आद्य शंकराचार्य भाग १०, (४६ ते ५०)

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  आद्य शंकराचार्य !!! 

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – ४६.

                 आचार्य म्हणाले,  

” मुंडन करायचे असते ; ते आपल्या वासनांचे. जी वासना षडरिपूंच्या आहारी जाते, ती ताब्यात आणायची. आणि भगवी वस्त्रे म्हणजे तरी काय? ते स्वार्थत्यागाचे प्रतीक आहे. तुमची स्वार्थ बुद्धी नष्ट होऊन वासनावर विजय मिळवला की सहज आनंदमार्ग सापडेल. संसारातील सुख म्हणजेच वासनांवर विजय. स्वार्थ त्याग म्हणजे संसारातील आनंद!”

    आचार्यांची ज्ञानगंगा स्रवतच होती •••••

” नुसती भगवी वस्त्रे धारण केली म्हणून कोणीही संन्यासी थोडाच होतो ? भगवी वस्त्रे घालायला हवीत आपल्या मनाला !! मनात वासना आणि देहावर भगवी वस्त्रे म्हणजे केवळ ढोंग असते. आणि संसारात राहूनही जो समष्टीसाठी झटत असतो ; कर्तव्य कर्मे पार पाडून ईश चिंतनात मग्न असतो तोच खरा संन्यासी !! ”   

        दुसरी सभा राजवाड्यात ठेवली होती.   सभेत आचार्य म्हणाले,

     ” वैदिक धर्मात अद्वैत सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अद्वैत म्हणजे तरी काय? ” न विद्यते द्विधा भावो यत्र तत्।” ज्यांच्या ठिकाणी भेदभाव नाही ते अद्वैत. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी फक्त एकच एक ब्रम्हस्थिती आहे. हे समजले की आप-परभाव नाहीसा होऊन समभाव जागृत होईल.” ब्रह्म सत्य, जगत मिथ्या ” हा मूळ सिद्धांत जर ध्यानात घेतला की शांती समाधान लाभेल.इथे जगताचे सतत  बदलणारे स्वरूप म्हणजे मिथ्या असे समजावे. मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थ घ्यायचाच नाही. मन:शांतीसाठी संसार त्याग करण्याची गरज नाही. आमचा वेदांत दुबळा नाही त्यात अग्नीची प्रखरता, शस्त्रांची तीक्ष्णता, चंद्र रेश्मीची तेजस्विता, सौदामिची चमक एकवटली आहे. तो  वर्धिष्णु;  जयेष्णु आणि सनातनही आहे. शिवाय साधुसंतांनी त्याला सहिष्णुही बनवले आहे. मोक्षप्राप्तीसाठी संसार त्याग करून, संन्यास आश्रम स्वीकारलाच पाहिजे असे नाही, तर उत्तम संसार करत निरपेक्ष बुद्धीने, निष्काम मनाने नेमलेले कार्य व्यवस्थित करून स्वतः निष्कलंक राहून परोपकारबुद्धी असेल तर संसारच परमार्थ होय. शुद्ध, सत्य धर्माने संसार करणाराच  “कर्मयोग” ठरतो.”

          शंकराचार्य एक एक मुद्दे क्रमाक्रमाने विविध ठिकाणांच्या सभेत खुलासेवार सांगत होते. त्यांच्या  सांगण्याच्या आकर्षक पद्धतीने, विषय सुलभ करून सांगण्यामुळे लोकमानसावर परिणाम होत होता. आजपर्यंत कधीही न ऐकलेल्या गोष्टी लोकांना ऐकायला मिळत होत्या .त्यामुळे धर्मापासून दुरावलेल्याना  दिलासा मिळून ते  वैदिक धर्मानुकूल होऊ लागले.  लोकजागृती घडू लागली. त्यामुळे प्रमुख बौद्ध भिक्खूंमध्ये मात्र खळबळ माजली. आचार्यांच्या प्रचाराला अटकाव केला नाही तर आपला बौद्ध धर्म नष्ट होईल, म्हणून त्यांनी जगद्गुरूंची वादसभा आयोजित केली.

              वादसभेत शंकराचार्यांनी बुद्धांविषयी पूर्ण आदर व्यक्त करून,  त्यांनी मांडलेले मुद्दे व्यवस्थित खोडून काढून नामोहरम केले. वैदिक धर्म हाच सनातन धर्म आहे हे समर्थपणे सिद्ध केल्यामुळे, बौद्ध प्रचारकांना बराच आळा बसला.

           अल्पावधीतच जगद्गुरूंच्या प्रचंड कार्यामुळे, नेपाळ नरेश  आश्र्वस्त  झाले. वैदिक धर्मास अनुलक्षून राज्यशकट हाकता येईल असे त्यांस वाटू लागले. त्याने आचार्यांविषयी  कृतज्ञता व्यक्त करून उपकार मानल्यावर, आचार्य म्हणाले,  

   ” धर्मकार्यात उपकाराची भाषा नको. वैदिक धर्म आपला सर्वांचा पिता आहे. आणि मी पितृकर्तव्य केले.  हे राजन ; तू फक्त या धर्माची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न कर. ती सतत प्रज्वलित राहील याची काळजी घे.”

  नरेशानी आनंदाने आचार्यांच्या म्हणण्यास मान्यता दर्शविली…..

          आचार्यांनी नेपाळ ;  बौद्ध धर्मापासून मुक्त करून ते केदारनाथ कडे निघाले. सोनगंगा पार करून, त्यांची धर्मयात्रा केदारनाथचा पवित्र पर्वत चढत होती.  सभोवतालची पर्वतराजी जणू राजमुकुट घातल्यासारखी दिसत होती. जणू ती साद घालत असल्याची आचार्यांना जाणीव झाली.

          श्री केदारनाथाच्या स्वयंभू लिंगासमोर आचार्य उभे राहिले. आचार्य माहिती देत म्हणाले,  

” हे केदारनाथ स्थान म्हणजे नंदिकेश्वराचा पार्श्वभाग आहे. नंदीचे मुख म्हणजे पशुपतिनाथ. महाभारतातील कथेनुसार कपटवेषाने पळून जाणाऱ्या नंदीला भीमसेनाने आपल्या दोन्ही पायात धरले, त्यावेळी नंदीचा पार्श्वभाग इथे व मुख नेपाळपर्यंत गेले.”

             केदारनाथची यथासांग पूजा आटोपून,  आचार्य ; मंदिरात मागे असलेल्या गुहेजवळ आले.  त्यांना कुणीतरी साद घातल्याचा भास झाला म्हणून, ते डोळे मिटवून स्तब्ध उभे राहिलेत. त्यांना वाटले, ही साद मानवी नसून प्रत्यक्ष ईश्वरी संकेत आहे.

       आचार्य अंतःर्मनाशी बोलू लागले..

” गुरुदेवा, तुम्ही साद घालत असलेल्या ठिकाणी इथले कार्य आटपून लवकरच येतो. सध्या इथे मुक्ती लिंगाची स्थापना करतो आहे.”.

          श्री केदारनाथाहून परततांना शंकराचार्यांच्या आतापर्यंत केलेल्या अथक परिश्रमाला चांगलेच फळ आल्याचे दिसून येत होते. आर्य सनातन वैदिक धर्म समूळ नष्ट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, शंकराचार्यांनी चमत्कार घडवला होता. जिकडे तिकडे वैदिक धर्माचे प्राबल्य वाढीस लागले होते……

      गुहाटीला आल्यावर  त्यांनी आजेगुरू भगवन गौडपादाचार्यांचे दर्शन पण घेतले.  आचार्यांच्या कार्याबद्दल  आजेगुरूंनी संतोष व्यक्त केला. प्रवासाचे टप्पे भराभर ओलांडत असताना ;  श्रृंगेरी पीठ जवळ येत होते. हा दक्षिण प्रदेश म्हणजे कापालिक, कालमुख पाशुपत यांच्या कचाट्यात सापडलेला विभाग !! अशोक सम्राटांनी येथे येऊन बौद्ध धर्माची घडी बसवण्यासाठी खूप कष्ट घेतले. शिलालेख कोरले. शिवाय जैन, वैष्णव, शैव धर्माचे हे प्रमुख स्थान. त्याचे मन वैदिक धर्माकडे वळवणे महाकठीण काम होते.

     हाच सर्व विचार करून, सुरेश्वराचार्यासारखा वयाने, अनुभवाने परिपक्व, कुशल धर्मप्रचारक, वैदिक धर्माशिवाय दुसऱ्या धर्माचा शिरकाव होऊ देणार नाही इतके समर्थ !! म्हणून त्यांची नियुक्ती आचार्यांनी श्रृंगेरी पीठावर केली होती. आणि सुरेश्वराचार्य आचार्यांच्या कसोटीत पूर्णपणे उतरले होते. कौशल्य पणाला लावून उतरले होते.

            जगद्गुरुंनी श्रृंगेरीत प्रवेश केल्याचा आनंद सुरेश्वराचार्यांना अतोनात झाला. त्यांनी आचार्यांची पाद्यपूजा केली. क्षेमकुशल चौकशी झाली. सुरेश्वराचार्य म्हणाले, 

  “आचार्य, आपल्या निर्देशानुसार सर्व कार्य काटेकोर चालू आहे. वैदिक धर्माला लोक अनुकूल होत आहेत.”

   ” ठीक आहे. तुमचे वार्तिक  लिहिण्याचे काम चालू आहे ना? “

     “होय गुरुदेव !! “

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १०-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – ४७.

               सुरेश्वराचार्य पुढे म्हणाले,

” दशोपनिषदावरील भाष्यांचे वाचन करताना मला  प्रकर्षाने जाणवले की, शतकानुशतके समाजाला अध्यात्मिक तत्त्वज्ञान  आणि रचनात्मक कार्यांच्या कल्पनेचा विसर पडलेला असताना ; आपण सर्वांना जागृत करून  पुन्हा नव्या स्वरूपात  स्मृती नष्ट झालेला भूतकाळ पुन्हा उभारला.”

      ” हे जगद्गुरु, आपण नुसते ध्येयवादी नसून चतुर द्रष्टे आणि समाज-  धुरीण  कर्मयोगी आहात. आपल्या साऱ्या स्तोत्र संग्रहावरून आपल्यातली रसिकता, बुद्धी, कवित्व, विद्वत्ता, ईश्वरप्रेम, नितांत श्रद्धा इत्यादी अन्यसाधारण गुणांचे दर्शन होते ; आणि  मन थक्क होते. आपण कुशल संघटक असल्याचे  आपल्या दिग्विजय यात्रेने सिद्ध झालेच आहे. आपण खरोखरच गगनवेधी कर्तृत्ववान आहात. या उतार वयात आपल्यासारखा सद्गुरू लाभला, हे माझे सौभाग्यच  म्हणायला हवे.”

स्वतःची स्तुती ऐकणे सहन न होऊन आचार्य म्हणाले, 

  ” सुरेश्वराचार्य, मला तुम्हाला काही सांगायचे आहे…”

       सुरेश्वराचार्य स्वस्थ मनाने ऐकू लागले. आचार्य सांगू लागले…

   ” अहो, वयाच्या पाचव्या वर्षी गुरुकुलात गेलो. नवव्या वर्षी गुरुभेटीच्या तळमळीने केरळहून नर्मदा किनारा गाठला पुढे ओंकारेश्वराहून गुरुगोविंद यतींच्या कृपेने हिमालयात पोहोचलो. तिथे व्यास, शुक, वामदेव ;  गौडपादाचार्यांसारख्या श्रेष्ठींचे दर्शन झाले. इतकेच नाही तर प्रत्यक्ष दक्षिणमूर्ती भगवान गौरी शंकरांचे दुर्मिळ दर्शन झाले. परमगुरूंच्या आज्ञेने काशीवास घडला. अध्ययन व अध्यापन दोन्हीही साध्य झाले. शिवाय स्तोत्र लेखन, भाष्य लेखन सुरूच आहे. केवळ पाचव्या वर्षी  “बालबोध संग्रह” लिहिला.  पुढे गुरुआज्ञेने आणि  प्रेरणेने दिग्विजय यात्रा सुरू केली.  आणि आता  तुमच्यासारखे शिष्योत्तम मिळाल्याने मठस्थापना करू शकलो. वैदिक धर्म पल्लवित झाला. तो फलताफुलता ठेवणे हे पुढच्या पिढीचे काम आहे. तुम्ही वयाने, बुद्धीने, ज्ञानाने, श्रेष्ठ आहात, म्हणून हे तुमच्याजवळ बोलतो आहे. “

आचार्य पुढे  म्हणाले,

   ” मी केदारनाथला गेलो असता, तिथे दत्तात्रय गुहेत मला वेगळीच अनुभूती आली. हे स्थान आपले असून पूर्वनियोजित विश्रांती स्थान आहे. ” 

   हे आचार्यांचे  वक्तव्य ऐकून सुरेश्वराचार्यांना आश्चर्य वाटले. हा एवढा तरणाबांड विलक्षण कर्तृत्वाचा, विलक्षण प्रज्ञेचा युवक, अशी वृद्धासारखी विश्रांतीची भाषा कसा बोलतो? काय हेतू असेल?

        सुरेश्वराचार्य म्हणाले,  

  ” आचार्य, इतक्या दूर केदारेश्वरी जाण्यापेक्षा येथेच श्रृंगेरी पीठातच वास्तव्य करावे. मी आपली सर्वतोपरी सेवा करेन.”

   ” छे! छे! इथे राहिलो तर, तुमचे महत्त्व कमी होईल. आणि मला माझ्या शिष्याचे महत्त्व कमी होणे आवडणार नाही.”

“शिष्यात् इच्छेत् पराजयम्”  शेवटी त्यांनी  नित्यकर्मासाठी गुरु शिष्य संवाद आटोपता घेतला.

        आचार्यांना आमंत्रित करण्यासाठी स्वतः कांची नरेश आले. वंदन करून म्हणाले •••

   ” जगद्गुरु, आपल्या आज्ञेप्रमाणे शिवकाची आणि  विष्णुकांची नगरी उभारली आहे. पण कामाक्षी म्हणजे इच्छा पूर्ण करणारी देवी, पण तीच माता अघोरी कृत्ये करू लागली. आम्ही मानवांनी तिच्यावर कसे नियंत्रण ठेवावे? ती नरबळी घेते.”

आश्चर्याने  आचार्य म्हणाले, 

” ती कपालीकांच्या स्वाधीन झाली की काय?” राजसेन म्हणाले,

   ” दिवसा ती गुहेच्या पोकळीतच राहते आणि रात्री बाहेर येऊन नरबळी घेते. अत्यंत अघोरी, भक्षणाला  लालचावलेली आहे. तिला शुद्ध सात्त्विक उपासना नकोशी झाली आहे.”

       आचार्य सुरेश्वराचार्याकडे दृष्टीक्षेप टाकून म्हणाले,  

  ” आपण आधी कांची नगरीला जाऊन तिथे   श्रीशिवजीची व श्रीविष्णूची प्राणप्रतिष्ठा करू. नंतर आदिशक्ती कामाक्षी देवीच्या मंदिराच्या उभारणीचे बघू.”

            आचार्यांचे कांची नगरीत भव्य स्वागत झाले. त्यांनी आपला मुक्काम एकाम्रनाथ या शिव मंदिरात केला. शिवकांची, विष्णुकांची नगरांची रचना, पुष्करणी, मंदिराची अप्रतिम शिल्पे पाहून, आचार्य समाधान पावले. समारंभ पूर्वक शिव-विष्णूची प्राणप्रतिष्ठा, पूजाअर्चा, नैवेद्याची योजना करून ते कामाक्षी ठाण्याजवळ आले.

          वास्तविक ही आदिमाया नगरांची रक्षणकर्ती ग्रामदेवता !!  पण तिचे वास्तव्य निर्जन, ओसाड जागेत होते. एका कोनाड्यावजा जागेत तिला बसवलेले पाहून आचार्यांनी खेद व्यक्त केला. एवढ्या वैभवसंपन्न शक्ती देवतेची ही विटंबना? त्यांनी राजाला कामाक्षी देवीची सुवर्णाची भव्य मूर्ती व मंदिराची उभारणी करण्यास सांगितले.

       जेव्हा आचार्य आदिशक्तीच्या त्या निर्जन, ओसाड ठाण्याकडे एकटेच निघाले तेव्हा, हितचिंतकांनी त्यांना आडकाठी करत म्हणाले,

” ती अघोरी, मानव रक्ताला चटावलेली आहे. भलतेच धाडस करू नका.”

        पण आचार्यांनी कोणाचेच ऐकले नाही. ते गेलेच. त्या रात्री त्यांचा मुक्काम कामाक्षीच्या एकांत स्थळी झाला. सावधगिरी म्हणून आचार्यांनी मंत्रयुक्त यंत्र बांधले. आणि श्रद्धायुक्त मनाने जगदंबेचे स्मरण करू लागले. भीती किंवा शंकेचा लवलेशही त्यांच्या मनी नव्हता.

नेहमीप्रमाणे ठराविक वेळी कामाक्षी देवी गुहेच्या पोकळीतून बाहेर आली. आचार्यांच्या गळ्यातील यंत्रातून प्रचंड अग्नी ज्वाला निघाली. त्याबरोबर भयभीत होऊन देवी पुन्हा गुहेकडे पळाली. आचार्य चटकन तिच्यासमोर जाऊन उभे राहिले. म्हणाले,  

   ” तू आदिमाया पार्वती ना? तूच त्रिपुरसुंदरी, तूच नेपाळची सिद्धेश्वरी देवी, तूच काली, तूच महालक्ष्मी, तूच शारदा, तूच आई जगदंबा! मग हे उग्ररूप? तुला तुझ्या सत्  स्वरूपाचा विसर पडला का? तू पराशक्ती आहेस. परब्रम्हमाता आहेस. तूं परब्रम्हाला जगत निर्माणाच्या कार्यात सहाय्यभूत होउन जगाचा पसारा  मांडतेस. तुझे सत्कार्य असताना, अघोरीपणे नरभक्षण का करते आहेस? तू अद्वैतिक लोकांच्या स्वाधीन कशी झालीस?

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १०-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                  भाग – ४८.

                  आचार्य  भगवतीला  पुढे म्हणाले,

” अगं! तू ब्रह्मा, विष्णू. रुद्राची माता. जगतजननी आहेस.”

” कामः अस्याः अक्षानां संभूतेः इति कामाक्षी”

        म्हणजेच, जिच्या डोळ्यातून विश्व निर्मितीची इच्छा निर्माण होते, ती कामाक्षी अशी तुझी ख्याती आहे. ‘ क’ म्हणजे ब्रह्मा, ” आ” म्हणजे विष्णू, ” म” म्हणजे रुद्र. हे तुझ्या अक्षातून म्हणजेच नेत्रातून बाहेर आलेत, याचे तुला विस्मरण झाले का?” आणि  आचार्यांनी लगेच  तिची स्तुती देवी भुजंग स्तोत्राने  करायला सुरुवात केली….

” विरिच्चदिभीपच्चभिर्लोकपालैः।

  समूढे महानन्दपीठे नियण्णम्।

  धनुर्बाण पाशाड्ःकुश-प्रोत हस्तं।

मस्रैपुरं शंकराद्वैतमव्यात्।”

     ”  हे देवी, तू अघोरी मार्ग सोडून दे. तुझी स्वर्णमूर्ती, तुझ्यासाठी भव्य मंदिर बांधले जात आहे. तिथे पूर्ण मुक्तीदायी श्रीयंत्राची, श्रीचक्राची स्थापना करून श्रीचक्राच्या ठिकाणी तुझा मंगलमय संकल्प करून लोकांचा उद्धार कर. तू वरदायिनी होऊन जगाला तुझे सत्य स्वरूप दाखव.”

      आचार्य – वाणी ऐकता ऐकता कामाक्षी देवी प्रसन्न झाली. स्मिता हास्य करत म्हणाली,

” मी तुझ्या चतुर बोलण्याने शांत झाले आहे. माझ्या आणखी काही सख्या आहेत.. त्यांनाही शांत कर.”

       आणि देवी अदृश्य झाली.

    इकडे कांचीपुरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. प्रत्येक जण आचार्यांच्या सकुशलतेसाठी नामस्मरण, ध्यानधारणा, जपजाप्य करीत होते. फक्त सुरेश्वराचार्य स्थिर होते. त्यांना आचार्यांच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव होती. आणि झालेही तसेच. प्रातःसमयी कंपा नदीवरून स्नान करुन हसतमुखाने परतलेले आचार्य पाहून महाघोर संकट टळल्याने लोकांना अतिशय आनंद झाला.  उत्स्फूर्त घोषवाणीने परिसर  दुमदुमून गेला.  

  ” जगद्गुरु श्रीपाद शंकराचार्य महाराज की जय.. शंकराचार्य महाराज की जय…”

          कामाक्षी देवीच्या आज्ञेनुसार तिच्या सख्यांचे उग्ररूप शांत करण्यासाठी आणि  त्यांना शोधण्यासाठी आचार्य पुन्हा एकटेच अरण्य भ्रमंतीस निघाले. पुन्हा सर्वांच्या मनात धास्ती निर्माण झाली.  कारण हा सर्व प्रदेश क्रूरकर्मा कापालिकांनी व्यापला आहे. ते माणसावरच नाहीतर देवावरही वर्चस्व गाजवून आपल्या कह्यात घेत आहेत. कोणा जिवलग शिष्याला तरी बरोबर घ्यावे. पण कसे आणि कोण आचार्यांना सांगणार? पण सुरेश्वराचार्य मात्र निश्चिंत होते. त्यांना लोकांच्या अज्ञानाचे हसू येत होते. त्यांनी अजून आचार्यांचे सामर्थ्य जाणले नाही. आतापर्यंत आलेल्या अनेक संकटावर जादूटोणा, भूतपिशाच्च, जागरण-मारण, करणी, तोडगा इत्यादी अघोरी शक्तींवर या महापुरुषाने आपल्या शुद्ध सात्विक सरळमार्गी आचरणाने ऋतंभरा प्रज्ञेने  मात केली आहेच.  त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वसंगपरित्याग केला आहे. त्यांचे म्हणणे की,

   ” प्रापंचिकाला लंगोटी धारण न करताही, वृत्तीने कौपिनवन्त होता येते.”

” देहादिभावं परिमार्जन मार्जियन्त आत्मानममात्मन्यव

  लोकयन्तः ।

  नान्तं न  मध्यं न बहिः स्मरन्तः कौपीनवन्तः  खलु

  भाग्यवंतः।”

        आजपर्यंत त्यांना कमी का मानमरातब मिळाले? द्वारकाधीशाचा राजा सुधन्वा, उज्जयनीचा राजा हर्षविक्रमादित्य, नेपाळनरेश ऋषभदेव वर्मा, कांचीचा राजा राजसेन या सर्वांनी आचार्य समोर सुखराशी ओतण्याचा प्रयत्न केला. राजगुरूपद आचार्यांनी स्वीकारावे अशीही  इच्छा व्यक्त केली होती.  पण या विरागी पुरुषोत्तमाने  कशाचाही मोह न धरता आणि कशाचाही स्वीकार न करता ते सारे वैभव, धन, धर्मपीठांच्या स्वाधीन करून चारही मठाधिपतींना राजदरबाराइतका सन्मान मिळवून दिला .

      असे हे वैराग्यमूर्ती कौपिनधारी आचार्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना अद्वैत सिद्धांत पटावा वैदिक धर्माची भरभराट व्हावी, या तळमळीने अनवाणी, अर्धपोटी, अनंत संकटे, कष्ट सोसून भारत भ्रमण करीत अखंड फिरत आहेत. अशा या निरंकारी, निरीच्छ, आत्मस्थितीत अखंड रममाण असलेल्या व परब्रम्हाशी पूर्ण रूपपणे समरस झालेल्या आचार्यांना या भौतिक जगात कशाचे भय, भीती?

           तिरुवन्न मलई, अरुणाचलम पर्वतांची निसर्ग शोभा पहात, आचाअर्य एकटेच जात होते. मधून मधून वन्य जमातीचे लोक भेटले की, त्यांच्या वस्त्यावर जाऊन त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत नरजन्माचे महत्त्व पटवून, त्यांच्या अडाणी समजुती, त्यांना लुबाडत असलेले भगत, याबद्दल सविस्तर समजावून सांगण्याने त्यांचे मतपरिवर्तन होत होते. आणि आचार्यांशी बिचकत वागणारे लोक त्यांना प्रवासात सहाय्य करत होते.

       या परिसरात असलेल्या तपस्वी साधूंच्या  आश्रमात जाऊन  पण आचार्य चर्चा करीत होते.  त्यामुळे त्यांचेवरही प्रभाव पडत होता. त्यांना  “शब्ददीक्षा” मिळत असे.

         जम्मूकेश्वरी आचार्य पोहोचले. तेथील ग्रामदेवता अखिलाण्डेश्वरी देवी कामाक्षीची सखी होती. तिने अन्य सख्यांसह अत्युग्र स्वरुप धारण केले होते. आचार्यांनी मोठ्या कुशलतेने त्या सर्वांची उग्रता  काढून त्यांना शांत केले.

     अखिलांडेश्वरीच्या चरणाशी तिचा पुत्र गणेशाची स्थापना करून तिची प्रार्थना करीत आचार्य  म्हणाले,   

    ” हे माते, तू लोककल्याणास्तव इथेच वास्तव कर.”

देवीने आचार्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.

         आचार्य आपले अरण्य भ्रमण आटोपून आता  परतले होते.

               देवी कामाक्षीची सुवर्णमूर्ती समारंभपूर्वक  वाजत गाजत ; मिरवत मंदिरात आणली. दहा पायऱ्या असलेले अतिशय देखणे देऊळ, कुशल शिल्पकारांनी निर्जीव दगडात सजीवत्व आणले होते..

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १०-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – ४९.

                   जगद्गुरु शंकराचार्यांनी आगमशास्त्राप्रमाणे  देवीची प्रतिष्ठापना केली. हिरा कोंदणात बसावा तशी देवी कामाक्षी स्वस्थानी विराजमान झाली होती. आचार्यांनी तिथे श्रीचक्राची  देखील स्थापना केली. आणि कामाक्षींच्या स्थानाला नाव दिले..” कामकोटी”

             या शुभ दिनी शंकराचार्यांनी घोषणा केली, की ते स्वतःसाठी इथे पीठ स्थापन करून ते स्वतःचा  निवास याच  कांची कामकोटी पीठात करतील. कांची कामकोटी पीठात आचार्यांचे वास्तव्य स्थिर झाले. त्यांचे लेखन, वाचन, चिंतन, अध्ययन ; अध्यापन – सुरू झाले.

      आचार्यांची अव्याहत कार्य करण्याची पद्धत, मधुर वाणी, संन्यस्त जीवन पाहून लोक म्हणत…

“काम्यनां कामणां न्यासं संन्यासम कवायः विदुः।”

           असा पुरुष आपल्या नगरात आहे हे आपले अहोभाग्यच म्हणावे.

        एव्हाना आचार्यांच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले होते.  भगंदराची व्यथा पुन्हा त्यांना त्रस्त करू लागली, तरी त्यांचे नित्यकर्म नियमित चालूच होतेच. सुरेश्वराचार्यांचा अधिकतर मुक्काम कामकोटी पीठातच असे. एकदा आचार्य त्यांना म्हणाले,  

   ” माझे वास्तव्य जरी या पीठात असले तरी, हे पीठ श्रृंगेरी पीठाच्या अधिपत्याखाली असेल. त्या दृष्टीने तुम्हाला कार्य करायचे आहे. तो उल्लेख आम्नायात करणार आहे.”

   सध्या त्यांचे विवेक चूडामणी  या ग्रंथाच्या लेखनाचे कार्य सुरू होते.

             एकदा सुरेश्वराचार्य म्हणाले,  

  ” आचार्य, एक महत्त्वाचे कार्य राहिले आहे. आचार्य, इथे असलेल्या सर्वज्ञ पीठावर द्वैतवाद्यांचे वर्चस्व आहे. आपल्या इतके प्रभावीपणे अद्वैत तत्वज्ञानाचे महत्त्व कोणाला  सांगता येईल की नाही याचीच शंका आहे. म्हणून आपणच धर्मचर्चा  घडवून आणावी.”

    ” ठीक आहे. द्वैतवादी मंडळींचे मतपरिवर्तन व्हायलाच हवे. तुम्ही वादसभा आयोजित करा. सर्व द्वैतवादी शास्त्री पंडितांना आमंत्रित करून, त्यांना मोठ्या मानसन्मानाची वागणूक द्या. वादसभेची तयारी जोरात सुरू असतानाच आचार्य म्हणाले, •••••

   ” माझ्या मनात कांची कामकोटीत सर्व शिष्यांचे संमेलन भरवावे असे आहे. तेव्हा बाकीच्या मठाधिपतींना बोलवण्याची व्यवस्था करा. या सर्वज्ञ पीठामध्ये वादसभा होईपर्यंत सर्व मंडळी येऊन दाखल होतील.”

         राजा, राजसेनेची इच्छा होती, या वादसभेच्या निमित्ताने या काषायवस्रधारी, निरिच्छ, निरहंकारी, या युगाचा जगद्गुरु, वैदिक धर्मक्षेत्राच्या दृष्टीने सम्राटाचाही सम्राट असलेल्या आचार्यांचे या कांची नगरीत  ‘अभिषिक्त धर्म सम्राट’ म्हणून सन्मान करावा. यामुळे प्रत्यक्ष वैदिक धर्माचा सत्कार केल्यासारखे होईल. हा आर्य सनातन वैदिक धर्मसत्कार आचार्यांना नक्की आवडेल. त्यांच्यासाठी रत्नजडीत सिंहासन करायचे ठरवले.

राजे सुरेश्वराचार्यांना म्हणाले,  

   ” आपण जाणकार आहात. सर्वज्ञ पीठाची शास्त्रोक्त रचना करण्यासाठी कारागिरांना मार्गदर्शन करावे.”        त्यानुसार …..

      देवी- पीठात वादसभेचे आयोजन करण्यांत आले.  आपापल्या मानाप्रमाणे विद्वान मंडळी स्थानापन्न झाली. सुरेश्वराचार्य आचार्यांना नेण्यासाठी आले असता, आचार्य दर्भासनावर पद्मासन घालून अंतरिक्षात ध्यान लावून बसले होते. त्यांची समाधी कशी मोडायची? तिकडे वादसभा खोळंबलेली. शेवटी अतिशय नम्रपणे सुरेश्वराचार्य म्हणाले,  

   ” गुरुदेव, सर्वज्ञ पीठाच्या व्यासपीठावर सर्वजण आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे.”

       शंकराचार्य येऊन आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. वादाला सुरुवात झाली. दैतवाद्यांनी  ब्रह्म, माया बद्दल बराच उहापोह केला.बहुत चर्वितचर्वण झाले. त्यांनी मांडलेले सर्वच मुद्दे आचार्यांनी कोणालाही न दुखवता समर्थपणे हाताळले.

             मायावादाचा परामर्श घेताना शंकराचार्यानी जवळ असलेली एक धूपकाडी उचलून गोल गोल फिरवीत म्हणाले,   

    ” ह्या धूपकांडीच्या टोकाला फक्त अग्नी स्फुल्लिंग आहे. पण मी गोल गोल फिरवल्याने ते तेजोवलय भासते, जे प्रत्यक्षात नाही. त्याचप्रमाणे सत्य, ब्रह्म हे फक्त टोकावर असलेल्या अग्नीप्रमाणे कल्पिले तर तेजोवलय म्हणजे आभासमय विश्व असते. म्हणून ब्रह्म सत्य आहे. आणि जगत मिथ्या आहे. निर्गुण ब्रह्माचे सगुणरूप कल्पून भक्ती करावी. त्यासाठी मी स्तोत्रे रचली आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांनी ही वादसभा  निर्विवादपणे जिंकली. आचार्यांच्या सन्मानासाठी तिथे ठेवलेल्या रत्नजडित सुवर्णपीठावर जयजयकाराच्या घोषात त्यांनी आरोहण  केले. भेरी, मृदुंग, तुताऱ्यांच्या नादब्रम्हात सारा आसमंत दुमदुमून गेला. पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले .

      जेमतेम तिशी ओलांडलेला हा तरणाबांड तरुण आगळ्यावेगळ्या तेजाने तळपू  लागला. ईश्वरी अनुग्रहाचे तेजोवलय त्यांच्या मागे फिरत होते.

           हा सर्वज्ञ पीठ सोहळा संपल्यापासून आचार्य जनसंपर्कापासून दूर राहू लागले. आणि ते  एकांतात जास्त वेळ घालवू लागले.  चित्सुखाचार्य वारंवार सांगत असल्यामुळे सुखेश्वराचार्यना काळजी वाटू लागली. अलीकडे आचार्य म्हणतात,  

   ” या लोककीचे कार्य संपले. “

                ” असे का?”

इतक्या लहान वयात भरभरून यश मिळत असल्यावरही अगदी तारुण्यातच  “माझे जीवित कार्य संपले” असं का म्हणतात? आचार्यांनी धर्म संमेलन  आयोजित केले. त्याचा हेतू काय?शिष्य भेटीचे निमित्त तर नसेल ना? काय आहे आचार्यांच्या मनात?

           चारही पीठांचे पीठाधिपती… गोवर्धन पिठाचे- पद्मपादाचार्य, द्वारकापिठाचे- हस्तामलकाचार्य, ज्योतिर्मठाचे- तोटकाचार्य, श्रृंगेरी पिठाचे- सुरेश्वराचार्य  असे चारही मठाधिपती येऊन हजर झाले.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १०-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                  अंतिम भाग – ५०.

                 चारही मठाधिपती  नित्य कर्मे आटोपून आचार्यांसमोर हजर झाले. आचार्य म्हणाले,   

   ” या धर्मसम्मेलनाचे दोन हेतू आहेत. एक तर धर्माबद्दल लोकांच्या मनात जागृती व्हावी, कार्य कळावे. ठिकठिकाणी त्यांचा परस्पर परिचय होऊन वैदिक धर्माचा अभ्युदय व्हावा आणि दुसरे कारण म्हणजे, तुम्हा सर्वांची प्रत्यक्ष भेट घेऊन मनातील गोष्ट सांगावी.”.

   थोडे थांबून मग ते सावकाश म्हणाले,  

” आता आमचे जीवित कार्य संपले आहे.”

        एक बाब इथे अवश्य बघावी की ; या भौतिक जगतात ; उफराट्या भावनांचे मुबलक पीक दिसते. जन्मलेला प्रत्येकजण सतत मृत्यूच्याच जवळ जवळ जात असतो. म्हणत असतो — ” इतकं इतकं जगलो. ” ••• याउलट आचार्यांना यथार्थतेची ; आणि जगताची अनुभूती आलेली आल्यामुळे ते समतोल राहून म्हणू शकतात की — ” आता या देहाचं जीवित कार्य संपलंय !! ” =:-+ या ठिकाणी तुकोबांची याद येते..  तेही असेच बोलले होते —

” तुका म्हणे आम्ही | मरोनी जन्मलो | आपुले पावलो | अधिष्ठान || “

   आचार्यांचं हे रूप तर सर्वांसाठी अनोखं होतं . वैदिक धर्मावर गाढ श्रद्धा ; त्याबद्दलचा अभिमान ; आणि इतकं असूनही — स्वतः जगद्गुरु पदावर आरूढ असूनही ; स्वतःबद्दलच्या श्रेष्ठत्वाचा यत्किंचितही अभिनिवेश नसे त्यांच्यात !!

    त्यांना जणू पूर्वनियोजन माहीत होतं. आता या जड देहाच्या जीवनाचा कळसाध्याय सुरू झालाय. आरंभिलेलं कार्यशिल्प मनोहर झालं आहे. वैदिक धर्म उत्तुंग होत चाललाय — जणू काहीं तो ; आकाशीच्या अंगणात ( आकाश तत्वात ) विहरतो आहे. ” रात्रंदिन युद्धाचेच  प्रसंग झेलून झेलून ” हे सगळच उभ करावं लागल आहे ; आणि आता तर त्यांतही कृतार्थताच आहे. तर मग आता ” निजधामी ”  जायला हरकत कोणती ??  तथापि •••••

” आता या देहाचं जीवित कार्य संपलंय. “

         हे आचार्यांचे शब्द ऐकताच …..

ऐकताच सगळेच चपापले. अशी निरवानिरवीची भाषा आचार्य आज का करताहेत? शिष्यांच्या मनःस्थितीची कल्पना आल्याने, आचार्यांनी लगेच विषय बदलून, धर्म संमेलनाचे आयोजनाबद्दल बोलू लागले.

         धर्म संम्मेलनाचे आयोजन मोकळ्या मैदानात भव्य मंडप उभारून करण्यात आले होते.  त्या आलिशान मंडपात आचार्यांसाठी उच्च आसन आणि  आसनाच्या दोन्ही बाजूंनी मठाधिपतींसाठी दोन-दोन आसने सुशोभित करून तयार ठेवली होती.

      आचार्यांच्या सन्मानार्थ चंदनाची पालखी आणली होती. आचार्य पालखीत बसल्यावर, चारही शिष्य मठाधिपतींनी पालखीचे दांडे खांद्यावर घेतले. जणू चार वेद परब्रम्हाला आपल्या खांद्यावरून वाहून नेत होते. आचार्यांच्या जयघोषात — मिरवणूक मोठ्या थाटाने निघाली. रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. जगद्गुरूच्या जयघोषात मिरवणूक मंडपात आली. सगळेजण आपापल्या जागी स्थानापन्न झाले. मंडप गच्च भरला होता.  आसनस्थ झालेल्या ह्या पाच विभूती, चार मठाधिपती व आचार्य म्हणजे संन्यास धर्माचा बहुमान होता. हे पाच जण म्हणजे त्यागाचे, वैराग्याचे, परब्रम्हाशी समरस झालेले आत्मस्थितीत रंगणारे तेजःपुंज व्यक्तिमत्वच होते.

        शंकराचार्याच्या ॐकारध्वनीने आणि चौघांच्या मंगलमय शंखध्वनीने सारा मंडप निनादून गेला. आचार्यानी  प्रवचनास सुरुवात केली.   ते म्हणाले,  

  ” माझ्या धर्म बांधवांनो! आजचे धर्मसंमेलन परस्परांचे विचार जाणून घेण्यासाठी, सुख संवाद साधण्यासाठी आयोजित केला आहे.”

    थोडक्यात आढावा सांगून म्हणाले,   

  ” या चारही पीठांच्या आचार्यांना मी आता आम्नाय आखून दिले आहेत. त्याप्रमाणे एकसूत्रता आणून त्यांनी कार्य करायचे आहे. त्यांच्यात मतभेद होऊ नयेत ;  म्हणून, श्रृंगेरी पीठ हे ज्येष्ठ पीठ मानून तिथल्या आदेशाप्रमाणे या बाकीच्यांनी वागावे. त्यासाठी बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात सर्वांनी एकत्र जमावे.

          त्यानंतर शंकराचार्य कितीतरी वेळ, आतापर्यंत झालेल्या कार्याचा, कशासाठी केले त्या सर्वाचा आढावा — यावर  सांगत राहिले.  बर्‍याच उपदेशात्मक गोष्टी सांगितल्या. आणि  सरते शेवटी म्हणाले,   

  ” आता माझे जीवित कार्य संपले आहे. पण या धर्मकार्याची धुरा सांभाळण्यास माझे शिष्य पूर्णपणे समर्थ आहेत.”

      आज आचार्य उपदेशात्मक बोलताना ; सर्वच लोकांना — साध्या, सामान्य गोष्टी पण आचार्यांच्या मुखातून ऐकताना एक प्रकारची  वेगळीच अनुभूती जाणवत होती.

          धर्मसंमेलनानिमित्त शंका निरसन, मार्गदर्शन, परस्पर परिचय तर झालाच, पण एक वेगळा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. ” आपण आपल्या धर्माचे शत्रू”  यात कित्येकांनी आपले रंजक अनुभव सांगितले. विषय छान रंगला. परस्पर सामंजस्य हा धर्मसम्मेलनाचा हेतू साध्य झाला.

        संम्मेलन आटोपल्यावर आचार्यांनी सर्व शिष्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाण्यास सांगितले. सुरेश्वराचार्य  व  चित्सुखाचार्याना तिथेच कामकोटी पीठात त्यांच्याजवळ थांबायला सांगितले. शिष्य परिवार निघून गेला. आणि आचार्य अंतर्मुख झाले.. त्यांनी अशनादी सर्व व्यवहाराचा त्याग केला होता. त्यांचा सारा वेळ एकांतात परब्रम्हचिंतनात जात होता.त्यांनी  जवळजवळ त्यांनी मौनव्रतच  धरले होते. क्वचित सुरेशश्वराचार्यांशी बोलत.

         एक  सप्ताह  उलटला. त्यांना देह स्थितीचा केव्हाच विसर पडला होता. त्यांनी अन्नपाणी कधीच वर्ज्य केले होते. तरीपण त्यांच्या मुखावरचे तेज वाढतच होते.

       आचार्य म्हणाले,  

  ” माझ्या प्रस्थानाचा समय निकट आला आहे. आपण उद्या प्रातःकाळीच केदारनाथकडे निघणार आहोत. तेच माझे अंतिम स्थान असेल.”

                दुसऱ्या दिवशी सर्वांची  पदयात्रा केदारनाथकडे निघाली. केदारनाथाच्या मंदिराचा कळस दिसू लागताच आचार्यांचा वेग वाढला. सर्वांनी केदारनाथांचे दर्शन घेतले. रात्री आचार्यांनी सर्वांना बोलावून शांतपणे सांगितले,

  ” उद्या मी देह त्याग करणार आहे. कोणीही शोक करू नका. मी देहाने गेलो तरी, ग्रंथरूपाने तुमच्या सानिध्यात असणार आहे .ग्रंथ पठण करताना मी समोर असल्याचा साक्षात्कार होईल. देह नश्वर आहे. तो कधी ना कधी नष्ट होणारच. हे सत्य तुम्ही स्वीकारायला हवे. माझ्या देह त्यागाच्या समयी कोणाच्याही नेत्रात अश्रू नको.”

आचार्य पुढे  म्हणाले,   

   ” मी पहिल्यांदा हिमालयात आलो होतो, त्यावेळी भगवान शंकरांनी मला ही आत्मलिंगे दिली होती. ”  असे म्हणून ती आत्मलिंगे आचार्यांनी ;  सुरेश्वर, हस्तामलक पद्मपाद व तोटक यांना देऊन म्हणाले,   

   ” यांची चार पीठात प्रतिष्ठापना करा. आणि पाचवे लिंग कांचीच्या पीठात स्थापन करा. ते पीठ मीच स्थापन केले आहे.”

       रात्रभर कोणीच निद्राधीन झाले नव्हते. सर्वांनी पहाटेच उठून निःशब्दपणे यंत्रवत नित्य कर्मे आटोपली.

             आचार्यांसह सर्वजण केदारनाथाच्या मंदिरात आले. आचार्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. शिष्यांनी त्यांना प्रणाम करून तसेच उभे राहिले. आचार्यांनी केदारनाथाकडे दृष्टी लावली आणि त्यांची समाधी लागली. त्या अवस्थेतच ते पुढे जाऊ लागले. शिष्यवर्ग ते  दृष्य  अनिमिष नेत्राने पाहत होते.

        आचार्य शिवलिंगाजवळ आले. एखाद्या गुहेचे दार उघडून त्यात शिरावे तसे, आचार्य शिवलिंगात शिरल्यासारखे भासले. दुसऱ्याच क्षणी तेथे काहीच नव्हते. आचार्य सदेह त्यात विलीन झाले होते.  केदारनाथाशी एकरूप झाले होते. 

        धर्माला ग्लानी येईल  तेव्हा उदयाच्या निश्चयाने ते विलीन झाले. गर्भगृहातून गंभीर ध्वनी येत होते….

” न धर्मो न चार्यो न  कामो न मोक्ष:श्चिदानंद रूपः

      शिवोऽह  शिवोऽम् शिवोऽम्

             !!!  समाप्त  !!!
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. १०-९-२०२३.

आद्य शंकराचार्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading