
केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! आद्य शंकराचार्य !!!
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४१.
नेहमीप्रमाणे आन्हिके आटोपून आचार्य ध्यानात बसले असता, एकाएकी त्यांच्या ध्यानावस्थेत पद्मपादाचार्यांचे आगमन झाले. आचार्य म्हणाले,
” काय अडचण आली? का आलास? “
“आचार्य, आपले दुखणे औषधाने बरे होणारे नाही.”
” हे तू सांगतोस मला? ” यावर
नम्रपणे पद्मपाद म्हणाले,
” आपली व्यथा माझ्याने पाहावली जात नाही. म्हणून आज मी धाडस केले. आचार्य, आमच्यासारखे शिष्य आपल्याजवळ असताना, आपण देहक्लेश का भोगताहात? मग आमचा उपयोग काय? मंत्रशक्ती वापरण्याची मला आपण अनुमती द्यावी.”
” म्हणजे काय?”
” आचार्य ; आपण तर सर्वज्ञ आहात. काट्याने काटा काढावा हा आपला धर्म आपणच शिकवला ना? त्याचाच उपयोग करणार आहे.”
आचार्य म्हणाले,
” म्हणजे तो शांक्तपंथीय अभिनव गुप्त?”
” होय! तोच. त्याची विद्या त्याच्यावरच उलटवणार. गुरुदेव फक्त आपल्या कानावर घालण्यासाठीच ध्यान भेट घेतली. जातो मी.”
आणि आचार्य काही म्हणण्याच्या आत पद्मपादाचार्य आचार्यांच्या ध्यान अवस्थेतून निघूनही गेले.
ध्यानातून उठलेले आचार्य, शिष्य भेटीमुळे आज विशेष प्रसन्न होते.
तक्षशीलेनंतरचा प्रवास होता काश्मीर खोरे. निघण्याच्या वेळेस अभिनव गुप्त धावत पळत आचार्यांकडे येऊन म्हणाला,
” इतर शिष्यांबरोबर मी इथेच तक्षशीलेत राहतो.”
आचार्यानी त्याच्याकडे रोखून पाहताच त्याची नजर खाली झुकली. तो म्हणाला,
” माझी प्रकृती बिघडली. पदयात्रा अशक्य आहे.”
आचार्य म्हणाले,
” या पदयात्रेत कुणाला सक्ती नाही. ज्याचे त्याने ठरवायचे आहे. माझ्या अनुमतीची गरज नाही.”
चित्सुखाचार्य व तोटकाचार्य , इत्यादीकाना वाटले, बरे झाले सुंठीवाचून खोकला गेला.
मग निवडक शिष्यांसह आचार्य काश्मीरकडे निघाले. त्यांचे दुखणे जादू केल्याप्रमाणे पूर्णपणे बरे झाले होते. आता प्रवास नगाधिराजाच्या सान्निध्यातून चालू होता. प्रवास सुरु असतांना, आचार्य वेदकाळापासून मानवाच्या उक्रांतीच्या हकीकती सांगत. भारतमातेच्या विविध रूपांचे वर्णन करीत. भारताचे शिरोभूषण असलेल्या काश्मीरची माहिती सांगत होते…
” काश्मीर म्हणजे महर्षी कश्यपांची भूमी. तिथे केवळ केशराचा सडा पसरत होता असे नव्हे तर, ते आजही कला, काव्याचेही माहेरघर आहे. ती भूमी अक्षरशः नंदनवन आहे.”
आचार्य सांगत होते,
” श्रीनगर मध्ये श्री शारदा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराचे तीन दरवाजे मोठ मोठ्या विद्वान, प्रकांड पंडितांनी आपल्या सामर्थ्यांनी उघडले. पण दक्षिणेचा दरवाजा उघडू शकेल असा समर्थ पुरुष अद्याप कोणी पोहोचला नाही, म्हणून तो दरवाजा अद्याप बंदच आहे. तोटकाचार्य म्हणाले,
” आपण तो दरवाजा उघडण्या साठीच इकडच्या प्रवास प्रवासाला आलोय ना?”
आचार्य म्हणाले
” प्रयत्न करून पाहणार आहे. यशापयश देणे शारदा देवीच्या हाती आहे. शारदा मंदिराचे सर्वच दरवाजे उघडल्याशिवाय पूर्ण ज्ञान प्राप्ती होणारच नाही.”.
या ठिकाणी आता या पीठाबद्दल संक्षिप्त माहिती देणे उचित होईल असे वाटते. म्हणून देत आहोत.
काश्मीरमधील हे सर्वज्ञ पीठ म्हणजे खरोखरच ज्याला विश्वामधील समस्त गोष्टींचे ज्ञान आहे अशा व्यक्तींसाठीच आहे. अशीच व्यक्ती या पीठावर आरूढ होऊ शकते. त्यासाठीच्या कसोट्या म्हणजे — या पीठाची चार द्वारे आहेत. पूर्व – पश्चिम – उत्तर — दक्षिण !! प्रत्येक द्वारावर एकेक ” द्वार – रक्षक ” आहे. इथे लक्षांत हे घ्यावे की “द्वार रक्षक ” म्हंटले आहे — पगारी शिपाई म्हणजे द्वारपाल म्हटलेले नाही. संघ शाखेत कसा ध्वज रक्षक असतो — तसेच हे !! तर हे रक्षक प्रकांड पंडित असत. प्रत्येक द्वारावरच्या पंडितांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणारासाठी एकेक द्वार खुले केले जाई. आजवर तीन द्वारे उघडू शकणारे होऊन गेले होते. तथापि दक्षिण द्वार उघडण्यास अद्याप कोणीही समर्थ ठरला नव्हता. या द्वारावरील पंडितांच्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिल्यावर देखील प्रत्यक्ष भगवतीचे त्यामुळे समाधान झाले तर आणि तरच आकाशवाणीने ती स्वतः या व्यक्तीची पीठावर आरूढ होण्याची योग्यता सांगून ; त्यांस पीठाधिष्ठीत होण्यास अनुमती आणि आमंत्रण देत असे. अशी ही अत्यंत कठोर अशी परीक्षा असे. आणि आता तर शंकराचार्य तिकडेच निघाले होते.
काश्मीरची नंदनभूमी जवळ येत होती. प्रकृती स्वास्थ लाभलेल्या शंकराचार्यांचा उत्साह दुणावला होता. आणि तिकडे तक्षशिलेत अभिनव गुप्ता भगंदर रोगाने तडफडत होता.
शंकराचार्य श्रीनगरमध्ये पोहोचल्याबरोबर, तेथील लोकांनी विविध वाद्याच्या गजरात, पुष्पहार घेऊन त्यांच्या स्वागताला सामोरे गेले. शंकराचार्यांच्या विद्वत्तेबद्दल, कार्यकुशलते बद्दल, धर्मप्रसाराबद्दल, कुशल संघटक, वादपटू इत्यादीबद्दल त्यांनी बरेच ऐकले होते.
परंतु त्यांचे वय पाहता आपण ऐकलेली माहिती खोटी आहे की काय? अशी त्यांना शंका येऊ लागली. कारण इतक्या अल्पवयात एवढे कर्तृत्व कसे शक्य आहे? परंतु त्यांच्या डोळ्यातील बुद्धीची चमक, चालण्यातली आत्मविश्वासपूर्ण ऐट यावरून ते दिव्य पुरुष असण्याची खात्री पटली.
आचार्य आपल्या शिष्यांसह सर्वांचे नमस्कार स्वीकारत मोठ्या शिस्तीत आपली दिग्विजय – यात्रा शारदा मंदिराच्या टेकडीकडे घेऊन निघाले. इतकी सारी मंडळी देशासाठी, धर्मासाठी सर्वसंगपरित्याग करून, घरदार सोडून निघालेली पाहून लोकांना आश्चर्य वाटत होते.
आज शंकराचार्य आपल्या शिष्यांसह येऊन वादसभा घेणार, हे कळल्यामुळे काश्मीरमधील अनेक विद्वान मंडळी आधीच उपस्थित झाली होती. दक्षिण दार उघडण्याचा सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. आचार्य स्थानापन्न झाल्यावर, मंदिराची सगळी माहिती सांगितली. तिन्ही दरवाजे कसे? कोणी उघडले हेही सांगितले व दक्षिण दारासंबंधीची माहिती सांगितली.
आचार्य म्हणाले,
” मी दक्षिणद्वार उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु विद्यादेवीची प्रांगण सर्व बाजूंनी खुले असायला हवे. नाहीतर तिच्या उपासकांची कोंडी होईल.”
त्यानुसार व्यवस्था केली गेली. नंतर प्रश्नोत्तराना आरंभ झाला.
कणादमताच्या एका पंडिताने त्यांना सांगितले की,
” आचार्य, आम्ही जे प्रश्न विचारू तीच कसोटी आहे असे समजावे…, दोन अणूंमध्ये तदाश्रित जो एक परमाणु आहे तो कोणापासून झाला?
आचार्यानी उत्तर दिले,
” या द्वित्तवसंख्या परमाणू निष्ठा सकाराणं तस्य गतस्य मात्रा”. दोन ही जी संख्या आहे तीच त्याच्या द्वयगुनी कगतला कारणीभूत आहे.”
उत्तर बरोबर आल्यावर, गौतमानुयायी नैयारीकने विचारले,
” हे यते, तुम्ही सर्वज्ञ आहात असे ऐकतो तर, सांगा.. कणाद पक्षाहून गौतम पक्षात मुक्तीला विशेषता काय आहे? “
आचार्य उत्तरले…
” अत्यन्ततनाशे गुणसंगतेर्या स्थितिर्नभोवत्कणभक्ष पक्षे।
मुक्तिस्तदीये चरणपक्षपक्षे साऽऽनन्द संवित्सहिता विमुक्तीः।।”
गुणसंबंधाच्या अत्यंत नाश झाला असताना नभोवत जी शून्यवृत्ती होती ती कणाद पक्षातील मुक्ती आणि गौतम पक्षात गुणसंगाचा अत्यंत नाश झाला असतानाही जी अवकाशात शून्यवृत्ती होते पण आनंद युक्त असते.”
प्रश्नकर्ता संतुष्ट होऊन त्यांनी आचार्याना वंदन केले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४२.
योगदर्शनमताभिमानीने विचारले,
” तूर्या व उन्मनी यात काय फरक आहे?”
आचार्य म्हणाले,
” तूर्या अपक्व स्थिती आणि उन्मनी ही परिपक्व स्थिती आहे.”
हळूहळू एकेका संप्रदायाचे एक एक विद्वान पुढे येत प्रश्न विचारत होते व संतुष्ट होऊन मागे फिरत होते. कापालिक, बौद्ध, सौत्रांतिक, विज्ञानवादी, वेदांतवादी इत्यादी सर्वांच्या शंकेचे आचार्यांनी निरसन केले. प्रश्नांची यथायोग्य उत्तरे ऐकून लोक विस्मित होत होते.
” काय हे बुद्धी वैभव? किती जन्माची पुण्याई? सारा जन्म गेला तरी आम्ही एका विषयात पारंगत होऊ शकत नाही. आणि हा यती एवढ्या लहान वयात सर्व विद्येत, सर्व शास्त्रात इतका पारंगत कसा? हा तर महान चमत्कारच म्हटला पाहिजे.”
आता दक्षिण दरवाजा उघडण्यास कोणताच अडथळा नव्हता. शंकराचार्यांची पूर्ण योग्यता असल्याची सर्वांनी एकमताने मान्य केले.
शारदा- मंदिराचे दक्षिण द्वार पानाफुलांनी सजवले. कुंकवाची स्वस्तिके काढली गेली. ज्येष्ठींनी शंकराचार्यांना मोठ्या मानमरातबाने दक्षिण दाराजवळ आणून द्वाराची यथाविधी त्यांना पूजा करायला सांगितले. दार उघडण्याआधी नारळ फोडले गेले. त्याचवेळी आचार्यांचा जय जय काराने आसमंत दुमदुमला.
” शंकराचार्य महाराज की जय… शारदा देवी की जय… “
उल्हासित मनाने आचार्यांनी इतके वर्ष बंद असलेले द्वार उघडले.
आचार्यांच्या हस्ते शारदा मातेची व तेथील पीठाची यथासांग पूजा केली गेली. आचार्य पीठाधिष्ठीत होणार तोच, प्रत्यक्ष सरस्वती प्रगटली. ती तीव्र शब्दात म्हणाली,
” वत्सा, तुझी सर्वज्ञता पूर्वीच सिद्ध झाली आहे. आर्यवर्तात तू वैदिक धर्माचे पुनरुस्थान घडवून आणलेस. तेव्हाच सकलशास्त्र संपन्न झालास. पण या पीठावर आरूढ होण्यास केवळ सर्वज्ञ असून चालत नाही. तर पूर्ण शुद्ध असावे लागते. संन्याशासाठी स्री स्पर्श वर्ज्य आहे. तू परकाया प्रवेश करून, राजा अमरकच्या शरीरात निवास केलास. त्यामुळे तू इथे आसनस्थ होऊ शकत नाहीस. “
आचार्य प्रणाम करून सरस्वतीला म्हणाले,
” माते, मी संपूर्ण जन्मात कुठलेही पातक केलेले नाही. कामशास्त्राच्या माहितीसाठी परकाया प्रवेश केला होता. राजाचे भोग हे त्या शरीराचे भोग होते. ती पुनर्जन्मावस्था होती. त्या शरीरात राहूनही मी व्रतस्थच राहिलो. कामशास्त्राचे लेखन केले. पण अनुभव घेतला नाही. मी कायावाचामनाने शुद्धच आहे.”
आचार्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकून शारदामाता प्रसन्न झाली. व अंतर्धान पावली.
सर्वांच्या समक्ष ; वाद्यांच्या निनादात ; आणि जयघोषात, मंत्रपठणाच्या पवित्र वातावरणात बहुमताने आचार्य पीठावर आसनस्थ झाले. सर्व श्रेष्ठीनी मिळून एकमताने त्यांना “जगद्गुरु ” ही बहुमानाची पदवी समारंभपूर्वक बहाल केली. या श्रीनगरमधील शारदा टेकडीचे “शंकर टेकडी” ; असे नामाभिधान करण्यात आले. जमलेल्या समुदायाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमत राहिले.
“श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य की जय…”
दिग्विजय यात्रा खऱ्या अर्थाने समाप्त झाली. दिग्विजय यात्रेतला हा टप्पा म्हणजे शिरोबिंदू ठरला ; कळस ठरला.
कालटीतला बालशंकर, गुरु गोविंदयती मुळे आचार्य झाला. तोच आज विद्वज्जनांचा ; आणि साक्षात भगवतीचाही कौल मिळून हाच शंकर आता ” जगद्गुरु शंकराचार्य ” झाला होता. एवढ्या लहान वयात यशाची ही एवढी प्रचंड घोडदौड दुर्मिळ ; असामान्य होती. जाणकार म्हणत होते,
” प्रत्येक युगात एकेक पुरुष निर्माण झाला. कृतयुगात कपिलमुनी,त्रेतायुगात श्री दत्तात्रेय, द्वापार युगात महर्षी व्यास आणि या कलियुगात जगद्गुरू शंकराचार्य. शंकराचार्याइतका ज्ञानी पुरुष झाला नाही व होणारही नाही.”
आता चौथ्या धर्मपीठाची स्थापना करायची होती. यात्रा हिमालयाच्या दिशेने निघाली. या यात्रेने तोटकाचार्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यातला पूर्वाश्रमीचा गिरी जणू जागृत झाला. आपल्या बालपणीच्या स्मृतीत पुन्हा जायला मिळेल म्हणून ते हरखले होते.
वितस्ता ( झेलम) नदीचा उगम पाहून जवळच असलेले मार्तंडमंदिर, शेषनाग, अनंतनाग मार्गाने यात्रा हरिद्वारला येऊन पोहोचली. गंगास्नान, दीपस्नान, गंगेची आरती इत्यादी सर्व यथासांग करुन ऋषिकेशहून रुद्रप्रयाग मार्गे प्रवास सुरू झाला. या बिकट मार्गात हिमालयाचे लहरी हवामान, वादळी वारे, मध्येच भरपूर पाऊस, अशा अनंत अडचणीवर मात करत ही यात्रा बद्रिकाश्रमाच्या अलीकडे बदरीवनाच्या गुहेजवळ पोहोचली. आचार्यांनी गुहेजवळची धूळ मस्तकी धारण केली. तोटकाचार्यातला पूर्वीचा गिरी जागृत होऊन आचार्यांना वंदन करून म्हणाला,
” या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने ‘द्विज’ झालो. म्हणजेच दुसरा जन्म प्राप्त झाला मला..आपल्यामुळे !! आपला माझेवर असलेला अनुग्रह हा माझा दुसरा जन्म होता. वेडा, खुळा गिरी अनुग्रह लाभताच तोटकाचार्य झाला.”
त्या गृहेजवळच धर्मयात्रेचा मुक्काम पडला. आचार्य आपल्या आजेगुरु गौडपादाचार्यांच्या स्मरणाने आनंदित झाले. त्यांच्याच कृपेने दक्षिणामूर्ती भगवान शंकरांचे दर्शन झाले होते. त्यांच्याच कृपेने या गुहेत बसून आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्ये लिहिली होती. महंतांची पण त्यांना दर्शने घडली होती. अशी ही पवित्र पावन भूमी धर्मपीठासाठी निश्चित करावी. येथेच तोटकाचार्याला ज्ञानप्राप्ती झाली म्हणजेच त्याच्या अंतकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित झाली म्हणून, या धर्म पिठाचे नाव “ज्योतिर्मठ” ठेवावे व मठाधिपती तोटकाचार्याला नेमावा. तो इथल्या लोकांशी परिचित असल्यामुळे धर्मापीठाची व्यवस्था उत्तम रीतीने व जबाबदारीने पार पडू शकेल. असा विचार आचार्यांनी केला.
आचार्यांनी आपला मनोदय तोटकाचार्याला सांगितल्यावर तो गोंधळून म्हणाला,
” आचार्य, मी अडाणी, जडमती मठाधिपती होण्याच्या योग्यतेचा तरी आहे का?”
जरबेच्या स्वरात आचार्य म्हणाले,
” मी तुझा गुरु म्हणून तुला आज्ञा देतो, हे तुला स्वीकारावेच लागेल.”
तोटाकाचार्य गुरुचरणी नतमस्तक होऊन म्हणाले,
“आपली आज्ञा शिरसावंद्य. फक्त एकच विनंती आहे, धर्मपीठाला बाधक असे काही माझ्या हातून घडू नये याकडे आपले लक्ष असावे. आपला आशीर्वाद असावा.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४३.
. सर्वांच्या उपस्थितीत आचार्यांनी ज्योतिर्मठाची स्थापना केली. आचार्यांनी सर्वासमक्ष या पीठाचा “आम्नाय” सांगितला. या मठासाठी धर्ममीमांसा… कुरु, कंबोज, पांचाल, काश्मीर, बद्रिकाश्रम, देवनारायण, देवी पूर्णागिरी, तीर्थ अलकनंदा, अथर्वण, संप्रदाय, नंदबार हे प्रांत / विभाग या मठाच्या अंतर्गत राहतील. आचार्यांचा, त्यांच्या धर्ममठाचा, वैदिक धर्माचा सर्वांनी जय जयकार केला. तोटकाचार्यावर ज्योतिर्मठाची जबाबदारी सोपवून बाकी मंडळी बद्रीनारायणाच्या दर्शनाला निघाली.
आचार्यांच्या निर्देशानुसार नारायण देवाच्या पूजाअर्चेचा मान अग्नी शर्मा नबुंद्री पादाकडे वंशपरंपरेने दिला गेला. आचार्य आल्याचे कळताच, अग्नी शर्मा धावत येऊन त्यांच्या पायावर लोटांगण घालत म्हणाला,
” आपल्या कृपेने माझा हा नरदेह सार्थकी लागला.”
नंतर तेथून श्रीपाद जगद्गुरु शंकराचार्य शिष्यांसह कांची नगरी पोहोचले. नारायण पर्वताजवळच्या गुहेत निवास असलेल्या श्रीदत्तात्रय या ज्ञानदेवतेचे दर्शन घेतले. दत्तराज त्यांना पाहताच अतिशय आनंदित झाले. आजपर्यंत त्यांच्या हातून झालेल्या धर्म कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. म्हणाले,
” शंकरा, खरं म्हणजे तुझी आयुमर्यादा फक्त सोळा वर्षेच होती. पण एकदा वामदेव व्यास कालीकटास आले असता, तुझ्या मातेने त्यांचे आदरातिथ्य केल्याने ते प्रसन्न होऊन, मातेने तुझे वय दुप्पट करून मागितल्यावर त्यांनी ते दिले. वत्सा, तुला मिळालेले वाढीव आयुष्य तू सत्कारणी लावलेस. वैदिक धर्माची तुझ्या हातून बहुमोल सेवा झाली.”
देवांची ही पवित्र वाणी ऐकून आचार्य तृप्त झाले. आचार्य मनी म्हणाले,
” हे भाग्य केवळ गुरु गोविंदयतींमुळेच मिळाले. आता चार मठांचा संकल्प पूर्ण झाला. ओढ लागली गुरुदर्शणाला जाण्याची.”
आचार्यांनी एक दिवस सर्व शिष्यांना बोलावून सांगितले,
” तुम्ही सर्वांनी आता भ्रमंती थांबून आपापल्या इच्छेप्रमाणे स्थायिक व्हावे. मिळवलेल्या ज्ञानाचा लोकसेवेसाठी उपयोग करावा. वैदिक धर्मकार्यास सर्वस्वी वाहून घ्यावे. कोणत्याही संभ्रमात न पडता फक्त कार्यरत रहा. त्यामुळे तुमच्या विभागातील मठाधिपतींना त्यांचे कार्य करणे सुकर होईल. राष्ट्राबरोबर स्वतःचाही उद्धार करून घ्या.”
चित्सुखाचार्य, उदंक व काही निवडक शिष्यांबरोबर आचार्य ओंकारेश्वरी आले. गुरु गोविंदयतींच्या समाधी स्थानी आल्याक्षणी त्यांची जगद्गुरूंची मोठेपणाची झूल केव्हाच गळून पडली होती. एखाद्या लहान बालकासारखे जणू गुरुमाऊलीच्या मांडीवर पहुडले. मंडन मिश्रा सारख्या गाढ्या विद्वान महंन्मत सत्ताधीशावर विजय मिळवलेले शंकराचार्य आता जगद्गुरुची पदवी घेऊन आल्याची बातमी कळताच त्यांच्या दर्शनार्थ झुंबड उडली. जेमतेम पंचवीशीत असलेला हा तरुणाबांड युवक “जगद्गुरु”? हा तर केवळ चमत्कारच होता. काही दिवस नर्मदा स्नान, ओंकारेश्वर दर्शन, प्रवचनात गेले. तेवढ्यात उज्जयिनीचा राजा हर्षविक्रमादित्य लवाजम्यासहित ओंकारेश्वरेश्वरी आला. आचार्यांना नमस्कार करून म्हणाला,
” मी आपल्याला उज्जयिनीला घेऊन जाण्यासाठी स्वतः आलोय. भर्तृहरिदादा तिथेच एकांतवासात असतात.”
गुरुबंधू भर्तृहरीच्या भेटीस जायलाच हवे, असे वाटून आचार्यांनी राजाच्या विनंतीला मान दिला.
उज्जैनी जवळच असलेल्या शांत, रम्य गुफेत वैराग्याचा पुतळा असलेला भर्तृहरीचा निवास होता. पित्याच्या परमार्थाचा वारसा चालवत होता. आचार्य येताच वैराग्य संपन्न अशा या दोन पुरुष श्रेष्ठींनी एकमेकांना मिठीत सामावून घेतले. गोविंदयतींच्या स्मरणाने दोघेही ज्ञानसंपन्न पुरुषोत्तम गहिवरले.
ही अपूर्व भेट राजा हर्ष विक्रमादित्य, व बाकी लोक अनिमिष नेत्राने पाहत होते. आज भर्तृहरीची गुफा पावन झाली होती. आचार्यांचा निवास या गुफेतच होणार होता. क्षिप्रा नदीत स्नान करून आचार्य श्री महाकालेश्वराचे दर्शनास आले. डोळे मिटून ध्यानावस्थेत स्तोत्र म्हणायला सुरुवात केली….
” अवन्तिकायां विहितावतारं मुक्ती पदानायच सुज्जनानाम्।
अकालमृत्योः परिरक्षणार्थ वन्दे महाकालहं सुरेशम्।”
तेथील हरासिद्धीदेवी, महाचंडी, भोगमूर्ती देवतांचे दर्शन घेऊन आचार्य गुफेत परत आले. हा त्यांच्या नित्यक्रमच झाला. दोघेही गुरुबंधू भिक्षान्न भक्षण करून अध्यात्म चिंतनात मग्न असत.
गुरु गोविंदयती परमधामाला गेल्यानंतर या दोघांची भेट प्रथमच होत होती. आचार्य शंकर ; आपण केलेल्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा सांगत म्हणाले…
” भारतभर भ्रमंती केली. पाखंडी मतांचे खंडन केले. अवैदिक सांप्रदायाचा अध्वर्यूना पराजित केले. अनेक वैदिक सांप्रदायातील मतभेद मिटवून समन्वय केला. अद्वैत मतांचा प्रसार आणि प्रचार केला. जनमानसात शुद्ध सात्विक आवश्यक कर्ममार्गाचे बीज पेरले. सर्वत्र समदृष्टी ठेवली.
सर्वाभूती ईश्वरांचे स्वरूप पाह्यण्याचा दृष्टिकोन ठेवला तर वैदिक धर्माचे सावट नक्कीच दूर होऊ शकेल.”
आचार्यांच्या बोलण्याकडे भर्तृहरि प्रमुदित अंतःकरणाने पाहत होते.
” माझ्या पित्याच्या या शिष्योत्तमाने किती अल्पकाळात वैदिक संप्रदायाची सुवर्णपताका ; विजयपताका गगनापर्यंत भिडवण्याचा प्रयत्न केला. ती परंपरा टिकावी म्हणून कल्पकतेने चार मठांची स्थापना केली. तातांच्या आत्म्याला नक्कीच धन्यता वाटत असणार.”
उज्जयनीतील प्रकांड पंडित भास्कराचार्य स्वतः भर्तृहरी गुफेत आचार्यांना भेटण्यास आले. वार्तालाप सुरू झाला. त्यांचे म्हणणे की, ज्ञानी झाला तरी त्याला कर्म सुटत नाही. त्याने देह पडेपर्यंत कार्य करायलाच पाहिजे. आचार्य म्हणाले,
” ज्ञानी पुरुषांची कर्मे ज्ञानानेच भस्मसात होतात. ” ज्ञानाग्निः सर्व कर्माणी भस्मसात् कुरुतेऽर्जुन” हे भगवद्गीतेतील वाक्य आहे. त्याने कर्म केले नाही किंवा केले काय — दोन्ही सारखेच असते. फक्त इंद्रिय व्यापार, देहधर्मापुरतेच, कर्म त्याला सुटत नाही.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४४.
आचार्यांनी “ज्ञानोत्तरकर्म ” यावर केलेले संगोपांग विवेचन भास्कराचार्यांना पूर्ण पटले .आणि त्यांचे मतपरिवर्तन झाले.
प्रयाग क्षेत्रासारखे उज्जयनीला बरेच पंथांचे फड होते. श्री महाकालेश्वराच्या मंदिराजवळ एका मठात भैरवपूजकांचा तांडा उपासना करीत असे. हे लोक भैरवाची निष्ठेने उपासना करीत असत. ते फक्त भैरवच मानत असत. इतर दैवते त्यांना मुळीच मान्य नसत. आचार्यांनी त्यांना उपदेश केला. त्यांची कूपमंडूक वृत्ती नाहीशी करून त्यांना आपलेसे केले आणि “सर्व खल्विदं ब्रह्म” ही व्यापक दृष्टी दिली.
दुसऱ्याचे अंतरंग जाणून त्याला आपलेसे करून घेण्याच्या पद्धतीचे ; दूरदर्शीपणाचे, कार्य कुशलतेचे भर्तृहरीला विशेष कौतुक वाटत होते. भर्तृहरी आचार्यांना म्हणाले,
” लवकरच उज्जयनीला कुंभमेळ्याची महान पर्वणी आहे. तुमचा मुक्काम येथेच ठेवावा.” आचार्य होकार देत म्हणाले,
” चारही मठाधिपतीना ना येथे बोलावून घ्यायचा माझा मानस आहे. पुढची पिढी घडवायच्या दृष्टीने त्यांना आपापल्या कार्याची जबाबदारी, सुसूत्रपणा समजून सांगायचे आहे. त्यानुसार चारही विद्यापीठांकडे तातडीने निरोप गेलेत.”
याच दरम्यान शंकराचार्यांचा शोध घेत नेपाळ नरेश ऋषभदेव उज्जयनीत आले. अलीकडे नेपाळ मध्ये बौद्ध धर्मप्रसाराने वेग घेतला होता. लाखभर लोक भिख्खु बनले होते. ह्या धर्म संकटाला अटकाव करणे नेपाळ नरेशाच्या आवाक्याबाहेर होते. अतिशय चिंतित होऊन, यावर काय उपाय करावा? धर्मरक्षणासाठी आपल्या सत्तेचा, संपत्तीचा विनियोग कसा करावा हेच त्यांना सुचत नव्हते.
शंकराचार्यांच्या धर्मकार्याची आणि दिग्विजय यात्रेची हकीगत त्यांच्या कानी गेली होती. शिवाय त्यांना काश्मीरमध्ये मिळालेल्या “जगद्गुरु” पदवीने ऋषभदेव प्रभावित झाले होते. त्याने ठरवले आचार्यांना नेपाळमध्ये आणून बौद्धधर्म प्रसाराला त्यांचेकरवी प्रतिबंध करावा. हा विचार करून ते उज्जयिनीला आले होते.
राजा हर्ष विक्रमादित्याने त्यांचा यथोचित सत्कार करून, त्यांचा हेतू जाणल्यावर त्याने स्वतः राजे ऋषभदेव यांना भर्तृहरी गुफेत आणून, त्यांची व आचार्यांची भेट घालून दिली. ऋषभदेव वर्माला भर्तृहरी व आचार्याचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून यातले आचार्य कोणते हा संभ्रम पडला. त्याने दोघांनाही साष्टांग नमस्कार घालून आपल्या येण्याचा हेतू स्पष्ट केला.
आचार्य म्हणाले,
” राजन, आपली इच्छा पूर्ण होईल. पण इथला कुंभमेळा पूर्ण होईपर्यंत वाट बघावी लागेल.”
” जशी आपली इच्छा! पण राज व्यवस्थेच्या दृष्टीने मला इथेथांबता येणार नाही. मला जाण्याची अनुज्ञा द्यावी.”
ऋषभदेवांची राजधर्माची आस्था, स्वकर्तृत्वाविषयीची जागृतता, वैदिक धर्माविषयीची तळमळ, दुसऱ्या धर्माचे सहन न होणारे आक्रमण पाहून, आचार्यांनी तिकडे जायचे ठरवले. राजसत्तेचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचे कार्य निश्चितच सुकर होणार होते.
आचार्यांचे आश्वासन मिळाल्यावर ऋषभदेव आनंदाने परत गेले.
इकडे जगद्गुरूंचा निरोप मिळताच, चारही मठाधिपती शिष्य तातडीने उज्जयनीकडे निघाले.
हर्ष विक्रमादित्यांनी या चारही मठाधिपतांचे ढोल, ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले. या धर्मराजांचा मिरवणूक सोहळा अपूर्व होता. सर्वांच्या निवासासाठी पर्णकुटींची आणि विद्वतसभा, प्रवचनासाठी भव्य मंडपाची उभारणी केली होती. आचार्यांच्या भेटीसाठी आतुरलेले शिष्य आचार्यांच्या मिठीत समावत होते. आनंदाचा गहिवर दाटून येत होता . एवढे सुरेश्वराचार्य प्रौढ, गाढ विद्वत्ताप्रचुर, स्वतःचा मोठा शिष्यपरिवार असलेले पण ते सुद्धा आपल्या गुरुमाऊलीपुढे नतमस्तक झाले होते. लौकिकदृष्ट्या गुरु त्यांच्यापेक्षा वयाने लहान होता. पण या शिष्याने आपल्या गुरूंची आध्यात्मिक उंची जाणली होती. तो सर्वभावे शरण आला होता.
चारही मठाधिपती शिष्य तिथे येऊन दाखल झाल्यावर, आचार्यांनी चौघांशी सुसंवाद करायला सुरुवात केली. म्हणाले,
” तुम्ही चौघेही पीठाधिष्ठीत मठपती आहात. कालमानानुसार उद्या ; तुम्ही -आम्ही नसणार. पण धर्मपीठ मात्र चिरंतन असणार आहे. त्यामुळे सतत टिकणारे नियम तुम्हाला सांगतो. जे तुम्हा चौघांनाही बंधनकारक आहेत.”
आचार्य म्हणाले…..
” मठाचा उताराधिकारी निवडताना, तो शुद्ध अंतःकरणाचा सर्व वेदवादंगाचाचा अभ्यास करून पारंगत झालेला, योगाशास्त्र व सर्व तंत्रांचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असावा. शिवाय तो जितेंद्रिय असायलाच हवा. त्याची सर्वतोपरी नीट परीक्षा घेऊनच नेमावा.आता स्वतः मठाधिपतींनी पाळायची पथ्थे… त्याला आखून दिलेल्या भूप्रदेशात सतत धर्म प्रचाराच्या निमित्ताने भ्रमंती करावी. स्वतःला केलेले बाह्योपचार, दिले जाणारे ऐश्वर्य, धर्मक्षेत्रातील अधिकार या सर्व मानमराताबाकडे अलिप्त दृष्टीने पहावे.”
आचार्य पुढे म्हणाले,
” मी तुम्हाला मुद्दाम हेतुपुरस्पर विभाग वाटून दिले आहेत. एकमेकांनी एकमेकांच्या कार्यात ढवळाढवळ करू नये. प्रत्येकाला स्वतंत्र कार्य करता यावे. पण याचा अर्थ असाही नाही की, परस्परांना जुमानयचे नाही. तर सर्वांनीच सामंज्यस्य राखून एकमेकांविषयी गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी. दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्यावेळी चारही मठांच्या आचार्यांनी एकत्रित येऊन एकमेकांच्या अडचणीचा व कालमानानुसार धर्माचरणात आवश्यक बदल करायचा असेल तर त्याप्रमाणे पहावे.”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४५.
आचार्य म्हणाले,
” या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला मुद्दाम पाचारण केले. ही पीठे म्हणजे, धर्मशासन केंद्रे आहेत. हे मठ “आम्नाय मठ” म्हणजे गुरुपरंपरा असलेले वेद व्याकरणादीचे विद्यास्थान आहे.” आचार्य पुढे म्हणाले,
” सर्वात आधी शारदा श्रृंगेरीपीठ स्थापन केले. ते ज्येष्ठपीठ म्हणून सर्वांनी त्याचे आदेश पाळावे. तुमचा आचार, विचार, उच्चार कधी ढळू देऊ नका. समाजाच्या अभिवृध्दी कडे सतत लक्ष असू द्या. मन केंद्रित करा.”
आचार्यांची धीर गंभीरवाणी संततधारेप्रमाणे प्रवाहित झाली होती. आचार्यांचा प्रत्येक शब्दच नव्हे अक्षर — ऐकणाऱ्याच्या हृदयात खोलवर ठसत होते. आचार्यांची प्रभावी वाणी, अमोघ वक्तृत्व ; देखणं व्यक्तिमत्व, सारच संस्मरणीय होतं.
सभा संपली.
यावर्षी कुंभमेळ्याला आगळावेगळा पवित्रपणा आला होता. भर्तृहरी – शंकराचार्य भेट, शिष्य व जगद्गुरु भेटीच्या आनंदात सारी अवंतिका नगरी डुंबत होती.
दक्षिणेतील कालटीस या शतकात जन्माला आलेला हा विराट पुरुष म्हणजे निसर्ग चमत्कारच होता. त्याने श्रृंगेरीस पाय रोवले. त्याचा माथा काश्मीरात टेकला. एका हाताने जगन्नाथपुरीस कवटाळले तर दुसऱ्या हाताने पश्चिम सागरावरील द्वारकेला आपलेसे केले. सारा भारत जणू त्यांनी आपल्या कवेत केवळ २५ वर्षाच्या एवढ्या लहान वयात घेतले.
आता आचार्य आणि चित्सुखाचार्य, उदंकासह नेपाळकडे निघाले. सुरेश्वराचार्य म्हणाले,
” आचार्य कांचीच्या सर्वज्ञ पीठाचा द्वैतवाद वाढला आहे.”
आचार्य म्हणाले,
” ते तुम्ही सांभाळायचे. त्यासाठी तुम्ही समर्थ आहात.”
आचार्यांचे प्रवासाबरोबरच लेखन कार्यही चालू होते. सध्या ते “विष्णुसहस्त्रनामभाष्य” लिहीत आहेत. द्वारकेहून जरी नेपाळकडेच निघाले तरी, मार्गात त्यांना बरेच विविध प्रवृत्तीचे लोक सामील झाले. कुणी दुराग्रही, मत्सरी, हेवादावा असणारे, कोणी परधर्माने प्रभावित झालेले, असे लोक आचार्यांच्या समीप आले की, ते दोषरहित होऊन त्यांची मलीनवृत्ती आपोआप धुवून निघत असे. आणि शुद्ध सात्विक द्विग्विजय यात्रा पुढे प्रवाहित होत असे.
शंकराचार्य आल्याचे कळताच, नेपाळनरेश राज्य सीमेवर लवाजम्यासह त्यांना सामोरे गेले. आचार्यांनी पाद्यपूजा करून त्यांना सजवलेल्या पालखीत बसवले. पालखीचा दांडा स्वतः राजा ऋषभ वर्माने स्वतःच्या खांद्यावर घेतला.
जनसामान्यांना आचार्यांच्या कार्याची, श्रेष्ठतेची काहीच कल्पना नव्हती. त्यांना वाटले, हा बौद्ध धर्माला अनुकूल नसलेला, राजा त्यांचा इतका मानसन्मान का करतो आहे? याच्यात असे काय आहे की, राजामध्ये एवढे परिवर्तन झाले?
जगद्गुरु प्रथम श्रीपशुपतीनाथांच्या मंदिरात आले. हे पंचमुखी महादेवाचे स्थान एकात्मतेचे जणूं प्रतिक होते. एकाच लिंगाला चार दिशेला असलेले मुख म्हणजे, चार धामाचे निदर्शक होते. दक्षिणेकडील मुख- रामेश्वर, उत्तरेकडील- वज्रेश्वर, पूर्वेकडे-जगन्नाथ पुरी, तर पश्चिमेकडील- द्वारका आणि शिरोभागी असलेले मुख हे स्वतः पशुपतिनाथ महादेव! आचार्यांनी वेदसाराशिवस्तव म्हणायला सुरुवात केली.
“‘ पशूंना पति पापनाशं वरेण्यम्।
गजेंद्रस्य कृतिं वसानं वरेण्यम्।
जटाजूटभध्ये स्फुरद गाड्ःगवारिं।
महादेवकं स्मरामि स्मरामि।।”
तेथील रुद्राभिषेक, महापूजा आटोपून आचार्य श्रीसिद्धेश्वरी मंदिरात आले. तिच्याकडे पहात असतानाच, आचार्यांना अंबिका आपल्याशी बोलत असल्याचा भास झाला. त्यांना आठवले, कालटीतल्या त्रिपुरासुंदरी देवीने बाल शंकराचा नैवेद्य भक्षण केला होता. त्यांना वाटले, तीच ही… तीच ही.. आणि काय आश्चर्य! तिला पान्हा फुटला. आचार्य झटकन पुढे झाले. त्यांनी अंबेच्या मांडीवर डोके ठेवले. त्याच क्षणी त्यांना दुग्ध पानाची तृप्ती लाभली.
आचार्यांनी त्याच तृप्तीने श्री ललिता त्रिपुरा सुंदरीचे कल्याणवृष्टी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली…
“कल्याण वृष्टी भिरिवामृत- पुरिताभिः
लक्ष्मी- स्वयंवरण- मंगल दीपकाभिः
सेवाभिरम्बब तव पाद- सरोज-मूले
नाकारि किं मनसि भाग्यवंतां हो जनानाम्।।”
नेपाळमध्ये असलेली पुरातन मंदिरे म्हणजे, वैदिक धर्माच्या उज्वल परंपरेची द्योतक होती. पण सध्या नेपाळमध्ये उफाळलेल्या बौद्ध धर्माच्या लाटेला थोपवणे अत्यंत आवश्यक होते
श्री पशुपतिनाथ मंदिराच्या आवाराबाहेर मोकळ्या मैदानात आचार्यांची पहिली सभा आयोजित झाली. उंच व्यासपीठावर उभी राहिलेली ती तेजःपुंज मूर्ती पाहून लोकांना क्षणभर भास झाला की, प्रत्यक्ष पशुपतीनाथच मानवी वेष धारण करून उभे आहेत. आचार्यांनी बोलण्यास सुरुवात केली,
” नेपाळवासियांनो, आपला वैदिक धर्म अनादी, लोककल्याणकारी आहे. हाच धर्म सुख शांती मिळवून देणार आहे. संसार दुःखमय नाही.”
हे ऐकताच श्रोते दचकले. कारण बौद्धभिख्खु तर सारखे सांगतात,
” संसार दुःखमय आहे.” आणि हे आचार्य असे परस्परविरुद्ध कसे सांगतात?
आचार्य म्हणाले, •••••
” जर हा संसार दुःखमय असता तर, आपल्याला आनंद, मोक्षाची प्राप्ती कशी झाली असती? प्रत्येकाला आपण सुखी, आनंदी आहो असे का वाटले असते? पक्के लक्षात ठेवा.. आनंद ही मनाची धारणा आहे. त्यासाठी मुंडन करून भिक्षू व्हावेच लागते असे नाही.”
आता मात्र लोक मनात म्हणू लागले —
” खरंच आपण असा विचार केलाच नाही. फक्त आनंद मिळवण्यासाठी धडपड करीत राहिलो……..
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.


