भाग – ८.
रात्री झोपल्यावर निवृत्तीनाथ स्वप्नात बघत होते,ते गहिनीनाथांचा हात धरुन अवघ्या त्रिखंडात संचार करीत आहे,ज्ञानेशांना दिसले,ते धर्मसभेत उभे असुन सारी धर्मसभा त्यांना वंदन करीत आहे,सोपानांना दिसले,आपण कांहितरी छान लिहित आहे आणि दोन्ही दादा आपली पाठ थोपटत आहे.आणि छोट्या चिमुकल्या मुक्ताईला दिसले,आपण मोठ्या झालोय,आईच्या बांगड्या हातात घातल्यात.आईबाबांच्या अस्तित्वाने भरुन गेलेली,वेद उपनिषदांच्या उच्चारानं पावन झालेली आणि आईच्या मायेला पोरक्या झालेल्या या जीवांना आधार देणारी ती मोडकी तोडकी वास्तू मात्र तथास्तू तथास्तू म्हणत होती.
सकाळ उजाडली.निरागस मुक्ता झोपलेली,सोपान घरादारांची स्वच्छता करु लागले.उडालेल्या धुळीने मुक्ताला सटासट शिंका आल्याने उठुन म्हणाली, आई मला किती प्रेमाणे उठवायची.आणि तू ? सोपानच्या चेहर्याकडे तिचे लक्ष गेले,काय नव्हते त्या नजरेत?प्रेमळ दटावणी,कठोर बजावणी,अपरंपार माया गहरं दुःख,उदास कणव आणि होती जबाबदारीची जाणीव!मुक्ताई एका क्षणांत सावरली व समंजसपणे बोलुं लागली,अरे दादा!अर्धवट कामं टाकु नये. असे म्हणुन तीने आपली वळकटी व्यवस्थित गुंडाळुन कोपर्यात ठेवली.
निवृत्तीनाथांनी आज गंगेच्या घाटा वर ज्ञानदेवांना गुरुगंडा बांधला.निवृत्ती ज्ञानदेवांच्या मुखातुन उमटलेल्या ओंकाराचा प्रतिध्वनी एका लोकविलक्षण घटनेचे साक्षीदार गंगेच्या लाटा व लोप होत असलेला चंद्र वारा होते.भाऊ भाऊ आणि आतां गुरुशिष्य या अनोख्या नात्यातुन उलगडत जाणारा उद्याचा भविष्यकाळ किती अनुपम व अपूर्व असणार होता.निवृत्तीनाथांनी गुरु म्हणुन ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला,तेव्हा ज्ञानदेवांनां आलेली अनुभुती इतकी तीव्र आणि अकल्पित होती की, क्षणभर आपल्याला मुर्च्छा येते की काय असे ज्ञानदेवांना वाटले.
त्या हातात इतकी शितलता,संवेदनशीलता होती आणि त्या हातातुन निर्माण होऊन प्रवाहीत होणारी उर्जा ज्ञानदेवांच्या मस्तकात शिरली तेव्हा त्यांच्या शरीराचा रोमरोम थरारला.संपूर्ण ज्ञानाचा प्रवाहच आपल्या नसानसात वाहतो आहे आणि त्या स्पर्शातुन झिरपणारं ज्ञान,माया,वात्सल्य,विश्वास, गुरुत्वाची साक्ष या सगळ्याने ज्ञानदेवांचा अणूरेणू व्यापला आणि त्या चैतन्याच्या वर्षावानं,त्या ज्ञानाच्या अभिव्यक्तीनं,त्या गुरुत्वाच्या अनुभूतीनं अवघे ७-८ वर्षाचे ज्ञानेश्वर विलक्षण थरारले.निवृत्तीसारखे गुरु आणि निवृत्तींना ज्ञानेश्वरांसारखे शिष्य मिळाले.न भूतो न भविष्यती ही एका अलौकिक भविष्याची आधारशीला ठरणार होती.
या सार्या चमत्कारापासुन अनभिज्ञ सोपान मुक्ता या दोघांची प्रतिक्षा करीत, घरांतील जशी जमतील तशी कामे उरकली होती.सोपांनांनी केर काढल्यावर मुक्ताईने अंगणांत सडा घालुन वेडी वाकडी का होईना छोटीशी रांगोळ काढली.दोघेमिळून धडपडत कशीबशी चूल पेटवुन पाणी तापवले.दोघांनी आंघोळी उरकल्या.पण नंतर मात्र मुक्ताई ची गुंतलेल्या केसांची वेणी घालायची पंचायत झाली.मी तुझी वेणी घालतो म्हणणार्या सोपानांना तीच्या केसांचा गुंता काढणे अवघड झाले.गुंता काढण्या च्या नादात तिचे केस दुखवल्या जाऊन जास्तच रडायला लागली.
आपल्यामुळेच दुखावल्याने ही रडते म्हणुन सोपानही रडायला लागले.त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकुन तिथुन पाण्याला जाणार्या कावेरीआक्कांच्या कानी पडला.ही कावेरीआक्का आळंदीला,रुख्मिणीचे वडील सिध्दोपंतांच्या घराजवळ राहत असल्यामुळे दोघींमधे विशेष स्नेह होता. बहिष्कृत केलेल्या या कुटुंबाला कोणत्या नी कोणत्या मार्गाने मदत करीत असे. विठ्ठलपंत आणि रुख्मिणींनी गंगेत आत्म समर्पण केल्याचे कळल्यावर आक्काच्या जीवाची अगदी घालमेल होत होती. या अनाथ,पोरक्या,निष्पाप मुलांना पोटाशी धरुन त्यांचे सांत्वन करावेसे फार वाटत होते,पण विनायकबुवा व त्यांच्या मुलांनी त्यांना अडवले कारण त्यांच्याही कुटुंबा वर बहिष्कार टाकला असतां.तरी त्या येता जाता चाहुल घेत असायच्याच.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

[…] चरित्र ६संत सोपानदेव चरित्र ७संत सोपानदेव चरित्र ८संत सोपानदेव चरित्र ९संत सोपानदेव […]