176-8
जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा॥176 ॥
जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही.
177-8
पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूताभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥177॥
पहा की, उदकावर तरंग येतात व जातात, परंतु उदक हे कायमच असते. त्याप्रमाणे, भुते नाहींतशीं झाली असतां अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही.
178-8
ना तरी आटतिये अळंकारी । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥178॥
किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यु पावणाऱ्या शरीरांत जे अमर आहे,
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ 8.21॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या ।
यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ 8.22 ॥
179-8
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे । जें मनबुद्धी न सांपडे । म्हणऊनियां ॥179॥
ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटलें असतां त्याची स्तुति केली असे वाटत नाही, कारण जे मन व बुद्धि यांना सापडत नाही,
180-8
आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकारलोपें न विसंचे । नित्यता गा ॥180॥
जे आकाराला आले असताही ज्याचे निराकारपण जात नाही, व आकाराचा नाश झाला असतां ज्याची नित्यता बिघडत नाही,
181-8
म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवीचि म्हणतां बोधुही उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नामपरमगति ॥181॥
म्हणून ज्याला ‘ अक्षर’ म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यांतच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही,
182-8
परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारू करवी ना करी । म्हणऊनियां ॥182॥
आणि याचेच नाव परमगति. परंतु तें या शरीरांत व्यापून राहीलेले असुन निजल्याप्रमाणे आहे. कां की, ते व्यापार करवीत नाही व करीतही नाही.
183-8
एऱ्हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा । दाही इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाति ॥183॥
हे महावीरा अर्जुना, येरव्ही शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार रहात नाही; दहाही इंद्रियांचे व्यापार चालूच आहेत.
184-8
उकलूं विषयांचा पेटा । होता मनाचां चोहटा । तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥184॥
विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरूं झाल्यावर, त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो.
185-8
परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारू न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥185॥
परंतु राजा सुखानें निजला असतां ज्याप्रमाणे त्याच्या राज्यांतील व्यापार रहात नाहीत, प्रजा आपापल्या (प्राप्तीच्या) इच्छेनें व्यापार करीतच असते,
186-8
तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणेंदेणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥186॥
त्याप्रमाणे, बुद्धिचे जाणणे किंवा मनाचे देणेघेणे, इंद्रियांचे करणे, व प्राणवायूंचे स्फुरण पावणे हे सर्व
187-8
हे देहक्रिया आघवी । न करितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥187॥
सर्व देहव्यापार त्याने न करवितां आपोआपच होतात, ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते,
188-8
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं । म्हणोनि पुरूषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥188॥
त्याप्रमाणे, अर्जुना, तो शरीरांत स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असें समज;
189-8
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें । येणेंही कारणें जयातें । पुरूषु म्हणों ये ॥189॥
आणि मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नीव्रतांत पडल्यामुळे हा पुरुष हे नांव पावला आहे.
190-8
पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥190॥
परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे आंगणही दृष्टीस पडत नाहीं, व ज्याच्यांत आकाशाचा समावेश झाला आहे,
191-8
ऐसें जाणूनि योगीश्वर ।जयातें म्हणती परात्पर ।जें अनन्यगतीचें घर ।गिंवसीत ये ॥१९१॥
असे जाणूनच योगिजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो.
192-8
जे तनू वाचा चित्ते ।नाइकती दुजिये गोष्टीतें ।तयां एकनिष्ठेचें पिकतें ।सुक्षेत्र जें ॥१९२।।
जो एकनिष्ठ भक्त कायावाचामनेकरून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय.
193-8
हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम ।ऐसा साच जयाचा मनोधर्मु ।तया आस्तिकाचा आश्रमु ।पांडवा गा ॥१९३॥
हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवद्रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे, त्या भक्ताचा हा आश्रमच होय.
194-8
जें निगर्वाचें गौरव ।जें निर्गुणाची जाणीव ।जें सुखाची राणीव ।निराशांसी ॥१९४॥
जे निरभिमान्यांचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान (राज्य),
195-8
जें संतोषियां वाढिलें ताट ।जें अचिंता अनाथाचें मायपोट ।भक्ती उजू वाट ।जया गांवा ॥१९५॥
जे संतोषी जनाचे जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट व जे भक्तीने चालणाराला मोक्षरूपी गावाची सरळ वाट.
196-8
हें एकैक सांगोनि वायां ।काय फार करूं धनंजया ।पैं गेलिया जया ठाया ।तो ठावोचि होइजे ॥१९६॥
धनंजया, असे एकेक सांगून उगीच किती वर्णन करू? परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रूपतेला पावतो.
197-8
हिंवाचिया झुळुका ।जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।कां समोर हालिया अर्का ।तमचि प्रकाशु ॥१९७॥
थंडीच्या झुळकेने जसे ऊन पाणी थंड होते किंवा सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो
198-8
तैसा संसारू जया गांवा ।गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा ।मोक्षाचाचि ॥१९८॥
त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचे कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन रहाते.
199-8
तरी अग्नीमाजीं आलें ।जैसें इंधनचि अग्नि जहालें। पाठीं न निवडेचि कांही केलें ।काष्ठपण ॥१९९॥
तसेच इंधन विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व मागून निवडू गेले असता त्याचे लाकूडपण दृष्टीस पडत नाही;
200-8
ना तरी साखरेचा माघौता।बुध्दिमंतपणेंही करितां ।परि ऊंस नव्हे पांडुसुता।जियापरी ॥२००॥
किंवा, पंडुसुता, ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुनः चातुर्याने तिचा ऊस करिता येत नाही,