रविवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

raviwarche-abhang-warkari-bhajni-malika/

रविवार चे अभंग

अनुक्रमणिका – अभंग संख्या : ११.

१ खेळ मंडियेला वाळवंटीं घाई
२ भीमातीरीं एक वसविलें नगर ।
३ नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया
४ एके घाई खेळतां न पडसी डाई
५ बाराहि सोळा गडियांचा मेळा
६ अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी
७ अनंत जुगाचा देव्हारा
८ पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा ।
९ वारी वो वारी । देई कां गा मल्हारी
१० वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ आधीं
११ खंडेराया तुज करितें नवसू

रविवार चे अभंग प्रारंभ

1.            खेळ मंडियेला वाळवंटीं घाई

खेळ मंडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एकएकां लागती पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणे नामावळी रे ।
कळिकाळावरी घातली कास । एक एकाहून बळी रे ॥२॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे ।
टाळा मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिध्दसाधकां रे॥४॥
वर्णाभिमान विसरली याती । एकएकां लोटांगणीं जाती रे ।
निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णववीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥६॥

2.            भीमातीरीं एक वसविलें नगर ।

भीमातीरीं एक वसविलें नगर । त्याचें नांव पंढरपूर रे ।
तेथील मोकाशी चार भुजा त्यासीं । बाईला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसांवा रे ।
पुढें गेले ते निधाई झाले । वानितील त्यांची सीमा रे ॥२॥
बळियां आगळा पाळी लोकपाळा । रिघ नाहीं कळिकाळा रे ।
पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदु:खवेगळा रे ॥३॥
संत सज्जनीं मांडलीं दुकानें । जें जया पाहिजे तें आहे रे ।
भुक्ति मुक्ति फुकाचसाठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥४॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
नवजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥५॥
बहुत दीवस होती मज आस । आजीं घडलें सायासीं रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्य । भेटी तया पायांसी रे ॥६॥

3.            नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया

नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया । नाही तेंचि दिसूं लागलें रे ।
अरूप होतें तें रूपासी आलें । जीव शिव नाम पावलें रे ॥१॥
आपुलीच आवडी धरूनि खेळिया । आप आपणातें व्यालें रे ।
जोपनाकारणें केली बायको । तिनें एवढें वाढविलें रे ॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितलें । ऐसें जाणुनि खेळ खेळे रे ॥धृ॥
ब्राम्हणाचें पोर एक खेळासी भ्यालें । तें बारा वर्षे लपालें रे ।
कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलें रे ॥३॥
सहातोंड्या एक संभूचें बाळ । त्यानें बहुतचि बळ आथियेलें रे ।
खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलें रे ॥४॥
चहुंतोड्याचा पोर एक नार्‍याही जाण । तो खेळियांमाजी आगळा रे ।
कुचाळी करूनि पोरें भांडवी । आपण राहे वेगळा रे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें वना रे ।
खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शहाणा रे ॥६॥
खेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनीं रे ।
कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैंचा । तेथें कैंचें भांडण रे ।
रामा गड्याची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणें रे॥७॥
यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळला रे ।
लहान थोर अवघीं मारिलीं । खेळचि मोडुनि गेला रे ॥८॥
ऐसे खेळिया कोट्यानुकोटी । गणीत नाहीं त्याला रे ।
विष्णुदास नामा म्हणे वडील हो । पाहा देहीं शोधूनि रे ॥९॥

4.            एके घाई खेळतां न पडसी डाई

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरीं थोर कष्टी होसी । या चौघांची तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनियां निराळाची राही । सांडी या विषयाची घाई रे ।
येणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाण माझ्या भाई रे ॥२॥
शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे ।
आपुल्या सवंगडियां शिकवूनी घाई । तेणें सतत फड जागविला रे ।
एके घाई खेळतां न चुकेचि कोठें । तया संतजन मानवले रे ॥३॥ ज
्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे ।
सकळिकां मिळोनि एकचि घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥४॥
रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ।
पाचां संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे ।
ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यानीं । तोहि खेळिया निवडिला रे ॥५॥
ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनियां तेणें । वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ॥६॥
आणिक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा । पुढीलांची धरूनियां सोई रे ।
एकचि घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥७॥

5.            बाराहि सोळा गडियांचा मेळा

बाराहि सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस्पद राखो जाणें टिपरिया घाई । अनुहत वाय मांदळा रे ॥१॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहुं रे ॥२॥ सा चहुं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥३॥ आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय । तुका म्हणे वृध्द होती तरणे रे ॥४॥

6.            अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी

अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी । सावध होऊनि भजनीं लागा देव करा कैवारी ॥१॥ मल्हारीची वारी । माझ्या मल्हारीची वारी ॥२॥ इच्छा मुरळीस पाहूं नका पडाल नर्कव्दारीं । बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी॥३॥ आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारीं । एक जनार्दनीं धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी॥४॥

7.            अनंत जुगाचा देव्हारा

अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधाचा घुमारा । अवचित भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥१॥ शुद्ध सत्वाचा कवडा मोठा । बोध बिरडे बांधला गांठा । गळा वैराग्याचा पट्टा । वाटा दाऊं भक्तीच्या ॥२॥ ह्रदय कोटंबा सागातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पातीं ॥३॥ लक्ष चौर्‍यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न झाला देव मल्हारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥ या देवाचें भरतां वारे । अंगीं प्रेमाचें फेपरें । गुरु गुरु करी वेडेचारें । पाहा तुके भुंकविलें ॥५॥

8.            पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा

पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥धृ॥ वरल्या आळीला तुम्ही सावद राहावे । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावे ॥१॥ मधल्या आळीला एक बायको फीरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे । नाहीं तरी पाटलोबा तिची पळतील गुरें ॥२॥ आणिक एक बारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥३॥ आणिक एक ऐका कैंचे नवल झालें । गांवच्या पांड्यांनीं पाटलास नागविलें । सार्‍या कागदाचें शून्य एकचि केलें ॥४॥ हिंडतां फिरतांना एक शकुन सांगे । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥५॥ हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं बा काळ बांधून नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥६॥

9.            वारी वो वारी । देई कां गा मल्हारी

वारी वो वारी । देई कां गा मल्हारी । त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥ वाहन तुझें घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी एसी पाहीन जेजुरी ॥२॥ ज्ञान कोटंबा घेऊनी आलों व्दारी । बोध भंडार लाविन परोपरी । एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ॥३॥

10.      वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ

वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ आधीं कळसु मग पाया हो । देव पुजू गेलो तंव देऊळ उडालें पान नाहीं तेथें वडु रे ॥१॥ चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥ पाषाणाचा देवो पाषाणाचा भत्कु पोहती मृगजळ डोहीं हो । वांझेचा पुत्र एक पोहों लागला तो तारी देव भत्का हो ॥३॥ भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोहीं हो । न सापडे आत्मा बुडाले संदेहीं ते गुंतले मायाजळीं हो ॥४॥ विरुळा जाणें पोहते खुणें केला मायेसी उपावो हो । बापरखुमादेविवरु विठ्ठल विसावा तेणें नेलें पैल थडी वो ॥५॥

11.      खंडेराया तुज करितें नवसू

खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥ सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥ सासरा मेलिया होईल आनंद । मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥ नणंद मरतां होईन मोकळी । गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥ जनी म्हणे खंडे अवघे मरुं दे । एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥

रविवार चे अभंग समाप्त

सात वाराचे अभंग पहा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading