संत सोपानदेव चरित्र ३

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ३.

अनुक्रमणिका


त्रिम्बकेश्वरीही न्याय मिळत नाहीसे पाहुन कुंटुंबासह विठ्ठलपंत आळंदीस परतले.आणि आळंदीच्या ब्राम्हणवृंदा कडे क्षमायाचना करीत राहिले.आजही ते सकाळी माधुकरी मागायला गावात गेले असतां माधुकरी तर मिळाली नाही परंतु अपमान,अवहेलना व शिव्यांचे मात्र धनी बनले.निवृत्तीनाथांना हटयोगाची दीक्षा मिळुन ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांच्या वागण्यात खुपच फरक पडला.इतके दिवस भावंडांना घेऊन खेळणारे निवृत्ती एकदमच प्रौढ झाल्यासारखे वागु लागले. अवघं दहा वर्षाचं वय असलेले निवृत्ती धर्माचं,अध्यात्माचं,ब्रम्हज्ञानाचं तत्वज्ञान बोलुृ लागले.सहा वर्षाच्या सोपानांना जास्त कळायचं नाही,पण आठ वर्षाचे ज्ञानेश्वर मात्र असंख्य प्रश्न विचारुन,शंका समाधान होईपर्यंत दोघांचा संवाद चालत असे.असेच दिवस चालले होते.मुल थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या मौंजीचा प्रश्न ऐरणीवर आला,तसे विठ्ठलपंत ब्रम्ह पीठासमोर जाऊन,मुलांच्या मौंजीबंधना साठी शुध्दीपत्र देऊन पात्र ठरवण्याची विनंती केली.आम्हा पतीपत्नीस द्याल ती शिक्षा,प्रायश्चित भोगण्याची तयारी दाखवली.वडिल सतत चिंतेत,आई पुन्हा पुन्हा डोळे पुसते याचे कारण लहानग्या सोपानाला कळत नसले तरी,ब्रम्हज्ञाना चा अभ्यास करण्याकरीतां निवृत्ती ज्ञानेश्वर इंद्रायणी घाटावर एकांतस्थळी जात असे.घाटावरुन येतां जातां लोकांची बोलणी कानावर पडत असल्याने,आई वडीलांच्या मनातील व्यथेची,वादळाची कांहीशी कल्पना त्या दोघांना आली होती


धर्मसभेचा निर्णय ऐकायला सकाळी गेलेले विठ्ठलपंत संध्याकाळ झाली तरी परतले नाहीत म्हणुन शंका कुशंकांनी त्रस्त रुख्मिणी,काय करावे की आपणच जावे अशा विचारांत असतांना विठ्ठलमंदिरात कीर्तन करणारे विनायक बुवा येतांना दिसले, ते आल्यावर लांबुन च त्यांना त्रिवार नमस्कार करीत धर्मसभेत काय झाले विचारल्यावर ते म्हणाले,पोरी!काय? आणि कसे सांगु? आज धर्मसभेत न्याय नव्हता तर न्यायाची क्रूर चेष्टा होती.तेवढ्यात विठ्ठल पंत आल्याचे पाहुन विनायकबुवा घाईने निघुन गेले.असहाय्य जखमी पाखरा सारखे गलितत्रात्र होऊन आंत आलेल्या विठ्ठलपंतांना रुख्मिणीने काय झाले धर्मसभेत?त्यांनी गुडघ्यात घातलेली मान वर केली आणि त्यांचा विदिर्ण,भग्न मंदिरासारखा गौरवर्ण काळवंडलेले मुख बघुन,तीच्या काळजाचा ठाव सुटला. विषण्ण,विव्हल,काळजाचा थरकाप उडवुन थरथरणार्‍या स्वरांत विठ्ठलपंत म्हणाले,रुख्मिणी संपलss सगळंss सगळss संपलss !आपल्या निरागस बाल्यावस्थेत असलेल्या चार लेकरांचा विचारही न करतां या धर्मसभेने आपल्या ला देहांताची शिक्षा सुनावली असुन लवकरच अमलांत आणायची आहे.


रुख्मिणीने स्वतःच्या मनाला आवर घालुन आपल्या दिवसभर उपाशी असले ल्या मुलांना खाऊ घातले.सोपान,मुक्ताई तर झोपले,पण निवृत्ती,ज्ञानदेवांना जवळ घेऊन,उसणे अवसान एकवटुन म्हणाली,निवृत्ती,ज्ञानेशा!लक्षपुर्वक ऐका. उद्यापासुन तुमचे बाबा व मी नसणार, तेव्हा ही मोडकी तोडकी झोपडी,त्यांतील असलेला किडुकमिडुक संसार आणि सोपान,मुक्ता या सगळ्यांचा सांभाळ तुम्हाला करायचाय!ज्या जगाने आम्हाला मान खाली घालायला लावली,त्याच जगाला माना उंच करुन तुमच्याकडे पाहावं लागेल.तुमची बुध्दीमत्ता,यश, कीर्ती,समाजाच्या दृष्टीक्षेपात मावणार नाही एवढे मोठे व्हा.उतुंग यश मिळवा. इतकी दिगंवत कीर्ती मिळवा की, सन्याशाची पोरं म्हणुन हिनवणारं हे जग तुमच्या पायावर डोकं टेकवायला मिळण्यासाठी अहमहनिका लागेल, धडपडेल,जीव टाकतील!”न भूतो न भविष्यती। असं भव्य दिव्य कार्य करा. निवृत्ती,ज्ञानेशा कानांत प्राण आणुन आई चा प्रत्येक शब्द ऐकत होते.मातृत्वाच्या या विराट दर्शनाला विठ्ठलपंतांनी मनोमन वंदन केले.मनांतलं सगळं सांगीतल्यावर त्या माऊलीला हुंदका आवरेनासा झाला. त्यांचे डोळे पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत,ज्ञानदेव म्हणाले,आई!मातेला तीच्या अजान लेकरांपासुन दूर करणारा, त्यांची ताटातूट करणारा हा कसला धर्म? दादा! हा प्रश्न आज ना उद्या या धर्म पंडितांना विचारण्याची वेळ येणार आहे. आपल्या सात वर्षाच्या लोकराच्या विलक्षण बुध्दीची साक्ष माता पितांना पटल्याने दोघेही समाधान पावले व ती लेकरांना थोपटत राहिली.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading