पाडून नवीन प्रशस्त ओवऱ्या बांधल्या. श्रीराम मंदिर, नारायणस्वामी मंदिर, गोपाळस्वामी मंदिर व श्री ब्रम्हानंदस्वामी मठाचे नुतनीकरण केले तसेच आपल्या आईच्या व टेंबेस्वामी भेटीच्या जागी एक तुळशी वृंदावन उभे केले आणी एक प्रशस्त धर्मशाळाही बांधली. सर्वात उल्लेखनीय व अविस्मरणीय कार्य म्हणजे प.पु. योगीराज गुळवणी महाराजानी प्रदक्षिणा मार्गी बांधलेली गोलाकार शिल्पकृती. हा सभामंडप उत्कृष्ट शिल्पकृतीचा एक नमुना असुन मजबूत पायावरील सोळा खांबावर आधारलेली व कमळाच्या कोरीव कामाने सजलेली ३५० टन वजनाची मजबूत गोलाकार स्लॅब – बांधकाम क्षेत्रातील एक नवलच आहे. हा सभामंडप उत्तम नटलेला असुन त्यात गुरुचरीत्रातील उल्लेखनीय प्रसंग चित्रित केलेले आहेत. पुढे ऑगस्ट १९७३ मध्ये प.पु. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवुन गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री दत्तप्रभुंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अश्याप्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठेही वाच्यता नाही व जाहिरातही नाही हे विशेष.

पुढे पवनी येथील चातुर्मासात योगीराजांना टेंबे स्वामींचा सत्संग लाभला व मंत्रदीक्षाही मिळाली. पुढच्या काळांत मुंबईहून गाणगापूरला जाऊन श्रीगुरुचरित्राचे त्यांनी ७ सप्ताह केले व सद्गुरुंच्या भेटीची त्यांना तळमळ लागली. तुटपुंज्या माहितीच्या आधारे त्यांनी शोध सुरु केला व तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेल्या हावनूर या गावी स्वामींची त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरांत भेट होऊन परम संतोष झाला. येथे ११ दिवसाचा दुर्मिळ सत्संग व सेवेचा लाभ झाला. याच भेटीत त्यांना स्वामींनी आसने, प्राणायाम, अजपाजप, भगवद् गीतेचा पाठ व विष्णूसहस्त्रनाम हे सर्व शिकवले. निरोप घेताना, पुनः दर्शन कधी होणार? असे वामनरावांनी विचारल्यावर ‘स्वामींनी हृदयाकडे बोट करुन हे लक्षांत ठेव’ असे सांगितले व वामनरावांना त्याचक्षणी व्याघ्रांबरधारी दत्तप्रभूंचे दर्शन झाले.

पुढे वामनराव बार्शीला शाळेत ड्रॉईंग टीचर म्हणुन कामाला लागले. यानंतर ते योगाभ्यासासाठी होशंगाबाद येथे श्री. पंडित यांच्याकडे गेले. त्याच सुमारास योगायोगाने प. पु. लोकनाथतिर्थस्वामी होशंगाबादला आलेले होते. ते वेददीक्षा देणारे अधिकारी पुरुष होते. वामनरावांचे ब्रह्मचर्यपालन, आचारसंपन्न जीवन, आसन, प्राणायामातील प्रगती पाहून प. पु. लोकतीर्थांना आनंद झाला आणी त्यांना शक्तिपात दीक्षा प्रदान केली. पुढे वामनरावांचे प्रगतीचे टप्पे पाहिल्यावर स्वामींनी वामनरावांना दीक्षागुरुत्वाचा अधिकार दिला व वयाच्या ३८ व्या वर्षी ते गुळवणी महाराज म्हणुन प्रसिद्धझाले आणी पुढे ५० वर्षे गुरुपदी राहुन शिष्यवर्ग सांभाळला. कालांतराने १९२६ साली बार्शीहून पुण्याला नू. म. वि. मध्ये ड्रॉईंग टीचर म्हणून रुजू झाले व १९४२ पर्यंत नोकरीवर होते. त्यांच्या दैवी कार्याला आता वेग आला होता. त्यांचा ऐकमेव लेख गोरखपुरच्या कल्याण मासिकामध्ये Transmission of Spiritual Power या नावाने प्रसिद्ध झाला. तदनंतर जिज्ञासू साधकांची गर्दी होऊ लागली. महाराजांनी खूप शिष्यांना शक्तिपात दीक्षा, काहींना मंत्र दीक्षा व इतर काहींना दोन्हीही दिलेल्या असुन अनेकांचे कल्याण केले. त्यांनी मुमुक्षु-आर्त-जिज्ञासु साधकांना मार्गदर्शन, शक्तिपात वा मंत्रदीक्षा देऊन त्यांचा उध्दार करण्याचा वसा ५० वर्षे निष्ठेने पाळला. लुप्त होत चाललेल्या शक्तिपात अथवा वेधदीक्षेला संजिवनी देण्याचे महत् कार्य त्यांच्या हातून घडले व हजारो साधक भक्तांना याचा लाभ झाला.

पुढे २/३ वर्षानी महाराजांची प्रकृती वारंवार बिघडु लागली व किरकोळ आजार, ताप वगैरे वाढु लागले. मात्र महाराज भीष्माप्रमाणे उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहु लागले व सारे क्लेश शांतपणे सहन करीत होते. अश्यातच एकदा विद्या नावाच्या मुलीचा ‘उघड नयन देवा’ हा अभंग ऐकताना टेंबेस्वामींचे दर्शन होत आहे, असे महाराज म्हणाले आणी लगेचच १५/०१/१९७४ ला दुपारी पाऊण वाजता त्यांनी चिरविश्रांती घेतली. रेडिओवर बातमी आली. सगळीकडे हाहाकार झाला. दुसरे दिवशी अभूतपूर्व व प्रचंड अंत्ययात्रा निघाली व त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराजांनी काढलेले श्रीदत्तप्रभुंचे ते प्रसिद्ध चित्र आजही “वासुदेव निवास, प्रभात रोड, पुणे” येथे विराजमान आहे.

संदर्भ- माहीती व आंतरजाल

संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839

✒विशेष विनंती- वरिल लेख आवडल्यास कृपया लेखात व लेखनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावा, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒

इति सुर्यार्पणमस्तु

दत्त संप्रदायातील सत्पुरुष सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *