संत सोपानदेव चरित्र ४

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग- ४.

अनुक्रमणिका

आईच्या प्रेमळ स्पर्शाने थोपटत असल्याने निवृत्ती,ज्ञानदेव कधी निद्रेच्या कुशीत सामावले त्यांना कळलेही नाही. सोपान,मुक्ताई तर आधीच झोपी गेले होते.आपल्या हळव्या झालेल्या,अखेरची निरवा निरव करणार्‍या,मातृत्वाची प्रचिती देणार्‍या पत्नीचे हात हाती घेऊन गदगदल्या व अपराधी स्वरांत विठ्ठलपंत म्हणाले!खरं तर नवर्‍याने बायकोची काळजी घेऊन सुखी ठेवायचे असते!पण मी तुला दुःखाशिवाय कांहीच दिले नाही. खोटं बोललो,वंचना केली,त्याग केला, सन्यास घेतला,गुरुंच्या आज्ञेने परत गृह स्थाश्रम स्विकारला.माझ्या करंट्यापणा मुळे तूं दुर्देवी ठरलीस आणि त्याहीपेक्षा दुर्देवी ठरलीत आपली ही अजान चार लेकरं!मी ना चांगला पती,ना चांगला पिता होऊ शकलो. या मुलांना जन्म देण्याशिवाय कोणतच कर्तव्य पुर्ण करुं शकलो नाही. आपण असतांनाच समाजाने त्यांची इतकी अवहेलना केली, माघारी तर त्यांचे गिधाड्यासारखे लचके तोडतील.मी तुझ्या पत्नित्वाचा आणि मातृत्वाचा अनंत अपराधी आहे.क्षमा कर रुख्मिणी!क्षमा कर! नाही स्वामी!नाहीs तुम्ही कुणाचा कसलाही अपराध केलेला नाही.माझा तर नाहीच नाही.उलट आपल्यासारखा प्रेमळ,समंजस,सन्मान करणारा सहचर मिळाला यांतच मला सर्व कांही मिळाले.

आपण मुलांना उत्तम संस्कार, त्यांच्या मनांत उत्पन्न केलली ज्ञानलालसा त्यांच्या पंखात भरलेलं श्रध्देचं बळ दिलं हेच आदर्श व चांगल्या पित्याचे लक्षण आहे.आपल्या मुलांच्या कल्याणार्थ देहांत प्रायश्चित घेत आहोत,यापेक्षा मोठा त्याग, आहुती काय असुं शकेल?उत्तर रात्र संपत आली.रुख्मिणीने मातृत्वाचे सारे सामर्थ्य,जीवनरस ओतुन मुलांसाठी पेज रांधुन ठेवली.एकमेकांना चिटकुन झोपले ल्या आपल्या पिल्ल्यांच्या मस्तकाचं दोघांनीही अवघ्राण केलं.आणि मागे न पाहतां झटकण दोघेही बाहेर पडले कधीहि परत न येण्यासाठी.आतां फक्त होते ते आत्मसमर्पन…फक्त आत्मसमर्पन एके काळी तरुन वयात प्रकांड पंडीत म्हणुन काशीत गणल्या गेलेले विठ्ठलपंत!आणि आज? काळजात कोंडलेल्या वात्सल्याच्या उद्रेकाने आकांत करणार्‍या वात्सलमयी मातेचं स्वरुप खरं की,सहचारीनी म्हणुन आत्म समर्पण करणारं रुप खर?विठ्ठलपंतांनी एक उपाय सुचवला.माझ्या पापाचं परिमार्जन म्हणुन देहान्त प्रायश्चित मी एकट्याने घेतले तर आपली मुलं अनाथ

होणार नाही,तूं त्यांना आईबापाचं प्रेम देऊन कर्तव्य पार पाडुं शकशील.तप्त शिश्याचा रस कानात ओतत आहे असे तीला वाटले.नाही स्वामीss नाही.दोघेही तेवढेच दोषी आहोत.पतीच्या प्रत्येक सुखदुःखात पत्नी अर्धी वाटेकरी असते. तरी विठ्ठलपंत आपला अट्टाहास पुढे नेत तीला समजावत असतांना,सहस्र सूर्याचं तेज असणार्‍या चार स्फुलिंगांना जन्म देणारी रुख्मिणी ठाम निश्चयाने म्हणाली, माझ्यातील आई जागी होण्यापूर्वी आपण निघावं!आंत निजलेल्या चौघांना देवाच्या भरोश्यावर सोडुन,झोपडीचं मोडकं तोडकं कवाड बंद करुन दोघेही झपझप चालु लागले.इंद्रायणीकाठी येऊन त्या दुर्देवी दोघांनी पाण्यांत पाऊल घातले मात्र,अचानक स्तब्ध,शांत पाण्याला अचानक उधाण आलं. हा इंद्रायणीचा आनंद होता की विद्रोह?एक उंच लाट उसळली आणि दुसर्‍याच क्षणी दोघांना आपल्यात सामावुन घेतले. लेकरांच्या भविष्यासाठी,जगाच्या कल्याणासाठी आत्मसमर्पण केलेले हे दोन जीव म्हणजे अध्यात्माच्या इतिहासा तील रुपेरी वर्खाच पानं आहेत.


दुसर्‍या दिवशी नेहमीच्या सवयी प्रमाणे सकाळी लवकर उठलेल्या निवृत्ती ज्ञानेशांना आई बाबांचे अंथरुण रिकामे दिसले.सोपान मुक्ताई अजुन झोपलेलेच होते.निवृत्तींचं काळीज चरकलं.रात्रीचा आईबाबांचा संवाद आठवला.दोघेही बाहेर पडले.थोड्या वेळाने मुक्ताई उठली सगळीकडे बघीतल्यावर आई न दिसल्या मुळे आईss आईss करत जोराने रडु लागली.तिच्या रडण्याच्या आवाजाने सोपान जागे होऊन तिची समजुत घालुं लागले.त्यांना प्रतिक्षा होती,आई बाबांची, मोठे भाऊ निवृत्ती ज्ञानेशाची आणि आणखी कशाची? याचे उत्तर काळच देणार होते,म्हणुन प्रतिक्षा होती काळाचीसुध्दा!
रडुन थकलेल्या मुक्ताला परत झोपवुन सोपान थेट पाणवठ्यावर आले. तेथील बायकांना आई दिसली कां म्हणुन विचारले,कदाचित काटके गोळा करायला गेली असेल,असे वाटुन बाभुळ वनात जाऊन आईss आईss अशा हाका मारण्याचा सपाटा लावला.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading