सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

526-15
आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ 526 ॥
आतां अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगांत रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानांत लय पावतात. 26
527-15
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे ॥ 527 ॥
त्या अज्ञानाचा, जसा अग्नि, काष्ठ जाळून आपणही स्वतः जळतो म्हणजे स्वरूपांत शांत होतो; तसा ज्ञानाने ग्रास करून ते ज्ञानही (काही कर्तव्य नाही म्हणून) मागल्या पावलीं निघून गेले. (शांत झालें) 27
528-15
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें । ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें ॥ 528 ॥
ज्ञानाने समूळ अज्ञान नाहीसे होते, व अज्ञाननाशाचा क्षण तोच वस्तुप्राप्तीचा क्षण असल्याने वस्तुदर्शनही ज्ञानामुळेच होतें; व अज्ञाननाशाबरोबर ज्ञाताज्ञयादि व्यवहाराचा लोप होत असल्याने ज्ञानाचे जीवनच जाऊन तेंही अंग टाकतें. म्हणजे सामान्यज्ञानरूप किंवा द्रह्मरूप होतें; ही अवस्था जाणण्यांत म्हणजे येणारी नसून स्वसंवेद्य आहे म्हणून कांहीं निर्देशच करणे तर तेथे ‘जाणण्याशिवाय नुसतें जाणणे’ म्हणजे ज्ञानमात्र स्थित असतें असा उपचार करावा लागतो. 28
529-15
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु । दोहींहून आणिकु । मागिला जो ॥ 529 ॥
ही स्थिति तो उत्तम पुरुष होय. मागील क्षराक्षर पुरुषांच्या अपेक्षेने त्याला तिसरा असे म्हटलें, तो शेवटचा शुद्ध परमात्मा होय. 29
530-15
सुषुप्तीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना । जागणें जैसें आना । बोधाचेंचि ॥ 530 ॥
अर्जुना, सुषप्ति आणि स्वप्न ह्यापेक्षा जागृतींतील बोध जसा फार वेगळा असतो. 530

531-15
कां रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवीं वेगळा । उत्तमु गा ॥ 531 ॥
किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ यांहून सूर्य मंडल जसे फारच वेगळे, तसाच हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून अत्यंत वेगळा आहे. 31
532-15
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥ 532 ॥
किंवा याहूनही, काष्ठांतीलच वन्हि जसा काष्ठाहून भिन्न असतो; तसा क्षराक्षरांत असूनही हा उत्तम पुरुष त्याहून वेगळाच आहे. 32
533-15
पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ॥ 533 ॥
कल्पांतकाळचा एकार्णव (व्यापक समुद्र) जशी आपली मर्यादा ओलांडून नदीनद जसे सर्व एकरूप म्हणजे जलमय करितो. 33
534-15
तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें ॥ 534 ॥
प्रलयकालच्या तेजोमय स्थितींत जसा दिवस आणि रात्र हा भेद उरत नाही, तशी, ह्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणीं, सुषुप्ति, स्वप्न किंवा जागृति अशा अवस्थाभेदांची गोष्टच बोलणें नको. 34
535-15
मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें ॥ 535 ॥
मग? ते द्वैत किं अद्वैत आहे, हे किंवा नाही काहीच सांगण्याची सोय नाही व त्रिपुटीच्या अभावी हा उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवही भयाने बुडी देऊन रहातो. 35

536-15
ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं । जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ॥ 536 ॥
असे जे काही तत्व आहे, तो उत्तम पुरुष जाणावा; त्यालाच परमात्मा असे म्हणतात.36
537-15
तेंही एथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥ 537 ॥
अर्जुना, हें वर्णनही या उत्तम पुरुषस्थितीच्या बाहेर असलेला जीवभाव पत्करून करून बोलावें लागते. बुडालेल्याची वार्ता काठावरील मनुष्य सांगू शकेल, बुडालेला नव्हे. 37
538-15
तैसें विवेकाचिये कांठीं । उभें ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणें वेदां ॥ 538 ॥
त्याप्रमाणे अर्जुना, विचाराच्या तीरावरच जोपर्यंत वेद उभे आहेत तोंवरच त्यास अक्षर अलीकडले, उत्तमपुरुष यांच्या हि पलीकडला ” वगैरे अलिकडच्या पलिकडल्या गोष्टी करत आल्या. 38
539-15
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । यातें म्हणती परु । आत्मरूप ॥ 539 ॥
म्हणून. क्षर व अक्षरपुरुष हे‘ अवर’ म्हणजे कनिष्ठ आहेत असे पाहून ह्या उत्तम पुरुषाला ” पर ” म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा म्हणजे परमात्मा असे म्हणतात. 39
540-15
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु ॥ 540 ॥
अर्जुना ह्याप्रमाणे परमात्मा ह्या शब्दाने पुरुषोत्तम (उत्तमपुरुष) अतें सुचविलें आहे असे समज. 540

541-15
एऱ्हवीं न बोलणेंचि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें । कांहींच न होनि होणें । जे वस्तु गा ॥ 541 ॥
आणखी त्या विषयी मौन धरणें हेंच तद्विषयक बोलणे होय, जे कोणत्याही समजेत न येणें हेंच त्याचे जाणणें ( अविजानतां विज्ञातं = ज्यांनी ब्रम्ह जाणले नाही त्यानिंच खरे जाणले) ते होन्या जाण्यांतलें नाहीं असा समज हेंच त्याचें होणे 41
542-15
सोऽहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें । द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ ॥ 542 ॥
सोऽहं ही बुद्धि जेथे मावळली व सर्वाधिष्ठानत्वामुळे सांगणाराच सांगणेरूप झाला व दृङमात्र स्वरूपनिश्चयांत द्रष्टत्व लोपले व त्यामुळे दृश्यही आटलें. 42
543-15
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा? । जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥ 543 ॥
कोणत्याही प्रकारें ती प्रतीतीला आली नाही तरी बिंब आणि प्रतिबिंब ह्यांच्यामध्ये बिंबाची सूक्ष्म आकृति नाहीं असें कसे म्हणतां येईल? 43
544-15
कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे जे माझारिलां ठायीं । ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये ॥ 544 ॥
किंवा प्राण आणि फुले ह्या दोघांच्यामधील प्रदेशांतही त्यांचा गंध, तो आपल्यास आहे असा वाटला नाही । तरी, आहे असे म्हटले पाहिजे. 44
545-15
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेंचि अनुभवें तेंचि पाहें । रूप तया ॥ 545 ॥
तसें द्रष्टेपणा व त्याच्याबरोबर दृश्यवस्तु ह्यांचा लोप झाल्यावर तेथे अमुक एक आहे असे कोणी म्हणावें? पण अशीच ती वस्तु आहे हें अनुभवानेच जाणावयाचे असते किंवा अनुभवी तेच जाणोतो; असे उत्तम पुरुषाचे रूप आहे.

546-15
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु । आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥ 546 ॥
जो प्रकाश्य वस्तूवांचून प्रकाशरूप आहे, नियम्य वस्तूवाचून जो स्वरूपतः ईश आहे व जो सर्व अवकाश व्यापून आपणच आहे. 46
547-15
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि ॥ 547 ॥
जो नादाचाही नाद (नादपणा ज्या सत्तेवर नांदतो आहे) तसाच जो स्वादाचाही स्वाद असून जो आपल्या आनंदस्वरूपानेच आनंदाचा भोग घेत असतो. 47
548-15
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें ॥ 548 ॥
जो पूर्णतेचा अंत ( किंवा परिणाम पावलेली अगर अवतरलेली अशी मूर्त पूर्णता ) सर्वपुरुषश्रेष्ठ व विश्रांतीचेही विश्रामस्थान. 48
549-15
सुखासि सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें । शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ॥ 549 ॥
जेथे सुखालाच सुखाची जोड, तेजालाच तेजोलाभ अगर महाशून्यामध्येच शून्याचा लय. 49
550-15
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता । जो बहुतें पाडें बहुतां- । पासूनि बहु ॥ 550 ॥
जो विकास संपून अवधिभूत असणारा, ग्रासाचाही ग्रास करून पूर्णत्वाने असणारा, जो सर्व बहुत्वाहुनही बहु म्हणजे श्रेष्ठ आहे. 550

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading