ग्रामगीता अध्याय १ ला, देव-दर्शन

ग्रामगीता अध्याय १ - देव-दर्शन
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका ! एकचि असोनि अनेका । भासशी विश्वरूपी ॥१॥
आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर । अणुरेणूतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥
आपणचि मंदिर, मूर्ति, पूजारी । आपणचि पुष्पे होऊनि पूजा करी । आपणचि देवरूपे अंतरी । पावे भक्ता ॥३॥
गणेश, शारदा आणि सदगुरू

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

🕉ग्रामगीता
प्रस्तावना
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय पहिला प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita Chapter I Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय १ – देव-दर्शन


देव-दर्शन
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका ! एकचि असोनि अनेका । भासशी विश्वरूपी ॥१॥
आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर । अणुरेणूतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥
आपणचि मंदिर, मूर्ति, पूजारी । आपणचि पुष्पे होऊनि पूजा करी । आपणचि देवरूपे अंतरी । पावे भक्ता ॥३॥
गणेश, शारदा आणि सदगुरू । आपणचि भक्तकामकल्पतरू । देवदेवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ॥४॥
नाना चातुर्यकला – व्यापे । आपणचि गाये नाचे आलापे । प्रसन्न होऊनि आपणचि सोपे । भक्तिफळ दावी ॥५॥
गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहता मुळीचे । सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥
हे जयाचिया अनुभवा आले । त्याचे जन्ममरणदुःख संपले । आत्मस्वरूप मूळचे भले । ओळखले म्हणोनिया ॥७॥
त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म । तो जे जे करील ते ते कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावात शिरली । म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हापाशी ॥९॥
जेव्हा तुझे दर्शन घडे । उघडती विशाल ज्ञानाची कवडे । मग मी – तू – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे ? ॥१०॥
ज्यासि तुझे दर्शन घडले । त्यास कैचे परके राहिले ? । सर्व विश्वचि झाले आपुले । दिव्यपणी ॥११॥
परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखे आनंद कुठला आम्हासि ? आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥
दुसर्‍याची उणीव पाहता हसणे । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणे । दुसर्‍याचे वैभव देखोनि जळणे । होते ऐसे ॥१३॥
कष्टासाठी कोणी मरो । प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो । लोभासाठी कुणाहि स्मरो । होते ऐसे ॥१४॥
हे जेव्हा अनुभवा आले । तेव्हाच ” अल्पज्ञ आम्ही ” कळले । म्हणोनि तुझ्या नामी वेधले । चित्त सर्वतोपरी ॥१५॥
दुजा कोणा शरण जावे । तरी सर्वांगीण शक्ति केवि पावे ? एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥
उजेडाकरिता काजवे धरावे । भुललिया मार्गी परतो जावे । तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे । निर्भयपणे ? ॥१७॥
तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वये क्षणात उडाली । तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥
तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळाही न ढळशी । सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥
यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून । अनुभवया आपुले चिंतन । ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥


सुर्य जैसा नभी उगवला । अंधकाराचा नाश झाला । तैसा तू हृदयी प्रकटला । जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥
चंद्राचे किरण व्यापले । चकोरचित्त प्रसन्न झाले । तैसे तू आपुलेसे केले । मग पळाले ताप सारे ॥२२॥
जोवरि पंचानन नाही दिसला । तोवरि अतिगर्व जंबुकाला । तैसा तुझा प्रकाश नाही पडला । तोवरि ग्रासती विकारशत्रु ॥२३॥
सूर्ये जीवन देता आपुले । कमल जैसे हसले फुलले । तैसे तुझ्या दर्शनाने झाले । कॄपापात्र जीवाचे ॥२४॥
राजहंसे चोच पुरविता । पाणीदुधाची होय भिन्नता । तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता । दोष – निर्दोषता उमगे ॥२५॥
अति काळोखी वीज कडाडे । दुरावला गडी दृष्टीस पडे । तैसी तुझ्या दर्शनप्रतापे घडे । शांतिप्राप्ति ॥२६॥
अज्ञानामुळे विकार माजती । अज्ञानेचि लाभते कुसंगति । अज्ञानानेच दुरावते प्राप्ति । सत्यस्वरूप देवाची ॥२७॥
तुझे दर्शन म्हणजे ज्ञान । अंतरंगात आनंदभान । वस्तु भरोनी पूर्णपण । तुझ्या ठायी ॥२८॥
म्हणोनी हे ज्ञानसमुद्रा ! पूर्णकलात्मक आत्मचंद्रा ! सर्वांगविकासा स्वर्गमुनींद्रा ! कृपा करी आम्हावरी ॥२९॥
जीवाचे दारिद्र्य द्याया निवारून । एक तूचि आहेसि संपन्न । म्हणोनी आलो तुझ्या शरण । सर्वज्ञा आदिपुरूषा ॥३०॥
होतो तुझेचि परि दुरावलो । ठायीच असोनि भुललो । मृगजळास पाणी समजोनि धावलो । हरिणापरी ॥३१॥
सुकलिया नदीसि पाहूनि । त्रस्त होती पिपासू प्राणी । भरते येता जाती आनंदूनि । तैसेचि करी आम्हासि ॥३२॥
कोवळे अंकुर भूमीवरि फुटले । जेथे मंदशीतल वर्षा चाले । त्यापरीच समाधान झाले । आर्त जीवाचे तवकृपे ॥३३॥
ऐसे व्हावयासि करतो प्रार्थना । तन्मय करोनी जीवप्राणा । भिन्न उरोचि नये वाटे मना । व्हावे लवणा – समुद्रापरी ॥३४॥
यात असती किती अडथळे । आकुंचित केले अज्ञान – मळे । परि तुझ्या विशालतेचे चिंतन बळे । करील मोकळे आम्हासि ॥३५॥
आम्ही कितीहि दडलो पडलो तरी । तुझे लक्ष उडत्या घारीपरी । निवडोनि काढी अज्ञानाबाहेरी । सुख सर्वतोपरी द्यावयासि ॥३६॥
भुललिया वत्सा गाय हंबरे । पक्षिणी अंडाभवती फिरे । तान्हुल्या माय काम करिताहि सावरे । आपुलेचि म्हणोनि ॥३७॥
भिंगोटी अळीसि गोंजारी । निज्यध्यासे आपणासमान करी । तैसा देव भक्तालागी घरी । साधनजाळे पसरोनि ॥३८॥
ऐसे हे प्रत्यक्षचि घडे । जीव आर्त होता मार्ग सापडे । मार्गे चालता साक्षात्कार जोडे । व्यापक देवदर्शनाचा ॥३९॥
हे जाणोनि करितो प्रार्थना । पूर्ण व्हावया मानवांची आरधाना । विश्वरूप पहाया देवदर्शना । आलो चरणा निर्धारे ॥४०॥
तू व्यापक सर्वातरात्मा । सत्यज्ञानानंद निष्कामा । तैसेचि होणे ह्रदये आम्हा । तरीच होय तुझी भक्ति ॥४१॥
म्हणोनि आमुची बुध्दि विशाल करी । कर्म करावया भूलोकावरि । आयुष्य दे शतक निर्धारी । जीवो आम्ही विश्वसेवे ॥४२॥
पुण्यक्षेत्र पंढरपुरी । बैसलो असता चंद्रभागेतिरी । स्फुरू लागली ऐसी अंतरी । विश्वाकार वॄत्ति ॥४३॥
तेथे दृष्टांत होई अदभूत । कासया करावी विश्वाची मात ? प्रथम ग्रामगीताचि हातात । घ्यावी म्हणे ॥४४॥
विश्व ओळखावे आपणावरून । आपणचि विश्वघटक जाण । व्यक्तिपासूनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ॥४५॥
समाजापुढे ग्राम आहे । ग्रामापुढे देश राहे । देश मिळोनि ब्रह्मांड होय । गतीगतीने जवळ ते ॥४६॥
मानवमात्रांचे प्रथम माहेर । आपुले गाव त्यातील घर । यातूनि प्रगति करीत सुंदर । पुढे जावे विश्वाच्या ॥४७॥
प्रथम पाया मानव – वर्तन । यास करावे उत्तम करावे जतन । गाव करावे सर्वांगपूर्ण । आदर्श चित्र विश्वाचे ॥४८॥
गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा । गावचि भंगता अवदशा । येईल देशा ॥४९॥
आकारे पॄथ्वी असो विशाल । नद्यापर्वतांनी महाप्रबल । परि आमुचे गावचि मूल । घटक विशाल पॄथ्वीचा ॥५०॥


गावचि जरि उत्तम नसले । तरि देशाचे भवितव्य ढासळले । ऐसे मानावे जाणत्याने भले । ह्रदयामाजी ॥५१॥
गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न । विश्व प्रसन्न, देव प्रसन्न । सर्वाआधी मन प्रसन्न । करावयाचे आपुले ॥५२॥
हे ओळखाया ज्ञान व्हावे । ज्ञान अनुभवासि आणावे । मगचि सुख संपादावे । विश्वरूप – दर्शनाचे ॥५३॥
जाणावे ग्राम हेचि मंदिर । ग्रामातील जन सर्वेश्वर । सेवा हेचि पूजा समग्र । हाचि विचार निवेदावा ॥५४॥
यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ । आचरण – ज्ञान मूळारंभ । सक्रियतेचा मूळस्तंभ । उभारावा ॥५५॥
ऐसा ऐकिला मधुर आवाज । भीमेतरी असता सहज । तैसाचि वंदिला पंढरीराज । ध्यानरूपाने ॥५६॥
केले साधुसंतांचे चिंतन । करावया ग्रामाचे पुनर्निर्माण । नवीन काहीच न सांगेन । जुनेचि देणे देवाचे ॥५७॥
संतमहंतांनी कथन केले । परि ते पुढे विपर्यस्त झाले । मानवा – मानवांत खंड पाडले । पाखंडयांनी ॥५८॥
विशालता गेली मानवांची । रचना केली जातिपंथांची । कामाची होती ती कायमची । विभागणी माथी बैसली ॥५९॥
सेवेसाठी पंथ – मंडळ । ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ । असोनि एकचि गोपाळ । लढले जैसे यादवापरी ॥६०॥
हे व्दैत जावे निघोन । म्हणूनि सेवा आरंभावी आपण । ऐसा संकल्प दृढ धरोन । ग्रंथ केला सदभावे ॥६१॥
आपुल्यापरी काम घ्यावे । जैसे जयासि साधेल बरवे । उत्तमचि करित जावे । ईश्वरगुरूसि स्मरोनी ॥६२॥
वाडःमयी सेवा सेवाचि जाण । जेणे मार्गी लागती जन । जन तितुका जनार्दन । जाणूनि कार्य करावे ॥६३॥
जे जे आपणासि कळते । ते ते सांगावे सकळाते । आपुलेचि म्हणोनि जन ते । मायबाप ॥६४॥
सांगणाराचि हुशार झाला । ऐकणारा वाया गेला । ऐसा समज ज्याने केला । बुडाला तो अहंकारे ॥६५॥
सर्वचि ऐकतील ऐसे नाही । यासि आहे मागील ग्वाही । म्हणोनि सेवा खंडो द्यावी । ऐसे नाही उचित ॥६६॥
आत्मसंतोषाकारणे । विश्वसेवेच्या प्रेरणेने । ग्रंथ रचिले सहृदयपणे । थोर जनांनी ॥६७॥
काही सांगती वेश्वाची कहाणी । काही बोलती देश लक्षूनि । आपण सांगावी ग्रामावरूनि । ग्राम – गीता ॥६८॥
कृष्णगीता रामगीता । हंसगीता हनुमंतगीता । शिवगीता अवधूतगीता । कथिल्या कोणी ॥६९॥
गुरूगीता गणेशगीता । पांडवगीता भगवदगीता । देवगीता देवीगीता । सर्व झाल्या ॥७०॥


सर्वाचा एकचि सार । शुध्द करावे हॄदय – मंदिर । सुखी करावे चराचर । तरिच पावे सदगति ॥७१॥
” विश्वब्रम्ह ” बोलत गेला । सभोवती समाज दुःखी बुडाला । ग्रामसेवाहि न कळे ज्याला । त्याचे ज्ञान व्यर्थचि ॥७२॥
वनी तीर्थी फिरोनी आला । आपुला गाव नाही सुधारला । तो कैसा म्हणावा महाभला । एकटाचि ? ॥७३॥
संतांचे ऐसेचि वचन । आपण तरला ते नव्हे उध्दरण । लोकास लावी सन्मार्ग पूर्ण । तोचि तरला पूर्णपणे ॥७४॥
ठेवोनिया संतांवरि विश्वास । हाचि धरिला मनी निजध्यास । आरंभ केला ग्रामगीतेस । आपुल्यापरी सेवाभावे ॥७५॥
माझी मला साक्ष आहे । मी ग्रंथकर्ता विद्वान नोहे । परि धान्यराशीत आपुले पोहे । टाकावे वाटती ॥७६॥
देव प्रेमाचा भुकेला । न पाही जातपात अथवा कला । साधाभोळाहि उध्दरिला । ऐसा लौकिक तयाचा ॥७७॥
देव सौंदर्याचा भोक्ता असता । तरि कुब्जेवरि का प्रसन्न होता ? देव जरि वैभवचि इच्छिता । तरि विदुराघरी का धावे ? ॥७८॥
देवा कलाकौशल्याचि रूचे । तरि का वेड पेंध्यावाकुडयाचे ? मीपण जिरवी ब्रम्हदेवाचे । तेथे पांडित्य काय करी ? ॥७९॥
ऐसे देवाचे गोडवे । सांगावे ते कमीच पडावे । म्हणोनि आपुल्यापरी चिंतावे । कार्यं करावे भक्तीने ॥८०॥
आपुला विश्वास जैशापरी । तैसी करावी चाकरी । येथे बोलायची उरी । आहे सर्वालागोनि ॥८१॥
आपणासि देवापायी समर्पावे । विश्वी विश्वाकार व्हावे । पहावे तैसे बोधीत जावे । जीवालागी ॥८२॥
ऐसे धरोनी मानसी । आरंभ केला ग्रामगीतेसि । प्रार्थूनिया संतमहंतासि । आशीर्वाद घेतला ॥८३॥
संतमहात्माचे हृदगत । देवाला शुभ सृष्टिसंकेत । विशद कराया सरळभाषेत सुखसंवाद आरंभिला ॥८४॥
येथे श्रोती विचारिले । ग्रामगीतेप्रति लिहीणे झाले । त्यात संतदेव कासया घातले । स्तुतिस्तोत्रे गौरवूनि ? ॥८५॥
आपुले गाव उन्नत करावे । सकल लोक हाती घ्यावे । यासि देवाचे गोडवे । गावेत कासयासि ? ॥८६॥
काय देव न म्हणता काम नोहे ? संता न भजता वाया जाय ? आशीर्वाद न घेता येतो क्षय । सत्कार्यासि ? ॥८७॥
कासयासि मध्यस्थता ? उगीच देवधर्मांची कथा । करवी सर्व आपण गाथा । मारावी माथा देवाच्या ॥८८॥
ऐसे देवावरि विश्वासूनि । लोक झालेत दुबळे मनी । गाव भिके लागले याच गुणी । सोडा ” देव देव ” बोलणे ॥८९॥
तुमचे म्हणणे मी ऐकले । लोक पराधीन आळसी झाले । परि देवाने ऐसे सांगितले । कोठे आहे ? ॥९०॥


अहो ! देवचि ऐसा नाही झाला । मग सांगेल कैसा इतरांला ? हा तो विपर्यास केला । भित्र्या आळसी लोकांनी ॥९१॥
ज्यासि करणे नको काही । त्याने द्यावे देवाची ग्वाही । आपुली पापे लपवावी सर्वही । पाठीमागे ॥९२॥
लोकात वाढवावा भ्रम । आपुले चुकवावेत श्रम । देवाचिया नामे चालवावे कुकर्म । त्यांनीच समाज बुडविला ॥९३॥
म्हणोनि मी तैसे न सांगेन । येथे जे केले देवस्मरण । ते भित्रे आळसी कराया जन । नाही जाणा निर्धारे ॥९४॥
देव म्हणजे कर्तव्यशूर । न्यायनीतीचे माहेर । क्रांतीकार्याचे दिव्य निर्झर । अग्रसर जगामाजी ॥९५॥
देव म्हणजे अतिमानव । मानवाचा आदर्श गौरव । त्यांचे कार्य ध्यानी राहो । फूर्ति यावया पुढिलासि ॥९६॥
येथे मुख्य देवाचे व्याख्यान । नाही केले यथार्थ पूर्ण । देवासि पुरूषोत्तम समजून । वागा म्हणालो सर्वाना ॥९७॥
मुख्य देवाचे आरंभी स्मरण । त्यातहि त्याचे एकेक लक्षण । तेच साधकासि व्हावे साधन । म्हणोनिया आठविले ॥९८॥
चला विशालतेच्या मार्गी । जे गेले ते तरले जगी । भरोनि दिली अंतरंगी । हीच कीर्ती भाविकांच्या ॥९९॥
मित्रहो ! गाव व्हावे स्वयंपूर्ण । सर्व प्रकारे आदर्शवान । म्हणोनीच घेतले आशीर्वचन । पूर्वजांचे ॥१००॥


आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन । ऐकोनि घ्यावे देऊनि श्रवण । त्या फळवावे कार्य करोन । यासि आशीर्वाद बोलती ॥१०१॥
लोक थोर आशीर्वाद घेती । परि कार्य थोडेहि न करिती । तेणेचि फजीत पावती । गुलाम दुर्बळ होऊनि ॥१०२॥
आमुचे आशीर्वादाचे लक्षण । थोरांनी करावे मार्गदर्शन । बोधमार्ग उमगावा आपण । सफल करावा संकल्प ॥१०३॥
एरव्ही थोरानी म्हणावे ” शतं जीव ” । आम्ही व्यसने करावी मृत्युठेव । अभ्यास न करिता ” बुध्दिमान भव ” । आशीर्वाद कैसे फळे ? ॥१०४॥
अंध दुबळा भाविकपणा । तो कधीहि न रूचे माझ्या मना । संतदेवाची निष्क्रिय गर्जना । करील तो अस्तिक नव्हे ॥१०५॥
आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक । चालती आम्हा ऐसे नास्तिक । ज्यांचा भाव आहे सम्यक । ” सुखी व्हावे सर्व ” म्हणूनि ॥१०६॥
भलेही तो देव न माने । परि सर्वा सुख देऊ जाणे । मानवासि मानवाने । पूरक व्हावे म्हणूनिया ॥१०७॥
ग्रामातील सर्वजन । होवोत सर्वसुख – संपन्न । घेऊ नये कुणाचा प्राण । समाजस्थिती टिकावी ॥१०८॥
आम्ही सर्वचि संतुष्ट राहू । सर्व मिळोनि सर्व खाऊ । राबू सर्व, सुखे सेवू । जे जे असेल ते सगळे ॥१०९॥
आमची संपत्ति नसे आमची । आमची संतती नसे आमची । कर्तव्यशक्तीहि नसे आमची । व्यक्तिशः उपभोगार्थ ॥११०॥
हे सारे गावाचे धन । असो काया वाचा बुध्दि प्राण । ऐसे असे जयाचे धोरण । तो नास्तिकहि प्रिय आम्हा ॥१११॥
तो तत्त्वतः नास्तिकचि नोहे । जो सर्वासि सुखविताहे । तो ” देव देव ” जरी न गाये । तरी देवसेवाचि त्या घडे ॥११२॥
आम्ही देवाचे नांव मध्ये घातले । परि सर्वाच्या सुखार्थ कार्य केले । कर्तव्यतत्परतेसीच वर्णिले । जिकडे तिकडे ॥११३॥
लोकापुढे विशाल ज्ञान । ठेवाया अत्युच्च आदर्श कोण । म्हणोनि देवाचे नामाभिधान । घेतले विशाल भावाने ॥११४॥
आम्ही आपुल्यासाठी मरतो । देव सकळासाठी कार्य करतो । हाचि भाव त्याने स्फुरतो । म्हणोनि धरिला देव चित्ती ॥११५॥
देव म्हणजे घेवचि नोहे । सर्व काही देवचि आहे । ऐसा ज्याचा संप्रदाय । त्यासि भजू जीवेभावे ॥११६॥
अंतिम ध्येय अखंड शांति । अनुभवा यावी जीवाप्रति । याचलागी केली स्तुति । साध्यसाधनाची ॥११७॥
जे शांती आणि सत्य । अंगी मुरवोनि झाले कृतकॄत्य । तेचि सेवामुर्ति संत स्तुत्य । आदर्शरूपे ॥११८॥
उदारचरित संतसज्जन । मनोभावे तयासि वंदन । जे उपदेशिती ” जनी जनार्दन ” । गाव संपन्न करावया ॥११९॥
साधुसंत देवधर्म । मानवोध्दारचि त्यांचे कर्म । तेचि आठवूनि उध्दरू ग्राम । तुकडया म्हणे ॥१२०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र – स्वानुभव संमत । देवसंत वंदोनि कथिले ह्रदगत । प्रथम अध्याय संपूर्ण ॥१२१॥

ग्रामगीता अध्याय पहिला समाप्त

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading