
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला………..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! दशावतार ( नृसिंहावतार ) !!!
!!! दशावतार ( नृसिंहावतार) !!!
*आज. वैशाख शुद्ध चतुर्दशीला नृसिंहावतार झाला
|| हिरण्य कश्यपू जगी मातले | धर्मावरती घालती घाले |
| निर्दालण्या त्या नरसिंहाचा |
होऊ दे अवतार ||
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असे मानले जाते.
विष्णूंनी हिरण्यकश्यपूवर क्रोध करत हा अवतार घेतला होता, तसेच क्रोधामुळे नृसिंहाचे शरीर जळतं म्हणून त्यांना थंड वस्तू अर्पित केल्या जातात. वेगवेगळे नैवेद्य दाखवल्याने वेगवेगळ्या प्रकाराचे फल मिळतं.
नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.
भाग – ८.
ब्रह्मदेवाकडून मनपसंत वर मिळाल्याने हिरण्यकश्यपू उन्मत झाला. एक प्रकारे आपल्याला अमरत्वच प्राप्त झाले असे मानून तो मनमानी करू लागला. त्याने सेनापतीला राज्यात सर्वेकडे दवंडी पिटयला सांगितली की, आज पासून कोणीही देवाची पूजा न करता माझीच आराधना करावी. या आज्ञेचे जो उल्लंघन करेल त्याचा शिरच्छेद केला जाईल. आज्ञेचे तंतोतंत पालन केले जाऊ लागले. धर्माचा लोप झाला. वैष्णव भक्तांच्या आश्रमात अत्याचार, अनन्वित छळ सुरू झाला. या सर्व कामाचा सेनापतीने हिरण्यकश्यपूला अहवाल सादर केला. आता आपल्या शिवाय इतर कोणाचीही पूजा होणार नाही,
ऐकून हिरण्यकश्यपू व अत्यंत हर्षित होऊन म्हणाला, हे सर्व ठीक आहे. पण ज्या विष्णूने माझ्या भावाचा वध केला त्याचा सूड घेतल्याशिवाय मला मनःशांती लाभणार नाही. सेनापतीने राक्षस राजाला सल्ला देत म्हणाला, विष्णूचा सूड घ्यायचा असेल तर, त्याला विष्णू लोकातून बाहेर काढणे अगत्याचे आहे. त्यासाठी त्याच्या भक्तांना छळणे, त्रास देणे गरजेचे आहे. आपल्या भक्तांचा त्रास पाहून विष्णू नक्की बाहेर येतील.
इकडे सेनापतींच्या सल्ल्यानुसार विष्णू भक्तांवर अन्याय, अत्याचार होऊ लागले. तर, दुसरीकडे मात्र त्याच्या स्वतःच्या घरात एक महान विष्णू भक्त जन्माला आला. त्याचे नाव प्रल्हाद ठेवले. हिरण्यकश्यपू स्वभावाने असुर असला तरी, तो कश्यप ऋषींचा पुत्र, वर्णाने ब्राह्मण होता. प्रल्हाद पाच वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी शुक्राचार्यांच्या आश्रमात पाठवण्यात आले. त्यावेळी शुक्राचार्य तपस्यासाठी दुसरीकडे गेलेले असल्यामुळे त्यांचे पुत्र शुंडी व अर्मक यांचेवर प्रल्हादाचे शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दोघे भाऊ प्रल्हादला शिक्षण देऊ लागले. एक दिवस व्यंजनाचा पाठ शिकवताना ‘क’ अक्षर ऐकताच प्रल्हादाच्या हृदयात उथलपुथल झाली. आणि तो रडू लागला. सगळे आवाक् झाले. रडण्याचे कारण विचारल्यावर म्हणाला, ‘ क’ अक्षर उच्चारताच मला कृष्णाची ( विष्णूचे एक नाव ) आठवण झाली. दोघा भावांनी त्याला समजावत त्याच्या मनावर बिंबवू लागले की, विष्णू कसे राक्षसांचे शत्रू आहेत. त्यांनी कसा तुझ्या काकाचा वध केला, तुझ्या पित्याच्या अपरोक्ष हल्ला करून राक्षस राज्य कसे नष्ट केले. आणि आज सर्वश्रेष्ठ तुझे पिताजीच आहेत. तेच सृष्टीचे नियंता आहे पण कट्टर विष्णू भक्त प्रल्हादला पटत नव्हते.
तो आपल्या सवंगड्या बरोबर आश्रमातील एका झाडाखाली बसून ॐ विष्णवे नमः। ॐ नारायण नमः। असा जप करीत असे. त्यामुळे इतर शिष्यही प्रभावित होऊन त्याचे अनुकरण करीत असत. सारे शिष्य श्री विष्णूंच्या नामस्मरणात मग्न झाले.
प्रल्हादाचे लक्ष विष्णू नामापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने नवनवीन विशेष शिकवले आणि तलक बुद्धीच्या प्रल्हादाने अल्पावधीच्या सारे आत्मसात केले. पण प्रल्हादाचे चित्त विष्णूपासून दूर गेले नाही.
विद्याभ्यासात आपल्या पुत्राची किती प्रगती झाली हे जाण्यासाठी राक्षसराज हिरण्यश्यपूने त्याला बोलावणे पाठवले. स्वतः शुक्राचार्य प्रल्हादाला घेऊन हिरण्यकश्यपू कडे आले. हिरण्यकश्यपूने विचारले, बाळ प्रल्हादा, सांग बरे, तू सर्वात उत्तम ज्ञान कोणते शिकलास? प्रल्हाद नम्रपणे म्हणाला, बाबा, कानाने विष्णूचे नाव ऐकणे, मुखी त्याचेच नाव, अंतःकरणात त्याचाच ध्यास आणि पूजा करणे, श्रद्धेने त्यांचे पायी समर्पित होणे हे सर्वश्रेष्ठ ज्ञान होय! या विश्वाचे पालन कर्ते आणि रक्षण कर्ते भगवान विष्णूच आहे.
ज्याने तिन्ही लोकातील हरिनामाचे उच्चाटन केले, यज्ञयाग, धर्म कर्म बंद केले त्याच्याच पुत्राच्या तोंडून विष्णुस्तुती ऐकून, हिरण्यकश्यपूच्या सर्वांगाचा भडका उडाला. त्याला काय करु नी काय करू नको असे झाले. त्यांनी शिपायांना बोलावून आदेश दिला, शिपायांनो, या अपशकुनी, कुलक्षणी कार्ट्याला आत्ताच्या आत्ता जंगलात नेऊन शिरच्छेद करा.
राजज्ञेनुसार शिपायांनी विष्णू नामात दंग असलेल्या प्रल्हादाला जंगलात नेऊन प्रथम तर त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण तो विष्णूचाच महिमा गात असल्यामुळे, संतप्त होऊन प्रल्हादाच्या मानेवर तलवारीचा घाव घातला. पण प्रल्हादाच्या अंगावर साधा ओरखडाही उमटला नाही. शिपायांनी अनेक वेळा प्रयत्न केला. पण व्यर्थ! शेवटी त्यांनी प्रल्हादला हिरण्यकश्यपू समोर उभे केले.
प्रल्हादला जिवंत पाहून त्याचा क्रोध अनावर झाला. त्याला हत्तीचे पायी देण्याची आज्ञा केली. या सर्व प्रकारापासून अनभिन्न प्रल्हाद विष्णू नामात दंग होता. प्रल्हादाचे हात पाय बांधून मस्तवाल हत्तीच्या पायाखाली फेकले. परंतु हत्तीने त्याला इजा तर केली नाहीच उलट सोंडेने उचलून पाठीवर बसवले. हे पाहून हिरण्यकश्यपूचा नुसता तीळ पापड झाला. आपला मोठाच अपमान झाला असं वाटून त्याला खोल नदी फेकून द्यायचा आदेश दिला. पण प्रल्हाद विष्णू नामस्मरणात दंग पोहत राहिला. हिरण्यकश्यपूला सर्व असह्य झाले. एवढ्याशा मुलाला आपण मारू शकत नाही याचे त्याला वैशम्य वाटले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१०-२०२३.
!!! दशावतार !!!
भाग – ९.
हिरण्यकश्यपूने अगदी प्रण केला, काहीही झाले तरी, प्रल्हादाला नष्ट करायचेच, या निश्चयाने त्याने शिपायांना प्रल्हादला उंच कड्यावरून ढकलून देण्याचा आदेश दिला. प्रल्हाद खाली पडण्या आधीच खाली ब्राम्हण रूपात उभे असलेल्या विष्णू देवांनी त्याला अलगद आपल्या हातावर झेलले. आश्चर्यचकीत शिपायांनी प्रल्हादला हिरण्यकश्यपू समोर आणून उभे केले.
त्याला जिवंत पाहून हिरण्यकश्यपू वेडा पिसा झाला. आत्यंतिक क्रोधाने प्रल्हादला एका अंधार्या कोठडीत ठेवून त्याच्यावर भयानक विषारी साप सोडण्याचा आदेश दिला. कोठडीत प्रल्हाद विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता. नामस्मरणाच्या लयीवर ते विषारी साप तल्लीन होऊन डोलू लागले व काही वेळाने सर्व साप निघून गेले. कोठडीतून काहीच आवाज ऐकू न आल्याने शिपायांनी आत येऊन बघितले, तर प्रल्हाद नामस्मान दंग सुखरूप असून साप नाहीसे झालेले होते.
पुन्हा प्रल्हादला हिरण्यकश्यपूकडे आणले. त्याला जिवंत पाहून जहाल विष पाजण्याचा आदेश दिला. एका वाडगाभर दुधात अतिशय जहाल विश मिसळून त्याला प्यायला दिले. प्रल्हादने श्री विष्णूचे नाव घेऊन ते विषयुक्त दूध घटाघटा करून टाकले. त्या जहाल विषयाचा प्रल्हादवर काहीच परिणाम न झाल्याने हिरण्यकश्यपू नुसता थयथयाट करू लागला. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले पण प्रल्हादावर काही परिणाम झाला नाही.
प्रल्हादला मारण्याचे अनेक जालीम उपाय करूनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही असे पाहून हिरण्यकश्यपू नैराशाने ग्रासलेल्या मनःस्थितीत विचार करीत महालात एकटाच बसला असता, त्याची बहीण होलीका येऊन म्हणाली, अरे दादा, असा निराश का होतोस! अरे तू विसरलास का? मला अग्नी काहीही करू शकत नाही. असे अग्नीचे वरदान आहे. मी प्रल्हादला मांडीवर घेऊन चिचेवर बसते. तू चित्ता पेटव. हिरण्यकश्यपूने तात्काळ चिता रचण्याचा आदेश दिला.
त्या अजान निरागस बालक प्रल्हादला मांडीवर घेऊन होलिका चितेवर बसली. चिता धडधडून पेटली. अग्नि ज्वाला आकाशवाला भिडल्या. दोघा बहिण भावांना वाटले, आता प्रल्हाद अग्नीत भस्म होईल. पण झाले उलटेच! होलिकाच त्या आगित जळून भस्म झाली. आणि या सर्वांपासून अबोध प्रल्हाद विष्णूंचे नामस्मरण करत हसतमुखाने चित्ते बाहेर आला. हे पाहून हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सारे उपाय करून हातबल झाला. अग्नी, वायू, थंडी , यापैकी कोणीही प्रल्हादला बाधा पोहोचू शकले नाही .
चित्तेच्या आगीतून सुखरूप बाहेर आलेल्या प्रल्हादचा दंड धरून ओढत हिरण्यकश्यपूने त्याला महालात आणले. त्या पाच वर्षाच्या बाल प्रल्हादाला ओरडूनन विचारले, तू एवढा विष्णूचा जप करतोस तर, सांग तो कुठे आहे? नम्रपणे प्रल्हाद म्हणाला, बाबा, तुमच्या सगळ्या अत्याचारातून प्रत्येक वेळी विष्णूनींच मला वाचवले. विष्णू सर्वश्रेष्ठ आहे. मी, तुम्ही संपूर्ण ब्रह्मांड इतकेच काय ब्रह्मदेव सुद्धा विष्णूच्या शक्ती पुढे कमी आहे. ब्रम्हांडाचे खरे स्वामी विष्णूच आहे.
त्रिभुनावर राज्य करणाऱ्या बलाढ्य राजा हिरण्यकश्यपूला हा पाच वर्षाचा मुलगा ब्रह्मज्ञान सांगतो हे सहन होणे शक्यच नव्हते. भयंकर क्रोधाने म्हणाला, सांग! तुझा तो विष्णू कुठे आहे? शांतपणे प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, भगवान विष्णू या जगाच्या चराचरात, कणाकणात अणूरेणूत बसलेला असून त्यांनी अखिल ब्रम्हांड व्यापलेले आहे. असे आहे तर, मग या खांबात आहे का? होय पिताजी, या खांबात देखील आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपूने संपूर्ण ताकदीने खांबाला लाथ मारली. त्याचवेळी महाभयंकर आवाज करत त्या खांबेचे दोन भाग झाले. त्यातून नरसिंहाच्या रूपात भगवान विष्णू प्रगटले. त्यांचे शरीर मानवाचे तर डोके सिंहाचे होते. त्यांचे ते भयानक रूप आणि गर्जनेने पृथ्वी कंप पावू लागली.
हिरण्यकश्यपूने त्यांना ओळखले. हा तर महाविष्णू! यानेच वराहरुप घेऊन माझ्या प्राणप्रिय बंधुला ठार केले. ही आठवण होऊन त्याने नरसिंहावर झेप घेतली. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. शेवटी सायं समयी नरसिंहांनी त्याला फरपटत दरवाज्याच्या उंबरठ्यावर नेले. उंबरठावर बसून त्याला मांडीवर आडवे झोपवले आणि नरसिंहांनी आपली तीक्ष्ण नखे हिरण्यकश्यपूच्या पोटात खुपसून आतडी बाहेर काढली. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचा वध झाला. पण त्यांचा क्रोध शांत झालं नाही. भयानक गर्जना करू लागले. डोळ्यातून भयंकर ज्वाळा निघू लागल्या. त्यांना शांत करण्याचे साहस कुणातच नव्हते. संतप्त नरसिंहाला कसे शांत करावे हा पेच सर्व देवांना पडला.
अखेर देवराज इंद्र प्रल्हादला म्हणाले, बाळ प्रल्हादा, तूच त्यांचा राग शांत करण्याचा उपाय कर. छोटा प्रल्हाद भक्तीभावाने नरसिंह कडे गेला. नतमस्तक होऊन भगवान विष्णूचे गुणगान, स्तुती करू लागला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याच्या कोमल स्पर्शाने नरसिंह शांत झाले. देवांनी श्रीविष्णूचा जयजयकार केला. ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपूने जो वर प्राप्त केला होता, त्याचे भगवान विष्णूंनी काटेकोर पालन केले. शरीर मानवाचे व डोके सिंहाचे असल्यामुळे विष्णू नरसिंह किंवा नृसिंह नावाने ओळखले जाऊ लागले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१०-२०२३.


