151-12
वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥151॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतुवाचून देखील समुद्र पूर्ण पाण्याने भरला असतो, त्याप्रमाणे सुखभोग प्राप्त न होता देखील जो अखंड प्रसन्नचित्त असतो.
152-12
वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचेनि ॥152॥
शपथ वाहून जो आपले अंतःकरण आपल्या स्वाधीन ठेवतो- अंतःकरणाच्या स्वाधीन होत नाही- आणि ज्याचा निश्चय इतका दृढ असतो की त्याच्याच योगाने निश्चयाला सत्यपणा आलेला आहे.
153-12
जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनीं । जयाचिया हृदयभुवनीं । विराजती ॥153॥
ज्याच्या ह्रदयामध्ये जीव परमात्मा हे दोघेही एकाच आसनावर बसून विराजमान झालेले असतात.
154-12
ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि । अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायीं ॥154॥
अशा रीतीने योगसंपत्तीने समृध्द होऊन, जो माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी मनबुद्धी अखंड अर्पण करतो.
155-12
आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु । तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ॥155॥
आतबाहेर दृढ ऐक्य साधल्यावरही माझ्या सगुणस्वरूपाच्या ठिकाणी ज्याचे अत्यंत प्रेम आहे.
156-12
अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु । तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥156॥
अर्जुना तोच भक्त आहे, तोच योगी आहे व तोच मुक्त आहे, असे समज, मी पती व तो पत्नी असा तो मला प्रिय आहे.
157-12
हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें । हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥157॥
एवढेच नाही, तर असा तो ज्ञानी भक्त मला माझ्या प्राणाप्रमाणे आवडतो. पण ही ही उपमा, त्याच्यावर असलेले माझे प्रेम वर्णन करण्यास कमीच पडते.
158-12
तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी । इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ॥158॥
प्रेमळ भक्तांची कथा म्हणजे चित्ताला भूल किंवा विसर पडणारीच होय; म्हणून ती शब्दाने बोलून दाखविण्यासारखी नाही, तरीपण तुझ्यावरील प्रेमच मला बोलायला लावते.
159-12
म्हणौनि गा आम्हां । वेगां आली उपमा । एऱ्हवीं काय प्रेमा । अनुवादु असे? ॥159॥
म्हणूनच अर्जुना ! भक्तावर माझे प्रेम कसे असते, हे सांगताना “तो वल्लभ मी कान्ता” “जीवाचेनि पाडे” अशा उपमा माझ्या तोंडातून एकदम बाहेर पडल्या. एर्हवी पाहता हे प्रेम शब्दाने सांगता येते काय?
160-12
आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ॥160॥
अर्जुना ! आता हे असो. पण प्रेमळाच्या गोष्टी करण्याने मात्र प्रेम दुप्पट उफाळून येते.
161-12
तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये । तिये गोडीसी आहे । कांटाळें मग? ॥161॥
तशातही कदाचित प्रेमळ भक्तांच्या कथा श्रवण करणारा श्रोताही प्रेमळच असला, तर मग त्या प्रेमगोडीची कशाशी तुलना करता येईल काय?
162-12
म्हणौनि गा पंडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता । वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥162॥
म्हणून अर्जुना ! तूच माझा अत्यंत प्रेमळ असा प्रिय भक्त आहेस आणि तूच प्रेमळ श्रोताही असून, त्यातच प्रसंगाने प्रेमळाचे निरूपण आले आहे.
163-12
तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों । ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागला देवो ॥163॥
तर आता प्रेमळाची कथाच बोलतो. भाग्याने प्रेमळाच्या कथा सांगण्याचे हे सुख मला प्राप्त झाले, असे म्हणताक्षणींच देव डोलू लागले.
164-12
मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण । जया मी अंतःकरण । बैसों घालीं ॥164॥
मग देव म्हणाले, अर्जुना ! ज्याला मी बसायला आपल्या अंतःकरणाचे आसन घालतो, त्या भक्ताचे लक्षण ऐक.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥12.15॥
अर्थ ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत, व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे.॥12-15॥
(भक्तलक्षणे = पुढे चालू)
165-12
तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा ॥165॥
ज्याप्रमाणे समुद्रात भयंकर खळबळ माजली, तरी समुद्रांतील प्राण्यांना भय वाटत नाही आणि समुद्राच्या पाण्यात भयंकर प्राणी असले तरी समुद्र कंटाळत नाही.
166-12
तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥166॥
त्याचप्रमाणे जगाच्या उन्मत्त वागणुकीची सत्पुरुषाला खंत वाटत नाही आणि ज्याच्या वागण्याने लोकांनाही दुःख होत नाही.
167-12
किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥167॥
किंबहुना, हे अर्जुना ! ज्याप्रमाणे शरीर आपल्या अवयवांचा कंटाळा करीत नाही, त्याप्रमाणे जो पुरुष, सर्व जीवांचे ठिकाणी जीवपणाने मीच आहे असे समजून, कोणाचाही कंटाळा करत नाही.
168-12
जगचि देह जाहलें । म्हणौनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥168॥
(सर्व जगात मीच आहे या जाणीवेने) सर्व जगच ज्याचा देह बनला. त्याच्याहून भिन्न काही राहिले नाही, म्हणून त्याची आवड नावड, हर्ष-क्रोध हे संपूर्ण नाहीसे झाले.
169-12
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याहीवरी भक्तु । माझ्यां ठायीं ॥169॥
अशा रीतीने जो द्वंदमुक्त होऊन भयोद्वेगरहित झाला आणि शिवाय माझ्या सगुणस्वरूपाचे प्रेम करणारा भक्त असला,
170-2
तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो । हें असे जीवें जीवो । माझेनि तो ॥170॥
तर अर्जुना ! त्याचा मला कसा मोह असतो व मला कसा प्रिय असतो, हे काय सांगू ! हे असो. “माझेनि जीवें” म्हणजे मी सगुणस्वरूपाने प्रगट झालो आहे, म्हणूनच तो जगतो.
171-12
जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो॥171॥
जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि आत्मानंदाचा परिणाम – म्हणजे शेवट – जो ब्रह्मानंद, तोच जणू जन्माला आला, असा जो पूर्ण ब्रह्मस्थितीचा पती झाला.
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥12.16॥
अर्थ निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थाचा देखणा, उदासीन, संसारदु:खविरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार, तद्विरहित असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.॥16॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
172-12
जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें॥172॥
ज्याच्या अंतःकरणात विषयसुखाच्या वासनेचा शिरकावच होत नाही, म्हणून ज्याचे असणे- म्हणजे ज्याची संगती – दुसर्याच्या सुखाची वृद्धी करणारी असते.
173-12
मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥173॥
काशीक्षेत्र अत्यंत पुण्यभूमी असून निश्चयाने मोक्ष देण्यास उदार आहे, पण त्या क्षेत्रात मरायला पाहिजे.
174-12
हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥174॥
हिमालयभूमी निष्पाप करणारी आहे; पण तेथे जो प्राणाला मुकतो, त्यालाच ती निष्पाप करणारी होते. ज्ञानभक्तीने अत्यंत पुनीत झालेल्या सज्जनांचे पावन करणे तशा प्रकारचे (म्हणजे काशीसारखे किंवा हिमालयाच्या भूमीसारखे) नाही (म्हणजे त्यापेक्षाही विशेष आहे, असा अर्थ).
175-12
शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परी तेथें आहे । बुडणें एक ॥175॥
सर्व पवित्र पदार्थांत अत्यंत पवित्र गंगा होय आणि तिच्या योगाने सर्व पाप व त्रिविध ताप नाहीसे होतात- म्हणजे पुरुष मुक्त होतो- पण या लाभाकरिता गंगेत बुडून मरावे लागते.