दिव्य ध्येय मार्गावरी हा…, योगेश्वर महाराज उपासनी, अमळनेर, जळगांव

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

…..दिव्य ध्येय मार्गावरी हा…….

हरी:ओम…..! नर्मदे हर…..!
सुप्रभात,सादर स्नेह वंदन……..!
सुजन हो……..
आज पाश्चात्त्य कालगणनेनुसार #वर्षाचा पहिला दिवस. कालच्या माझ्या पोस्टमध्ये मी लिहिल्या प्रमाणे अनेक संस्कार शून्य ,केवळ जन्म हिंदूंनी हा आपलाच पारंपारिक उत्सव असल्याच्या भ्रामक कल्पनेत व निरर्थक उत्साहात स्वतः जागरण करून इतरांचीही झोपमोड केल्याचा अनुभव माझ्याप्रमाणेच आपणही घेतला असेलच.

कोणाची जीवनपद्धती कशी असावी? हा खरे तर संपूर्णतया स्वायत्त व व्यक्तिगत विषय आहे, हे मान्य करूनही व कोणत्याही सहिष्णू व संवेदनशील हिंदू प्रमाणे अन्य लोकांना त्यांच्या त्यांच्या मतानुसार, पद्धतीनुसार व जीवनशैलीनुसार जीवन जगण्याची मुभा आहे हे लक्षात ठेवुनही हे सारे सहन करणे सहनशीलतेच्या पलीकडे आहे, या माझ्या मताशी आपणहि सहमत व्हाल.

तथाकथित स्वतंत्र भारताच्या गेल्या सत्तर वर्षातिल हिंदू नागरिकाचा हाच अनुभव आहे. नववर्ष असे साजरे करावे की करू नये? तर याचे सरधोपट उत्तर आहे, करावे….!
पण आपण कोणते कृत्य कशासाठी करतो याचा जर कार्यकारणभाव व साध्यासाध्य विवेक आपल्याकडे नसेल तर मात्र आपणासही दुःख होते व आपल्यामुळे इतरांनाही दुःख सहन करावे लागते.

मी नेहमीच भारतीय चिंतन, भारतीय सिद्धांत, भारतीय जीवन पद्धती, स्पष्टच सांगायचे झाले तर सनातन चिंतन, सनातन सिद्धांत व सनातन वैदिक हिंदु जीवनपद्धतीचा पक्षधर असल्याचे आपणास माझ्या चिंतनातून जाणवत असेलच. मी एकांगी चिंतन करतो असे असे आहे कां? तर त्या प्रश्नाचे उत्तर 1000% खात्रीपूर्वक ” नाही ” असेच आहे. कारण एकाचा, एकट्याच्या सुखाचा विचार भारतीय सिद्धांत किंवा जीवन पद्धतीने कधीही केलेला नाही. भारतीय विचार पद्धती नेहमी संघ जीवनाचा, समूह जीवनाचा व समष्टी जीवनाचा आग्रह धरणारी आहे हेही थोडे चिंतन केल्यास आपल्या सहज लक्षात येईल.
पण लक्षात घेतो कोण…….?
हीच तर आजच्या भारतातल्या चिंतकांची आणि संघर्ष भूमीवर प्राणांची पर्वा न करता कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची खंत आहे, हे मात्र दुर्दैवाने खरे.

मानवी जीवन हे सुखाच्या शोधासाठी सतत धडपडत असते. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सामान्या पासून असामान्या पर्यंत ,वृद्धा पासून बाला पर्यंत, अज्ञानी पासून ज्ञानी माणसापर्यंत, राजापासून रंकापर्यंत, प्रत्येकाची धावपळ-धडपड, प्रयत्न व वाटचाल ही केवळ निरतिशय, निरामय, कल्पनातित आणि कायमचे सुख मिळविण्याच्या दिशेने असते हे तर मान्य आहे ना…?
या सुखाचा, त्याही पुढे जाऊन समाधानाचा व त्याही पुढे जाऊन कृतकृत्यतेचा जेवढा विचार भारतीय अध्यात्मशास्त्राने केला, तेवढा जगातल्या अन्य कोणत्याही विचारसरणीने किंवा संप्रदायानेही केला नाही, हे मात्र मी माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर व भारतीय ऋषींच्या गेल्या किमान दहा वर्षांच्या इतिहासाच्या अनुषंगाने छातीठोकपणे सांगू शकतो.

म्हणूनच आज सर्व जगातील तत्त्वचिंतक,राजकारणी विचारवंत व समाजकारणी यांचे डोळे फक्त आणि फक्त भारताकडेच लागून राहिलेले आहेत. ते एकाच आशेने की उद्याच्या शतकातला आनंदाचा, चैतन्याचा, सुसंस्कृतीचा, समरसतेचा,भेद भाव रहित समाज जीवनाचा व गुण, कर्म, कौशल्याधारित आनंदमय समाज जीवनाचा नवा सूर्योदय (पश्चिम क्षितिजावर नसून) तो भारताच्या पूर्व क्षितिजावरून होईल. गेल्या हजार वर्षाच्या यवनांच्या विनाशकारी पाशवी आक्रमणानंतर, दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या कुटील बुद्धीने केलेल्या बौद्धिक आक्रमणानंतर व गेल्या सत्तर वर्षात केवळ संस्कार शून्य जन्म हिंदूंनी पाश्चात्त्यांच्या केलेल्या अंधानुकरणाच्या दुष्परिणामां नंतरही आज वैश्विक पातळीवर भारतीय विचार, भारतीय समाज ,भारतीय कर्तुत्व व भारतीय संघटनेचा जो डींडिम पिटला जातो आहे, त्याच्याकडे बघून विरोधकही हे मान्य करतील की ही भारतीय संस्कृती अजर, अमर, सनातन लोक कल्याण कारी व आद्यतन आहे.


एक मुस्लिम कवी या भारतीय संस्कृतीचं गुणगान गाताना म्हणाला……
दिन ए इलाही का बेबाक बेडा
न जेहु मे रूका न सेहू मे अटका ।
किये पार है जिसने सातो समंदर
दहाडे मे डूबा वह गंगा के अंदर ।।

संपूर्ण जगाला आपल्या विनाशकारी आक्रमणाने राखरांगोळी करणाऱ्या तथाकथित शांतिदूतांना या देशामध्ये येऊन या देशातल्या अनेक परंपरांचे नकळत पाईक व्हावे लागले हे परखड ऐतिहासिक सत्य ही विसरून कसे चालेल……..?
पण ” केवळ इतिहासात रमतात ते इतिहास घडवत नाहीत ” हे शाश्वत व विदारक सत्य आपण सतत ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
” पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ “
असे जेव्हा कवी म्हणतात, तेव्हा त्या भविष्यातील रम्य भावी काळासाठी मागच्या पिढीला पूर्व दिव्य करावे लागते हेही आपण ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय अध्यात्म शास्त्रातल्या अनेक स्वनामधन्य व दिव्य अशा चरित्रातून या प्रकारचे “पूर्व दिव्य” करण्याची प्रेरणा संपूर्ण जगाने घेतली आहे. पण…….
” तुझे आहे तुजपाशी परी तू जागा भूललासि “
या तुकारामोक्ती सारखी आम्हा भारतीयांची व विषेशत:हिंदुंची अवस्था झाली आहे.कोणत्याही अभ्यासाशिवाय या देशातील विद्वानांनी सुद्धा ज्या एका ग्रंथाचा पराकोटीचा द्वेष केला आणि तोही हा ग्रंथ बामनाने लिहिला आहे या गैरसमजुतीतून केला तो महान ग्रंथ आहे भगवान मनुंनी लिहिलेला

” श्री मनुस्मृती “……!
या ग्रंथाचे लेखक असलेले भगवान मनु हे ब्राह्मण नसून मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्रीरामचंद्रांचे पूर्वज आहेत हे जर लक्षात घेतले तर आपल्या ध्यानात येईल की भगवान मनु हे क्षत्रिय होते. किमान दहा हजार वर्षांपूर्वी एका उदात्त मानवी जीवनाची घटना,( आर्टिकल ऑफ मेमोरेंडम ) देणार्‍या या महामानवा कडे अभ्यासकाच्या दृष्टीने न बघता केवळ पूर्वग्रहदूषित वृत्तीने बघितल्यामुळे आज हा महामानव व त्याने दिलेला क्रांतिकारी विचार हा दुर्दैवाने टीकाकारांच्या टीकेचा व आम्हा भारतीयांच्या उपेक्षेचा विषय झालेला आहे.
भारतीय दिव्य परंपरेबद्दल सांगतांना भगवान मनु मनुस्मृतीमध्ये म्हणतात………
एतद्देश प्रस्तुतस्य सकाशाद् अग्र जन्मन:।
स्वं स्वं चरित्रन् शिक्षेरन् पृथ्वीव्यां सर्व मानवा:।। म्हणजे या देशात जन्माला आलेल्या उदात्त, जनहितैषी, लोककल्याणकारी जीवन जगणार्‍या महापुरुषांचे चरित्र हे केवळ अभ्यासण्या सारखे नसून ते अनुसरणहि आहे. या चरित्रांचा अभ्यास केल्यास पृथ्वीवरील सर्व मानवांच्या चरित्राला उदात्तता प्राप्त व्हावी येवढी ही चरित्र दिव्य आहेत. पण दुर्दैवाने मेकॉलेच्या नजरेतुन भारतीय संस्कृतीचं अवलोकन करणाऱ्या बुद्धी आंधळ्यांना हे कोणी समजून सांगावे….?

भारतीय पुराण इतिहास वाचल्यानंतर आपणास अशा अनेक पराक्रमी, जिद्दी, प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या व स्वीकृत ध्येयासाठी पिढ्यानपिढ्या खपणार्या,कष्ट करणाऱ्या अनेक चरित्रांचा परिचय होऊ शकेल. मी आपणास विनम्र आवाहन करीन…….. एकदा डोळस बुद्धीने या सर्व पुराण ग्रंथांचा अभ्यास करून तर बघा. पण त्यातही आम्ही गोंधळच घातला. ” पुराणातली वांगी पुराणातच बरी ” असं म्हणणाऱ्यांना आपण विद्वान समजू लागलो. पण पुराण या शब्दाचा अर्थ– जे जुने असूनही नित्य नवे आहे ते — असाच आहे. संस्कृतात
” पुरा नव इति पुराण: “
अशीच त्याची व्याख्या दिलेली आहे. या पुराणातील दिव्य विचारांची, श्रेष्ठ समाज जीवन पद्धतीची व उदात्त भारतीय चरित्रातील श्रेष्ठत्वाची वानगी न घेताच आपण त्यांना केवळ भाकडकथा म्हणून बाजूला टाकल्यामुळे आज आपल्या समाजाची अतिशय भ्रांत, गलितगात्र व कर्तव्य शून्य अशी अवस्था झाली आहे.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूजनीय श्री.पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या अनेक प्रवचने व ग्रंथातून त्यांनी या भारतीय वांङमयातिल श्रेष्ठ विचारांचे व दिव्य चरित्रांचे आपणास दर्शन घडविले आहे. अभ्यासकांनी व शंकेखोरांनी त्यांचे हे अलौकिक वाङमय एकदा– किमान विरोध करण्यासाठी – – तरी नजरेखालून घालावे असे मी सांगू इच्छितो.
त्यातिल काही उदाहरणे बघीतल्यावर आपणास हे खचितच पटेल.

पूर्वजांच्या उद्धारासाठी सातत्याने प्रयत्न करून स्वर्गातिल गंगा जमिनीवर आणणारे भगीरथ…..

आपल्या वडिलांच्या / पूर्वजांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य खपून त्यांचा उध्दार करणारे सगरपुत्र…….

सिकंदराला तेवढ्याच ताकतीने, शक्ती बुद्धी व संघटनेच्या पातळीवर तोंड देऊन हरवणारे आचार्य आर्य चाणक्य व त्यांचे शिष्योत्तम सम्राट चंद्रगुप्त मौर्य…….

संपूर्ण विश्वात बौद्ध धर्माची पताका फडकविणारे तथागत भ.गौतम बुद्ध व त्यांचे अनुयायी सम्राट अशोक……

सातशे पन्नास वर्षाच्या पाषवी व मानवतेला कलंक ठरणाऱ्या यावनी आक्रमणाच्या विरोधात ( संपूर्ण प्रतिकूलतेतही ) उभे राहून प्राणपणाने स्वराज्य संस्थापना करणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवराय…….

इंग्रजांच्या विरोधात अतिशय अल्प शक्ती असून सुद्धा सर्वार्थाने झुंजून हौतात्म्य पत्करणारे सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक………

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच “अशी सिंहगर्जना करून इंग्रजांच्या राजसत्तेला खिळखिळे करणारे क्रांतिकारकांचे गुरुणां गुरु, भारतीय असंतोषाचे जनक,लोकमान्य दादासाहेब टिळक…….. " आजादी और जिंदगी एक बात है । मौत और गुलामी एक बात है ।।

असे म्हणणारे चंद्रशेखर आजाद, सुखदेव, भगतसिंग,राजगुरू आदि क्रांतिकारक…….

भारताला अणुविज्ञान संपन्न करणारे डॉक्टर विक्रम साराभाई……..

भारताला अण्वस्त्र क्षेपणास्त्र संपन्न करणारे भारतरत्न डॉक्टर एपीजे कलाम…….

भारताला संगणक क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे महासंगणक निर्माते डॉक्टर जयंत नारळीकर……..

कुष्ठ रोग्यांच्या वेदना समजण्यासाठी त्याची लागण करून घेऊन आजन्म त्यांची सेवा करणारे महामानव डॉ.बाबा आमटे……

अशी ही स्वनामधन्य राष्ट्रसेवकांची यादी आपापल्यापरीने आपणास वाढवता येईल.

पण त्या महापुरुषांनी केलेला अभ्यास, त्याग, समर्पण व राष्ट्रहितासाठी ची त्यांची अखंड तळमळ या गुणांचा जर आपण अभ्यास केला नाही तर
” सांगे वडिलांची स्तुती तो एक मूर्ख “
ही समर्थोक्ती आपण खरी केली असेच होइल. म्हणून आपण या सर्व महापुरुषांच्या चरित्रातून नुसता बोधच घेणे आवश्यक नसून त्या बोधामृतातुन नव संजीवन घेउन प्रत्यक्ष कार्य करण्याची आज आवश्यकता आहे. " न हि सूप्तस्य सींहस्य प्रविषंती मुखे मृग: "

या न्यायाने एका जागी बसून आपणास हे यश मिळणार नाही, मिळवु शकणार नाही. त्यासाठी ” साधू घूमता भला” हे सूत्र आपल्याला अंगीकारावे लागेल. भारतीय चिंतकांनी आम्हाला हजारो वर्षांपूर्वी हेच सांगितले…….
” चराती चरतो भग: “
” चाले त्याचे भाग्य चालते, थांबे त्याचे भाग्य थांबते “
असा याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे.म्हणून …..
उठ जाग मुसाफिर भोर भई
अब रैन कहा जो सोवत है ।
जो जागत है सो पावत है

जो सोवत है सो खोवत है ।
हे ध्यानी घेउन सर्व प्रथम जो झोपलाय त्याला जागं केलं पाहिजे, जो जागा आहे त्याला उठवलं पाहिजे, उठला आहे त्याला चालते केले पाहिजे व जो चालतो आहे त्याची पाउले लोककल्याण व राष्ट्रहिताच्या दिशेने पडतील याची काळजी केली पाहिजे. अशा प्रकारे नित्य निरंतर ध्येयाप्रती चालणाऱ्या साधकाला……..
पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना।
सब समाजको लिए साथ मे आगे है बढते जाना ।।
हे वेगळे सांगावे लागत नाही. लोक कल्याणासाठीच सर्व प्रकारच्या आपत्ती सहन करत चालणे हीच ज्या साधकाची जीवन साधना असते, अशा अनेक जीवन साधकांच्या चरित्रातून आपणास हे ध्यानात येईलच. पाश्चात्य जगतात सनातन वैदिक धर्म ,विशेषतः वेदांताची सिंह गर्जना करणारे, विश्वबन्धु स्वामी विवेकानंदांनी सुद्धा याच औपनिषदिक सिद्धांताची आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून दिली……. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत........!अशाप्रकारे उठून, जागुन, श्रेष्ठ ध्येय प्राप्ती शिवाय मागे हटायचे नाही असा या महा वाक्याचा अर्थ आहे. अशा प्रकारची वाटचाल ही सुखकर तर नसतेच, पण ती आपल्या लोकांच्या विरोधाने, उपेक्षेने, अपमानाच्या वळणांनी व अपयशाच्या भीतीनेहि भरलेली असते. तरीही साधक या ध्येय पथावर निरंतर चालत असतो. नव्हे या सर्व संकटाची जाणीव त्याच्या अंतर्मनात सतत तेवती असते. पण त्याचे ध्येय स्पष्ट असते. श्रुतं चै वयत् कंटकाकीर्ण मार्गं स्वयम् स्वीकृतन् न सुगं कारयेत।।

ध्येय पथाचा हा मार्ग कंटकाकिर्ण आहे हे माहीत असूनही आम्ही स्वखुशीने व सर्वस्व समर्पणाच्या तयारीनेच हा मार्ग स्वीकारला आहे असे त्यांचे सांगणे असते. स्वातंत्र्यवीर हिंदुह्रदय सम्राट सावरकर म्हणाले……..
की घेतले व्रत हे नच अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने।
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे।।

अशा प्रकारे या मार्गावर चालणे हे ” सतीचे वाण ” आहे हे समजून,सतीचे वाण स्वीकारण्याची, पेलण्याची व विशिष्ट ध्येय प्राप्ती पर्यंत अव्याहत चालू ठेवण्याची आजच्या तरुणांची जबाबदारी आहे,हे आजच्या तरुण/तरुणींनी विसरता कामा नये. अशा प्रकारच्या दिव्य ध्येयाची वाटचाल करण्याची सद्बुद्धी आमच्या सर्व तरुणांना होऊन आमचे राष्ट्र ” विश्व गुरु पदावर ” सुप्रतिष्ठित होवो……
साने गुरुजींच्या शब्दात…….
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन।
मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो।।


……या देशावर ,धर्मावर, या संस्कृतीवर, येथील जनमानसावर प्रेम करणाऱ्या सर्व राष्ट्र भक्तांनी व उदात्त विचार करणाऱ्या महामानवांनी याच प्रकारचे विचार मांडले आहेत. याचे अनेक दाखले देता येत असले तरी विस्तार भयास्तव मी इथे थांबतो. अशा प्रकारची सद्बुद्धी, सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा व ध्येय प्राप्त केल्याशिवाय मागे न हटण्याची जिद्द तुम्हां आम्हां सर्वांच्या घरातील नवतरुणांना प्राप्त होतो या मंगलमय शुभकामने सह…….
……… प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
बहुत काय लिहिणे…….?
आमुचे आगत्य असो द्यावे….
स्नेह प्रार्थी,
।।।© अक्षर योगी।।।
राष्ट्रीय कीर्तनकार,शिव कथाकार,
राष्ट्रीय किर्तन रत्न, भागवताचार्य,
ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज,
श्री दत्त मंदिरासमोर, समर्थ नगर,
अमळनेर,जि. जळगाव.
मंगल ध्वनी संकेत…….
94 222 84 666 / 79 72 00 28 70
जानेवारी, दि.1,2022

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *