
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला………..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! दशावतार ( बुध्दावतार) !!!
भाग – २४.
श्रीराम, श्रीकृष्ण यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार चालून मानवाची बरीच उन्नती झाली होती. लोकांच्या लक्षात आले की, ईश्वर प्राप्तीच जीवनाचा मुख्य उद्देश आहे. त्यातच सुख शांती आहे. त्यानुसार मानव आपले कार्य भगवंत प्राप्तीसाठी करत होते. त्यामुळे सगळीकडे शांति प्रस्थापित झाली होती.
परंतु या सुख शांती मुळे लोक आराम पसंत होऊ लागलेत. ईश्वर आणि धर्म फक्त कल्पनाच राहिल्या. आणि मानमरातब, ऐश्वर्य, सांसारिक सुख जीवनाचे अंग आहे ही भावना प्रबळ होऊ लागली. आणि धर्माचे आचरण केवळ आपला अहंकार, गौरव वाढवण्यासाठीच करू लागले.
योगी, साधक, ब्राह्मण तपस्या करून देहक्लेश करत होते, पण त्यांचाही हेतू सन्मान मिळवण्यासाठी आणि शिष्य बनवण्यासाठीच मर्यादित राहू लागला.
कपिलावस्तु नगरीत शुद्धोधन नावाचा राजा होता. त्याला बऱ्याच उशिरा उतार वयात संतान प्राप्ती झाली. त्याचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. त्याचे जन्मजातक पहिल्यावर ज्योतिषाने सांगितले, हा बालक संसारात राहिला तर महान चक्रवर्ती राजा होईल आणि संन्यासी झाला तर जगद्गुरु होईल.
सिद्धार्थ अतिशय तेजस्वी बुद्धिमान असून सर्वांचे मन जिंकल्यामुळे सर्वांना हवाहवासा वाटत होता. पण इतक्या लहान वयातही बालसुलभतेचा अभाव होता. इतकेच काय पण त्यांची खेळण्या कुदण्यातही रूची नव्हती. सदैव गंभीर असायचा. त्यामुळे राजा शुध्दोदनला धास्ती वाटायची की हा संन्यासी तर होणार नाही? त्यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी मनोरंजनाचे अनेक साधने त्याला उपलब्ध करून देत असे.
बालपणापासूनच सिध्दार्थांच्या मनात प्राणिमात्रा विषयी दयाभाव होता. एक दिवस देवदत्त नावाच्या शाक्त मुलाने एका जंगली हंसावर तीर चालवला. तो हंस जखमी अवस्थेत सिद्धार्था जवळ येऊन पडला. सिद्धार्थांनी त्याला उचलून जवळ घेतले. व तीर उपसून काढला. पाणी पाजले. तेवढ्यात देवदत्त नावाचा तो मुलगा आपली शिकार घेण्यासाठी आला. पण सिद्धार्थाने हंस परत करण्यास ठाम नकार दिला. दोघांमध्ये खूप विवाद झाला. शेवटी दोघेही एका वृद्धाजवळ गेल्यावर त्याने सांगितले की जो जीव रक्षा करतो त्या प्राण्यावर त्याचा अधिकार असतो.
कपिलावस्तु नगरीमध्ये दरवर्षी कृषी महोत्सव होत असे. त्यावेळी राजा, मंत्री, गाव प्रमुख शेतामध्ये नांगर चालवत असे. त्या मातीतून अनेक जीवजंतू बाहेर येत. त्यातले बरेचसे यांच्या पायाखाली कुचलले जात. तर काही पक्षी त्यांना पकडून खात असे. त्या जीवजंतूची ही भयानक हत्या होत असलेली पाहून सिद्धार्थांनी आपल्या वडिलांना ही प्रथा बंद करण्याची विनंती केली.
योग्य वयात सिद्धार्थाचा विवाह गोपा ( यशोधरा) नावाच्या एका गुणवंत कन्येशी झाला. सिध्दार्थाचे मन रमावे म्हणून राजाने एक सुंदर प्रमोद उद्यानाचे निर्माण केले. तिथे रोज नृत्य, गायनाचे आयोजन होत होते. सिद्धार्थ शरीराने उपस्थित असायचे पण ते मनाने कधीच रमले नाही.
सिद्धार्थ दुसऱ्याचे दुःख पाहून अतिशय व्यथित होत असत. त्यांना वाटायची की प्रसंगी प्राण देऊन समोरच्याचे दुःख निवारण करावे. एक दिवस नगरात फेरफटका मारण्यासाठी निघाले असता, एक व्यक्ती रोगाने पीडित होऊन अतिशय त्रास सहन करीत होता. ते पाहिल्यावर सिध्दार्थाचे मन विचलित झाले. पुढे न जाता तसेच परतले. असेच एका वृद्धाची दुर्दशा पाहून त्यांचे मन मानव शरीराचे दुःख दूर कसे करावे या विषयी चिंतित झाले.
एके दिवशी एक शव दहन करण्यासाठी स्मशानात नेत होते. त्यांचे नातेवाईक अति दुःखाने धायमोकलून रडत होते. हे दृश्य पाहून सिद्धार्थाच्या मनात प्रबळ वैराग्याचा संचार झाला. ते विचार करू लागले. व्याधी, जरा आणि मृत्यूपासून उध्दार करण्याचा काहीच उपाय नाही का? जर नाही तर मग जीवनाला अर्थच काय? अशाच विचारात सिद्धार्थ विचारमग्न राहू लागले.
एक दिवस एका सन्यासाला निर्विकार भावाने समाधीस्थ पाहून सिद्धार्थच्या मनात नवीन विचाराने जन्म घेतला. आपणही असे संन्याशी होऊन तपासाधना करून जरा, व्याधी, मृत्यूपासून मुक्ततेच्या काही उपाय मिळतो का पहावे. संन्यास घ्यायचा विचार निश्चित झाला.
दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला विचार पिताजी समक्ष व्यक्त केल्यावर त्यांनी सक्त मनाई केली. आणि ते जाऊ नये म्हणून कडक पाहर्याचा बंदोबस्त केला.
त्याचवेळी यशोधराला पुत्ररत्न झाले. सिद्धार्थांना आनंद झाला पण आपण संसारात अधिक गुरफटत चाललोय हे योग्य नाही. आता उशीर करण्यात अर्थ नाही. एक दिवस अर्ध्यारात्री कोणाला न सांगता घरदार, पत्नी, मुलगा, राज्य सोडून सिध्दार्थ निघून गेले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. १८-१०-२०२३.
!!! दशावतार !!!
भाग – २५.
सिद्धार्थांनी मोह,माया, घरदार, राज्य सर्व त्यागून संन्यासी वस्त्र परिधान करून तपस्वी लोकां जवळ जाऊन योग्य शिक्षा ग्रहण करू लागले. नंतर स्वतः अनेक प्रकारची कठोर तपस्या करून काही अनुभती प्राप्त होताच त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. सिद्धार्थांनी अनेक योगींचे शिष्यत्व पत्करून आपले ज्ञान वाढवले. आणि धर्मामतांची सिद्धी प्राप्त केली. त्यांच्या लक्षात आले की, आपण एवढ्या सिध्दी प्राप्त केल्यात, पण वृद्धत्व व मरणापासून मनुष्याला वाचवू शकत नाही. या विचाराने त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढली.
अनेक ठिकाणी भ्रमंती केली. शेवटी निराश होऊन आपण स्वतःच कठोर ध्यान, धारणा, तपस्या करूनच वृद्धत्व, मरण यावर उपाय शोधायचा प्रयत्न करावा.विचार पक्का करून ते गया जवळील निरंजना नदीच्या किनारी असलेल्या उरुबिल्व गावातील एक सुंदर, शांत स्थान पाहून तिथे पद्मासनात बसून ध्यानस्थ झाले. त्यांच्यावर गाढविश्वास असणारे पांच शिष्य त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ राहू लागले.
सिद्धार्थांनी आहार निद्रेचा त्याग करून रात्रंदिवस अखंड ध्यान करू लागले. उपवासाने ते तितके दुर्बल अशक्त झाले की, एक दिवस नदीवरून स्नान करून परत येत असताना मुर्च्छीत होऊन पडले. शिष्यांना वाटले त्यांचा मृत्यू झाला. परंतु काही वेळाने सिद्धार्थ शुध्दीवर आलेत. त्यांनी विचार केला अशा प्रकारे अन्न पाणी टाकून देहाला कष्ट देऊन सिद्धी प्राप्त होणार नाही. मग कशाला देहाला क्लेश द्यायचे? त्यांनी पुन्हा अन्नपाणी ग्रहण करण्यास सुरुवात केली. त्या पाच शिष्यांना वाटले आपल्या गुरुचे पतन झाले. त्यांच्याजवळ आता राहण्यास काही अर्थ नाही. शिष्य त्यांना सोडून निघून गेले. शरीर स्वस्थ् झाल्यावर ते बोधीवृक्षा खाली ध्यानस्थ झाले. त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. त्यांचे हृदय आनंदाने उचंबळून आले. सिद्धार्थांना बालपणापासूनच दुसऱ्यांचे दुःख पाहवला जात नसे. स्वतः दुखी होत असत.
त्यांना बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर दुःख निवारणाचा उपाय पण मिळाला. पण मुक्ती किंवा निर्वाणाबद्दल कोणाला सांगणार? सामान्य जनता समजू शकणार नव्हती. त्यांना आपल्या पाच शिष्यांची आठवण झाली. त्यांना शोधत शोधत काशीजवळ सारनाथला आले. तिथे ते शिष्य त्यांना मिळाले. त्यांना सिद्धार्थ बुद्धाने उपदेश केल्याने पाचही शिष्य कृतार्थ झाले. आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढल्याने अनेक शिष्य त्यांच्याकडून धर्माची शिक्षण प्राप्त करून घेण्या करण्याकरिता जमा झालेत. अनेकांनी सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी होऊ लागले.
याच भगवान बुद्ध सिद्धार्थांनी अंगुलीमाल नावाच्या भयंकर हिंसाचारी व्यक्तीचे मत परिवर्तन करून त्याला बुद्धत्वाची दीक्षा दिली होती. अंगुलीमालाचा मुळचा अहिंसक बनवला. व शेवटी त्याला मोक्ष सुद्धा प्राप्त करून दिला.
राजा शुद्धोदनाला आपल्या पुत्राचा गौरव ऐकून त्यांना अतिशय अभिमान, आनंद वाटला. त्यांनी भगवान बुद्धांना कपिल वस्तु नगरीत आणण्यास आपली काही माणसे पाठवले. बुद्ध देवाचे नगरीत आगमन झाल्यावर नगरवासी खूप आनंदित झाले. त्यांचे दर्शन घेण्यास एकच झुंबड उठली.
पिता शुद्धोदन, पत्नी यशोधरा असेच बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडून निर्वाण धर्माचा उपदेश ऐकून त्यांना सुखदुःखापासून मुक्ती झाली. शाक्य वंशातील अनेक तरुणांनी संन्यास घेऊन बुद्ध देवांचे अनुकरण करू लागले. इतकेच काय त्यांच्या स्वतःचा पुत्र राहुल सुद्धा संन्यासी झाला.
बुद्धदेव उत्तर भारतात सगळीकडे निर्वाण धर्माचा उपदेश करत भ्रमंती करू लागले. ज्या साधकांनी आधी कठोर तपस्या करूनही त्यांना ज्ञान प्राप्त झाले नव्हते त्यांना सुद्धा बुद्ध देवांच्या कृपेने सिद्ध प्राप्त झाली. संसारातील अनेक लोक संसार तापात दग्ध होत होते, ते सुद्धा बुद्ध देवाच्या उपदेशाने तरुण गेले.
समाजाने ज्यांचा घृणीत, पतीत म्हणून बहिष्कार केला होता त्यांना सुद्धा बुद्ध देवाने शिष्य बनवून त्यांचा उद्धार केला.
भारत वर्षात पुन्हा धर्म जागृत झाला. लोक सुख शांतीने राहू लागले.
अशा या बुद्ध देवाचे महानिर्वाण ८० वर्षाच्या आयुष्यात झाले. बुद्धकाळ संपल्यानंतर लोकांना पुन्हा धर्माचे विस्मरण झाले.
तेव्हा समाजाला धर्माची शिक्षण देण्यासाठी आद्य शर्य शंकराचार्यांचे अवतरण झाले. त्याचप्रमाणे मानवाच्या कल्याण हेतू रामानुज महाराज, चैतन्य महाराज आणि रामकृष्ण अवतारी पुरुष होऊन गेलेत. परंतु दशावतारात बुद्ध देवानंतर कलियुगाचा उल्लेख आहे.
कलीचा अर्थ आहे… जे पुढे घडेल…, येईल….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१०-२०२३.


