401-14
यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा ॥401॥
अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व यालाच चौथा पुरुषार्थ असेही नाव आहे.
402-14
परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । एथ मी हन साधन । गमेन हो ॥402॥
परंतु माझी (श्रीकृष्णाची) भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी (पोहोचण्याचे) साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी (कृष्ण) साधन आहे असे कदाचित तुला वाटेल.
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥14.27॥
क्ष्लोकार्थ :-नित्य, अमृत, शाश्वत, धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात रहाते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥14॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रयविभागयोग नावाचा हा चौदावा अध्याय समाप्त झाला. ॥14॥
403-14
तरी झणीं ऐसें । तुझ्या चित्तीं पैसें । पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि ॥403॥
तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस. अरे माझ्यावाचून ब्रह्म दुसरे नाही.
404-14
अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रायो मी पांडवा । मीचि बोलिजे आघवा । शब्दीं इहीं ॥404॥
अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी (म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी) मीच बोलला जातो.
405-14
पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा । तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं ॥405॥
चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही.
406-14
अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जें उमप । अद्वितीय ॥406॥
अर्जुना जे ब्रह्म नित्य, अचल, प्रगट, धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे. ते स्वगत सजातीय-विजातीय भेदरहित असे आहे.
407-14
विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम । निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी ॥407॥
विचार, अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून, ज्या ठिकाणी प्राप्त होतो, ते स्थान मी आहे. फार काय सांगावे? सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे समज.
408-14
ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासी ॥408॥
अहो महाराज, ऐका. अशा अशाप्रमाणे, तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला.
409-14
येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें । पुसलेनिविण वायाणें । कां बोलसी? ॥409॥
धृतराष्ट्र व संजय यांच्यातील भाष्य तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया, हे तुला कोणी विचारल्या शिवाय तू व्यर्थ का बोलतोस?
410-14
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥410॥
माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी शंका दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे.
411-14
संजयो विस्मयो मानसीं । आहा करूनि रसरसी । म्हणे कैसें पां देवेंसी । द्वंद्व यया? ॥411॥
(धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून) संजय आश्चर्ययुक्त होऊन संतापून मनात म्हणाला) अहो काय आश्चर्य आहे ! याचे देवाशी कसे वैर आहे?
412-14
तरी तो कृपाळु तुष्टो । यया विवेकु हा घोंटो । मोहाचा फिटो । महारोगु ॥412॥
तरी तो कृपाळू (श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास) हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य येवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.
413-14
संजयो ऐसें चिंतितां । संवादु तो सांभाळितां । हरिखाचा येतु चित्ता । महापूरु ॥413॥
संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करत असता आणि कृष्णार्जुनांच्या संवादाचे मनन करत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला.
414-14
म्हणौनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें । श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजैल ॥414॥
म्हणून आता या उत्साहाच्या आवेशाने तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल.
415-14
तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो । आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥415॥
त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहचवीन (तुम्हाला सांगेन). ते तुम्ही ऐका. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले.
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां गुणत्रय विभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥14 ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण
