सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

201-16
तैसीं बांधिलीं सोडिता । बुडालीं काढिता । सांकडी फेडिता । आर्तांचिया ॥ 201 ॥
त्याप्रमाणे बद्धांना मुक्त करणारा, बुडणारांचा उद्धार करणारा, व संकटग्रस्तांचे संकट निवारण करणारा. 1
202-16
किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति । आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ॥ 202 ॥
किंबहुना स्वार्थाच्या व्यापारांत रत असतांनाही सभोंवारच्या जीवांच्या सुखाचे व उन्नतीचे ज्याच्या चित्तांत नित्य चिंतन चालू असतें. 2
203-16
वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं । संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ॥ 203 ॥
किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे यत्किंचितही अहित करावें असा नुसता संकल्पही ज्याला शिवत नाही. 3
204-16
पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें ॥ 204 ॥
अर्जुना, अशी वागणूक जेथे दिसेल अगर ऐकू येईल ते “अद्रोहत्व” होय असें तुला पटण्यासारखे सांगितले. 4
205-16
आणि गंगा शंभूचा माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था । तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें ॥ 205 ॥
आणि, अर्जुना, गंगेला शंकरांनी आपल्या जटेत धारण करून जिरविल्यावर तिच्या स्वतःच्या वेगाचा गर्व जसा हरण झाला व ती जशी लज्जित झाली, तसा लोकांनी अतिशय मानमान्यता केली असतां जो चित्तांत संकोच पावतो. 5

206-16
तें हें पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों ॥ 206 ॥
इत्यादि जें वर्तन हेच अमानित्व होय; अर्जुना मागे ह्याचे दिग्दर्शन आले आहेच; पुन्हा तेच ते सांगणे कशाला? 6
207-16
एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय ॥ 207 ॥
ह्याप्रमाणे सव्वीस प्रकारची ही दैवी किंवा ब्रह्मसंपत्ति आहे व ती मोक्षसम्राटांचे जणू वतनच होय.7
208-16
नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥ 208 ॥
किंवा, नित्य नवे वाटावे अशा ह्या सव्वीस पवित्र गुणरूपांची ही दैवी संपत्ति म्हणजे वैराग्यरूपी सगरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी जणू गंगाच अवतरली आहे ! 8
209-16
कीं गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥ 209 ॥
किंवा ही मुक्ति नवरी ह्या सव्वीस गुणरूपी पुष्पांची माला घेऊन वैराग्यादि साधनांनीं संपन्न असलेल्या वराच्या गळ्यांत ती घालावी म्हणून जणू त्याचा शोधच करीत आहे ! 9
210-16
कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥ 210 ॥
किंवा ह्या सव्वीस गुणरूप ज्योतींनी युक्त अशी आरती घेऊन; आपला पति जो आत्मराज त्याला ओवाळण्यासाठ गीता ते ताट घेऊन पुढे आली आहे. 210

211-13
उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें । दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची ॥ 211 ॥
गीतारूप समुद्रांतील शिंपल्यातून ही दैवीसंपत्तिरूप मुक्ताफळेच जणु बाहेर पडली आहेत. 11
212-16
काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केलें दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥ 212 ॥
ह्या दैवीसंपत्तीरूप गुणराशीचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णन करावें? 12
213-16
आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥ 213 ॥
आतां, अंतर्बाह्य दुःखरूप असलेली व दोषादि कंटकांनी युक्त असलेली अशी जरी आसुरी संपत्ति असली तरी, तीही तुला माहीत असू दे. 13
214-16
पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥ 214 ॥
कारण, ती त्याज्य व निरुपयोगी अशी जरी असली तरी जिचा त्याग करावयाचा तिचीं लक्षणेही चांगल्या प्रकारे ऐकलेली पाहिजेतच. 14
215-16
तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषींघोरीं । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥ 215 ॥
तरी जीवांना घोर नरकव्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर दोष एकत्र जमून त्यांचा मेळावा झाला, ती ही “आसुरी” संपत्ति होय. 15

216-16
नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥ 216 ॥
जगांतील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे एक “कालकूट” विष म्हणावें त्याप्रमाणे जगांतील सर्व दोषांचे एकत्रीकरण ती ही आसुरी संपत्ति होय. 16
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥16. 4॥

217-16
तरी तयाचि असुरां । दोषांमाजीं जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥ 217 ॥
तरी, अर्जुना, ह्या दोषयुक्त आसुर संपत्तीमध्यें जो प्रमुख म्हणून गणला जातो असा जो दंभ तो असा असतो. 17
218-16
जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं । ते तीर्थचि परी पतनीं । कारण होय ॥ 218 ॥
आपल्या जननीचे स्मरण केव्हांही पवित्रच होय; पण, तेंच जनांत तिच्या आंगच्या दोषाविष्करणाच्या निमित्तानें केलें असतां जसें पतनाला कारण होते. 18
219-16
कां विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटां । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥ 219 ॥
किंवा गुरूपासून प्राप्त झालेली गुह्यविद्या चव्हाट्यावर उघडी मांडली असतां, ती मूळची हितकारिणी खरी, पण तीच अनिष्टाला कारणीभूत होते. 19
220-16
पैं आंगें बुडतां महापूरीं । जे वेगें काढी पैलतीरीं । ते नांवचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैसी ॥ 220 ॥
जिचे स्वतःचे बहुतेक अंग पुरांत अगर पाण्यांत बुडालेले असते तरी जी वेगाने पैलतीराला पोंचविते ती नावच डोक्यावर घेऊन पाण्यांत शिरणारा जसा निश्चित बुडणार. 220

221-16
कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥ 221 ॥
जीवन रक्षण करणारे म्हणून अन्न सेवनसमयीं स्तुतियोग्य असले, तरी अर्जुना, तेच प्रमाणाबाहेर सेवन केले असतां विषाप्रमाणे बाधक होते. 21
222-16
तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय ॥ 222 ॥
त्याचप्रमाणे इहपरलोकींचा सखा असा जो स्वधर्म घडेल त्याची चव्हाटयावर टिमकी वाजविल्यास तोच पतनाला कारणीभूत होतो. 22
223-16
म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥ 223 ॥
म्हणून आचरलेल्या धर्माचा स्वत:च्या वाचेने डांगोरा अगर प्रसिद्धि करीत बसले असतां त्यालाच अधर्माचे फल प्राप्त होतें; व अर्जुना, दंभ म्हणतात तो हाच होय. 23]
224-16
आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥ 224 ॥
आतां, मुर्खाला चार अक्षरे येत झालीं कीं तो जसा ब्रह्मसभेलाही तुच्छ लेखतो ! 24
225-16
कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा । कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥ 225 ॥
किंवा एखाद्या शिलेदाराला आपला घोडा गजराजापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वाटावें, किंवा, काट्यांच्या वईवरील सरडयाला आपण आकाश पायांखाली आणिलें असे वाटावें, 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading