श्री नवनाथ भक्तिसार नियम, व प्रारंभिक माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार “ हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला जातो . नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. मालू कवींनी हा ग्रंथ इ.स.१८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण केला. प्रस्तुत ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे.

या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर,प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ. जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथाचा प्रसार केला. त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप,अनन्य गुरुभक्ती,अपूर्व भक्तीभाव, ब्रम्हचर्याचे नैश्ठीक पालन या सद्गुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येवू शकते हि गोष्ट आपणास पटते . 

ज्ञानेश्वरी च्या खालोखाल चिंतन,मनन व पारायण यांसाठी “नवनाथ भक्तिसार”हा ग्रंथ सुपरिचित आहे. “गोरक्ष किमयागार” या अप्राप्य ग्रंथाच्या आधाराने धुंडिसुत मालू यांनी हा अद्भुत ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्दतीने केले जाते. बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात. तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण करतात. या ठिकाणी आम्ही “नवनाथ भक्तिसार” पोथीतील सर्व ४० आध्याय त्यांच्या सुलभ मराठी सारांशा सह देत आहोत

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ दिव्य अश्या चित्रमय कथांनी सजलेला आहे. या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण असे दोन्हीही हेतू साध्य होतात.याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक श्रेष्ठ भक्तांना आला आहे.

पारायण कसे करावे?

श्री नवनाथ भक्तिसार या  ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या  ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या  पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे.

पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेल पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात

पारायणाची पूर्वतयारी

श्री नवनाथ भक्तिसार’ ह्या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे इ. तसेच अष्टगंध, शक्य तर हीना अत्तरच, रांगोळी, नारळ इ. गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी, तसेच नयनमनोहर सुंदर रांगोळी काढावी, समई लावावी. (ही समई म्हणजेच नंदादीप, सातही दिवस अखंड तेवत ठेवावी.) नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतर संध्या करून १०८ वेळा गायत्री जप करावा.

एवढे झाल्यावर श्रीगणेश, श्रीकुलदैवत, आपले सद्‌गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे.

नवनाथ पारायणासाठी सोवळे-ओवळ्याचे फारसे नियम नाहीत. शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते.

असो. या  ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. (रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.

या नंतर उजव्या तळहातावर उदक (पाणी) घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते. त्यामुळे  फलाची प्राप्ती होत नाही.

हा संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-

श्रीमम्नगणाधिपतये नम:।  मातृपितृभ्यो नम:। इष्टदेवताभ्यो नम:। कुलदेवताभ्यो नम:। ग्रामदेवताभ्यो नम:। स्थानदेवताभ्यो नम:। सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम:।  एतत्कर्मप्रधान देवताभ्यो नम: ।ॐ तत्सत् श्रीमद् भगवते महापुरुषस्य विष्णूराज्ञ् या ।प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो  परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियूगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणतीरे शालिवाहन शके… नाम संवत्सरे… अयने… ऋतो… मासे… पक्षे… तिथौ… वासरे… दिवस… नक्षत्रे…. योगे… करणे… राशिस्थिते वर्तमानचंद्रे… राशिस्थिते… श्रीसूर्ये… राशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्तिथौ  मम आत्मन: सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ असमाकं सहकुटुंबानं सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्र्वर्यांभीवृद्यर्थ  समस्ताभ्यूद्यार्थं चं श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथस्य पारायणं करिष्ये तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीनवनाथ पूजनं च करिष्ये । आसनादि कलश, शंख, घंटा, दीपपूजनं च करिष्ये। (असे म्हणून हातातील उदक ताम्हनात सोडावे. नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन, न्यास, कलशपूजा तसेच शंख, घंटा, दीप यांची पूजा करून श्रीनवनाथ पोथीचीही प्रेभावाने भक्तीपूर्वक पूजा करावी व पोथी वाचनास प्रारंभ करावा.

दुसऱ्यासाठी करावाचा संकल्प

काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते. अशावेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणाला करावे लागते. अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न कुणाला पडेल. त्यासाठी पुढीलप्रमाणे संकल्प सोडावा.

‘अमुक गोत्रात्पन्ने, अमुक शर्मणा वृत्तोऽहं (स्त्री असेल तर अमुक नाम्ना वृत्तोऽहं) यजमानस्य (स्त्री असेल तर यजमान्याया) श्रीनवनाथ देवता प्रीतिद्वारा इष्ट कामना सिद्ध्यर्थं श्रीनवनाथ भक्तिसारग्रंथ पारायणं करिष्ये’ इ.

मात्र, संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाहेी करू नये. कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे. अगदी निष्काम भावनेने पारायण करावाचे असेल तेव्हाही ‘श्रीनवनाथ देवता प्रीत्यर्थ’ किंवा ‘श्रीनवनाथ देवता कृपाप्रार्प्त्थं’ असे म्हणावे. दुसरे महत्वाचे सांगावाचे म्हणजे, हे वाचन कधीही मनात करू नये, ते मोठ्यानेच करावे. त्यायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते. बाधा किंवा पीडा दूर पळतात. (फक्त मंत्रजप मनात करावा.)

पारायणकाळात कसे वागावे?

पारायणकाळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे. सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्रीदत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांचच्या लीलांचे स्मरण, चिंतन करावे. या  काळात शक्यतर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे.

रोजचे वाचन झाल्यावर श्रीगणेश, श्रीशिव, श्रीदेवी, श्रीदत्त व श्रीनवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्यात, तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत.

रोज किती अध्याय वाचावेत?

पारायणकाळात रोज किती अध्याय वाचावेत या विषयी मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही.

पहिल्या दिवशी      १ ते ६ अध्याय

दुसऱ्या दिवशी      ७ ते १२ अध्याय

तिसऱ्या दिवशी      १३ ते १८ अध्याय

चौथ्या दिवशी      १९ ते २४ अध्याय

पाचव्या दिवशी      २५ ते ३० अध्याय

सहाव्या दिवशी      ३१ ते ३६ अध्याय

सातव्या दिवशी      ३७ ते ४० अध्याय

रोजच्या वाचनानंतर आरती, प्रसादाबरोबरच शक्यतो देवापुढे धूप जाळावा. धूपामुळे दैवत जागृत राहते. तसेच धूपाच्या सुवासामुळे आपले मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. देवाला हीना अत्तरही लावायला विसरू नये.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *