ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.462

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६२

वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानी । हरिहरि न म्हणती तया थोर जाली हानी ॥१॥ उठा उठा जागा पाठी भय आले मोठे । पंढरी वांचूनी दुजा ठाव नाही कोठे ॥२॥ तापत्रय अग्निचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥ देखोनि ऐकोनि एक बहिर अंध जाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥ आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला ॥५॥ व्याघ्रलासी भूतें ये लागतील पाठी । हरिभजन न करिता सगळे घालू पाहे पोटीं ॥६॥ संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरा ॥७॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावे न निघतां न चुके जन्ममरण ॥८॥

अर्थ:-

जीवाचे कल्याण व्हावे म्हणून वेदशास्त्रे व पुराणे जीवांना हरिनाम उच्चार करण्या विषयी बोंब ठोकून सांगत आहे. पण कोणीच कानानी ऐकत नाही. म्हणजे वेदशास्त्राच्या म्हणण्या कडे लक्ष देत नाहीत पण त्यांच्या म्हणण्या प्रमाणे जे वाचेने हरीनामाचा उच्चार करीत नाही. त्याची अतिशय हानी निश्चित झाली आहे. महाराज मोठ्या कळकळीने सांगतात अरे उठा उठा! लवकर जागे व्हा ! तुमच्य पाठीमागे मृत्युचे मोठे भय लागले आहे त्या भयातन सुटण्याला पंढरपूरावाचून दुसरे ठिकाण नाही. अध्यात्मिक, आधिभैतिक आधिदैविक अश तीन प्रकारच्या तापरुपी अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चहूकडून लागला आता तूही कुणाच्या आड जाणार आणि कोणाचा सावाधावा करणार म्हणजे कळकळीने धाऊन येऊन तुम्हाला साह्य कोण करील. विषयाच्या लंपटपणामुळे शास्त्र पाहून व ऐकूनही जे आंधळे व बहिरे झाले. त्यांना काळाने बांधून यमपूरीस नेले. पहा तुझ्या देखत आजा मेला, पणजा मेला, बापालाहि मसनात नेले. पाहता पाहता नातु पंणतु मेले हे पाहून वेडा झालास. अरे हा भोवतालचा गोतावळा व्याघ्रलासी भुत पाठी लागले तसा आहे. हा काळ, तु हरिभजन केले नाहीस तर सगळ्यांनाच आपल्या पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही. याकरता तुम्ही संत संगती धरा,आणि संताच्या संगतीने हरिभजन करा हा पहा दांत करकरा चाऊन काळ तुमच्या पाठीस लागला आहे. माझे पिता व रखुमादेवीवर जे श्री विठ्ठल त्यांना अनन्यभावाने शरण न गेलात तर तुमचे जन्ममरण चुकणार नाही. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *