सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

376-9
ऐसें जियेचियां जवळिकां । सामर्थ्य घरींचियां पाइकां । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥376॥
असे जिच्या घरांतील दासींचे सामर्थ्य आहे, त्या पट्टराणी श्रीलक्ष्मीचीहीया ठिकाणीं प्रतिष्ठा नाही.
377-9
मग सर्वस्वें करुनि सेवा । अभिमान सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥377॥
मग अर्जुना, मनोभावाने सेेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय घुण्याच्या अधिकारास पात्र झाली! म्हणून,
378-9
म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी 378॥
म्हणून, थोरपणा एकीकडे ठेवून व सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेंव्हा जगतांत नम्रपणाने वागावे, तेव्हांच माझी प्राप्ति होते.हे किरीटी, ज्या ठिकाणीं सुर्याचे तेजापुढे चंद्रही लोपून जातो,
379-9
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढा चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजें ॥379॥
हे किरीटी, ज्या ठिकाणीं सुर्याचे ते जापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्यानें आपल्या तेजाबद्दल कां घमेंड मारावी?
380-9
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे ॥380॥
त्याचप्रमाणे, लक्ष्मीचेंही ऐश्वर्य जेथे शोभत नाही, व शंभूचे तपही पुरत नाही, त्या ठिकाणीं अज्ञानी व हेंदरा मला कसा जाणूं शकेल?


381-9
यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥381॥
याकरितां, सर्व अभियान टाकून, सर्व गुणांचे लिंबलोण उतरून, आणि संपत्तीचा मद सोडून आपला देह मजवरून ओवाळून टाकला पाहिजे.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥9.26॥

382-9
मग निस्सीमभाव उल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ एक आवडे तैसें । भलतयाचें हो ॥382॥
नंतर, दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने, हव्या त्या झाडाचें हवे ते फळ
383-9
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवीं । मग देठुं न फेडितां सेवीं । आदरेंसी ॥383॥
भक्ताने माझ्या पुढे केले म्हणजे मी ते दोन्ही हात पुढे करून घेतो, व त्याचा देंठ न तोडतां ते आदराने सेवन करतो.
384-9
पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें । तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥384॥
हे पहा, भक्तिभावाने जर मला कोणी एखादे फूल दिले, तर वास्तविक पाहतां ते हुंगावयाचे; पण तें सोडून देऊनप्रेमाच्या भरांत मी तोंडातच घालतो! फार काय सांगावे?
385-9
हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें । तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥385॥
फुलेचशीं काय, परंतु मला एका झाडाचे पानही प्रिय आहे; मग ते कोणत्याही झाडाचे आणि ताजे किंवा सुकलेले कसेही असो,


386-9
परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखे । तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥386॥
पण ते भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असे पाहतांच, ज्याप्रमाणे एखादा क्षुधित मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने अर्पण केलेले तें पान अमृततुल्य मानुन मी खाऊ लागतो.
387-9
अथवा ऐसेंही एक घडे । जे पालाही परि न जोडे । तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ॥387॥
अथवा एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडली की, झाडाला कोठेंच पाला नाही, पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाहींना?
388-9
तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें । तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें । जेणें मज ॥388॥
ते वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते. तेच मला मनोभावानें अर्पण करतो,
389-9
तेणें वैकुठापासोनि विशाळें । मजलागीं केलीं राऊळें । कौस्तुभाहोनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥389॥
त्याने माझ्याकरिता वैकुंठाहूनही मोठी देवळे बांधल्याप्रमाणेव कौस्तुभ मण्याहूनही तेजस्वी असे दागिने दिल्याप्रमाणे होते.
390-9
दूधाचीं शेजारें । क्षीराब्धीऐसीं मनोहरे । मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥390॥
त्याने दुधासारखी स्वच्छ व क्षीरसमुद्रांतील लाटांप्रमाणे फुगीर व मनोहर अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरितां निर्माण केल्याप्रमाणे आहेत.


391-9
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु । मज हातीं लाविला दिनकरु । दीपमाळे ॥391॥
कापूर, चंदन, कृष्णागरू अशा सुगंधाच्या महामेरूएवढाल्याढिगांनीं माझ्यापुढे काडवाती लावून सुर्याची दीपमाळ पाजळल्याप्रमाणेआहे;
392-9
गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतंरुचीं उद्यानें । कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥392॥
त्याने गरूडासारखी वाहने, कल्पतरूच्या बागा, व कामधेनूंची खिल्लारें मला अर्पण केल्याप्रमाणे आहेत.
393-9
मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिलीं बहुवसें । ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥393॥
मला अमृताहूनही गोड अशी पुष्कळ पक्वान्ने वाढून जो संतोष होतो, तो अशा भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबापासून होतो.
394-9
हें सांगावें काय किरीटी । तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी । मी सुदामयाचिया सोडीं गाठीं । पव्हयालागीं ॥ 394॥
हे किरीटी, मी पोह्यांसाठी सुदामजीच्या जवळील गांठोडीच्या गांठी सोडल्या, त्या तूं पाहिल्या आहेस ना? हे तुला सांगितले पाहिजे का?
395-9
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥
म्हणून, मी फक्त एक भक्ति ओळखतो. त्या ठिकाणीं लहानथोर हें मनांत आणीत नाही; आणि वाटेल त्यानें भक्तीची मेजवानी केली असता आम्ही तिचा आदर करतो.


396-9
येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्फळ । भक्तितत्व ॥396॥
एरव्ही पत्रे, पुष्पे, फळे, ही आमची भक्ती करण्याकरितां केवळ निमित्तमात्र आहेत. याशिवाय भक्तितत्वाखेरीजइतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो.
397-9
*म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं । तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥397॥
म्हणून, ऐक; तूं आपली बुद्धि स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडूं देऊं नको.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥9.27॥

398-9
जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी । अथवा यज्ञीं यजसी । नानाविधीं ॥398॥
तूं जे जे कांही करशील, किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेशील, अथवा, ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करशील,
399-9
नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें । तपादि साधनें । व्रतें करिसी ॥399॥
किंवा सत्पात्री जीं जीं दाने करशील, अथवा चाकरमाणसांस जी वेतने देशील आणि जीं जीं तपादि सर्व साधने व व्रते करशील,
400-9
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें । तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥400॥
ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तूं माझ्या उद्देशाने भक्तिपुरःस्सर कर

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading