दशावतार 6 ( परशुराम ) भाग ४, (१२ ते १५)

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( परशुराम ) !!! 

    

!!!  दशावतार ( परशुरामावतार )  !!!

                भाग – १२.

                सुरुवातीला मानवांचा एकच वर्ण होता. नंतर तो चिंतन, मनन करत कार्यृद्धींगत मानवाच्या एका वर्गाने  समाजहिताच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. तो ब्राह्मण वर्ग. बाकी कार्याचा भाग अन्य दोन वर्गाने उचलला. त्यातील एक वर्ग खूप बुद्धिमान व शूरवीर होते. त्या वर्णाने समाजाच्या रक्षणार्थ रक्षणाचा व दुष्टांचे निर्दालण करण्याचा भार उचलला. तो वर्ग क्षत्रिय. या वर्गापेक्षा कमी बुद्धिमान असून सुद्धा त्यांची कार्य कुशलता होती. हा वर्ग समाजाचा धनवर्धक वैश्य झाले. आणि ज्यांच्याजवळ बुद्धीचा अभाव, हीन स्वभाव पण परिश्रमिक होते. ते शूद्रवर्णाचे झाले. अशाप्रकारे मानव चार वर्णात विभक्त झाला.

                  ब्राह्मण हे समाजाचे डोके, जे  मानवाचे हितचिंतक. क्षत्रिय झाले बाहू, ते समाजाचे रक्षक! डोके आणि बाहूंनी कार्य केल्याशिवाय समाजाची उन्नती होऊ शकत नाही.

           सहाजिकच वर्ण निर्मिती झाल्यावर वाद सुद्धा सुरू झाले. ब्राह्मणांनी साधना तपस्या द्वारा समाज हिताचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे, क्षत्रियांनी बाल्य काळापासूनच वेद अध्ययन करायला हवे. कठोर ब्रम्हचार्य पालन करायला हवे. क्षत्रियांना वाटे, वेद अध्ययन ठीक आहे. पण इतके कठोरपणे शिष्यत्व करायला मान्य नव्हते. राजपुत्र असल्यावर तो कां हे सर्व करेल? दोन्ही वर्णात वाद सुरू राहिले. क्षत्रिय ऐश्वर्याने अहंकारी झालेत. देशाची धनदौलत आणि मनुष्यबळ त्यांच्या आधीन झाल्यामुळे ते ब्राह्मणांकडून धर्म, नीती, धर्माची अवाज्ञा करू लागले. प्राचीन भारतातील भृगवंशी ब्राह्मण फार बुद्धिमान आणि प्रभावशाली होते. या वंशात अनेक योगी पुरुषांनी जन्म घेतला. रघुवंशाचे पुत्र महर्षी वृचिक केवळ विद्वान आणि तपस्वीच नव्हते तर, युद्धकलेतही पारंगत होते. गाजीराजाची कन्या आणि विश्व मित्राची बहिण सत्यवती बरोबर वृचिकांचा विवाह झाला होता. सत्यवती सुद्धा त्यांच्या सारखीच धार्मिक आणि तपास्विनी होती.

        धर्माचे अधिक पतन आणि अधर्माचे प्राबल्य वाढल्यामुळे दुःखी झालेल्या वृचिकांनी जलकल्याण हितार्थ घोर तपस्या केली. ब्राह्मण आणि क्षत्रियात आदर्शाचे सामंजस्य असल्याशिवाय मानव जातीचे कल्याण अशक्य होते. सत्यवतीचा विवाह झाल्यावर, तिचे सासरे सुशील सुंदर सुनेला पाहून प्रसन्न झाले. व वर मागण्यास सांगितला. विनयाने म्हणाली, तात, मला बंधू नाही माझ्या आईला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र व्हावा. आणि भगुकुलाचे नाव उज्वल करेल असा तेजस्वी पुत्र मला व्हावा. त्यांनी दोघींनाही काही व्रत करायला सांगितले. ऋचिकांनी जनहितार्थ व पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ पिताश्रींची अनुज्ञा घेऊन केला. यज्ञाचा प्रसाद चरु देतांना देताना घोटाळा झाला. दोघींच्या प्रसादात अदलाबदल झाली. सत्यवतीचा  प्रसाद तिच्या आईने, व  आईचा प्रसाद सत्यवतीने खाल्ला. अंतर्ज्ञानाने भृगुऋषींना कळल्याबरोबर ते त्वरेने येऊन म्हणाले, हे काय केलेस? प्रसाद बदलला म्हणजे पुत्रांची अदलाबदल झाली. ते सत्यवतीला म्हणाले, तुझ्या पोटी शूर क्षत्रिय,

 तुझ्या आईच्या पोटी ब्राह्मण येईल. हे ऐकून सत्यवती अतिशय दुःखी झाली.  विप्रपत्नी असून क्षत्रिय जन्माला यावे हे तिला सहन होईना. विकल स्वरात म्हणाली, मामंजी मला तुमच्यासारखा सुज्ञ सर्व मान्य सर्वज्ञानी ब्राह्मण पुत्रच हवाय. भृगुंनी तिला परोपरीने समजावले पण ती आपल्या हट्टावर कायम राहिली. शेवटी त्यांनी मंत्र फिरवला. म्हणाले, तुला होणारा पुत्र ब्राह्मण झाला तरी नातू मात्र क्षत्रियच होईल. तुझ्या आईच्या पोटी ब्रह्मर्षी येईल. यथावकाश दोघी मायलेकींना पुत्ररत्न प्राप्त झाले. गादी राजाने राजपुरोहितांना दोन्ही बालकांचे जातक बघायला सांगीतले. त्यांनी सांगितले की दोन्ही मुले थोर ऋषी होतील. सत्यवतीच्या मुलाचे नाव जमदाग्नी ठेवावे. हा अत्यंत बुद्धिमान होईल. आणि तुमचा मुलगा क्षत्रिय कुशीतून झाला असला तरी यज्ञाच्या प्रसादी संस्काराने याच्यात ब्रम्हण्यांचे संस्कार दृढ होतील. ब्राह्मण म्हणवून घेण्यासाठी विश्वामित्रांनी साठ हजार वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद मिळवले ही गोष्ट प्रसिद्ध आहे. सत्यवती चा मुलगा दोन महिन्याचा झाला आणि ऋश्चिक तपस्येसाठी वनात निघून गेले.

         जमदग्नी कले कलेन वाढत होते. पिता ऋचिकांबरोबर शास्त्रार्थ, वेद विद्या आपल्या तलक बुद्धाने ग्रहण करीत होते. यथावकाश रेणू राजाची कन्या रेणुकाशी जमदाग्नीचा विवाह झाला. त्यांना तेजस्वी वसु, वसुमती, सुषेन व विश्वसु असे चार पुत्र झाले.

           आणि देवांनी दिलेल्या वरानुसार वैशाख शुध्द तृतीयेला रेणुकांच्या उदरी जन्मले आजन्मा परमात्मा! श्री विष्णूंनी भार्गवराव नाव धारण केलेला हा सहावा अवतार! भृगुवंशीय या भार्गवरामाने परशु धारण केला म्हणून ते परशुराम म्हणून ओळखल्या जाऊ लागले. लहानपणापासूनच त्यांचे शास्रतेज दिसून येत होते. शास्त्र पेक्षा त्यांचा कल शस्त्र पाठाकडे जास्त होता.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १७-१०-२३.

!!!  दशावतार  !!!

              भाग – १३.

             भार्गवराम अवघ्या बाराव्या वर्षी सर्व प्रकारच्या विद्येत प्रवीण झाले. शिक्षण संपल्यावर जमदाग्नी म्हणाले, राम माझ्याकडचे सर्व ज्ञान तुला दिले. आता तू विद्या दाता गणेशांना प्रसन्न करून घे. पिताज्ञेनुसार रामाने उग्र तपस्या करून विघ्नहर्ता गणेशाला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेल्या गणेशाने त्यांच्या विनंतीनुसार रामाला परशु विद्याचे रहस्य अवगत करत म्हणाले, परशु, हे देव दुर्लभ असलेले हस्त मुक्त शस्त्र आहे. गणेश म्हणाले, या परशु रूपाने तुला माझे आत्मीय रूपच देत आहे. हा दिव्य परशु धारण केल्यामुळे यापुढे तू परशुराम म्हणून ओळखला जाशील.

              परशु प्राप्तीनंतर राम पृथ्वीप्रदक्षिणे साठी शालिग्राम पर्वतावर पोहोचले. तिथे त्यांची भेट महामुनी कश्यपांशी झाली. त्यांनी रामाला जितेंद्री होण्याचा मंत्र दिक्षा दिली. परशुराम प्रवासात असताना कैलास पती शिवानी आदेश दिला की, देवेंद्र संकटात आहे. सैहिकेय दैत्याने त्यांच्या पराभव केल्यामुळे इंद्राचे सिंहासन डळमळत आहे. तू त्यांचे सहाय्य कर.

            हे कळताच दैत्य गुरु शुक्राचार्य संचित झाले. त्यांना माहित होते की परशुराम विष्णूचा अवतार आहे. शुक्राचार्यांनी सैहिकेयला इंद्राशी तडजोड करण्याचा सल्ला दिला. पण त्याने सल्ला न मानता परशुरामाशी युद्धाला सज्ज झाला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. रामाने आपल्या चिन्मय परशु द्वारा सैहियकाचे मस्तक धडा वेगळे केले. बाल परशुरामाचे अतुलनीय पराक्रम पाहून देवेन्द्रसह सगळे देव चकित झाले. शिवजी प्रसन्न होऊन त्यांनी त्यांचे सारे ४१ अस्त्रे परशुरामांना दिले. त्याचबरोबर दिव्य धनुष्य, अक्षय शर, दोन भाते व एक अभेद्य कवच दिले. रामांनी शिवांना साष्टांग नमस्कार करून पित्याच्या आज्ञेनुसार पूर्वजांच्या भेटीस प्रवासास निघाले. प्रवास करत करत परशुराम भागीरथीतीरी आपल्या आजोबाच्या आश्रमात आले. साक्षात सूर्यनारायणच आपल्याकडे येत असल्याचा भास त्यांना झाला. परशुरामांनी आजा ऋचिकांना व आजी सत्यवातींना साष्टांग नमस्कार केला. ऋचिकांनी भार्गव आणि हैहया मधील संघर्षा बद्दल माहिती दिली.

              ऋचिकांच्या सांगण्यानुसार त्यांचे आजोबा च्यवन आणि सुकन्याची भेट घेऊन, हिमालयात वास्तव्यास असलेल्या भृगुऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी केलेल्या ग्रंथरचनेचे ज्ञान प्राप्त करून घ्यायला सांगितले.

                त्याप्रमाणे परशुराम हिमालयात महायोगी भृगुंना भेटायला गेले. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमाचा परिसर अत्यंत अल्हाददायक, उत्साहवर्धक होता.

       भृगुऋषी विशाल अश्वत्थ वृक्षा खाली ध्यानस्थ बसले होते. ध्यान संपल्यावर समोर रामांञना पाहून त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, मी तुझीच वाट बघत होतो. क्षेम कुशल विचारपूस झाल्यावर, रामाने ग्रंथसंपदा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ज्ञानलालसा पाहून संतुष्ट झालेल्या भृगुंनी दोन ग्रंथ रामाच्या स्वाधीन केले.

          रामांनी अगदी आधाशा सारखे एकामागून एक प्रकरणे वाचू लागले. त्यातील अलौकिक प्रज्ञेपुढे नतमस्तक होत होते. शिवल्ली मधील सर्वच भाग लोककल्याणार्थ असून त्यातील विचार उदात्त व समतोल होते. गुण आणि कर्माचा विचार भृगुंनी साकार केला होता. त्यानंतर आनंदवल्ली प्रकरणात आनंदाचे स्वरूप विशद करून हे अलौकिक ज्ञान भृगुंनी पृथ्वीवर आणले. तैतरीय उपनिषदातील ही प्रकरणे वाचून झाल्यावर त्यांनी ज्योतिषी विषयक ग्रंथ वाचण्यास घेतला. या संहितेमध्ये माणसाचे भूत, भविष्य, वर्तमानाचे वर्णन केले होते. वाचताना रामाची मती गुंग होत होती.

        जवळजवळ एक महिना भृगुऋषींच्या आश्रमात ज्ञान संपादन करण्यात घालवल्यावर प्रतितामाह भृगु व माता-पौलिमीचा आशीर्वाद घेऊनण हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू असतांना त्यांना एक मुलगा संकटात होता त्याची सुटका केली. तो मुलगा म्हणाला, आपण मला नवीन जीवन दिले यापुढे आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. तो शांतनाम ऋषींचा पुत्र होता. त्याचं नाव रामाने अकृतव्रण ठेवले.

           दोघेही प्रवास करत जमदाग्नीच्या आश्रमात पोहोचले. नंतर  जमदाग्नींनी सर्वावर कामाची जबाबदारी सोपवून दिली. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपले कार्य पार पडत होते. सर्व सुरळीत चालत असताना ती घटना घडली.

            रेणुका मातेच्या शुल्कशा चुकीने क्रोधीत होऊन जमदाग्नींनी तिला भयंकर शिक्षा केली. मोठा मुलगा रुमवत(वसुवंत) ला तिची मान कापण्याची आज्ञा केली. पण मातेची हत्या करण्यास नकार दिल्याने त्याला भस्मसात केले. नंतर वसु सुषेन, विश्ववसु या तिघांनीही नकार दिल्यामुळे त्यांची गत तशीच मोठ्या भावासारखी झाली.

            तेवढ्यात जंगलातून आलेल्या परशुरामांना त्याच्या परशूने तिची मान कापण्याची आज्ञा केली.  परशुरामाला आपल्या पिताच्या विवेकावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पिताच्या आज्ञाचे पालन केले. आईची हत्या करताना ते जराही कचरले नाही. त्यांनी पुढे पृथ्वी निःक्षत्रिय केली तर त्यात काय आश्चर्य?

      क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. १७-१०-२०२३

!!!  दशावतार  !!!

                 भाग – १४.

              परशुरामांनी मनी कोणताही विकल्प न ठेवता, मातृप्रेम, पाप पुण्याचा संभ्रम, शास्त्रवचन कोणताही विचार न करता तात्काळ पितृज्ञाचे पालन केल्यामुळे जमदाग्नी प्रसन्न होऊन म्हणाले, ” तू त्रैलोक्यात सर्वमान्य होशील.” आणि म्हणाले वर माग!  साक्षात शिवरूप पित्याला अभिवादन करून राम म्हणाले, बाबा, आधी माझी आई व चारही भावांना जिवंत करावे. तसेच मी चिरंजीव होऊन मला मातृवधाची स्मृती नसावी. अजिंक्य होऊन सर्वत्र माझा विजय व्हावा. तथास्तु! म्हटल्यावर आई, भाऊ जिवंत झाले.

               रेणुकाने पतीचे पाय धरून क्षमा मागितल्या  वर तिने त्यांची केलेली मधुर स्तुती ऐकून प्रसन्न झालेले जमदाग्नीचे प्रेम पूर्वीपेक्षाही वाढले. दोघांचे मनोमिलन झाले. अशा या शिवपार्वती स्वरूप माता-पित्यांची सेवा साक्षात विष्णू भगवान परशुराम निष्कामपणे मनोभावे करत होते.

          महिष्मती राजधानीतील भव्यप्रसादात आज कार्तवीर्य फारच अस्वस्थ होते. वास्तविक त्यांच्या पायाशी सगळी सुखे लोळण घेत होती. खंबायताच्या आखातापासून गंगा यमुनेच्या पलीकडे वाराणसी पर्यंत त्यांची सत्ता होती. कोणीही प्रतिस्पर्धी उरला नव्हता.

            कार्तवीर्याचे वडील गणेश भक्त होते. त्यांच्या प्रसादाने झालेला हा पुत्र जन्मतः अपंग होता. त्यामुळे ते अतिशय दुःखी होते. कार्तवीर्य थोडे मोठे झाल्यावर त्यांनी बारा वर्षे दत्तोपसना केली. दत्तकृपेने  ‘ॐ’ हा एक अक्षरी मंत्र मिळाला. या मंत्राच्या उग्र तपस्येने गणेश प्रसन्न होऊन कार्तवीर याला सुंदर शरीर व सहस्त्रबाहुंचे बळ प्रदान केले. तेव्हापासून कार्तवीर्य सहस्त्र अर्जुन नावाने ओळखले जाऊ लागले.

            कार्तवीर्य दत्तभक्त, सर्व सिद्धी प्राप्त मोठा दानशूर या सर्व भूमीचा सम्राट असल्यावरही यांची नियत एका ब्राह्मणाच्या गाईवर का खराब व्हावी? कार्तवीर्य तर इतके निरिच्छ, नितीज्ञ,धर्मनिष्ठ होते की,  पित्याचे राज्य सुद्धा स्वीकारत नव्हते.

               पण हे सर्व कृत्य घडायला, त्यांची बुद्धी फिरवायला कारण झाला वशिष्ठांचा शाप. दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या कार्यवीर्याची बुद्धी भ्रष्ट झाली. अनिर्बंध सत्ता हाती असल्यामुळे उन्मतपणा वाढला. नर्मदा तीरी असलेल्या नागांच्या वस्त्यांचा समूह उच्छेद केला. रावणासारख्या शिवभक्ताला ते तो शिवपूजेत मग्न असताना त्याला आपले सामर्थ्य दाखवले. नर्मदेचे पाणी अडवल्यामुळे काठावर असलेल्या ऋषीमुनींची आश्रमे उध्वस्त झाली. पण कार्तवीर्याला या कशाचीच पर्वा नव्हती.

         कार्तवीर्य शिकारीहून आपल्या चतुरुंग सेनेसह  परतताना जमदाग्नींचा आश्रम दिसल्यामुळे आपल्या लवाजमासह कार्तवीर्य आश्रमात आले. तिथले पवित्र आनंददायी वातावरण पाहून त्यांना एकदम प्रसन्नता वाटली. साक्षात धर्मच इथे वावरत असल्याचा भास झाला. आणि रेणुका माता आणि जमदाग्नीच्या दर्शनाने त्यांना गौरीशंकरच भेटल्यासारखे वाटले. त्यावेळी आश्रमात कोणीच नव्हते. सर्वजण आपापल्या कार्याने बाहेर गेले होते.

       जमदाग्नींनी त्यांचा आदर सत्कार करून भोजनासाठी सर्वांना थांबवून घेतले. जमदाग्नींना इंद्रा कडून मिळालेल्या कामधेनूमुळे जेव्हा जितकं, जे हवं ते मिळत असल्यामुळे या सर्वांना छान सुग्रास जेवण मिळाल्याने तृप्त झाले. पण विवेकशील अर्जुनाची मती मात्र फिरली. त्यांनी जमदाग्नीला सरळ कामधेनूचीच मागणी केल्यावर ते म्हणाले, राजन, ही मागणी धर्मबाह्य आहे. पण उन्मत राजाने जबरदस्तीने रथाच्या मागे बांधून कामधेनु घेऊन गेले.

         परशुराम व अकृतव्रण आश्रमात परतल्यावर सारा प्रकार कळला. पित्याची आज्ञा घेऊन पाच बंधू, अकृतव्रणासह महिष्मती नगरीकडे निघाले. दूरदर्शीपणे राम आश्रमांना भेटी देत पुढे जात होते. कामधेनु हे एक निमित्त होते. परंतु भविष्यात गरज पडली तर संघर्षामध्ये उतरायची मानसिक दृष्ट्या तयार असावी हा सामाजिक विशाल हेतू होता. प्रवास करत करत परशुराम मार्कंडेय मुनींचा आशीर्वाद व आपले कार्य अवगत करण्यास त्यांच्या आश्रमात आले असता कलिंदू राक्षसाने आश्रमावर आक्रमण केले. रामाने आपल्या परशुने त्याचा वध केला. व पाशवी शक्ति पासून नर्मदा तीर मुक्त केले.

 परशुराम महिष्मती नगरी जवळ पोहोचल्यावर, सम्राट कार्तवीर्याला अकृतव्रणला दूत म्हणून निरोप पाठवला की, बळजबरीने नेलेली कामधेनु परत करावी. पण राजाने ऐकले नाही. त्यांच्या हट्टपायी प्रिय सचिव वरण्य व त्याचा पुत्र ठार झाले. आपला पती कार्तवीर्य ऐकत नाहीसे पाहून महाराणी मनोरमाने स्वतःला संपवले. शेवटी युद्धभूमीवर कार्तवीर्य आणि परशुराम सुमारासमोर उभे राहिले. रामाने त्यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण अहंकारी कार्तवीर्य आणखी संतप्त झाले. आणि त्यांना त्यांच्या वराची आठवण झाली. त्यांनीच वर मागितला होता, रणांगणी आपल्यापेक्षा श्रेष्ठाकडून क्षात्रोचित मरण यावे. त्यांना कळून चुकले, आपला वर खरा होण्याची वेळ जवळ आली आहे. दोघांमध्ये युद्ध झाले. आणि परशुरामाने आपल्या परशूने राजाचा शिरच्छेद केला. युद्धात कार्तवीर्य पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कार्तवीर्यच्या सेनापतीने शरणागती पत्करली. परशुरामाची कामधेनू सन्मानाने परत केली. राम आपल्या बंधुसह कामधेनु घेऊन आश्रमात पोहोचले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. १८-७-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                   भाग – १५.

                 पाच दिवसांनी परशुरामांनी माता-पितांची  आज्ञा घेऊन अरण्यात तपस्ये करता निघून गेले. त्या दिवशी कामानिमित्त सर्वजण आश्रमा बाहेर गेले होते. मोजके शिष्य व जमदाग्नि व रेणुमाता आश्रमात होते.

           तेवढ्यात कार्तवीर्याचे पुत्र येऊन जमदाग्नीचा  वध केला. सर्व आश्रम उध्वस्त केला. मध्ये पडलेल्या ऋषीकुमारांनाही सोडले नाही. काही वेळाने बाहेर गेलेले सर्वजण परत आले. आंतरिक जाणीव पडल्याने परशुरामही परतले. झालेला भीषण संहार पाहून आणि कार्तवीर्य पुत्रांनी त्यांच्या पित्यावर २१ वार करून वध केला म्हणून परशुरामाने प्रतिज्ञा केली २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावरच मी पितृणातून मुक्त होईल.

         कृष्णामालिकी या पवित्र क्षेत्रावर परशूरामांनी पित्याचे अंत्यसंस्कार केले. रेणुका मातेने सहगमन केले आणि कार्तवीर्य पुत्रांचा सूड घेण्यासाठी महिष्मती नगरात आले. कार्तवीर्य पुत्रांचा शिरच्छेद केला. राजवाडा जमीनदोस्त करून रामांनी आपली सूडाची प्रतिज्ञा पूर्ण केली. आणि उत्तरेकडे निघाले…

          प्रदीर्घ प्रवासानंतर परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले. शिवपार्वतीला नमस्कार केल्यावर शिवांनी आशीर्वाद देत, त्रिलोक्य विजय कवच दिले. म्हणाले,तू जे पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचे व्रत अंगीकारले त्यात तुला यश प्राप्त होईल.

          परशुरामांच्या प्रतिज्ञाची वार्ता सर्वेकडे पसरली. परशुरामांनी सम्राट कार्तवीर्याचा निःपात केल्यामुळे क्षत्रिय संतापाने धगधगत होते. ते युद्धाला सज्ज झाले. पण परशुरामांपुढे त्यांचा टिकाव लागेना.मार्ग क्रमण करीत असता, जे क्षत्रीय राजे युद्धास तयार होते त्यांचा निःपात करत अनेक वर्ष अखंड प्रवास सुरू होता. उन्मत क्षत्रियांचाच निःपात करणे हाच रामाचा मुख्य उद्देश होता. क्षत्रियांचा संहार करून मातेला दिलेले वचन पूर्ण केले. पृथ्वीवरील झाल्या संहाराने रामाचे मन विषण्ण झाले होते.

              अज्ञानी क्षत्रियांचा संहार झाल्यावर त्यांनी विश्वजीत यज्ञ केला यज्ञाची सांगता करताना परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान केली. त्यांच्याच आज्ञेने नवनिर्माण भूमीच्या शोधात अकृतव्रणसह परशुराम निघाले. महेंद्र पर्वताच्या दक्षिण टोकाजवळ येऊन सागराला आव्हान केले. प्रचंड जलराशीचा सागर सह्याद्रीच्या पायथ्यापासून पाच सहा योजने मागे सरकला. आणि भूमी वर आली.

            नव भूमीवर परशुरामांनी नियोजन करून विकास घडवून आणला. त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर परशुराम निघून गेले. परशुराम ज्या ठिकाणी गुप्त झाले तिथे त्यांच्या पादुकांची स्थापना केली. महेंद्र पर्वत डोंगरावरची भूमी परशुराम क्षेत्र बनले.

 परशुरामांनी जे क्षत्रिय धार्मिक वृत्तीचे निरूपद्रवी होते जे अहंकार सोडून त्यांना शरण आले होते, त्या क्षत्रियांना सोडून दिले होते. त्यांना उपयुक्त शिक्षण देऊन राज्य शासनाचा भार त्यांचेवर सोपवला. क्षत्रिय, ब्राह्मण धर्म नियमांचे पालन करत देशात पुन्हा धर्मशांती स्थापन झाली. ब्राह्मण क्षत्रिय विवाद नेहमीसाठी मिटला.

           समाज रक्षणासाठी संपूर्ण मानव जातीचे चार वर्णात विभाजन झाले. सगळे वर्ण आपापले कार्य स्वधर्म समजून श्रद्धापूर्वक करत होते.. समाजात शांती प्रस्थापित झाली होती. ऋषीमुनी भगवंत प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करू लागले.

        पुलस्य वंशाचे  विश्वस्तवाचे पुत्र रावण कुंभकर्ण विभिषण यांनी यथोचित शास्त्र शिक्षण संपल्यावर तिघेही कठोर तपस्या करू लागले. रावणाने तपस्येचे फळ म्हणून अनेक प्रकारची शक्ती प्राप्त झाल्या नंतर रावण लंकाधीपती होऊन राज्यभोगात दिवस घालवू लागला. राक्षसी प्रवृत्तीचे सर्व लोक त्याला येऊन सामील झाले.

         रावण अहंकाराने उन्मत झाल्यामुळे सर्वांनाच तुच्छ समजत होता. रावणाचे अनुयायी राक्षस ऋषीमुनींवर अत्याचार करू लागले. यज्ञयागात विघ्ने निर्माण करू लागले. रावण इतका शक्तिशाली झाला की, त्याने देवांनाही सोडले नाही. कोणीही त्याचा प्रतिकार करू शकत नव्हता.

            शेवटी असहाय्य  आर्त ऋषी साधूंची हाक, प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली.

             सूर्यवंशी महाराज दशरथ भारताचे महान सर्वश्रेष्ठ राजे होते. त्यांचे वास्तव्य आयोध्या नगरीत होते. अत्यंत शूर, न्यायी, दानी, धार्मिक प्रवृत्तीचे होते. पण संतान नसल्यामुळे दुःखी होते. त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. परिणाम कौशल्यापासून राम, सुमित्रापासून लक्ष्मण व शत्रृघ्न, कैकयी पासून भरत असे चार पुत्ररत्न प्राप्त झाले. चारही पुत्र कलेकलेन वाढत होती. योग्य वेळ झाल्यावर चौघांच्याही शिक्षणाची व्यवस्था केली. शास्त्र बरोबरच अस्र शिक्षणही त्यांना दिल्या गेले. राम मोठे म्हणून तिघेही भाऊ त्यांचा आदर करत. त्यांच्या आज्ञाचे पालन करत.

         विश्वमित्र ऋषी आपल्या तपसाधनेमुळे पूर्ण विश्वात प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य तपोवनत होते. राक्षसगण त्यांच्या साधनेत अनेक प्रकारचे विघ्ने आणत. त्यांना यज्ञ याग करणे कठीण होऊ लागले. ते परमेश्वराची आराधना करू लागले व देवतांनी त्यांची हाक ऐकली.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  १८-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading