संख्या ३ तीन Sankhya Shastra Three

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संख्या ३

तीन अवस्था नृत्यकलेच्या-१ लयतालमूलक, २ भावमूलक, आणि ३ रसमूलक. या तिन्ही प्रकारांचा परस्पर सहयोग म्हणजे नाट्य

(नवयुग दि. अंक)

तीन अवस्था (जीवनाच्या)- १ पुत्र, २ पति आणि ३ पिता.

तीन अवस्था (स्त्रीजीवनाच्या)- १ कन्या, २ कांता व ३ माता.

तीन अवस्था (प्रेमाच्या)- १ पूर्वराग (गुण ऐकून अथवा चित्र वगैरे पाहून उत्पन्न होणारें प्रारंभिक प्रेम), २ मीलन आणि ३ वियोग. (कल्याण योगांक ६२)

तीन अवस्था (बाल्यदशेच्या)- १ कौमार (एक ते पांच वर्षे), २ पौगंड (सहा ते दहा वर्षें) आणि ३ कैशोर (दहा ते पंधरा वर्षें) अशा बाल्यदशेच्या तीन अवस्था असतात.

कौमारं पञ्चमाब्दान्तं पौगण्डं दशमावधि ।

कैशोरमापंचदशाद्यौवनं तु तत : परम् ‌‍ ॥ (भाषा. स्कंध १० अ. १२ तळटीप)

तीन अवस्था मानवी जीवनांतील-१ संकल्प २ साधना व ३ सिद्धि.

तीन अवस्था (सृष्टींतील पदार्थोच्या)- १ घनरूप, २ द्ववरूप आणि ३ वायुरूप. यच्चावत् ‌‍ सृष्टींतील सर्व पदार्थांच्या या तीन अवस्था असतात.

तीन अर्थ-१ वाच्यार्थ, २ लक्ष्यार्थ आणि ३ व्यंग्यार्थ असे तीन प्रकारचे अर्थ एकाच शब्दापासून बोधित होतात, असें अलंकारशास्त्रांत मानलें आहे.

तीन अमावास्या-१ आषाढ वद्य अमावास्या (दीपपूजा), २ श्रावण वद्य (पिठोरी) आणि ३ भाद्रपद वद्य : (सर्वपित्री) या तीन अमावास्या विशेष प्रसिद्ध आहेत.

तीन अवतार (वायुदेवतेचे)- १ श्रीहनुमान, २ भीमसेन व ३ पूर्णप्रज्ञ (श्रीमध्वाचार्य.)

प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च ।

पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधक : ॥ (वायुस्तुति-फ्लश्रुति)

तीन अश्रु-१ आनंदाश्रु, २ दु : खाश्रु आणि ३ नक्राश्रु.

तीन अक्षरी मंत्र – (१) श्रीराम, (२). ॐ हा, अ, उ, म् ‌ हीं तीन अक्षरें मिळून झाला आहे. ” ॐ कार । वेदांतासी आधार । हा राज-राजेश्वर । अवघ्या मंत्रविद्येचा ” (शंकराचार्य चरित्र अ ३१-१००). अ (सत्त्व), उ (र्ज), म् ‌‍ (तम), अर्घमात्रा हें शिवाचें स्वरूप. (हें वर्णत्रय म्हणजे या त्रिगुणाचें निदर्शक सक्तिस्वरूप होय. (३) ’ ॐ गम्  ’ हा एक महान् ‌‍ बीज मंत्र. वैदिक कालीं सीमा प्रदेश ओलांडणार्‍या आक्रमकांशीं लढत असतांना याच मंत्राचा उद्‌‍घोष करीत असत. (रोहिणी जून १९६३) (४)” ॐ तत् ‌‍ सत् ‌‍ ” हीं ब्रह्म वाचक तीन अक्षरें आहेत अथवा जगाचे उप्पत्तिस्थान आणि विश्रांतिस्थान, नाम-जति-रहित, आरंमरहित अशा परब्रह्मासच ॐ तत् ‌‍ सत् ‌‍ हें नांव आहे. (प्रसाद ऑगस्ट १९६३)

तीन अक्षरांत तीन गोष्टींचें प्रतिनिधत्व-१ भ-र-त, भ-भाव (भावाविष्कार) २ र-राग (रागाविष्कार) ३ त-ताल (प्रमाणबद्धता)

(नवयुग दि. अंक १९५५)

तीन अलंकार-१ शब्दालंकार, २ अर्थालंकार व ३ उभयालंकार हे मुख्य तीन. यांत वाकीचे सर्व प्रकार येतात. अलंकारांची संख्य़ा ६८ आहे. (म. शब्द कोश)

तीन अवतारांचीं तीन मूल्यें-श्रीराम-सत्य, श्रीकृष्ण-प्रेम व श्रीगौतमबुद्ध-करुणा. (महाराष्ट्रांत विनोवा)

तीन आदर्श (स्त्रियांचे)- १ सती, २ सीता आणि ३ सावित्री.

तीन आदर्श पातिव्रता-१ अनसूया, २ द्रौपदी व ३ दमयंती. अनसूया द्रुपदात्मजा दमयन्ती दुख-लीन । निजसतीत्वके तेजसे चमक उठी ये तीन । (कल्याण-हिंदुसंस्कृति अंक)

तीन आद्य महाकवि-१ ब्रह्मा, २ वाल्मीकि व ३ व्यास.

तीन आधार धर्माचे (वैदिक)- (अ) १ यज्ञ, २ अध्ययन व ३ दान. त्रयो धर्मस्कंधा यज्ञोऽघ्ययनं दानमिति (छं. उप. २-२३-१) (आ) १ श्रुति, २ स्मृति व ३ पुराणें हे तीन आधार धर्मशास्त्रांत मानतात. म्हणून कोणत्याहि कर्माचे आरंमीं ’ श्रुतिस्मृतिपुराणोक्त ” असा संकल्प म्हटला जातो.

तीन आघारस्तंभ शरिराचे-१ आहार, २ निद्रा व ३ ब्रह्नचर्य. या तिन्हींच्या उचित उपयोगावर शरिरांत बल, वर्ण व आयुष्य यांची वृद्धि होते. (चरक. सूत्रस्थान अ. ११).

तीन आनंद (वेदांत)- १ ब्रह्मानंद, २ वासनानंद व ३ विषयानंद. (पंचदशी ११-८७)

तीन आविर्भाव एकमात्र महाजीवनाचे-१ जन्म, २ मृत्यु आणि ३ पुनर्जन्म. (धवलगिरि)

तीन उपदेशपद्भति (वाङमयांत)- (अ) १ वेद-प्रभुसंमित उपदेश-जा. २ पुराणें-मित्रसंमित उपदेश-जायला पाहिजे. ३ दासबोध-कांतासंमित उपदेश-जायचें ना ? (आ) १ प्रभुवाक्य – (स्वत : प्रमाण) २ मित्रवाक्य (परत : प्रमाण) व ३ कांतावाक्य (प्रमाण-अप्रमाणाचा प्रश्न नाहीं.)

तीन उपमाता-१ दाई, २ पालन करणारी मातेशिवाय दुसरी बाई आणि ३ सावत्र आई.

तीन उपाय मोक्ष प्राप्तीचे-१ वैराग्य, २ आत्मज्ञान आणि ३ भाक्ति, (प्रवोधसुधाकर)

तीन एषणा (इच्छा)- (अ) १ पुत्रैषणा, २ वित्तैषणा आणि ३ लोकैषणा. (आ) १ पाणेषणा, धनेषणा व परलोकेषणा या तीन ईषणा सफल करण्याचें मानवी जीवनाचें उद्दिष्ट असतें (चरक सूत्रस्थान) (इ) १ आहारसंज्ञा, २ परिग्रहसंज्ञा व ३ मैथुनसंज्ञा (जैन दर्शन)

(ई) १ भवतृष्णा, २ विभवतृष्णा व ३ कामतृष्णा (बौद्धदर्शन) (उ) १ इज्जत, २ दौलत व ३ हुकुमत (फारशी) (ऊ) १ वाईन २ वेल्थ व ३ वुइमेन (इंग्रजी) (ए) १ आहारेच्छा, २ धनेच्छा व ३ रतीच्छा (देवी भागवत).

तीन ऋतु-१ उन्हाळा. २ पावसाळा व ३ हिंवाळा.

तीन ऋणें – (अ) १ देवऋण, २ ऋषिऋण आणि ३ पितृऋण. मनुष्य जन्मास येतो तो हीं तीन ऋणें घेऊन येतो. तीं यज्ञ, स्वाध्याय व पुत्रोत्पादन इत्यादींनीं फेडावयाचीं असतात. ’ ब्रह्मचर्येण ऋषिभ्यो यज्ञेन देवेभ्य : प्रजया पितृभ्य : ’ (वै. संहिता). चवथें समाजऋण (भक्तिरसायन) (आ) १ मातृऋण, २ पितृऋण व ३ पत्नीऋण – (श्रीरामकृष्ण).

तीन ऐकांतिक भक्तश्रेष्ठ-१ विवस्वत् ‌‍ २ मनु आणि ३ इक्ष्वाकु या तिघांना ऐकांतिक भक्तीचें गुह्म ज्ञान नारायणानें सांगितलें (भ. गी. ४-१)

तीन कार-१. कनक २. कांता आणि ३ कादम्बरी हे तीन क कार प्रभावी आहेत.

तीन ललितकला-१ नर्तन २ गायन, आणि ३ बादन. ’ नृत्यं गीतं च वाद्यं च त्रयं ललितमुच्यते ’ (भ. ना.)

तीन कर्मोनीं पुत्रधर्माची सार्थकता-असेतोंपर्येत मातापित्याचें आज्ञापालन २ कालतिथीस त्यांचे स्मृतीप्रीत्यर्थ अन्नदान व ३ गयेस पिंडदान.

जीवतो वाक्यकरणात् ‌‍ क्षयाहे भूरिभोजनातू ।

गयायां पिण्डदानाच्च त्रिमि : पुत्रस्य पुत्रता ॥

(देवी ६-४-१५)

तीन कारणें कर्म घाडण्याचीं-१ उपादान कारण, २ निमित्तकारण आणि ३ मूलकारण (वेदान्त)

तीन काळ – (अ) १ सकाळ, २ दुपार आणि ३ संध्याकाळ. (कालविभाग); (आ) १ भूतकाळ, २ वर्तमानकाळ आणि ३ भविष्यकाळ.

तीन कायित (शारीरिक) पापें – (अ) १ दिल्याविना एखादी वस्तु घेणें, २ निषिद्ध हिंसा आणि ३ परस्त्रीसंगम हीं तीन शारीरिक पापें होत. (आ) १ हत्या, २ चौर्य व ३ परदारागमन.

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत : ।

परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतम् ‌‍ ॥

(मनु-१२-७)

तीन किरणयुक्त अथवा प्रकाशमान देव-१ अग्नि, २ वायु आणि ३ सूर्य. (अथर्व अनु-मराठी)

तीन क्रिया (प्राणायामाच्या)- १ पूरक-श्वास आंत घेणें, २ कुंभक-श्वास स्थिर करणें व ३ रेचक-श्वास बाहेर सोडणें या तीन क्रियांनीं प्राणायाम पूर्ण होतो.

तीन काळचीं तीन नांवें (गायत्रीचीं)- १ गायत्री, २ सावित्री आणि ६ सरस्वती.

गायत्रीनाम पूर्वाह्ले सावित्री माध्यमे दिने ।

सरस्वती च सायाह्ले एवं सन्ध्या त्रिधा स्मृता ॥

(वेदव्यास श्रुति)

तीन कार-१ गणक, २ गणिका आणि ३ गणिती.

तीन गण-१ देवगण, २ मनुष्यगण आणि ३ राक्षसगण अशा मनुष्याच्या तीन कोटी, प्रकार अथवा गण आहेत. (कुंडली)

तीन गति (द्रव्याच्या)- १ दान, २ भोग आणि ३ नाश. या तीन प्रकारांनीं द्रव्याचा विनियोग होतो.

दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।

(भर्तृ. नीति. ४३)

तीन गति नाडीच्या-१ वक्र, २ त्वरित व ३ स्थिर (नाडीविज्ञान)

तीन गया-१ मातृगया (सिद्धपूर-गुजराथ), २ पितृगया (गया-बिहार) व ३ शिवगया-काशी (काशीखंड)

तीन गुण-१ सत्त्वगुण, २ रजोगुण आणि ३ तमोगुण. ’ सत्त्वं रजस्तमश्चेति प्रसिद्धं हि गुणत्रयम्  ’ (रा. गी. ११-३). जगांत जें जें आहे तें तें सर्व या तीन गुणांनीं व्याप्त आहे. त्रिविधिस्त्रिविध : कृत्स्न : संसार : सार्वभौतिक :

(मनु. १२-५१)

तीन गुण – (काव्याचे)- १ उपमा, २ अर्थगौरव आणि ३ पदलालित्य. असा तीनहि गुणसंपन्न संस्कृतवाङ्‌मयांत माघ कवि होऊन गेला. ” उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ‌‍ दण्डिन : पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा : ” (सु.)

तीन गुण (वाङ् ‍ मयांतले)- १ माधुर्य, २ ओज व ३ प्रसाद.

तीन गुण मायेचे-१ उत्पत्ति २ पालन आणि ३ संहार. मायाके गुण तीन है । उत्पत्ति पालन संहार ॥ (कबीर),

तीन गुण स्त्रीचें मूल्य वाढविणारे-१ रूप ; २ शील आणि ३ स्वभाव. (योगीश्वर याज्ञवल्वय)

संख्या ३

तीन गुण (शास्त्र जाणणारास आवश्यक)- १ ग्रंथाचें संपूर्ण ज्ञान, २ तात्पर्याचें निरूपण करतां येणें व ३ ग्रंथाच्या भागांसंबंधीं विवेचन करतां येणें.

ग्रंथार्थस्य परिज्ञानं तात्पर्यार्थनिरूपणम् ‌‍ ।

आद्यन्तमघ्यव्याख्यानशक्ति : शास्त्रविदो गुणा : ॥

(सं. समयसार ८-२७)

तीन गुरु – (अ) १ जन्मदाता, २ विद्यागुरु व ३ मोक्षगुरु. (आ) १ पिता, २ माता व ३ आचार्य.

पुरुषस्येह जातस्य भवन्ति गुरव : सदा ।

आचार्यश्रैव काकुत्स्थ पिता माता च राघव ॥

(वा. रा. अयोघ्या १११-२)

तीन गोष्टी (अतींद्रिय ज्ञान्यासहि कळणें कठीण)- १ आयुष्य, २ वय आणि ३ गर्भिणीचें लक्षण.

आयुर्ज्ञानं वयोज्ञानं गर्मिणीनां च लक्षणम् ‌‍ ।

ऋषयश्चापि मुह्मन्ति किं पुंनर्मोसचक्षुषः ॥

(गौ. धर्मसूत्रें. अ. ९)

तीन गोष्टी अविश्वासार्ह-सर्पाची मिठी, २ विषप्राशन व ३ शत्रूवर विश्वास ठेवणें. (शिवाभारत अ. १३).

तीन गोष्टी (आयुष्यांत उपकारक पण तितक्याच कठीण)- १ दारिद्र्यांत औदार्य, २ एकान्तांत इंद्रियनिग्रह व ३ संकटसमय़ीं सत्य.

तीन गोष्टी (एकेकदां होतात)- (अ) १ मोठीं माणसें एकदांच बोलतात, २ विद्वान ‌‍ एकदांच बोलतात आणि ३ कन्यादान. (आ) १ वडिलार्जित मालमत्तेची वांटणी, २ कन्यादान आणि ३ वचन.

सकृजल्पन्ति राजानः सकृजल्पन्ति पण्डिताः ।

सकृत्प्रदीयते कन्या त्रीण्येतानि सकृत ‌‍ सकृत ‌‍ ॥

(स्कंद वट्सावित्री-कथा)

तीन गोष्टी (कालाधीन)- १ विवाह, २ जन्म आणि ३ मरण. या तीन गोष्टी कालाधीन म्हणजे जेथें व ज्याच्याशीं होणें असतील त्या ठिकाणीं अवश्य होतील.

त्रयः कालकृताः पाशा शक्यन्ते न निवर्तितुम् ‌‍ ।

विवाहो जन्म मरणं यथा यत्र च येन च ॥

(पद्म.- भूमि ८१-३४)

तीन गोष्टींत कुतूहल वाटणारा स्त्रीस्वभाव-१, जन्म, २ मरण आणि ३ विवाह (श्रीसरस्वती दीपावली १९६२)

तीन गोष्टी (केवळ नामघारी होत)- १ धान्य नसलेला गांव, २ पाणी नसलेली विहीर आणि ३ अध्ययन न केलेला ब्राह्नण.

धान्यशून्यो यथा ग्रामो यथा कूपश्च निर्जलः ।

ब्राह्मणश्वाधीयानस्त्रयस्ते नामघारकाः ॥ (सु.)

तीन गोष्टी (क्लेशदायक)- १ बालपणीं मातृवियोग, २ तरुणपणीं भार्यावियोग आणि ३ म्हातारपणीं पुत्रशोक.

तीन गोष्टी तिरस्कारार्ह-१ दुर्जन, २ परस्त्री व ३ परधन. (प्रश्नोत्तर रत्नमालिका)

तीन गोष्टी (दावून ठेवतां येत नाहींत)- १ प्रेम, २ खोकला आणि ३ स्फूर्ति.

तीन गोष्टी (दुरूनच चांगल्या)- १ डोंगर, २ वेश्येचें मुखकमल आणि ३ युद्धवार्ता.

दूरस्थाः पर्वता रम्या वेश्या च मुकमंडने ।

युद्धस्त वार्ता रम्या च त्रीणि रम्याणि दूरतः ॥ (सु.)

तीन गोष्टी (दुर्लभ)- (अ) १ विषयत्याग, २ तत्त्वदर्शन व ३ अपरोक्ष साक्षात्कार. (आ) १ मनुष्यत्व, २ मुमुक्षुत्व आणि ३ सत्पुरुष-सहवास.

दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् ‌‍ ।

मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय : ॥ (विवेकचूडामणि)

तीन गोष्टी (देतां येत नाहींत)- १ पुरुषानें आपली अब्रू, २ स्त्रीनें आपलें पातिव्रत्य आणि ३ राष्ट्रानें आपलें स्वातंत्र्य. या तीन गोष्टी कोणी कितीहि उपकार केला म्हणून कृतज्ञतेचें मोल म्हणून देतां यावयाच्या नाहींत. (डॅनिअल ओकोनेल)

तीन गोष्टी (दुःख परिहार करणार्‍या)- १ सुभाषितरसास्वाद, २ प्रौढपत्नी-समागम व ३ विवेकी अधिकार्‍याची सेवा.

सुभाषितरसास्वादः प्रौढस्त्रीसंगमस्तथा ।

सेवा विवेकिनो राज्ञो दुःखनिर्मूलनं त्रयम् ‌‍ ॥ (सु.)

तीन गोष्टी (दैवाधीन)- १ अन्न, २ मान, ३ धन. अन्न मान धन । हे तों प्रारब्ध-आधीन ॥ (तुकाराम)

तीन गोष्टी (निरर्थक होत)- १ किमयेनें द्रव्यप्राप्ति, २ शाक्त मार्गानें मोक्ष व ३ जावयाचे ठिकाणीं पुत्रत्वबुद्धि –

धातुदाहेन वित्ताशा मोक्षाशा कौलिके मते

जामातरि च पुत्राशा त्रयमेतन्निरर्थकम् ‌‍ ॥ (सु.)

तीन गोष्टी (परत येत नाहींत)- १ सुटलेला बाण, २ बोललेला शब्द आणि ३ गेलेली अब्रू वा सत्कर्म करण्याची संघि.

तीन गोष्टी पहाटे उठणारास प्राप्त होतात-१ आरोग्य, २ लक्ष्मी आणि ३ शहाणपणा,

तीन गोष्टी (पुरुषांचें विडंबन करणार्‍या)- (अ) १ अर्धवट ज्ञान, २ द्रव्यसंपादित मैथुन आणि ३ पराधीन भोजन. (आ) १ वृद्धपर्णी भार्यावियोग. २ बंधुवर्गाचे हातीं संपत्ति जाणें व ३ परस्वाधीन भोजन.

खण्डे खण्डे च पाण्डित्य क्रयक्रीतं च मैथुनम् ‌‍ ।

भोजनं च पराधीनं तिस्त्रःपुंसोर्विड्म्बनम् ‌‍ ॥ (सु.)

तीन गोष्टींचा प्रभाव (अतर्क्य असतो)- १ रत्नें, २ मंत्र व ३ औषधी.

” अचिंत्यो हि मणिमंत्रौषधीनां प्रभावः ” (वाणकवि)

तीन गोष्टींनी प्रापंचिकांस सुख होतें-१ सुंदर अपत्य, २ हसत-मुखी सुंदर स्त्री व २ सज्जनसंगति. (बृद्ध चाणक्य ४-१०)

तीन गोष्टींमुळें मनुष्य गुरफटला जातो-१ लोभ, २ बेसावधपणा आणि ३ विश्वास.

लोभात्प्रमादाद्विश्रम्भात् ‌‍ पुरुषो बध्यते त्रिभिः ।

तत्माल्लोभो न कर्तव्यो न प्रमादो न विश्वसेत ‌‍ ॥ (स्कंद-नागर. ५१-२५)

तीन गोष्टी यावज्जीव वंदनीय-१ वेदान्त, २ श्रीगुरु आणि ३ ईश्वर.

यावज्जीवं त्रयो वन्द्या वेदान्तो गुरुरीश्वरः ।

आदौ ज्ञानाप्तये पश्चात् ‌‍ कृतनत्वापनुत्तये ॥ (भ. प्रदीप)

तीन गोष्टी प्रकट करूं नयेत-१ चित्त, २ वित्त आणि ३ मैथुन (स्मृतिशेष)

तीन गोष्टी लहरी असतात-१ निद्रा, २ प्रिया आणि ३ कला (मंझधार)

तीन गोष्टी वर्ज्य (स्नेह टिकविण्यास)- १ वाद, २ देवघेव आणि ३ पतीचे अपरोक्ष त्याच्या स्त्रीशीं संभाषण.

वाग्वादमर्थसंबंध तत्पत्नीपरिभाषणम् ‌‍ ।

यदीच्छेद् ‌‍ विपुलां मैत्रीं त्रीणि तत्र न कारयेत् ‌‍ ॥ (गरुड ११४-५)

तीन गोष्टी वेदानेंच जाणावयाच्या-१ परमेश्वर, २ परलोक व ३ पुनर्जन्म. या तीन गोष्टी केवळ वेदानेंच जाणल्या जातात.

तीन गोष्टी श्राद्धकालीं पवित्र आणि तीन गोष्टी वर्ज्य-१ कन्यापुत्र, २ दर्भ आणि ३ तीळ. हे तीन पवित्र आणि १ कोप, २ प्रयाण व ३ त्वरा (घाई) या तीन गोष्टी श्राद्धसमयीं वर्ज्य सांगितल्या आहेत.

त्रीणि श्राद्धे पवित्राणि दौहित्रं कुतपास्तिलाः ।

वर्ज्यानि चाहुर्विप्रेन्द्रैः कोपोऽध्वगमनं त्वरा ॥ (मार्केडेय ३१-६४)

तीन गोष्टींमुळें रोगाचा उद्भव होत नाहीं-१ भोजनानंतर ताक पिणें, २ रात्रीं दूध घेणें व ३ उषःपान.

भोजनान्ते पिवेत्तकं वासरान्ते पिवेत्पयः ।

निशान्ते च पिबेद्वारि त्रिमी रोगी न जायते ॥ (सु.)

तीन गोष्टी स्त्रीधर्मास आवश्यक-१ पतिभक्ति, २ अदुष्टत्व आणि ३ अवाग्दुष्टत्व (हरिवंश अ ८०)

तीन गोष्टींत संतोष असावा-१ स्वपत्नी, २ भोजन आणि ३ धन. ” संतोषस्त्रिषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने ” (वृ. चा. ७-६)

तीन गोष्टींत संतोष असूं नये-१ ज्ञानसाधना, २ उपासना व ३ दान. ” त्रिषु चैव न कर्तव्योऽघ्ययने तपदाययोः ” (वृ. चा. ७-४)

तीन गोष्टींना स्वतंत्र अस्तित्व नसतें-१ व्यापारावांचून वैभव नाहीं, २ वादाशिवाय विद्वत्ता नाहीं आणि ३ सत्तेशिवाय राज्य नाहीं. (शेखसादी)

तीन गोष्टी तिघांत स्वभावसिद्ध असतात-१ कमलाचा लाल वर्ण, २ सत्पुरुषाचें परोपकारित्व आणि ३ दुष्टाचें निर्दयत्व.

रक्तत्वं कमलानां सत्पुरुषाणां परोपकारित्वम् ‌‍ ।

असतां निर्दयत्वं स्वभावसिद्धस्त्रिषु त्रितयम् ‌‍ ॥) (भर्तृ. नीति १२५)

तीन गोष्टी क्षणभंगुर-१ यौवन, २ धन आणि ३ जीवित. ” यौवनं धनमायुष्यं पद्मिनीजलबिन्दुवत् ‌‍ ” (स्कंद-काशी ८२-४३)

तीन ग्रंथि (मानवी शरिरांतल्या)- १ रुद्रग्रंथि-मूलाधार चक्राजवळ, २ विष्णुग्रंथि-मणिपूर चक्रजवळ म्हणजे नाभीजवळ व ३ ब्रह्म-ग्रंथि-अनाहत चक्राजवळ म्हणजे ह्र्दयस्थानीं. या तीन ग्रंथि अथवा शक्ति मानव शरीरांत असतात. (अक्कलकोट स्वामी चरित्र आंणि कार्य)

तीन ग्राम (गायनशास्त्र)- षडज्, २ मध्यम आणि ३ गांधार. सप्तस्वरांच्या समुदायास ग्राम म्हणतात. यांचीं उत्पत्तिस्थानें अनुक्रमें भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्ग अथवा मेघलोक हीं आहेत. (कल्याण-नारद-विष्णु-पुराणांक)

तीन घटक ग्रंथालयाचे-१ ग्रंथ, २ ग्रंथपाल व ३ वाचक. (ग्रंथालय-शास्त्राचीं पांच सूत्रें)

तीन चांडाळ-१ मद्यपि, २ जुगारी आणि ३ वेश्यागामी. हे तीन सामाजिक जीवनांतले चांडाळ होत.

तीन जीवनम्‌ल्यें-१ सत्यं, २ शिवं आणि ३ सुंदरम् ‌‍

तीन ठिकाणीं गंगास्नान दुर्लभ-१ गंगाद्वार, २ प्रयाग आणि ३ गंगासागर.

सर्वत्र सुलभा गङ्रा त्रिषु स्थानेपु दुर्लभा ।

गङ्राद्वारे प्रयागे च गङ्रासागरसंगमें ॥ (पद्म. क्रिया ३-१४)

तीन ढोंगीपणाचीं लक्षणें-१ खोटें वेलणें, २ दिलेलें वचन न पाळणें व ३ विश्वास ठेवणारांशीं बेइमान होणें. (इरलाम आणि नीतिशास्त्र)

तीन तत्त्वें सृष्टींत असलेलीं-१ चित् ‍ २ अचित् ‍ आणि ३ ईश्वर (श्रीरामानुजदर्शन)

तीन तंटयाचीं कारणें-१ कनक, २ कांता आणि ३ कृषि. हीं तीन प्रायः तंटयाचीं मूळ कारणें असतात.

तीन दानें-१ विद्यादान, २ धनदान आणि ३ कन्यादान. हीं तीन प्रकारचीं दानें.

तीन दुःखें (जीवनांतील)- १ जरा (म्हातारपण), २ व्याधि (आजार) आंणि ३ मरण.

तीन देवता – (अ) १ ब्रह्मा, २ विष्णु आणि ३ महेश ; (आ) १ आग्नि, २ वायु आणि ३ सूर्य ; (इ) १ महाकाली, २ महालक्ष्मी आणि ३ महासरस्वती ; (ई) १ सत्ता, २ संपत्ति आणि ३ सरस्वती ; (उ) १ मातृभूमि, २ मातृभाषा आणि ३ मातृसंस्कृति. (ऋग्वेद ७-२-८)

तीन दोष अंत : करणाच्या ठायीं असणारे-१ मल, २ विक्षेप आणि ३ सुह्रदांचा अविश्वास.

परस्वानां च हरणं परदाराभिमर्षणम् ‌‍ ।

सुहृदामतिशाङ्का च त्रयो दोषाः क्षयावहाः ॥ (वा. रा. युद्ध. ८७-२३)

परद्रव्याचें ज्यासी हरण । परदाराभिलाषण । सुह्लदांचा द्वेषपूर्ण । तेथें मरण सहजचि. ॥ (भा. रा. युद्ध. ३८-५९)

तीन दंड – (अ) १ राजदंड, २ नैसर्गिक दंड आणि ३ दैवी दंड ; (आ) १ समाजदंड, २ राजदंड आणि ३ यमदंड ; (इ) १ वाग्दंड (मौन), २ मनोदंड (आशाहीन मन) व ३ देहदंड (स्वधर्माचरण). योग हा मनोदंड । मौन होय वाग्दंड । निरिच्छता देहदंड । हें अखंड असावें ॥ (द. माहात्म्य अ. ३५)

” वाग्दंडः कर्मदंडश्च मनोदंडश्च ते त्रय : ” (सु.)

तीन द्वारें आत्मशक्तीचा नाश करणारीं-१ काम, २ क्रोध आणि ३ लोभ (भ. गी. १६-२१)

तीन द्दष्टि-१ चाक्षुषी द्दष्टि, २ विचारी द्दष्टि आणि ३ अनुभव द्दष्टी कोणत्याहि पदार्थाकडे पहाण्याच्या अशा तीन द्दष्टि असतात. (अमृतानुभव अमृतवाहिनी टीका)

तीन धर्मलक्षणें-१ वेदविहित धर्म, २ धर्मशास्त्रांतर्गत स्मार्त धर्म व ३ शिष्टांचा आचार. विधात्यानें सृष्टीच्या सर्गसमय़ीं असे तीन धर्म निर्मिले ; व ते सनातन आहेत.

वेदोक्तः प्रथमो धर्मः स्मृतिशास्त्रांतर्गतोऽपरः ।

शिष्टाचीर्णोऽपरः प्रोक्तस्त्रयो धर्माःसनातनाः ॥ (म. भा. अनु १४१-६५)

वेदोक्ताः परमो धर्मो धर्मशास्त्रेषु चापरः ।

शिष्टाचारश्च शिष्टानां त्रिविधं धर्मलक्षणम् ‌‍ ॥ (म. भा. वन. २०७-८४)

तीन नयन (श्री शिवाचे) – (अ) १ कृशानु (अग्नि) २ भानु (सूर्य) व ३ हिमकर (चंद्र) म्हणून त्रिनयन हें एक शिवाचें नांव आहे. (आ) १ श्वेतभानु-सोम, ३ बृद्धभानु-अग्नि आणि ३ भानु-सूर्य हे शिवाचे-महादेवाचे तीन नेत्र होत. (स्तुतिकुसुमांजलि)

तीन धूर्तलक्षणें-१ मुख-कमलाप्रमाणें, २ वाणी-चंदनाप्रमाणें शीतल आणि ३ पोटांत राग हीं धूर्तांची तीन लक्षणें होत.

मुखं पद्मदलाकारं वाणी चंदनशीतला ।

ह्रदयं क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ‌‍ ॥ (सु.)

तीन नाडीसंस्था मानवी शरिरांतल्या-१ रक्तवश, २ वातवश आणि ३ मनोवश (स्वर्गदर्शन)

तीन नाडया – (अ) १ इडा, पिंगला व ३ सुषुग्ना (योगशास्त्र); (आ) १ वात, २ पित्त आणि ३ कफ (वैद्यक); (इ) १ आद्य, २ मध्य व ३ अन्त्य (ज्योतिष).

तीन नाशहेतु (दानाचे)- १ दिल्यानंतर वाईट वाटणें, २ अपात्रीं दान देणें आणि ३ देतांना श्रद्धा नसणें, हे तीन दानाचे नाशहेतु म्हणून सांगितले आहेत.

यद्दत्वा तप्यते पश्चादपात्रेभ्यस्तथा च यत् ‌‍ ।

अश्रद्भया च यद्दानं दाननाशास्त्रयस्त्वमी ॥

तीन नीतिशास्त्रप्रवर्तक-१ शुक्र, २ विदुर आणि ३ चाणक्य. हे तीन जगांतले आद्यनीतिशास्त्रप्रवक्ते होत.

नीतितत्त्वप्रवक्तारस्त्रयः सन्ति धरातले ।

शुक्रश्च विदुरश्चायं चाणक्यस्तु तृतीयकः ॥

तीन परिणाम-१ निरोध परिणाम, २ समाधि परिणाम व ३ एकाग्रता परिणाम. या तिन्ही परिणामांत संयम् ‌‍ केल्यानें भूत व भविष्य-काळाच्या गोष्टींचें ज्ञान होतें. परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम् ‌‍ ।

तीन पायर्‍या ज्ञानविकासाच्या-१ धार्मिक, २ आध्यात्मिक आणि ३ शास्त्रीय

तीन पिते-१ परमात्मा २ गुरु आणि ३ जनकपिता

तीन पीठें – (अ) १ व्यासपीठ, २ पूजापीठ आणि ३ दीपपीठ ; (आ) १ वाक्‌‍पीठ, २ व्यासपीठ आणि ३ मुद्रापीठ. Press हीं तीन पीठें आधुनिक प्रचारतंत्रांत प्रभावी आहेत.

तीन पुरुष जगांत दुर्लभ-१ जननिंदेला पात्र न झालेला श्रीमान् ‌‍, २ स्वतःची प्रौढी न सांगणारा शूर आणि ३ सर्वत्र समद्दष्टि असणारा राजा अथवा शासनाधिकारी.

श्रीमानजननिंद्यश्च शूरश्चाप्यविकत्थन : ।

समद्दष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः ॥

तीन पुराणकालीन महाक्रोधी-१ दुर्बास, २ जमदग्नि आणि २ विश्वामित्र. हे प्राचीन कालचे महाक्रोधी म्हणून प्रसिद्ध आहेत.

तीन पुराणकालीन लोभी आणि महत्त्वाकांक्षी-१ कंस २ जरा-संध आणि ३ दुयोंधन

तीन पुराणकालीन मामा-१ कंसमामा, २ जांगीळमामा (घटोत्कचाचा कारभारी) व ३ शकुनिमामा. हे तीन कपटनीतिनिपुण मामा होत.

तीन पुरुष-१ प्रथम पुरुष-मी, २ द्वितीय पुरुष-तूं व ३ तृतीय पुरुष-तो.

तीन पुरुष-१ विश्वव्यापी विराट् ‌‍ पुरूष, २ पृथ्वीवरील सर्व मानव-समाजरूपी राष्ट्र्पुरुष, आणि ३ मानव व्यक्तिरूप-व्यक्ति पुरुष. पुरुषसूक्तांत पहिल्या दोन पुरुषाचें वर्णन आहे. तिसर्‍या पुरुषाचा संकेत आहे.

तीन प्रकारचे अर्थ (शब्दांचे)- १ वाच्यार्थ, २ लक्ष्यार्थ आणि ३ व्यंग्यार्थ.

तीन प्रकार अवताराचे-१ आवेश अवतार-नरसिंह, २ अंश अवतार-श्रीरामचंद्र आणि ३ पूर्ण अवतार-श्रीकृष्ण.

तीन प्रकारचीं आकाशें-१ चिदाकाश, २ चित्ताकाश आणि ३ भूताकाश

तीन प्रकार आगम ग्रंथाचे-१ वैष्णवागम (पांचरात्र), २ शैवागम आणि ३ शाक्तागम.

तीन प्रकार आहाराचे-१ सात्त्विक-नित्याचा साधा आहार, २ राजस-उंची पक्वान्नें वगैरे व ३ तामस-तळकट वगैरे.

तीन प्रकारचे उत्पात-१ दिव्या-उत्कापात, २ अंतरिक्ष-धूमकेतु इ. आणि ३ पार्थिव-भूकंप

तीन प्रकारच्या उपासना-१ ब्रह्मोपासना, २ मंत्रोपासना आणि ३ प्रतिमोपासना.

तीन प्रकारच्या ओढी-१ विषयी माणसाची विषयांसंबंधीची, २ मातेची मुलांसाठीं असलेली व ३ सतीची पतीविषयीं असलेली. या तीन प्रकारच्या ओढींच्या शक्ति एकत्रित झाल्यास भगवद्‌‍दर्शन होतें.

तीन प्रकारचे ऋषि-१ ब्रह्मर्षि, २ देवर्षि आणि ३ राजर्षि.

तीन प्रकारचे कवि-१ धीट, २ धीटपाठ आणि ३ प्रासादिक.

तीन प्रकारचीं कर्मे-१ संचित, २ क्रियमाण आणि प्रारब्ध.

तीन प्रकार कर्मफलाचे-१ इष्ट, २ अनिष्ट आणि ३ संमिश्र. ” अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ‌‍ ”

तीन प्रकारचे किरण सूर्याचे-१ ताप देणारे ३ प्रकाश देणारे व ३ आरोग्य देणारे.

किरणास्त्रिविधाः सूर्यें तापाऽरोग्यप्रकाशदाः ।

हरन्ति स्वप्रभावेण दैन्यं तापं च पातकम् ‌‍ ॥

तीन प्रकार कीर्तनभक्तीचे-१ गुणसंकीर्तन, २ लीलासंकीर्तन आणि ३ नामसंकीर्तन.

तीन प्रकारची कृपा-१ गुरुकृपा, २ शास्त्रकृपा व ३ आत्मकृपा

तीन प्रकार खडकाचे-१ स्तरित, २ अग्निजन्य व ३ रूपांतरित.

तीन गति पृथ्वीला-१ परिवलन-स्वतःभोवतीं फिरणें २ परिभ्रमण-सूर्याभोवतीं फिरणें व ३ सहचलन-सूर्य जात आहे त्या दिशेनें जावें लागणें.

तीन प्रकार गाथांचे-१ भक्तिपर, २ उपदेशपर आणि ३ अनुभवपर.

तीन प्रकारचे गुरु – (अ) १ उपदेशगुरु, २ कुलगुरु आणि ३ जगद्‌गुरु. (आ) १ लौकिक ज्ञान देणारे, २ वैदिक ज्ञान देणारे आणि ३ आध्यात्मिक ज्ञान देणारे. (इ) १ दिव्य, २ सिद्ध आणि ३ मानव

तीन प्रकार ग्रहणाचे-१ खंडग्रहण २ कंकणग्रहण आणि ३ खग्रास ग्रहण.

तीन प्रकार (चित्रांचे)- १ शिल्पचित्र, २ अर्धशिल्प व ३ चित्राभास

तीन प्रकार जपाचे-१ आध्यात्मिक-वेड लागणें, खरूज इ. २ आधिभौतिक-धरणीकंप, अग्निपीडा इ. व ३ आधिदैविक-विद्युत्पतन, अतिवृष्ट-अनावृष्टि इ.

तीन प्रकार दांनाचे-१ अभयदान, २ उपकारदान व ३ द्रव्यदान.

तीन प्रकारच्या दीक्षा (वीरशैव संप्रदाय)- १ वेधादीक्षा, २ क्रियादीक्षा आणि ३ मंत्रदीक्षा.

सा दीक्षा त्रिविधा प्रोक्ता शिवागमविशारदैः ।

वेधारूपा क्रियारूपा मंत्ररूपा च तापस ॥

तीन प्रकार दीक्षेचे-१ ईक्षण (द्दष्टिविक्षेप) २ भाषण (शब्दानें) व ३ स्पर्शन-देहास स्पर्श करून. (साधुसंतांचा देवयानपंथ)

तीन प्रकारचे दूत-२ स्वतंत्रपणें कार्य साधणारा, २ सांगितले तेवढेंच करणार आणि ३ नुसता निरोप पोहोंचविणारा.

तीन प्रकारचीं दुःखें-१ परिणाम-दुःख, २ ताप-दुःख व ३ संस्कार-दुःख

तीन प्रकारचे दोष भोजानांत टाळावेत-१ जातिदोष (पदार्थाचा स्वाभाविक दर्प वगैरे), २ आश्रयदोष (पदार्थ शुद्ध असला तरी अपवित्र स्थानीं ठेविल्यामुळें) आणि ३ निमित्तदोष (कुत्रें वगैरेच्या स्पर्शामुळें).

तीन प्रकारची दृष्टि-१ सूक्ष्मद्दष्टि, २ विज्ञानद्दष्टि व ७ दिव्यद्दष्टि.

तीन प्रकारचे धर्म-१ संन्याश्याचा यतिधर्म २ कर्मयोग्याचें निष्काम कर्म व ३ एकान्त धर्म

तीन प्रकारचा ध्वनि-१ अलंकारध्वनि, २ वस्तुध्वनि व ३ रसध्वनि (साहित्यशास्त्र) (हिंदी संत वाङ् ‍ मयाचा परमार्थ मार्ग)

तीन प्रकारचे नास्तिक-१ क्रियादुष्ट (कर्म न करणारे), २ मनोदुष्ट (मनानेंच विघडलेले) आणि ३ वाग्दुष्ट (वाणीनें दोष देणारे).

नास्तिकास्त्रिविधाः प्रोक्ता धर्मज्ञैस्तत्त्वदर्शिभिः ।

क्रियादुष्टो मनोदुष्टो वाणीदुष्टस्तथैव च ॥

तीन प्रकार नाशाचे (अध्यात्मशास्त्र)- १ स्वभावनाश, २ परतः नाश आणि ३ आश्रयनाश. या तिन्हीहि प्रकारचा नाश आत्माचे ठिकाणीं नाहीं म्हणून तो अविनाशी आहे.

तीन प्रकार कावळ्यांचे-१ साधा कावळा, २ डोम कावळा आणि ३ पाण कावळा.

तीन प्रकारचीं पापें-१ कायिक, २ वाचिक आणि ३ मानसिक

तीन प्रकार पारायणाचे-१ योजित, २ पल्लवित व ३ संपुटित

तीन प्रकारच्या पीडा-१ स्वस्थ बसल्यावेळीं याचकांपासून होणारी कटकट, २ भोजनसमयीं मुलांचा त्रास व ३ निद्राकाळीं स्त्रीहट्ट. या तीन प्रकारच्या पीडा नित्याच्या असतात व त्या तशा मोठया माणसांना असाव्यात असा आशीर्वाद दिल्याची कथा आहे.

आसने विप्रपीडा च सुतपीडा च भोजने ।

शयने स्त्रीपीडा च त्रिभिः पीडा दिने दिने ॥

तीन प्रकार प्रतिज्ञेचे-१ द्वेषमूलक प्रतिज्ञा-सूडबुद्धि, स्वार्थमूलक प्रतिज्ञा व ३ परार्थमूलक्र प्रतिज्ञा-परार्थहितबुद्धीनें केलेलीं

तीन प्रकारची प्रकृति मनुष्याची-१ दैवी, २ आसुरी आणि ३ राक्षसी. ” दैव्यासुरी राक्षसी च ”

तीन प्रकार प्रारब्धाचे-१ इच्छा प्रारब्ध, २ अनिच्छा प्रारब्ध व ३ परेच्छा प्रारब्ध.

तीन प्रकारचीं बेटें-१ उपखंड बेटें-मुख्य भूमि लगतचीं, २ सामुद्रिक बेटें व ३ प्रवाळ द्वीपें

तीन प्रकारर्ची भूतसृष्टि-१ असंज्ञ-पाषाण वगैरे २ अंतःसंज्ञ-वृक्ष इ. आणि ३ ससंज्ञ-पुरुष पशु इ.

तीन प्रकार मानवाचे-१ ज्ञानी मानव, २ भक्त-मानव आणि ३ कर्मनिष्ट मानव.

तीन प्रकार मानवी अनुभूतीचे-१ भावना २ विचार आणि ३ आचार

तीन प्रकार माणसांचे-१ वीर माणूस-दुर्दम्य महत्त्वाकांक्षी, २ पशुमाणूस-कोणतीहि मह्त्त्वाकांक्षा नसलेला आणि ३ दिव्या

(शाक्ततंत्र)

तीन प्रकार मंगलाचरणाचे-१ वस्तुनिर्देशरूप, २ आशीर्वादरूप आणि ३ नमस्काररूप (अमृतानभव-कौमुदी)

तीन प्रकार मृत्यूचे-१ आध्यात्मिक (कालमृत्यु), २ आधिभौतिक (कुपथ्यामुळें होणारे) आणि ३ आधिदैविक (गंडांतर वगैरे स्वरूपाचे) या तिघां माजी बलिष्ठदेख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥ (ग. वि. ३-८५)

तीन प्रकार मंत्रांचे-१ बीजमंत्र, २ मूलमंत्र व ३ मालामंत्र (मंत्रशास्त्र)

तीन प्रकारची यात्रा-गुरुयात्रा, २ देवयात्रा व ३ तीर्थयात्रा. ’ गुरुयात्रा देवयात्रा तीर्थयात्रेति च त्रिधा ’ (वी. प्र. १०-३७)

तीन प्रकार रोगांचे-१ तीव्र-नवज्वर, ग्रंथिक सन्निपात. इ. २ सौम्यपडसें, खोकला इ. व ३ विलंबी-क्षय मधुमेह इ.

तीन प्रकारचे लोक-१ हौसे २ नौसे आणि ३ गौसे असे तीन प्रकार जगांत असतात.

तीन प्रकारचे वाद-१ वाद (गुरुशिष्यसंवाद), २ जल्प (युक्तिप्रमाण कुशल पंडितांचा वाद) व ३वितंडा (मूर्खांचा प्रमाणरहित वाद).

(मो, प्रदीप)

तीन प्रकार वेदवाणीचे-१ यथार्थ, २ भयानक आणि ३ पुष्पित. (एकनाथ दर्शन खंड २ रा)

तीन प्रकार विधींचे-१ अपूर्वविधि २ नियमविधि आणि ३ परिसंख्याविधि.

तीन प्रकार विवाहाचे-१ स्त्रीविवाह, २ आर्किविवाह आणि ३ कुंभविवाह. (दु. श. को.)

तीन प्रकारचीं विषें-१ स्थावर विष, २ जंग्म विष आणि ३ कृत्रिम विष. (निघंटु)

तीन प्रकारचें वैराग्य-१ पुराणवैराग्य, २ प्रसूतिवैराग्य आणि ३ स्मशानवैराग्य.

तीन प्रकारांनीं शहाणपण प्राप्त होतें-१ शास्त्राचा अभ्यास केल्यानें, २ संप्रदायांत वावरल्यानें व ३ निरीक्षणानें.

तीन प्रकार शास्त्रग्रंथाचे-१ आकर ग्रंथ, २ प्रकरणग्रंथ व ३ वाद ग्रंथ. (लक्षण रत्नाकर)

तीन प्रकार (शिवयोगींचे)- २ क्रियायोगी, २ तपोयोगी आणि ३ जपयोगी. (कल्याण विशेषांक १९६२)

तीन प्रकारची शुद्धि-१ अंतःशुद्धि, २ बहिःशुद्धि आणि ३ संबंधितशुद्धि-संबंधित दोषांपासून मुक्त होणें. (अथर्व-अनु.- मरठी)

तीन प्रकार श्रद्धेचे-१ सात्त्विक, २ राजस आणि ३ तामस. (भ. गी. १७-२)

तीन प्रकार सद्‌‍गुरुस शरण जाण्याचे-१ प्रणिपात, २ प्रश्न आणि २ सेवा.

तीन प्रकार (संगीताचे)- १ गीत, २ वाद्य आणि ३ नृत्य असे संगीताचे तीन प्रकार. ” गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते ॥ ”

(सं. रत्नाकर अ. १)

तीन प्रकार स्वभावाचे-१ पूर्व बालस्वभाव, २ वडिलार्जितस्वभाव व ३ कष्टार्जित स्वाभाव. (परिसरांत)

तीन प्र-कार समर्थोच्या उपदेशाचे-१ प्र-बोध, २ प्र-यत्न व ३ प्र-चीति.

तीन प्रकार सूर्य-किरीटाचे (ज्योतिःशास्त्र)– १ वैषुव किरीट, २ ध्रूवीय किरीट आणि ३ ३ उभयान्वयी किरीट. (राहुकेतु-ग्रहणें)

तीन प्रकार सूत्रग्रंथाचे-१ शब्दप्रधान, २ अर्थप्रधान आणि ३ व्यवहारप्रधान.

तीन प्रकारचें स्वयंवर-इच्छास्वयंवर, २ पण लावून आणि ३ पराक्रम करून. अशा तीन प्रकारांनीं प्राचीन काळीं स्वयंवरें होत असत.

इच्छास्वयंवरश्चैको द्वितीयश्च पणाभिधः ।

तृतीयः शौर्यशुल्कश्च शूराणां परिकीर्तितः ॥ (देवी. भाग. तृतीयस्कंध १८-४२-४३)

तीन प्रकार स्वरांचे-१ तार = वरचा षड्‌‍ज = निषाद, २ मंद्र = मधला षड्‌‍ज, मध्यम, व ३ घोर = खलचा षड्‌ज, खर्ज.

तीन प्रकारचीं स्नानें-१ नित्य, १ नैमित्तिक व ३ काम्य. (आचारमयूख)

तीन प्रकार हिरडयांचे-१ बाळहिरडा, २ सुरवारी हिरडा आणि ३ चांभार हिरडा.

तीन प्रतीति (अनुभव)- १ गुरुप्रतीति, २ शास्त्रप्रतीति व ३ आत्मप्रतीति (दा. बो. ५-९)

तीन प्रतिज्ञा महत्त्वाच्या (स्त्रीजीवनांत)- १ आज्ञापालन २ चारित्र्य आणि ३ दारिद्य. (सेंटटेरेसी-स्पॅनिश स्त्री) (जीवन विकास, मासिक)

तीन प्रधान विषय महाकाव्याचे-१ प्रेम, २ धर्म व ३ संग्राम.

तीन प्रपंच-२ स्थूल प्रपंच (कुटुंबपोषण), २ सूक्ष्म प्रपंच (कुटुंब पोषणाविषयींचें मनोराज्य) आणि ३ कारण प्रपंच (परोपकारबुद्धि).

तीन प्रमाणें – (अ) १ प्रत्यक्ष, २ अनुमान आणि ३ शास्त्र (मनु. १२-१०५); (आ) १ श्रुति, २ धर्मशास्त्र आणि ३ लोकसंग्रह.

” धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं प्रथामं श्रुतिः ।

द्वितीयं धर्मशास्त्रं तु तृतीयं लोकसंग्रहः ॥ ” (सु.)

तीन प्रमेयें (सांख्य दर्शन)- १ अव्यक्त, २ व्यक्त आणि ३ ज्ञ म्हणजे जाणणारा पुरुष. (सांख्यकारिका)

तीन प्रमेयसिद्धान्त (अद्वैत-वेदांत)- १ ब्रह्म हेंच सत्य आहे, २ जगत् ‌‍ हें मिथ्या आहे व ३ जीव हा वस्तुतः परमात्माच आहे.

श्लोकाधेंन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ।

ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीबो ब्रह्मैव नापरः ॥ (श्रीशंकराचार्य)

तीन प्रमुख गुणा (धनुर्विद्येचे)- १ अति लहान वस्तूचा वेध करणें, २ अति दूरग्राही वेध करणें आणि ३ अति कठीण पदार्थ फोडणें. धनुर्धर अर्जुन हा असा तिन्ही गुणांत प्रवीण होता.

लक्ष्मणो लघुसन्धानः दूरपाती च राघवः ।

कणों द्दढप्रहारी च पार्थस्यैते त्रयो गुणाः ॥ (सु.)

तीन प्रयोजनें परमेश्वरी अवताराचीं-सज्जनांचें पालन. २ दुर्जनांचा नाश आणि ३ धर्म-संस्थापना. (भ. गी. ४-८)

तीन प्राचीन संस्कृत व्याकरण-ग्रंथकार-१ पाणिनी-सूत्रकार, २ कात्यायन-वार्तिककार, आणि ३ पतंजलि-भाष्यकार.

तीन प्राचीन भारतीय ज्योतिर्वेत्ते-१ आर्यभट्ट, २ वराहमिहिर आणि ३ भास्कराचार्य.

तीन प्राचीन महायुद्धें-१ देव-दानव युद्ध, २ राम-रावण युद्ध आणि ३ कौरव-पांडव युद्ध. यांतील प्रमुख नायकांस युद्धावर पाठविण्यापूर्वी ब्रह्मोपदेश करण्यांत आला. ब्रह्मदेवानें इंद्रास, वसिष्ठानें रामास व श्रीकृष्णानें अर्जुनास गीता सांगितली.

तीन फलें योगासनामुळें प्राप्त होणारीं-१ नाडीशुद्धि, २ शरीरास आरोग्य व ३ अंगांत चपलता (योगसोपान-पूर्व चतुष्टय)

तीन फलज्योतिषशास्त्राचे आद्यप्रणेते-१ पराशर, २ जैमिनी व ३ वराहमिहिर.

तीन बलें-१ मंत्र (युक्ति), २ कोश आणि ३ सैन्य हीं राजसत्तेचीं तीन बलें.

तीन बंध-१ मूलबंध, २ उड्डियान बंध आणि ३ जालंधर बंध. हीं तीन योगशास्त्रांत श्रेष्ठ मानिलीं आहेत. (गोरक्षपद्धति)

तीन बंधनें पृथ्वीवरील-१ अन्न, २ स्थान आणि ३ बीज. (ऋग्वेद मंडल १-१६३)

तीन ब्रीदवाक्यें फ्रेंच राज्यकांतीचीं-१ स्वातंत्र्य, २ समता आणि ३ बंधुभाव.

तीन भरत-१ रामसखा भरत, २ दुष्यंतपुत्र भरत आणि ३ जीवन्मुक्त जडभरत. हे तीन प्राचीन काळीं आदर्शभूत होऊन गेले.

तीन भाग आयुर्वेदाचे-१ हेतु स्कंध, २ लक्षण स्कंध व ३ औषध स्कंध या तीन भागांस आयुर्वेदाची त्रिसूत्री म्हणतात.

तीन भाग धर्माचे-१ यज्ञ-उपासना २ अध्ययन-ज्ञानार्जन व ३ दान-परोपकार (छांदोग्य २-१३-१)

तीन मद-१ धनमद, २ विद्यामद आणि ३ उच्च कुलाचा मद. विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः । (म. भा. उ. ३४-४४)

तीन महत्त्वाचे प्रसंग (माणसाच्या आयुष्यांत)- १ जन्म, २ विवाह आणि ३ मृत्यु.

तीन महा आनंद-१ स्वतःचा विवाह, २ सत्पुत्रलाभ आणि ३ पुत्राला पुत्रप्राप्ति होणें. हे संसारांतले तीन महा आनंद होत.

जैं होतसे अपुलें स्वयंवर । आणिक सत्पुत्र होय संसारीं ।

आणिक पुत्रासी पुत्र होय तरी । विशेष चतुर्गुण ॥ (काशीखंड ७६-१६०)

तीन महान् ‌‍ शक्ति जीवन घडविणार्‍या-१ आत्मज्ञानशक्ति, २ विज्ञानशक्ति आणि ३ साहित्यशक्ति (विनोबाजी)

तीन साधनें भक्तीचीं-१ श्रवण, २ कीर्तन आणि ३ भजन (शिव. विश्वेश्वर ३-२२)

तीन माता-१ र्‍ह्स्व २ दीर्घ व ३ ष्लुत.

तीन मानसिक पापें-१ परधनापहार करण्याचा विचार करणें, २ मनानें दुसर्‍याचें अहित चिंतिणें आणि ३ खोटा दुराग्रह.

परद्रव्येष्बभिघ्यानं मनसानिष्टचिंतनम् ‌‍ ।

वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतम् ‌‍ ॥ (स्कंद-काशी खंड २७-१५४)

तीन मार्ग मोक्षप्राप्तीचे-१ कर्मयोग, २ ज्ञानयोग आणि ३ भक्तियोग.

” मार्गास्त्रयो एम विख्याता मोक्षप्राप्तौ नगाधिप ॥ ” (देवी भा. ७-३७-२)

तीन मूर्ख – (अ) १ विरक्त पण लोभी, २ योगी पण इंद्रियासक्त आणि ३ व्युअत्पन्न पण क्रोधी ; (आ) १ ज्ञानी पण वैराग्यरहित, २ श्रद्धाहीन भक्त व २ कुटुंबसंग्रही पण निर्धन.

तीन युगांतले तीन दाते-सत्ययुग-बलि, २ त्रेतायुअग-श्रीरामचंद्र व ३ द्वापरयुग-कर्ण आणि कलियुग (?)

तीन योग – (अ) कर्मयोग, २ भक्तियोग आणि ३ ज्ञानयोग ; (आ) १ कालयोग, २ दैवयोग आणि ३ प्रारब्धयोग.

तीन रथ आकाशगामी-१ अश्विनीकुमारांचा रासभ रथ, २ उषेचा वृषभ रथ व ३ सूर्याचा सप्ताश्व रथ. असे प्राचीनांनीं मानिलें आहे. (अशोक ते कालिदास)

तीन रत्नें (इहलोकींचीं)- १ अन्न, २ उदक आणि ३ सुभाषित. पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ‌‍ । (वृ. चा. १४-१)

तीन रूपें (अग्नीचीं)- १ आहवनीय-देवांचा, २ गार्हपत्य-मानवांचा व ३ दक्षिणाग्नि-पितरांचा.

तीन रूपें पदार्थांचीं-१ स्थाणुरूप, २ द्रवरूप व ३ वायुरूप अशा तीन रूपांत पदार्थ जगांत आढळतात.

तीन रूपें (भगवंताचीं)- १ प्रकृति, २ पुरुष आणि ३ काल. अशीं सृष्टयुअत्पत्तिसमयीं भगवंताचीं तीन रूपें प्रकट होतात. (कल्याण नारद-विष्णुपुराणांक)

तीन रूपें (श्रीविष्णूचीं)- १ महत्-ब्रह्मांडाला उत्पन्न करणारें, २ ब्रह्मांडांत असलेलें आणि ३ सर्वभूतस्थ. तृतीयं सर्वभुतस्थं-तानि ज्ञात्वा विमुच्यते (भारतीय दर्शनसंग्रह)

तीन रूपें (सूर्य देवतेचीं)- १ उदयकालीं-ब्रह्मरूप, २ माध्यान्हकालीं-रुद्ररूप व अस्तमानकालीं-विष्णुरूप. ” अस्तमाने स्वयं विष्णुस्त्रिमूर्तिश्व दिवाकरः ” (आदित्य हृदय)

तीन लयी (संगीत शास्त्र)- १ द्रुत, २ मध्यम आणि ३ विलंबित.

तीन लक्षणें (नित्यसंन्याशाचीं)- १ इच्छा न धरणें, २ द्वेष न करणें आणि ३ द्वन्द्रभाव धारण न करणें (भ. गी. ५-३).

तीन लक्षणें विभूतिमत्त्व ओळखण्याचीं-१ ऐश्वर्य, २ शोभा आणि ३ प्रभाव.

तीन लक्षणदोष (काव्य शास्त्र)- १ अव्याप्ति, २ अतिव्याप्ति आणि ३ असंभव (काव्य प्रकाश).

तीन लक्षणें (साधूचीं)- १ सन्मानाचा हर्ष नाहीं, २ अपमानाचा राग नाहीं व ३ क्रोध आला तरी कठोर वाणि नाहीं. हीं साधूचीं तीन लक्षणें होत.

न प्रह्रष्यति सन्मानैर्नावमानैः प्रकुप्यति ।

न क्रुद्धः पुरुषं ब्रूयादेतत्साधोस्तु लक्षणम् ‌‍ ॥ (गरुड ११३-४२)

तीन लाभ (आसनापासून) व्यवहारद्दष्टया-१ नाडीची शुद्धि, २ आरोग्य आणि ३ अंगचापल्य.

आसनस्य फलान्वक्ष्ये प्रथमं नाडिशोधनम् ‌‍ ।

द्वितीयं शरीरारोग्यं तृतीयं चांगलाघवम् ‌‍ ॥ (सु.)

तीन लोक अथवा त्रिभुवनें – (अ) १ स्वर्ग, २ मृत्यु व ३ पाताळ ; (आ) १ भूमि, २ अंतरिक्ष आणि ३ द्यौ ; (इ) १ मनुष्यलोक, २ पितृलोक व ३ देवलोक (शतपथ) ” त्रींल्लोकान्न्याप्य भूतात्मा ” (म. भा. अनु-अ १४९)

तीन लोक-१ वाणी-पृथ्वी, २ मन-अंतरिक्ष व ३ प्राण-स्वर्गलोक. ’ वागेवायं लोकः मनो अंतरिक्षलोकः प्राणोऽसौ लोकः ’ (बृ. १।५।४)

तीन वर्ग पदार्थांचे-१ खनिज, २ उद्धिज्ज व ३ प्राणिज. जगांतील यच्चयावत् ‌‍ पदार्थ या तीन वर्गांपैकीं कोणत्यातरी वर्गांत समाविष्ट असतात.

तीन वस्तु दातृत्वांत प्रसिद्ध-१ कामधेनु, २ चिंतामणिरत्न व ३ कल्पवृक्ष.

तीन वस्तु (दुसर्‍याच्या स्वाधीन करूं नयेत)- १ ग्रंथ, २ स्त्री व ३ पैसा.

” पुस्तकं वनिता वित्तं परहस्तगतं गतम् ‌‍ ।

यदि चेत्पुनरायाति नष्टं भ्रष्टं च खंडितम् ‌‍ ॥ ” (सु.)

तीन वाद (वेदातशास्त्र)- १ आरंभवाद-जसे मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ति. हा आरंभवाद-नैयायिकांचा आहे. २ परिणामवाद-दुधापासून दही होणें (सांख्य) आणि ३ विवर्तवाद-दोरीवर सर्पाचा आभास होणें (अद्वैत वेदान्त).

संख्या ३

तीन वासना-१ लोकवासना (लोकांनीं चांगलें म्हणावें म्हणून), २ शास्त्रवासना (शास्त्राध्ययनाची आवड) आणि ३ देहवासना (वेशभूषा वगैरेंनीं चांगलें दिसावें म्हणून खटपत). यांमुळें जीवांना खरें ज्ञान होत नाहीं. यांनाच वासनात्रय म्हणतात.

तीन वारकरी वैशिष्टयें-१ टाळ, २ माळ आणि ३ पताका. हीं तीन वारकरी सांप्रदायिकांस धारण करावीं लागतात.

तीन विद्या-१ प्रकृति विद्या २ आत्मविद्या-आध्यात्मिक ज्ञान आणि ३ ब्रह्मविद्या. यांच्या अध्ययनानें ऐहिक सुख आणि अमृतत्व प्राप्त होतें (अथर्व-अनु-मराठी)

तीन विद्याप्राप्तीचीं साधनें-१ गुरुशुश्रूषा, २ पुष्कळ धन आणि ३ विद्या देऊन विद्या घेणें.

” गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा ।

अथवा विद्यया विद्या चतुर्थं नोपपद्यते ॥ ” (सु.)

तीन विद्येचे शत्रु-१ गुरुशुश्रूषेचा अभाव, २ त्वरा आणि ३ आत्मश्लाघा.

” अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रुवत्‌‍त्रयः ॥ ” (म. भ. उद्योग ४०-४)

तीन विश्रांतिस्थानें सांसारिकांस-१ पुत्र, २ पत्नी आणि ३ सज्जनसमागम.

संसारतापदघानां त्रयो विश्रांतिहेतबः ।

अपत्यं च कलत्रं च संतसंगतिरेव च ॥ (सु.)

तीन वेळां विश्वरूपदर्शन-पहिलें-घृतराष्ट्राच्या राज्समेंत शिष्टाईस गेल्या वेळीं, दुसरें-अर्जुनास गीता उपदेशितांना आणि तिसरें-युधिष्ठिरास राज्याभिषेक झाल्यानंतर द्वारकेस परत जात असतां, उत्तंक नांवाच्या तपोधन ऋषीस त्याचे विनंतीवरून श्रीकृष्णानें विश्वरूपदर्शन दिलें. (भगवान् ‌‍ श्रीकृष्ण)

तीन वैभवलक्षणें-१ दुसर्‍याच्या गोष्टींत ढवळाढवळ न करणें, २ आपल्या कामामध्यें मग्न असणें आणि ३ मिळालेल्या संपत्तीचें रक्षण करणें. हींद तीन वैभव प्राप्त होण्याचीं लक्षणें होत.

अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।

रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् ‌‍ ॥ (म. भा. सभा. ५४-७)

तीन व्यसनें (कामापासनून उत्पन्न होणारीं)- १ मिथ्या भाषण, २ परस्त्रीगमन व ३ वैरावांचून क्रर कर्म. हीं तीन व्यसनें कामापासून उत्पन्न होणारीं. (वा. रा. अरण्य. ९-३)

तीन व्याह्रति गायत्रीमंत्राच्या-१ भूः (पृथ्वी) २ भुवः (अंतरिक्ष) आणि ६ स्वः (स्वर्ग)

तीन वृत्ति (शब्दाची अर्थबोधक शक्ति)- १ अभिधा, २ लक्षणा आणि ३ व्यंजना. अर्थ ज्या शक्तीमुळें बोधित होतो ती वृत्ति. कांहीं

” तात्पर्य ” नामक चौथी वृत्तीहि मानतात.

तीन शरीरें-१ स्थूल शरीर (पंचमहाभूतांच्या पंचीकरणानें बनलेलें), २ सूक्ष्म शरीर (मनु, बुद्धि, पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेंद्रियें व पंचाप्राण यांचें) आणि ३ कारणशरीर (अविद्या). अशीं तीन शरीरें आत्म्याला असतात.

तीन शक्ति-१ ज्ञानशक्ति, २ क्रियाशक्ति आणि ३ अर्थशक्ति. (देवी. भाग. तृतीयस्कंध ७-२५)

तीन शत्रू चंद्राचे-१ कावळा, २ चोर आणि ३ विरही (चंद्रप्रभा)

तीन शास्ते – (जगाचे नियंत्रण करणारे)- १ मनोनिग्रही माणसाचा शास्ता गुरु, २ दुष्टांचा शास्ता राजा (शास्नाधिकारी) आणि ३ गुप्तपणें पाप करणारांचा प्रत्यक्ष यमच. हे तीन शास्ते होत.

गुरुरात्मावतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ‌‍ ।

अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ (म. भा. उ. ३५-७१)

तीन कार प्रतिष्ठा वाढविणारे-१ संपत्ति, २ सन्मान आणि ३ सत्ता.

तीन सत्ता-१ पारमार्थिक सत्ता, २ व्यावहारिक सत्ता आणि ३ प्रातिभासिक सत्ता (वेदान्तशास्त्र)

तीन सप्तक (गायनशास्त्र)- १ मंद्र, २ मध्य आणि ३ तार.

तीन संग्रहणीय वस्तु-१ ग्रंथ, २ स्नेही व ३ औषधी. यांचा संग्रह करावा.

तीन संप्रदाय व त्यांचीं घोषणावाक्यें (द्त्त उपासकांचे)- १ गुरु संप्रदाय-श्रीगुरुदेवदत्त, २ अवधूत संप्रदाय-अबधूत चिंतन श्रीगुरुदेवद्त्त. ३ आनंद संप्रदाय-आनंदे द्त्तात्रय देवदेव. (दासोपंतांची पासोडी-प्रस्तावना)

तीन साधनें (तिघांना आपलेसे करून घेण्याची)- १ वृद्ध-इष्ट वस्तूचें दान, २ बालक-प्रेचळ अंतःकरन आणि ३ विद्वान्-मधुरवाणी.

तीन साधनें ब्रह्मविद्या शिकण्याचीं-१ श्रद्धा, २ भक्ति व ३ घ्यान (कैवल्योपनिषद् ‌‍ १-२)

तीन साधनें ज्ञानप्राप्तीचीं-१ प्रत्यक्ष, २ अनुमान आणि ३ आगम (शास्त्र)’ प्रत्यक्षानुमानागमाभ्याम्  ’ (पातंजलयोगशास्त्र)

तीन सिद्धि-१ व्यवहार सिद्धि, २ अलौकिक सिद्धि म्हणजे अणिमा लघिमा इ. सिद्धि आणि ३ अत्यंत दुःखनिवृत्ति व परमानंद प्राप्तिरूप सिद्धि. (हरिपाठ रहस्य)

तीन सांस्कृतिक गर्जना महाराष्ट्रधर्माच्या-१ पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, २ हरहर महादेव आणि ३ जयजय रघुवीर समर्थ. (महाराष्ट्रा जीवन)

तीन स्थानीं गंगा विशेष पुण्यपद-१ तीर्थराज प्रयाग, २ हरिद्वार व ३ गंगासागर संगम. (गूढार्थचंद्रिका)

तीन सौंदर्यें-१ विचारसौदर्य, २ गुणसौंदर्य व ३ मनोसौंदर्य.

तीन स्थानें ध्वनीचीं-१ ह्रदय, २ कंठ व ३ मूर्ध्नया स्थानांतून अनुक्रमें मंद्र, मध्यम व तार हे स्वरालाप उगम पावतात. (गायनशास्त्र)

तीन स्थानें (पवित्र)- १ अवतारांची जन्मभूमि, २ संतांची मृत्युभूमि आणि ३ वीरांची कर्मभूमि. (विचार पोथी)

तीन स्थानें भगवान् ‌‍ सूर्यदेवतेचीं-१ उदयकाल-पूर्वदेशाच्या पर्वतावर — कोणार्कजवळ, २ मध्यान्ह-कनोजच्या दक्षिणेस कालप्रिय

(कालपी) येथें व ३ अस्तमान-मूलस्थान (मुलतान). चंद्रभागा (चिनाव) कांठीं. अशीं तीन स्थानें श्रीकृष्णपुत्र सांबानें स्थापन केलीं. (वराह पु. अ. १७८)

तीन स्वर-१ उदात्त, २ अनुदात्त व ३ स्वरित.

तीन स्कंध (विभाग) ज्योतिषाचे-१ सिद्धान्त, २ संहिता आणि ३ होरा.

तीन हट्ट-१ बालहट्ट, २ स्त्रीहट्ट आणि ३ राजहट्ट.

तीन हेतु तीर्थप्राशनाचे-१ देहशुद्धि, २ धर्मसाधन आणि ३ मोक्षप्राप्ति असे तीन हेतु तीर्थ घेण्याचे क्रमानें सांगितले आहेत.

प्रथमं कायशुद्धयर्थं द्वितीयं धर्मसाधनम् ‌‍ ।

तृतीयं मोक्षमाप्नोति एवं तीर्थं त्रिधा पिबेत् ‌‍ ॥ (क्रग्वेदी ब्रह्मकर्म)

तीन हेतु (विवाहाचे)- १ धर्मसाधन, २ प्रजोत्पत्ति व ३ रतिसुख. ” धर्मप्रजारत्यर्थां हि विवाहः । ”

तीन हास्यें-१ सुप्तहास्य, २ स्पितहास्य आणि ३ व्यक्तहास्य. असे हास्याचे तीन प्रकार.

तिघांना आश्रयाविना शोभा नाहीं-१ विद्वान, २ स्त्री आणि ३ वेली.

विनाश्रयं न शोभन्ते पण्डितावनितालताः । (सु.)

तिघेजण जगांत निंद्य-१ लग्न केल्यानंतर पत्नीला टाकणारा पति, २ बापाचे पश्चात् ‌‍ आईचें भरणपोषण न करणारा मुलगा आणि ३ उपवर मुलीचा योग्य वेळीं विवाह न करून देणारा बाप. (सावित्रीचरित्र)

तिघांच्या तीन प्रकारें परीक्षा-१ सोन्याची-अग्नीनें, २ स्त्रियांची-सोन्यानें व ३ पुरुषाची परीक्षा-स्त्रियांनीं. (विनोद महदाख्यायिका)

तिघांना तीन प्रकारचें भय असतें-१ कनिष्ठ वर्गांना बेकारीचें भय, २ मध्यम वर्गीयांना मरणाचें भय आणि ३ उच्च वर्गीयांना अपमानाचें भय.

अवृत्तेर्मयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ‌‍ ।

उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् ‌‍ (म. भा. उ. ३४-५२)

तिघेजण दुर्दैवी-१ जुगारानें धनप्राप्ति, २ सेवा करून मान आणि ३ भिक्षेनें भोग मिळण्याची इच्छा करणारा. हे तिघे दुर्दैवी होत.

द्यूतेन धनमिच्छन्ति मानमिच्छन्ति सेवया ।

भिक्षया भोगमिच्छन्ति ते दैवेन विडम्बिताः ॥ (सु.)

तिघेजण नामधारी होत-१ नांव विद्याधर पण मूर्ख, २ नांव दिवाकर पण जन्मांध व ३ नांव लक्ष्मीधर पण दरिद्री. कृति व आकृति यांत विसंगति असली म्हणजे हा संकेत उपयोजिला जातो.

विद्याधरो यथा मूर्खों जन्मांधश्च दिवाकरः ।

लक्ष्मीधरो दरिद्रश्च-त्रयस्ते नामधारकाः ॥ (सु,)

तिघांचा नाश अटळ-१ अज्ञ-ज्ञान नसणारा, २ अश्रद्ध-स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरूषाच्या वचनांवर विश्वास न ठेवणारा आणि ३ संशयात्मा-ज्ञानी सांगतात त्याविषयीं सतत संशय घेणारा.

तिघांना नरक मिळतो-१ जन्मदाता, २ प्राणदाता व ३ विश्वासघातकी

मित्रद्रोही कृतघ्नश्च योहि विश्वासघातकः

ते नरा नरकं यान्ति यावच्चंद्रदिवाकरौ (विक्रमचरितम् ‌‍)

तिघेजण पित्यासमान-१ जन्मदाता, २ प्राणदाता व ३ अन्नदाता.

शरीरकृत प्राणदाता यस्य चान्नानि भुंजते ।

क्रमेणैते त्रयोऽप्युक्ताः पितरो धर्मशासने ॥ (म. भा. आदि ७२-१५)

तिघेजण पृथ्वीचा उपभोग घेणारे-१ शूर, २ विद्यासंपन्न आणि ३ सेवा कशी करावी हें जाणणारा. (म. भा. उद्योग ३५-७४)

तिघेजण महाभारताचे (आजच्या) कर्ते-१ व्यास-जय, २ वैशंपायन-भारत आणि ३ खौती-महाभारत (म. भा. उपसंहार)

तिघेजण यज्ञ न करितां स्वर्ग प्राप्त करून घेतात-१ अन्नदान करणारा, २ पाणपोई घालणारा आणि ३ रोगी बरा करणारा. या तिघांना यज्ञ न करितां स्वर्ग (उत्तम गति) प्राप्त होते.

अन्नदो जलद्श्चैव ह्यातुरस्य चिकित्सकः ।

त्रयस्ते स्वर्गमायान्ति विना यज्ञेन भारत ॥ (योगरत्नाकर)

तिघेजण वक्रोक्तिमार्गनिपुण-१ सुबंधु, २ बाणभट्ट आणि ३ कविराज – (राघवपाण्डवीय काव्याचाः कर्ता) हे तीन संस्कृत वाङ्‌मयांत वकोक्तिमार्गनिपुण असे कवि होऊन गेले.

सुबंधुर्बाणभट्टश्च कविराज इति त्रयः ।

वक्रोक्तिमार्गनिपुणाश्चतुर्थों विद्यते न वा ॥ (रा. पा. १-४१)

तिघेहि सुखी असावेत-१ अन्नदाता, २ भोजन करणारा व ३ स्वयंपाक करणारा.

” अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भवेत् ‌‍ । ” (सु.)

संख्या ३

तिघेजण सृष्टिकर्त्याशीं स्पर्धा करणारे-१ ग्रंथकार, २ चित्रकार आणि ३ शिल्पकार. (प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार)

तिघेजण स्थानांतरामुळें भोभा पावतात-१ सिंह, २ सत्पुरुष व ३ हत्ती, हे तिघे संचारामुळें शोभून दिसतात.

’ स्थानभ्रष्टाः सुशोभन्ते सिंहाः सत्पुरुषा गजाः ’ (सु.)

तिर्थर्यात्रचीं तीन प्रयोजनें-१ देहदंडन, २ षड्‌‍विकारांचा त्याग आणि ३ आपपर अभेदत्व. अशीं तीर्थयात्रेचीं तीन प्रयोजनें होत. यापरी यात्रा तीन्ही । घडल्या असती ज्यालागुनी । तो ज्ञानियाचा मुकुटमणी । प्रतिईश्वर होईल ॥ (भक्तिसारामृत ११-१०६)

त्रयी-तिन्हींचा समुदाय. (अ) १ सत्, २ चित् ‌‍ आणि ३ आनंद ; (आ) १ ऋक ‌‍, २ यजुस् ‌‍ आणि ३ सामन ‌‍ ; (ई) १ शंसन, २ हवन आणि ३ स्तव ; (ई) १ अध्यात्म, २ भक्ति आणि ३ नीति. अशा अनेक त्रयी आहेत. यांच्या एकत्रीकरणांतच वैदिक धर्माची सिद्धि आहे. (उ) १ बाप, २ आजा आणि ३ पणज्ञा ; (ऊ) १ आई, २ आजी आणि ३ पणजी असे अनुक्रमानें येणारे तीन पूर्वज. (ए) १ धर्म, २ अर्थ व ३ काम यांचा समुच्चय (ऐ) १ संहिता, २ ब्राह्यण व ३ आरण्यकें मिळून होणारे ग्रंथ.

आत्मत्रय-१ जीवात्मा, २ अंतरात्मा व ३ परमात्मा.

आयुर्वेदग्रंथत्रयी-१ चरक, २ सुश्रुत आणि ३ वाग्मट.

दर्शनत्रयी-१ सांख्य, २ योग व ३ वेदान्त.

पुराण प्रस्थानत्रयी-१ रामायन, २ महाभारत आणि ३ भागवत.

प्रमाणत्रयी-१ श्रुति, २ युक्ति व ३ अनुभव. (वेदान्त)

प्रार्थनात्रयी (औपनैषादिक)- १ असतो मा सद् ‌‍ गमय । २ तमसो मा ज्योतिर ‌ गमय । व ३ मृत्योर् ‌‍ मा अमृतं गमय ।

रत्नत्रय (जैन धर्म)- १ सम्यद्नर्शन, २ सम्यग्ज्ञान व ३ सम्यक चारित्र. (रत्नकरंडक श्रावकाचार)

रत्नत्रयी – (बुद्ध धर्माची) १ बुद्ध, २ धर्म आणि ३ संघ.

वनस्पतित्रयी-१ सुंठ, २ मिरी व ३ पिंपळी.

वारकरी प्रस्थानत्रयी – (अ) श्रीज्ञानेश्वरी, २ तुकारामाची गाथा आणि ३ एकनाथी भागवत. (आ) १ चांगदेवपासष्टी, २ अमृतानुभव आणि ३ ज्ञानेश्वरी.

वेदान्तप्रस्थानत्रयी-१ दशोपनिषदें, २ भगवद्नीता आणि ३ ब्रह्मसूत्रें.

त्रिकर्में-१ नित्य, २ नैमित्तिक आणि ३ काम्य. ’ नित्यं नैमित्तिकं काम्यमिति कर्म त्रिधा मतम्  ’ (व्यास. स्मृति ३-१)

त्रिकटु-१ सुंठ, २ मिरें आणि ३ पिंपळी या तीन औषधांचा समुदाय.

त्रिकूट-तीन शिखरें असलेला लंब नामांतरनें लंकेतील एक पर्वत. (वा. रा. सुंदर सर्ग १ भारत-प्राचीन ऐति. कोश)

त्रिकूट (पाकशास्त्र)- १ बोरकूट, २ मेथकूट आणि ३ तिळकूट.

त्रिकांडाबभु-पांडवांपैकीं भीमाचा शक्तिकेतु हा महापराक्तमी पुत्र. पण भारतीयुद्धांत हा कौरवपक्षाला मिळाला होता. याचेजवळ तीन विषारी धूम्रास्त्रें होतीं म्हणून याला त्रिकांडबभरु म्हणत असत. (शक्तिकेतु)

त्रिकांड वेद-१ कर्मकांड (मंत्रभाग), २ उपासनाकांड (ब्राह्मणभाग) आणि ३ ज्ञानकांड (उपनिषद्‌‍भाग). या तीन कांडांनीं युक्त असा वेद. ज्ञान भक्ति कर्मकांडा । वेद त्रिकांड नेमस्ता ॥ (ए. भा. २०-७१)

त्रिगुण-१ सत्त्व, २ रज आणि ३ तम. हे तीन प्राकृतिक गुण.

ते प्राणिये तंव स्वभावें । अनादि मायाप्रभावें ।

त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥ (ज्ञा. १७-५६)

त्रिगुणाचीं तीन प्रतीकें-१ रजोगुण-रावण, २ तमोगुण-कुंभकर्ण आणि ३ सत्त्वगुण-बिभीषण. (विचार पोथी)

त्रिचक्र-आश्विनीकुमारांचा रथ (आदर्श हिंदी श. को.)

त्रिजात-दालचिनी, २ तमालपत्र आणि ३ वेलदोडे या तीन साल्याच्या पदार्थांस (समुच्चयानें).

त्रितन्त्री – (अ) तीन तारा असलेली वीणा. (आ) १ आध्यात्मिक, आधिभौतिक आणि ३ आधिदैविक.

त्रिताप-१ आधि, २ व्याधि आणि ३ उपाधि.

त्रिदोष-१ वात, २ पित्त आणि कफ हे तीन मुख्य धातु शरीरांत असतात. आयुर्वेदाची मूळ उभारणी शरीरांतील या मुख्या तीन पदार्थांवर केलेली आहे. यांना उद्देशूनच वातपित्तकफात्मक त्रिदोषपद्धति असें नांव आहे. कांहींच्या मतें रक्त हा चवथा पदार्थ किवा दोष मानून चतुर्दांषात्म पद्धति असें म्हणतात.

त्रिदंडी-१ काया (कर्म), २ वाचा आणि ३ मन, या तिहींवर ज्यानें ताबा मिळविला आहे असा पुरुष.

वाग्दंडः कर्मदण्डश्च मनोदंडश्च ये त्रयः ।

यस्यैते नियता दण्डाः स त्रिदण्डी महायतिः ॥ (सु.)

त्रिदंडी संन्यास-ज्यांत १ शिखा, २ यज्ञोपवीत व ३ कच्छ यांचा त्याग करावा लागत नाहीं असा संन्यासाचा एक प्रकार. अशास पुन्हा गृहस्थाश्रमांत येतां येतें, अशी समजूत आहे,

त्रिधातु-१ वात. ३ पित्त व ३ कफ. (ऋग्वेद १-३४-६) (सायण भाष्य.)

त्रिनयन-महादेवाचे तीन नेत्र, १ श्चेत भानु-सोम, २ बृह्द्‌भानु-अग्नि आणि ३ भानु-सूर्य हे महादेवाचे तीन नेत्र होत.

(स्तुतिकुसुमांजलि)

त्रिपथ-१ कर्म, ३ ज्ञान आणि ३ उपासना. या तिन्ही मागौस समुच्चयानें म्हणतात

त्रिपीटक-१ सूत्र, २ विनय आणि ३ अभिधर्म म्हणजे बुद्धदेवाचे आचार आणि तत्त्वज्ञान अशीं तीन पीटकें म्हणजे संग्रह. यांना त्रिपीटक अशी संज्ञा आहे.

त्रिपदागायत्री-तीन पदांचा गायत्री छंद. उदा० — ॐ तत्सवितुर्वरेण्यम् ‌‍ । भगोंदेवस्य धीमही । धियो यो नः प्रचोदयात् ‌‍ (गा. मंत्र)

” त्रिपदां जपे पवित्रपूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ॥ ” (ए. भा. ११-१३८०)

त्रिपथगा (भागीरथी)- ही १ स्वर्ग, २ मृत्यु आणि ३ पाताळ या तिन्ही लोकांत वाहणारी. म्हणून त्रिपथगा.

क्षितौ तारयते मर्त्यान् ‌‍ नागांस्तारयतेऽप्यधः ।

दिवि तारयते देवान ‌‍ तेन त्रिपथगा स्मृता ॥ (सु.)

त्रिपुटी-एक नसेल तर दुसर्‍या दोहोंची सिद्धि होणार नाहीं. अशा रीतीनें एकमेकांशीं संबद्ध अशा तीन गोष्टींचा समुच्चय ; याला त्रिपुटी म्हणतात. अशा त्रिपुटी अनेक आहेत.

उदा० — परमेश्वर, आत्मा व जगत् ‌‍ ; तत् ‌‍, त्वे, व असि ; सत् ‌‍, चित् ‌‍ व आनंद ; ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान ; कर्ता, कारण व क्रिया ; प्रकृति, पुरुष व परमपुरुष ; द्दश्य, द्रष्टा व दर्शन ; ब्रह्म, माया व जीव ; साध्य, साधक व साधन ; पूजा, पूजक व पूजन ; ध्येय, ध्याता व ध्यान ; पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा (खिरस्ती धर्म); भोक्ता, भाग्य व भोग ; शब्द, अर्थ व प्रत्यय ; प्रिय, प्राणेश्वरी व प्रीति ; शिष्य, सद्‌‍गुरु व साक्षात्कार ; उपमा, उपमेय व उपमान ; व्यष्टि, समष्टि व परमेष्टी ; कर्म, भक्ति व ज्ञान ; कर्ता, कर्म व क्रियापद ; अकार, उकार व मकार ; जागृति, स्वप्र व सुपुप्ति इत्यादि.

त्रिपुंड्र-१ अ-अ-कार, २ उ-कार आणि ३ म-कार या भस्माच्या तीन रेषा कपाळावर लावावयाच्या. यांस त्रिपुंड्र म्हणतात. (गुरुचरित्र)

त्रिभुवन-१ स्वर्ग, २ मृत्यु व ३ पाताळ.

त्रिमधु-१ तूप, २ गूळ किंवा साखर आणि ३ मधु. हे तीन मधुर पदार्थ मानले आहेत.

’ घृतं गुडं माक्षिकं च विज्ञेयं मधुरत्रयम् ‌‍ । (शा. नि.)

त्रिमूर्ति – (अ) १ ब्रह्या (सृजन), २ विष्णु (पालन) आणि ३ शिव (संहार) या तीन देवता ; (आ) ब्रह्मा, विष्णु आणि शिव या तिन्ही देवतांच्या अंशापासूनचा दत्तात्रेयावतार.

त्रिराम-१ दाशरथि राम, २ परशुराम आणि ३ बलराम.

त्रिरूपा लक्ष्मी-१ श्रीदेवी, २ भुदेवी व ३ दुर्गा, लक्ष्मीदेवतेचीं हीं सत्त्व, रज व तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचीं तीन रूपें आहेत.

’ लक्ष्मी त्रिरूपा संभूता श्री-भू-दुर्गेति संज्ञिता ’ (गरुड. ब्रह्य. ४-१)

त्रिलोह-१ सोनें, २ रुपें व ३ तांबें.

त्रिवाचा-तीन वेळां उच्चारिलेलें वचन. ठाम अभिवच. जानकी आणीन हें प्रमाण । सत्य सत्य त्रिवाचा ॥ (रा. वि. १७-११८)

त्रिवारशांत्रि-१ व्यक्तिमध्यें शांति, २ राष्ट्रास शांति आणि ३ जगांत शांति. याचा अर्थ सर्वत्र शांति नांदावी असा आहे. म्हणून कोणत्याहि शुभकार्याचे अंतीं ’ ॐ शांतिः शांतिः शांतिः ’ असा शांतिपाठ त्रिवार उच्चारण्याचा परिपाठ आहे.

त्रिशूल-१ कटिशूल (कामेच्छा), २ पोटशूल व ३ मस्तकशूल.

त्रिविध-आनंद-१ काव्यानंद २ ज्ञानानंद व ३ भक्त्यानंद.

त्रिविध आदर्श मानवी जीवनाचे-१ धर्म, २ अर्थ व ३ काम. ” धर्मार्थाविरोघेन कामं सेवेत । ” (कौटिल्य)

त्रिविध गंडांतर-१ नक्षत्र गंडांतर, २ तिथि गंडांतर व ३ लग्न गंडांतर. (म. वा. को.).

त्रिविध केतू अथवा दुश्चिन्हें-१ दिव्य-उल्कापात इ., २ अंत रिक्ष-घूमकेत ‌‍ इ. व ३ पार्थिव-भूकपं इ. असे तीन प्रकार. असे उत्पात भारतीय युद्धारंभीं झाले होते अशी कथा आहे. (मुक्तेश्वर सभा अ. १२)

त्रिविध ताप-१ आधिदैविक (विद्युत्पतन, अतिवृष्टि इ.). २ आध्यात्मिक (ज्वर, शूळ इ.) आणि ३ आधिभौतिक (पाण्यांत बुडणें, चौर्य, भय इ.)

देवापासूनि आधिदैविक । मानसताप आध्यात्मिक ।

भूतापासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥ (ए. भा. २२-३९९)

त्रिविध देह-१ स्थूल देह, २ सूक्ष्म देह आणि ३ कारण देह.

त्रिदोष (आयुर्वेद)- १ वात, २ पित्त आनि ३ कफ. हे शरिरांत असणारे तीन दोष, चांगल्या स्थितींत असले म्हणजे शरीराचें रक्षण करतात व बिघडले म्हणजे नाश करतात.

’ वात-पित्त-कफा एते त्रयो दोषा इति स्मृताः । ’ (भावप्रकाश पूर्वखंड)

त्रिविध दोष खाद्यपदार्थासंबंधीं-१ जातिदोष-कांदा, लसूण वगैरे २ निमित्त दोष-हलवायाकडील पदार्थ व ३ आश्रयदोष-चारित्र्यहीन व्यक्तींनीं स्पर्शिलेले (स्वामी विवेकानंदांच्या सहवासांत)

त्रिविध नायिका-१ मुग्धा, २ मध्या व ३ प्रौढा.

त्रिविध प्रतिबंध-१ भूत प्रतिबंध-मनाची अस्थिरता, विषयचिंतन वगैरे, २ वर्तमान प्रतिबंध-कुतर्क दुराग्रह वगैरे आणि ३ भावी प्रतिबंध-निश्चय करण्याची शक्ति बुद्धींत नसणें, मिथ्या ज्ञान इ. (बोधामृत)

त्रिविध प्रकार औषधाचे-१ दिव्य-हवा व उष्णता, २ पार्थिव-खनिज, उद्भिज्ज पदार्थ व ३ औदक-प्रवाही किंवा द्रवरूप (ऋ. मंडल १-३४)

विविध बुद्धि-१ देहबुद्धि, २ जीवबुद्धि आणि ३ आत्मबुद्धि.

त्रिविध ब्रह्म-१ उपभोग घेणारा जीवात्मा २ उपभोग्य हें बाह्य वस्तुविश्व व ३ त्या दोहोंना प्रेरणा देणारें चैतन्य़ ही ब्रह्यची त्रिविधता (धवलगिरी)

त्रिविध मृदंग-१ मायूरी, २ अर्धमायूरी आणि ३ कूर्मरता.

त्रिविध वीरचूडामणी-१ रणवीर, २ विद्यावीर आणि ३ दानवीर. अशा तीन गुणांनीं युक्त असा प्राचीन कालीं राजा भोज होऊन गेला. त्याला त्रिविध वीरचूडामणी म्हणत.

त्रिविध श्रद्धा-१ सात्त्वि, २ राजस आणि ३ तामस.

’ त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । ’ (भ. गी. १७-२)

त्रिवेणी संगम-१ गंगा, २ यमुना आणि ३ सरस्वती (गुप्त). या तीन नद्यांचा संगम हा प्रयागास आहे. त्रिवेणी संगमावरील स्नान फार पुण्यकारक मानलें आहे.

त्रिविध श्रोता-१ मुक्त, २ मुमुक्षू आणि २ विषयी (गूढार्थचिंतामणी कोश)

त्रिविध सुखें-१ लौकिक, २ पारलौकिक आणि ३ पारमर्थिक.

त्रिविध समीर-१ शीतल, २ मंद व ३ सुगंध.

त्रिपाद भूमि-१ त्रिविष्टप. २ भरतखंड आणि ३ पाताळ या तीन देशविभागांना संकेतानें त्रिपाद भूभि म्हटलें आहे. ही त्रिपाद भूमि वामनानें बलीजवळ मागितली व ती त्यानें दिली अशी पौराणि कथा आहे.

त्रिसूत्रि (भगवंताच्या अवतारकार्याची)- १ सज्जनांचें रक्षण, २ दुष्टांचें निर्दालन व ३ धर्माची संस्थापना.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम ‌‍ ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ (भ. गी. ४-८)

त्रिस्थळी याता-१ काशी, २ प्रयाग आणि ३ गया. या तीन तीर्थांची यात्रा.

त्रिस्त्रोता-१ स्वर्ग. २ मृत्यु आणि ३ पाताळ. या तिन्ही लोकांत वाहणारी-गंगा. पृथ्वीवरील प्रवाहास भागीरथी, स्वर्गांतील प्रवाहास मंदाकिनी व पाताळ लोकांतील प्रवाहास भोगावती अशी संज्ञा आहे.

त्रैविद्या-१ ऋग्वेद, २ यजुर्वेद आणि ३ सामवेद या तीन वेदांना मिळून त्रैविद्या अशी संज्ञा आहे.

” त्रयी वै विद्या ऋचो यजूंषि सामानि ” (शतपथ)

औट-म्हणजे साडेतीन.

साडेतीन पीठें-१ तुळजापूरची भवानी, २ मातापुरची रेणुका, ३ जोगाईच्या आंब्याची योगेश्वरी आणि १-२ कोल्हापूरची लक्ष्मी हीं देवीचीं साडेतीन पीठें मानिलीं आहेत.

साडेतीन् ‌‍ मुहूर्त-१ वर्षप्रतिपदा, २ अक्षय्यतृतीया, ३ विजया-दशमी हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा.

साडेतीन वाद्यें-१ वीणा, २ पखवाज, ३ बांसरी आणि १-२ मंजिरी मिळून साडेतीन वाद्यें.

साडेतीन शहाणे (पेशवाईंतील)- १ सखारामबापू बोकील, २ देवाजीपंत चोरघडे, ३ विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस अर्धा शहाण. हे साडेतीन शहाणे मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत.

तीन अंगें धर्माचीं-१ तत्त्वज्ञान, २ पुराणें व ३ विधि व अनुष्ठान. कोणत्याहि धर्माचीं अशीं तीन अंगें असतात. (सार्वजनीक धर्म-स्वरूप व साधना)

तीन अर्थवाद-१ अनुवाद, २ गुणवाद व ३ भूतार्थवाद.

तीअन आद्य आचार्य लेखन (लिपी) कलेचे-१ ब्रह्या-ब्राह्मीलिपि.- डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी, २ खरोष्ठ-खरोष्ठी-उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी व ३ त्सं-की-चित्रलिपि. वरून खाली लिहिली जाणारी. पहिलेदोन भारतांत व तिसरा चीनमध्यें होऊन गेला. ब्रह्मा आणि खरोष्ठ यांनी आपल्या लिपि देवलोकापासून प्राप्त करून घेतल्या व त्सं-कीनें आपली लिपी पक्षी आदिंच्या पदचिन्हावरून बनविली. (प्रा. भा. लिपिमाला)

तीन ऋणें (व्यावहारिक)- (आ) १ कौटुंबिक, २ सामाजिक आणि ३ राष्ट्रीय.

तीन गुण कीर्तनास आवश्यक-१ ताल, २ अर्थ व गान (गायन (कीर्तन पद्धति)

तीन गुण वैश्याचे-१ शेती, २ गोरक्षण आणि ३ वाणिज्य-व्यापार-क्रय विक्रय (भ. गी. १८-४४)

तीन गोष्टी जगांत व्यर्थ – (१) अप्रगल्माची विद्या (२) कंजूषाजवळचें धन (३) भित्र्या माणसाचें बळ.

अप्रगल्मस्य या विद्या कृपणस्य च यद्धनम् ‌‍ ।

यच्च बाहुबलं भीरोर्व्यर्थमेतत् ‌ त्रयं भुवि ॥ (भोजप्रबंध)

तीन प्रकार आगम ग्रंथांचे-१ शौवागम, २ शाक्तागम व ३ वैष्णवागम.

तीन प्रकार मोठेपणाचे-१ जन्मसिद्ध, २ कष्टार्जित व ३ बळेंच चिकटविलेला. (Twelth Night)

तीन प्रकार शिवनृत्याचे-१ संध्या नृत्य, २ ताण्डव नृत्य व ३ नदन्त नृत्य (कला आणि कलास्वाद)

तीन प्रकार संतांचे-१ व्यावहारिक संत, २ प्रातिभासिक संत व ३ पारमार्थिक संत (विवेक चिंतामणि)

तीन प्रकार हास्याचे – (अ) १ अंगहास्य. २ काव्यहास्य व ३ नेपथ्यहास्य (भ. ना. अ. २१) (आ) १ द्दष्टिहास्य-नुसत्या नजरेनें-विद्वान् ‌ माणसें, २ दंतहास्य-दांत दाखवून-मध्यम माणसें व ३ अकांड तांडव करून-अघम माणसें. सत्पुरुष जे आहेत ते फारसे हसत नाहीं.

तीन सभा-१ देव अथवा देवकी सभा-देवतेचें कीर्तन चालतें, २ दैत्य सभा-सर्व तामसी प्रकार चालतात व ३ मानुष्य सभा-देवपूजन-शास्त्र चर्चा चालते ती. गोंधळीवाङ्मय – (पराग जून १९४८)

तीन साधनें ज्ञानाचीं-१ सहज प्रवृत्ति, २ तर्कबुद्धि व ३ अंतःस्फूर्ति वा अपरोक्षानूभूति, (सार्वजनीन धर्म-स्वरूप व साधना)

तीन लक्षणें आप्ताचीं – (यथार्थ वक्ता)- १ कर्तव्य दक्ष, २ निः-पक्षपाती व ३ सन्मान्य (सु.)

तिघांना आवरण्याचीम तीन साधनें-१ हत्ती-साखळदंड किंवा अंकुश २ घोडा-लगाम ३ स्त्री-ह्रदय-आलाने गृह्यते हस्ती वाजी वल्गासु गृह्यते । ह्रदये गृह्यते नारी ॥ (मृच्छकटिक १-५०)

त्रिरत्न-१ बुद्ध, २ धर्म व ४ संघ. या तीन्हींच्या समुच्चयांस त्रिरत्न म्हणतात.

त्रिविध योगपट्टक (वस्त्र)- १ व्याघ्राम्बर, २ मृगाजिन आणि ३ कार्पास वस्त्र.

त्रिविधं योगपट्टकमाद्यं व्याघ्राजिनोद्भवम् ‌ ।

द्वितीयं मृगचर्माढयं तृतीयं तन्तुनिर्मितम् ‌ ॥ (सु.)

ध्यान समयीं वापरावयाचे तीन वस्त्र प्रकार.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *