सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

126-15.
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥126॥
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात.
127-15
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥127॥
संहारकारक प्रचंड वार्‍याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसारवृक्षाची साली गळून पडतात न पडतात तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय उत्पन्न होतात.
128-15
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥128॥
कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसर्‍या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो.
129-15
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥129॥
कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची नविन अतिशय रसरशीत अशी मोठी सालपटे जोमाने उत्पन्न होण्यास लागतात.
130-15
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥130॥
चालू असलेले जे वर्ष संपुन जाते ते पुढच्या वर्षास आमञंन देते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही.

131-15
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥131॥
ज्याप्रमाणे वार्‍याच्या झुळुकांमागून झुळुका वहात असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्‍या व नाश पावणार्‍या फंद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही.
132-15
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥132॥
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्‍हेने हा संसारवृक्ष अव्यय, अविनाशी आहे असा वाटतो.
133-15
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥133॥

जसे वहाणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वहाणारे पाणी मिळात असते, त्यामुळे पहाणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात.
134-15
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥134॥

अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटीवेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते.
135-15
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥135॥

एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो.

136-15
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥136॥
भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो.
137-15
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥137॥
हे राहू दे, अंधारामधे कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंडचक्राच्या आकाराची दिसते.
138-15
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥138॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळाल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात.
139-15
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥139॥
परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते,
140-15
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥140॥
या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भासमात्र आहे असे ज्याने जाणले.

141-15
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥141॥
अर्जुना, त्याला संसारवृक्षाचे क्षणिकत्व जाणणार्‍याला मी जो सर्वज्ञ तोच ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे.
142-15
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी ॥142॥
✏सर्वप्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे? ज्ञान-उपदेशाचा संप्रदाय देखील त्या जिवनमुक्त पुरुषाच्या योगानेच सुरु असतो.
143-15
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें । जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥143॥
✏हे फार बोलणे राहू दे. अशा प्रकार हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल?
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥15.2॥

क्ष्लोकार्थ:- ज्याप्रमाने ह्या सात्विक, राजस, आणि तामस या गुणांच्या पाण्याने वाढलेल्या विषयभोगरुपी अंकुरांच्या देव, मनुष्य आणि तिर्यक आदि योनिरुप फांद्दा खालचया बाजुस व वर सर्वञ पसरल्या आहेत. तसेच मानव योनीमध्ये कर्माप्रमाने बांधनारी अहंता, ममता आणि वासनारुपी मुळे खाली आणि वर तिन्ही लोकामध्ये सामावली आहेत.
144-15
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥144॥
✏मग याच खाली असलेल्या या संसाररुपी झाडाला वरच्या बाजुस सुद्धा पुष्कळ फांद्या तयार होतात.
145-15
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें । तयाही तळीं पघळे । वेल पालवु ॥145॥
✏आणि तळाशी पसरलेल्या संसारवृक्षाच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मूळे होतात व त्या मुळांपासून खालच्या भागास वेल व पाला फुटुन त्याची विस्तार होत जातो.

146-15
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं । तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ॥146॥
✏असे जे आम्ही सुरुवातीला (ओवी 57 ते 64 मधे) म्हटले होते तेच अजुन सोप्या भाषेत सांगतो ऐक.
147-15
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें । वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ॥147॥
✏तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने अष्टदा प्रकृती तयार होऊन वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो.
148-15
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज। हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥148॥
परंतु प्रारंभी झाडाच्या बुडापासुन तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून (मुळापासून) चार मोठ्या मोठ्या फांद्दा उत्पन्न होतात.
149-15
यया एकैकाचेनि आणगटें । चौऱ्यांशीं लक्षधा फुटे । ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंघचि होती ॥149॥
✏या एकेक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौर्‍यांशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे तयार होतात.
150-15
प्रसवती शाखा सरळिया । नाना सृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥150॥
✏मागे सांगितलेल्या चार खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात. आणि अनेक जातिरूपी आडव्या फांद्या ह्या संसारवृक्षाला उत्पन्न होतात.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading