सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

201-8
लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी ॥201॥
लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील?
202-8
म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपण न येचि निरूतें । तेविं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥202॥
म्हणून, तुपाचे ज्याप्रमाणे पुनः खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असतां पुनः जन्म नाही,
203-8
तें माझें परम । साचोकारें निजधाम । हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असें ॥203॥
त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असतां पुनः जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे.
यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ॥8.23॥

204-8
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । जाणतां आहे सोपारें । तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥204॥
त्याचप्रमाणे, देहावसानानंतर ज्या स्वरुपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्य वर्म आणखी एक प्रकाराने समजण्याला सोपे आहे.
205-8
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे । तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥205॥
अथवा अकस्मात् असे घडते की, जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुनः देह धारण करावा लागतो.


206-8
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती । एऱ्हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥206॥
त्यांना पुनः देह धारण करावा लागतो. म्हणून, शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले, तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात येरव्ही अकाली देहावसान झाल्यावर पुनः जन्मास येतात.
207-8
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति । या दोन्ही अवसराअधीन आहाती । तो अवसरू तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥207॥
त्याचप्रमाणे, मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल, तो प्रसंगानुसार तुला सांगतो.
208-8
तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥208॥
तर हे महावीरा अर्जुना, ऐक. मरणकाल समीप आला असतां शेवटी पंचमहाभूतें आपापल्या रस्त्याने जातात.
209-8
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी । बुद्धीतें भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥209॥
असा मरणकाल प्राप्त झाला असतां बुद्धीला भ्रांति गिळीत नाही, स्मरणशक्ती अंधळी होत नाही, व मनही मरत नाही.
210-8
हा चेतनावर्गु आघवा । मरणी दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गवसणी होऊनि ॥210॥
ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे, तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो.


211-8
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो । हे तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥211॥
अशा रीतीने हा समुदाय सावध असतो; व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते, असे साह्य जठराग्नि प्रदीप्त असला म्हणजेच मिळते.
212-8
पाहें पां वारेन कां उदकें । जैं दिवियांचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ॥212॥
पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसां होतो, त्या वेळेस आपली दृष्टि विद्यमान असतांही तिला काही दिसतें का?
213-8
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंतबाहेरि श्लेष्माआतें । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें ॥213॥
त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आंतबाहेर कफाने व्याप्त होते, त्या वेळेस जठराग्निचे तेज विझून जाते,
214-8
ते वेळीं प्राणासि पाणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अग्नीवीण देहीं । चेतना न थरे ॥214॥
त्या वेळेस प्राणाला अवसान नसते, मग बुद्धि असुनही काय करणार? म्हणून अग्नीशिवाय देहांत चेतना रहात नाही.
215-8
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वायां आयुष्यवेळु आपुला । अंधारे गिंवसी ॥215॥
हे पहा, शरीरांतील जठाराग्नि जर नाहींसा झाला, तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारांत शोधीत बसतो.


216-8
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥216॥
नंतर पाठीमागील सर्व गोष्टीचे मरतेसमयी स्मरण होते. मग देह टाकून स्वरूपाला मिळावे कसे?
217-8
तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण ॥217॥
इतक्यांत त्या देहांती कफाच्या चिखलांत चेतना बुडून गेल्यामुळे मागील व पुढील गोष्टीचे स्मरण नाहींसे होते.
218-7
म्हणोनि आधीं अभ्यासु जो केला । तो मरण न येतां निमोनि गेला । जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा ॥218॥
म्हणून पूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधी नाश पावतो. ज्याप्रमाणे आपण ठेविलेली वस्तु दिवा हातांत घेऊन शोधण्याकरितां गेले असतां ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा,
219-8
आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥219॥
त्याप्रमाणे, आता या सर्व गोष्टी राहूं दे, तूं हे समज की, ज्ञानाला जठराग्नि हा मूळ कारण आहे, आणि मरणसमयी सर्व बळ त्या अग्नीचेंच असते.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥8.24॥

220-8
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सा मासांमाजीं मासु । उत्तरायण ॥220॥
शरीराच्या आंत जठाराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना,


221-8
ऐशिया समयोगाची निरूती । लाहोनि जे देह ठेविती । ते परब्रह्मचि होती । ब्रह्मवि ॥221॥
अशा प्रकारे सर्व गोष्टीची तयारी असतां जे आपला देह ठेवितात,ते ज्ञानी ब्रह्मस्वरूपी मिळतात.
222-8
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावया पैं ॥222॥
धनुर्धरा, ऐक. या वेळेच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून मोक्षप्राप्तीकरितां स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे.
223-8
एथ अग्नि हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥223॥
या मार्गात जठराग्नि ही पहिली पायरी होय, अग्नीचें सतेजपण ही दुसरी पायरी; दिवस ही तिसरी पायरी; शुक्लपक्ष ही चौथी पायरी असे समज.
224-8
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥224॥
आणि उत्तरायणांतील सहा महीन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी, अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धिरूप घराला पावतो.
225-8
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरादि मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥225॥
हा उत्तम काल असें समज, आणि याला अर्चिरादि मार्ग (प्राणोत्क्रमणाचा मार्ग) असे म्हणतात. आता मरण्यास अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक.
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥8.25॥

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading