दृष्टांत 34 महाप्रलय कुणी पहिला?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

महाप्रलयाची कथा

वैशंपायन ऋषी म्हणाले, “महाप्रलयाचा अनुभव घेणारे या त्रिभुवनात फक्त मार्कंडेय ऋषी आहेत. त्यांनी महाप्रलयाची हकिगत ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने ती व्यासांना व व्यासांनी मला सांगितली आहे ती अशी- कृत, त्रेता, व्यापार व कली या युगांची सर्व लक्षावधी वर्षे उलटली की एक देवयुग होते. अशी एकाहत्तर देवयुगे झाली की एक मन्वंतर होते. अशी अठ्ठावीस मन्वंतरे गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो व अशा रीतीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे लोटली की महाप्रलय होतो. महाप्रलयाच्या वेळी योगामायेच्या संगतीने सर्व प्राणिमात्रांच्या शक्ती एके ठिकाणी होतात. सूर्याचे तेज अनेक पटींनी वाढते. समुद्रातील वडवानल जागृत होतो व अशा तर्‍हेने भयंकर उष्णता निर्माण होते. अत्यंत प्रखर असा अग्नी निर्माण होऊन सर्व प्राणिमात्र मरून जातात. ब्रह्मांडात फक्त राख उरते. भयंकर वारा सुटून ही राख एका ठिकाणी होते. नंतर मुसळधार पाऊस पडून सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते.


महाप्रलयाच्या वेळी सर्व जलमय झाले असता मार्कंडेय ऋषी इकडेतिकडे फिरत होते. ते चिरंजीव असल्याने त्यांना या प्रसंगाची भीती नव्हती. पण दुसरा कोणताही प्राणी दृष्टीस पडेना त्यामुळे त्यांच्या मनाला फार उदासीनचा आली व त्यांनी त्या आदिशक्तीची प्रार्थना केली, “मला एकदा तरी तुझे दर्शन घडू दे.” त्याप्रमाणे एका वटवृक्षाच्या जवळ मार्कंडेय ऋषी आले असता पाण्याला लागून असलेल्या एका पानावर एक लहान मूल आनंदाने खेळत आपण अंगठा चोखीत असलेले त्यांना दिसले. ते मूल म्हणाले, “बाळा मार्कंडेया, कुशल आहेस ना?” अंगठा चोखणार्‍या एका तान्ह्या मुलाने आपणास “बाळा’ म्हणावे याचे मार्कंडेय यांना फार नवल वाटले. किंचित रागाने ते म्हणाले, “लाखो वर्षे जगून महाप्रलय पाहिलेल्या मला तू बाळ म्हणतोस?” यावर वटपत्रावरील ते मूल खदखदा हसून म्हणाले, “बाळ मार्कंडेया, मी असे अनेक महाप्रलय पाहिले आहेत. तुझ्या पित्याने चिरंजीव पुत्र मागून घेतल्याने तू आता आहेस.” हे ऐकून मार्कंडेय म्हणाले, “मला तुझी ओळख पटत नाही. तू कोण आहेस?” मग ते मूल म्हणाले, “मला मुकुंद असे म्हणतात. या त्रिभुवनाचा कर्ता, हर्ता मीच आहे. या महाप्रलयाची कथा सर्वांना कळावी म्हणून तू हिचा प्रसार कर.” याप्रमाणे सांगून बालमुकुंद नाहीसा झाला.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 40

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *