संत सोपानदेव चरित्र ५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ५.

अनुक्रमणिका


सोपानदेव काट्याकुट्यांची पर्वा न करतां आईss आईss करत बेभानपणे धावत होते.मुक्ता घरी एकटीच असल्याचे लक्षात आल्यावर,व आतांपर्यंत आई घरी पोहचली असेल असे वाटुन रक्ताळलेल्या पायांनी घरी आल्यावर मुक्ता रडत असलेली दिसली.पण आई?निवृत्तीनाथ ज्ञानदेव श्लोकांचे पठण संपवुन घरी आले तर त्यांना अंगणांत रक्ताळलेल्या पावलांचे ठसे दिसले.लगेच त्यांनी घरांत धाव घेतली.सोपानांचे दोन्ही पाय रक्ताळलेले,बाभळींच्या काट्यांनी पायांची चाळण झालेली,अवस्था पाहुन ज्ञानेशांचे मन गलबलुन आले.पायावर उपचार करुन,दोघांनाही घरी थांबण्यास सांगुन आईच्या शोधार्थ जातो म्हणुन दोघेही बाहेर पडले.
दिवसभरांत ना आईबाबा परतले ना निवृत्ती ज्ञानदेव!सोपानांचा पाय चांगलाच सुजुन ठणका लागल्या होत्या. आईची सतत आठवण येत होती. मोठ्याने रडावेसे वाटत होते,पण आपण रडलो तर,मुक्ताईला सांभाळणे कठीण झाले असते,म्हणुन एवढ्या लहान वयात सारं दुःख आंतल्या आंत गिळुन टाकलं. संध्याकाळ झाली.अंधार पडला,दोघांना ही भीति वाटत होती.सोपानदादा आई बाबा कुठे गेले असतील रे?निवृत्तीदादा, ज्ञानदादा अजुन कां आले नाहीत?मला भूक लागली रे सोपानदादा!ठसठसणारा पाय घेऊन सोपान चुलीजवळील गाडगे मडके धुंडाळल्यावर थोडे पोहे मिळाले,ते भिजवुन त्यात थोडे मीठ टाकुन मुक्ताई ला खायला दिले.ती घास तोंडात टाकणार तोच ती म्हणाली,तू पण घे!थोडे थोडे दोघेही खाऊ.सोपानांना गलबलुन आले.कांही वेळापुर्वी भूकेसाठी रडणारी हीच का ती मुक्ताई?


आई बाबांच्या शोधात दिवसभर वणवण हिंडत निवृत्ती ज्ञानेश्वर घरी परतत असतांना मनी विचार आला .खरच काल ऐकल्याप्रमाणे त्यांनी आत्मत्याग,देहान्तप्रायश्चित घेतले असेल का?दोघांच्याही मनाचा थरकाप उडाला. निवृततींना मृत्यु म्हणजे काय हे थोडे तरी समजत होते,पण लहान तीन भावडांना काय सांगायचे?कसे समजवायचे?मलाच आतां यांची आईबाबा होऊन जबाबदारी घ्यावी लागेल,गुरुमाऊली!मला शक्ती, बळ द्या.सोपान मुक्ताई एकटे घरी घाबरले असतील या विचाराने दोघेही एकमेकांना दिलासा देत घरी पोहौचले. सोपान मुक्ताई दाराशी एकमेकांना चिटकुन बसले होते.त्यांना पाहतांच आई बाबांचा शोध लागला कां म्हणुन विचारले काय सांगायच या बालजीवांना?कशी समजुत काढायची?तेवढ्यात सोपानांचा आवाज आला,दादा!भूक लागली रेss त्याबरोबर आपल्यालाही भूक लागल्या ची जाणीव त्यांना झाली.एका मडक्यांत असलेल्या कण्या व परसदारी असलेल्या शेवग्याच्या शेंगा व पाला पातेल्यात शिजायला टाकला.अन्नब्रम्हाची सिध्दता तर झाली खरं..पण अशीच ज्ञानाची सिध्दता केली तर अज्ञानाच्या अंधकारा वर सहज मात करतां येईल असे विचार ज्ञानदेवांच्या मनात आले.


आई वडीलांनी केलेल्या आत्म समर्पणाच्या वावटीळनं या चौघांचीही आयुष्य पालापाचोळ्यासारखी भिरभिरत जावीत असा डाव कदाचित नियतीनचं आखला असावा.पण तीला कुठं माहित होतं की,चौघांतील एकी,एकमेकांबद्दल चा अपार जिव्हाळा,प्रेम आणि बुध्दीमत्ते चे तेजस्वी वलय याच्या सहाय्याने नियती वर मात करणार होती…त्या अग्नीच्या तेजस्वी ज्वालांनी अंधारावर मात केली तशी!कण्या शिजवायला चुलीजवळ बसलेल्या निवृत्तींना बघुन सोपान मुक्ताई ला आईच बसलेली असल्याचा भास झाला.आणि दोघांचेही डोळे भरुन आले. मुक्ता रडायला लागली,पण सोपान? अबोध वयाचा,धड लहान नाही ना धड मोठा नाही.त्यांच्या मनाची घुसमट घुसमट होऊ लागली.मुक्तासारखं लहान होऊन रडायचं होतं.मोठं होऊन तीची समजुत काढायची होती.नेमकं कोणत्या भूमीकेत जावे हेच कळेना.त्यांची ती अवस्था निवृत्तींच्या लक्षात आल्यावर, जवळ जाऊन पाठीवर हात फिरवत म्हणाले,अरे!तू मुक्तापेक्षा मोठा असलास तरी अजुन लहान आहेस.मनाचा कोंडमारा करुं नकोस.सहानुभुतीच्या शब्दांनी व पाठीवर मायेने हात फिरल्या मुळे आतांपर्यंत आवरुन धरलेले अवसान गळुन पडले.आणि मोठ्याने हबरडा फोडला.. आईss आईss खरं तर तो टाहो नव्हताच तर आकांत होता. एका लेकरानं आईसाठी,अनाथानं माये साठी,निराधाराने आधारासाठी,सोपानानं आईसाठी केलेला आकांत,आक्रोश होता


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

  1. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

  2. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

  3. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading