1 तो आनंदाश्रू होता

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

© तो आनंदाश्रू होता.

“आई मी लग्न करतोय” मी आनंदाची बातमी सांगत मी एका मुलीचा फोटो आईपुढे धरला.

हे ऐकून आईला आनंद वाटण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक ऐक वेगळीच चिंतेची छटा उमटली. “काय झालं आई? तुला मुलगी आवडली नाही का?” फोटोकडे तिने पाहीलेच नाही. ती काहीच बोलत नव्हती. इतक्यात दरवाज्यावरची बेल वाजली.

मी दरवाजा उघडला बाहेर प्रसाद उभा होता. तो आईला भेटायला आला होता. डोळ्यात तराळलेले पाणी पुसत आई किचनमध्ये गेली. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून मी गलबललो. आज तब्बल सहा वर्षानी आईच्या डोळ्यात पाणी पाहत होतो. प्रसादशी बोलत असताना माझं लक्ष त्या बोलण्यात नव्हते. तो त्या रात्री आमच्याकडे राहणार असल्याने मला आईशी काहीच बोलता आले नव्हते. तिचा काळवंडलेला चेहरा मला अस्वस्थ करत होता.

रात्री मला झोप येत नव्हती. विचाराने डोक्यात काहूर माजले होते. आईचा मुड असा का बदलला. खरतरं तिच लग्नासाठी माझ्या मागे लागली होती. मला काहीच कळत नव्हते. मन भूतकाळात जावू लागले होते.

तो दिवस मला चांगला आठवतो. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या रूमवर लवकर पोहोचता यावे म्हणून बसची वाट न बघता सरळ रिक्षा करून जायचे ठरविले. त्या दिवशी संकेतचा वाढदिवस होता. पाच मिनिटे झाली तरी रिक्षा येत नव्हती. इतक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. माझ्याकडे छत्री असून पण बसस्टॉपच्या आडोशाला आलो. बसस्टॉप जवळ अंधार होता. माझं सहज लक्ष एका कोपऱ्यात गेले. तिथे कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज येत होता. मी जवळ जावून पाहीले असता तिथे एक बाई शरीराचे मटकुळं करून बसली होती. पावसाचे पाणी तिच्या अंगावर पडत होते. तिच्यात उठायचे त्राण नव्हते.

“अहो बाई, कोण आपण? इथे काय करताय?” तिच्या कडून काहीच प्रतिसाद नव्हता. त्यांची मध्येच खोकण्याची उबळ आणि कण्हण्याशिवाय काहीच हालचाल नव्हती. इतक्यात माझी बस आली पण त्या बाईंना तिथे असं सोडून जाणं प्रशस्त वाटेना. पण लगेच तो विचार झटकून आपण का त्या फंदात पडा ? असा विचार करून मी सुटणारी बस धावत धावत पकडली. सीटवर बसलो पण काही केल्या बसस्टॉपवरचे दृश्य डोळ्यासमोरून जाईना. बस काही अंतर पुढे गेली असेल आणि मी एका बसस्टॉपवर बस मधून खाली उतरलो. प्रसादला फोन लावून मी धावतच बसस्टॉपकडे निघालो. मी तिथे पोचलो तेव्हा त्या बाई एका बाजूने पुर्ण भिजल्या होत्या. पाऊस ओसरला होता. थोड्यावेळात प्रसादही तिथे पोचला. दोघांनी मिळून त्या बाईंना रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसाद आणि मी हॉस्पिटलमध्ये असतानाच रूमवरून कॉल येत होते. आज संकेतचा वाढदिवस होता. त्यासाठीच सर्व आमची वाट बघत थांबले होते.

प्रसादला पुढे व्हायला सांगून मी हॉस्पिटलमध्येच थांबलो. इस्पितळ सरकारी असून पण चांगले उपचार होत होते.

” या पेशंटसोबत तुम्ही आहात ना?”

” हो”

” तुमच्या आई आहेत ना या?

हॉस्पिटलमध्ये आणायला इतका वेळ का केलात? ” एका नर्सने मला विचारले.

“उशीर झाला खरा, पण उपचारात काही कमतरता ठेऊ नका, काही लागले तर सांगा” असे बोलून मी सारी सत्यकहानी त्यांना सांगीतली. त्या बरोबर तिथल्या नर्सही हळहळल्या.

” तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही यांची नीट काळजी घेऊ, आपण घरी गेलात तरी चालेल “

” खरचं ना?”

” हो निश्चिंत राहा.” त्या नर्सच्या आश्वासक शब्दानी बरं वाटले. किंबहुना त्यांनाही मी घेतलेल्या कामात खारीचा वाटा उचलायचा होता.

मी घरी आलो आणि सारी परीस्थिती सांगीतली. सगळे हळहळले पण संकेत काही न बोलता आत निघून गेला.

चार दिवसात त्या बाई किरकोळ खोकला वगळता ठणठणीत बऱ्या झाल्या. पण काहीच बोलत नव्हत्या. मी त्यांना खुप बोलते करायचा प्रयत्न केला. त्यांना काही विचारले की डोळ्यात पाणी भरायच्या. शेवटी मी त्यांना आमच्या रूमवर आणायचे ठरविले . त्या कुठून आल्या ? का आल्या? आम्हाला काहीच माहीत नसून सुद्धा मी आणि प्रसादने त्यांना आमच्या रूमवर घेऊन आलो. आम्ही पाचजण एका चाळीच्या खोलीत राहायचो. त्यातला संकेत सोडला तर आम्ही सगळेच एकमेकांना समजून घेत होतो. आम्ही पोहोचलो तेव्हा संकेत रूमवर होता. आमच्या सोबत त्या बाईंना बघून त्याने एक नाराजीचा कटाक्ष टाकला आणि तो बाहेर जाऊ लागला.

” संकेत थांब, तुम्हा सगळ्यांशी मला काही बोलायचे आहे” त्या बाईंना एका खुर्चीवर बसवून मी म्हणालो.

संकेत थांबला.

मी बोलायला सुरूवात केली. ” हे बघा मित्रानो, ह्या बाईंबद्दल तुम्हाला अगोदरच बोललोय, यापेक्षा त्यांच्याबद्दलची माहीती मला अजून तरी मिळाली नाहीये. माझे आणि प्रसादचे असे मत आहे की, या बाईंना आपल्यासोबत राहू द्यायचे. “

“मला हे मान्य नाहीये, एकतर या कोण कुठल्या हे आपल्याला माहीत नाहीये आणि आपल्यालाच ही जागा पुरत नाहीये.” संकेत तडतडला.

“संकेत मी परवानगी विचारत नाहीये, तुम्हाला सांगतोय, माझा आणि प्रसादचा निर्णय झालाय. आपणां सर्वांना थोडे ऍडजस्ट करावे लागेल.” संकेत सोडून सगळ्यांनी होकारार्थी मान डोलवली. संकेत सोडला तर आम्ही सगळेच अनाथ होतो. त्याचे आईबाबा गावी असायचे. त्यामुळे संकेतशिवाय आम्हा सगळ्यांना अनाथपण काय असते हे चांगलेच माहीत होते. या बाईंची माहीती समजेपर्यंत त्या पण आमच्यासाठी अनाथ होत्या. आमच्या रूममध्ये एक दिवान होते त्यावर त्या बाईंना झोपायला देऊन मी किचन मध्ये झोपलो. तिथून आम्ही आळीपाळीने प्रत्येक जण किचनमध्ये झोपू लागलो. सुरूवातीचे दिवस त्या बाईंच्या खोकल्यामुळे आम्हाला झोप मिळत नव्हती. अशातच संकेतने आपली सोय दुसऱ्या ठिकाणी केली. आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. फक्त थोडे जास्तीचे रूमभाडे सहन करावे लागले.

काही दिवसानी त्या बाई पुर्ण बऱ्या झाल्या. सगळ्यात पहिले त्यानी सर्व घर नीट लावले. किचनचा ताबा आपल्याजवळ घेतला. घराला घरपण आले. किचनमधले सामान जागच्या जागी राहू लागले. आम्ही नको म्हणत असताना सुद्धा आमची सर्व घरातली कामे त्या करू लागल्या. काही दिवसात त्या आमच्यात रूळून गेल्या.

एक दिवस मी त्यांच्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण तोही असफल ठरला. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मी पण जास्त आग्रह केला नाही. तिथून पुढे मी तो विषय काढला नाही. त्यांचा सहवास आम्हाला हवाहवासा वाटू लागला. त्याही आमच्यावर आईची माया करू लागल्या. आम्ही त्यांना आई बोलावू लागलो. आमच्या सोबत नाटक, सिनेमाला घेवून जाऊ लागलो. आमची सर्व सुख दु:खे त्यांच्या सोबत शेअर करू लागलो. देवाने आम्हाला काही दिवसातच सनाथ करून टाकले होते. दिवसां मागून दिवस जात होते. एकदा तर माझ्या एका मोठ्या आजारपणातील एखादी आई सुद्धा लढली नसती अशी लढून तिने मला मृत्यूच्या दारातून आणले होते.

सहा वर्षात अशा बऱ्याच गोष्टीनी आमच्या मनात त्यानी घर केले होते त्याच दरम्यान संतोष, राकेश आणि प्रसादचे लग्ने देखील झाली. आता फक्त मी आणि आई घरी राहीले होतो. मी आईला कायम माझ्यासोबत ठेवायचे ठरवले होते. तिही आता थकत चालली होती. ती लग्नासाठी माझ्या मागे लागली होती. मी मात्र तो विषय टाळत होतो. न जाणो होणारी बायको कशी मिळेल? आईशी कशी वागेल? मला आईची खुपच सवय झाली होती. मला बालपणापासून प्रेम, माया काय असते हे माहितच नव्हते. कचराकुंडीतून अनाथाश्रम आणि मग शिक्षण झाल्यावर भाड्याच्या खोलीत असा फिरत होतो. आईकडे सर्व व्यवहार दिल्यापासून दोन वर्षात आम्ही स्वताचे घर घेतले.

पैसा जरी माझा असला तरी त्याला वळण मात्र आईने लावले होते. सुरूवातीला लोक काहीही बोलायचे. लोकांना फक्त नर मादीचेच नाते माहीत असते. त्या पलीकडे पण काही नाती असतात हा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावत नाही. चार जवान पोर आणि एक पंचावन्न वर्षाची बाई या गणितामध्येच आपली बुद्धी गहान ठेवत होते. आम्हाला याचा खूप त्रास झाला . शेवटी आम्हाला भाड्याची रूम बदलावी लागली होती. पुढे मग काही दिवसात स्वताचे घर घेतले.

प्रसाद सकाळी लवकर उठून कामावर निघून गेला. मला पण ऑफीस साठी निघायचे होते. पण आईला रात्रीच्या प्रकाराबद्दल विचारायचे होते. मी नाष्टा करता करता विषय काढला.

“आई तुला, मुलगी पसंद नाहीये का? “

ती काहीच बोलली नाही.

“आई तू बोलत का नाहीस?”

“काय बोलू बाळा? या वयात मी खुप स्वार्थी वागतेय रे. मला तुला गमवायचे नाहीये.”

” म्हणजे? मी काही समजलो नाही”.

“मला तुझ्या लग्नाची खुप भीती वाटतेय”

“काय बोलतेस तू, तूच तर लग्नासाठी मागे लागली होतीस. तू म्हणत असशील तर लग्न देखील करत नाही.”

“अस बोलू नको रे बाळा, मी इथे येण्यापूर्वी अगदी खुप सुखात होते. तुला कधी हे बोलले नाही. पण आज सांगतेय. मी, माझे पती आणि सागर असा आमचा तिघांचा संसार सुखात चालला होता. पण नियतीला ते पाहवले नाही. एके दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सागरचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले.

वडीलांच्या धाकात असलेला सागर मोकळा झाला. तो मनाला येईल तसा वागू लागला. त्याचे घराबाहेर राहणे वाढू लागले. नवऱ्याशिवाय कुठेही बाहेर न पडणारी मी घरातच कुढू लागले. अशातच माझा दम्याचा आजार वाढत चालला. सागरला सांगून सुद्धा तो कानाडोळा करत होता. एके दिवशी आपल्या लग्नाचा विषय त्याने स्वताहूनच माझ्याकडे काढला. मी ही खुश झाले. आपल्या कुटुंबात अजून एक मेंबर वाढणार होता. सुनेमुळे तरी हा घरी राहील. त्याचे लग्न झाले. नव्याची नवलाई संपली. सागर तर माझा मान राखतच नव्हता. सुनही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागली. ते माझ्या साधेपणाचा फायदा घेऊ लागले.

वरचेवर घालून पाडून बोलू लागले. औषधोपचार न झाल्यामुळे माझा दम्याचा आजार बळावला. नवऱ्याने मला एवढी पंगू करून ठेवले होते की घर आणि घर, या शिवाय मला काहीच माहीत नव्हती. मी साधी आहे मला कोणीतरी फसवेल या भीतीने ते मला एकटी कुठेच पाठवत नव्हते. त्याचे परिणाम त्यांची साथ सुटल्यावर भोगावे लागले. माझा खोकला त्यांना त्रास देवू लागला. माझं रात्रीचे अवेळी उठने यांची प्रायव्हसी भंग करू लागला. काही दिवसानी माझी रवानगी किचन मध्ये झाली. हॉलमध्ये झोपले तर माझ्या खोकण्याचा आवाज बेडरूम मध्ये जोरात जात होता. म्हणून मला किचनमध्ये झोपायला सांगण्यात आले.

किचनमध्ये फॅनही नव्हता शिवाय दरवाज्या बंद करून घेतल्यामुळे मला श्वासोच्छ्वास घेणे अवघड जावू लागले. एक दिवस मी कशी बशी झोपले. दुसऱ्या दिवशी मला फारच गुदमरायला झाले. अशातच मी आत धडपडले. स्टँडवरची सगळी भांडी माझ्या डोक्यावर पडली. त्या आवाजाने सागरने दार उघडले आणि निघून गेला. सागर एवढा का निष्ठूर वागत असावा तेच कळत नव्हते…., आणि तो दिवस उजाडला. निष्ठूरतेचा उच्चांक गाठणारा.

त्यादिवशी मला देवदर्शनासाठी म्हणून घेवून जाणारा सागर थोडा वेगळा भासला. खरं तर मला बाहेर पडायचे नव्हते. पण त्याचा आग्रह मला मोडता आला नाही. त्यावेळी पोटचा पोर असा का वागला याचे उत्तर मी आजही शोधते रे. हॉटेलमध्ये जेवण आणायला गेलेला सागर परतलाच नाही. मी मात्र भुकेने व्याकूळ होऊन वाट पाहत बसले. पोटची भूक विरली पण मनाची भूक त्याची वाट पाहत बसली. मुलाने आपल्याला फसवलेय हे समजून घ्यायला मी खूप वेळ घेतला. तरीही माझे एक मन माझी समजूत काढायचे. ज्याच्यामुळेच मी एकटी तग धरू शकले. जेव्हा मनाची पूर्ण समजूत झाली की आपले कोणीच नाहीये तेव्हा डोळ्यातील पाणी थांबायचे नावच घेत नव्हते. मला सोडून गेलेले ठिकाण मुंबई आहे हे कळल्यावर त्याने मला किती दुर केलयं हे समजले. मी गावी परतूही शकले असते. पण तसं नाही केले. जे काही होईल ते इथेच होऊ दे असे समजून दिवस कंठू लागले.”

आईचे शब्दन शब्द माझे काळीज चिरत होते. मी निरूत्तरीत झालो होतो. जणू काही मीच त्या सर्व गोष्टीला कारणीभूत होतो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी त्या घरात परत लग्नाचा विषय काढला नाही. आईने पण त्या दिवसापासून त्या विषयाला पूर्णविराम दिला. मी असा निर्णय का घेतला हे माहीत नव्हते. पण माझ्या निर्णयामुळे आईला त्रास व्हायला नको होता. संतोष , राकेश आणि प्रसाद मला वारंवार लग्नाविषयी विचारणा करायचे. मी मात्र सारवासारव करून वेळ मारून न्यायचो.

आता आम्ही मुंबई उपनगरात राहत होतो. सारं काही सुरळीतपणे चालले होते. एक दिवस माझ्या सोबत एका तरुण मुलीला घराच्या दारात पाहून ती चपापली.

“आई ही , कल्पना. आज पासून आपल्या इथे राहील”

“अरे पण?” ती काय बोलावे या संभ्रमात पडली.

“अग, मी तुला मागे म्हणाला होतो ना, कपिल मामांबद्दल, त्यांची ही मुलगी.”

“??” तिच्या चेहऱ्यावरील अजूनही प्रश्नचिन्ह तसेच होते.

“आई, मला सहा महीन्यासाठी दुबईला जावे लागतेय, मग तू इथे एकटी असणार ना? म्हणून मग मी कपिलमामांना सांगून कल्पनाला तुझ्या सोबतीला पाठवून द्यायला सांगितले.” इतक्यात कपिलमामाच दारात आल्याबरोबर तिची समजूत पटली. तिची कळी लगेच खुलली.

” तू ना, धक्क्यावर धक्के देतोस बघ, आता हे दुबईचे कधी ठरले तुझे?”

” अगं आई कालच, माझे जायचे नक्की नव्हते. तुझ्या सोबतीला कोणी असले तरच जाणार होतो. पण कपिल मामांमुळे माझी परदेशवारी आज निश्चित झाली. मला परवाच निघायचे आहे, अजून खूप तयारी बाकी आहे” मामांना बसायला सांगून मी घराबाहेर पडलो.

ज्या दिवशी मी बाहेरगावी जायला निघणार होतो, त्यादिवशी ती खूपच भावूक झाली होती. मी ही तिला सोडून कधी गेलो नव्हतो. पण काही निर्णय थोडं कठोर होऊन घ्यावे लागतात.

आज तब्बल सहा महीन्यानी मी आईला पाहणार होतो. घराचे जिणे चढताना एक अनामिक हूरहूर मनात दाटली होती. तशी मी अधून मधून आईची ख्यालीखुशाली घेत होतो मी दरवाज्यावरची बेल वाजवली. बराच वेळ कोणीच दरवाजा उघडला नाही. मी परत बेल वाजवली. मला स्तब्धता नकोशी वाटत होती. अखेरीस आईने दरवाजा उघडला. आईला गाढ अलिंगन देऊन मी सोफ्यावर बसलो.

“कशी आहेस आई?” आईचा हात हातात घेऊन मी म्हणालो.

” मी एकदम मस्त, कल्पना बाजारात गेलीये”

” तेव्हाच.” असे मनाशी बोलत मी आईकडे पाहीले. ती माझ्याकडे मिस्कील पणे पाहत होती. खूप खुशीत होती स्वारी. मला काहीतरी तिला सांगायचे होते पण तिला स्वताला आवरत होती.

“आई मी काय म्हणतोय, मी आता आलोय तर कल्पनाला जायला हरकत नाही ना?”

“ए, नाही हा, मी तिला कायम माझ्यासोबत ठेवणार आहे.” मला हे तिचे उत्तर अपेक्षित होते.

” काय पण काय बोलतेस आई ? कायम कशी राहील ती आपल्या जवळ?”

“जावईबापू तुमच्या साखरपुड्याची तयारी झालीय आणि प्रश्न कसले विचारत बसलाय?” कपिल मामा घरात येत म्हणाले. सोबत येणारी कल्पना कमालीची लाजली होती. हे सगळे होणार याची मला कल्पना होती पण एवढ्या झटपट सगळं ठरेल असे मला वाटले नव्हते.

आई हसतच गोड आणायला स्वयंपाक घरात गेली. बाहेर मी, कल्पना आणि कपिलमामा हसायला लागलो. ही सगळी कल्पनाचीच योजना होती. कल्पनाचे स्थळ जेव्हा आले तेव्हाच ती मला पसंद होती. जेव्हा तिचा फोटो आईला दाखवायला घेऊन गेलो, तेव्हा तिने त्यावेळी तो फोटो पाहीला देखील नव्हता. त्याचवेळी तिने आपल्या मनातील सल बोलून दाखवली होती. आम्ही दोघानी एकमेकांना केव्हाच वरले होते पण आईला दुखवून मला काहीच करायचे नव्हते. तिच्या मनातील साशंकता घालवायची होती. तिच्या मनाला बसलेला पीळ सोडवायचा होता. तिला एक आश्वासक धीर द्यायचा होता. पण कसा ? तेच कळत नव्हते. मी आईची करूण कहाणी ऐकून हादरून गेलो होतो. अशीही मुलं असतात ज्यांना आईने नऊ महीने विनातक्रार जपलेले असते आणि जेव्हा जन्मदात्याना जपायची वेळ येते त्यावेळी मात्र सारं काही जाणीवपूर्वक विसरले जाते. म्हातारे आई बाप नकोशे वाटतात. बायको की आईबाप यात गफलत करून बसतात. सागरने पण असचं केले. यात त्याच्या बायकोची चुक असेल अस वाटत नाही. आपणच आपल्या जन्मदात्यांचा मान आपण ठेवला नाही तर ती तरी काय ठेवणार ?

या सगळ्यातून आईला बाहेर काढायचे होते. मग कल्पनाच्या मदतीने आम्ही एक बेत आखला. सहा महीन्याच्या कालावधीसाठी मला त्याच शहरात राहून आईपासून दूर राहणे थोडे जड जाणार होते. पण कल्पनाला आईसमोर आणण्याचा दुसरा मार्ग दिसत नव्हता. या सहा महीन्यात कल्पनाने आईचे मन जिंकले आणि ते होणारच होते. कल्पनाचा स्वभाव कमालीचा गोड होता. तिच्यात परक्यांनाही आपलेसे करण्याची कला होती. आईला माणसांची भीती नव्हती, भीती होती ती फक्त नवीन नात्याची! एका सूनकडून मिळालेले दुखः ती विसरू शकत नव्हती. आई कल्पनाच्या सहवासात छान रमून गेली. हळूहळू कल्पना, आई टाकत असलेला विश्वास सार्थ ठरवत गेली. आईलाही तिच्या स्वभावाची ओळख झाली. ती कल्पनाला आपल्या सूनेच्या ठिकाणी पाहू लागली. अर्थात कल्पनाला बऱ्याच छोट्या मोठ्या परिक्षा द्याव्या लागल्या.

फक्त माझ्या मनात एक खंत मात्र राहणार होती. आईशी खोटं बोलून हे सारं केले होते. माझ्या मनातील घालमेल कल्पनाने ओळखली असावी. तिने माझा हात हातात घेऊन धीर दिला. स्वयंपाक घरातून जिलेबी घेवून येणाऱ्या आईकडे पाहून मी भरून पावलो होतो. तिच्या चेहऱ्यावर एकटेपणाचा किंचितही लवलेश नव्हता. कपिलमामा आमचा हा कौतुक सोहळा दुरूनच पाहत होते. त्याचवेळी आईने, यापुढे कपिलमामाही आपल्यासोबत इथे कायम राहणार असं घोषित केले. कल्पनाच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आईने तिला जवळ घेतले.

“बाळ, एकमेकांच्या मनाचा विचार केला तर.. कोणतेही मन का बरं दुखावेल? तसं पाहायला गेलो तर आपल्यात कोणतेच रक्ताचे नातं नाही, तरीही आपण एकत्र आलो आणि एकमेकांचे झालोच ना?” त्याचवेळी आईच्या डोळ्यातून एक अश्रु गालावरून खाली ओघळला. आईच्या डोळ्यात पाणी पाहून मी चमकलो पण तो आनंदाश्रू होता.. आनंदाश्रू..

समाप्त…

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

लेखक – नितीन राणे.
सातरल – कणकवली
सध्या वास्तव्य – बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८

नितीन राणे :- लेखक, :- संकलक, :- समग्र सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *