भाग क्र.10
कौसल्येचे धर्माचरण
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातल्या अयोध्या कांडातील संस्कृती दर्शन पाहु.
राजा दशरथ व कैकयी मातेची आज्ञा घेवुन रामचंद्र कौसल्यामातेचा निरोप घ्यावा या करता तिच्या वाड्यात प्रवेश करते झाले या ठिकाणी अनेक जेष्ठ मंडऴी, विद्वान वैदिक ब्राह्मण, अनेक दासी, द्वारपाल हे त्यांची वाट पाहताना दिसले त्यांना पाहुन सर्व मंडळी आनंदि झाली व कौसल्या मातेला रामचंद्र वाड्यात आलेत हि बातमी त्यांनी ऐकवली.
कौसल्यापि तदा देवी रात्रिं स्थित्वा समाहिता ।
प्रभाते चाकरोत् पूजां विष्णो:पुत्रहितैषिणी।। (अयो.कां.20-14)
पुत्राचे मंगलचिंतणारी माता रात्रभर जागुन पहाटे पर्यंत एकाग्रचित्त होवुन महाविष्णुंचे पूजन करत होती.
आपल्या संस्कृतीत “जागरणाचे “महत्व फार आहे. एकादशी,महाशिवरात्र सत्यनारायण किंवा सत्यविनायक , मंगळागौरी महालक्ष्मी (घागरी फुंकणे) वगैरे व्रतांमध्ये रात्रौ जागरणं कृत्वा असे उल्लेख येतात. जागरण म्हणजे केवऴ “न झोपता गप्पा मारत बसणे असा मर्यादित घेवु नये तर परमेश्वरासमोर नृत्य गीत वादन शास्त्रचर्चा, कथासेवन, पूजन अर्चन वगैरेंनी रात्र जागवणे व त्यातुन भगवंताचे रुप व गुण अधीक चांगल्या प्रकारे जाणुन घेणे हे जागरण आहे.हिच खरी जागृती आहे.
उत्तिष्ठत जाग्रत ।प्राप्य वरान् निबोधत् ।। (उठा जागे व्हा वर प्राप्त करा)हा स्वामी विवेकानंदानी तरुणांना केलेला उपदेश याच जागृतीचा आहे . सजग व्हावे या करता हे जागरण आहे. (डिजे लावुन रात्रभर नाचगाणे व धांगडधिंगा, जुगार वगैरे यात शास्त्रमान्य नाहित व ते धर्मजागरण हि नव्हे) जागृती हि एक समाधी अवस्था देखील आहे.
आजहि आपल्याकडे शिवरात्रीला प्रदोष याम पूजाकरुन मंगऴागौरी महालक्ष्मी वगैरे व्रतात नृत्य गीत कथावाचन वगैरेंनी जागरण केले जाते.
या व्रतांचा आणखी एक लाभ आहे कि या व्रतांमुऴे स्त्रियांच्या गीत, नृत्य वादन वगैरे कलांना वाव मिऴतो त्यांना एकत्र येवुन आपल्या विचारांचे आदान प्रदान करता येते. जुन्या मंडऴींनी हा विचार आधीच केला होता. हल्लीच्या फेक्युलर विचारवंतांनी मात्र भारतीय संस्कृतीत महिलांना गौण लेखलय त्यांना बंदि बनवलय हि ओरड मारल्यामुऴे आपल्या माता भगिनी तेच सत्य मानु लागल्या व इंग्रज भारतात आल्यामुऴेच भारतीय स्त्रियांचा उध्दार झाला हा गैरसमज पसरवला त्यांना आपण कधी विचारलच नाहि कि युध्दशास्त्रात निपुण कैकयी, सत्यभामा राज्यकारभारात पारंगत सीता, द्रौपदी, जिजाबाई, गणीतात पारंगत भास्कराचार्यांची कन्या लीलावती, चांगदेव पासष्टि सारखा उपदेश करणारी मुक्ताबाई (जो आज डॉक्टरेट करणार्यांना घाम फोडतोय.) जनाबाई , संतसखु, कान्होपात्रा यांचे अभंग यांत केलेला विचार, उपदेश हे ज्ञान त्यांना कसे मिऴाले असे असेल. (मी शब्द शिक्षण असा वापरला नसुन ज्ञान हा योजला आहे) म्हणजे त्या पढिक नव्हत्या तर पंडित होत्या.केवऴ शालेय शिक्षण हेच खर बाकी बकवास हा अट्टहास चुकीचा वाटतो याने यंत्रवत् काम करणारे यंत्रमानव घडतील पण सृजनशील व नितिमान नागरीक घडणार नाहित.
कै.गंगुबाई हनगल, भारतरत्न लता मंगेशकर, आशाताई वगैरेंची शालेय शिक्षण हि कमी आहेत पण त्यांचाजवऴ “ज्ञान” आहे.
आपण अेक विचार सहज करा कि पार्टित जावुन मद्यपान, जुगार खेऴुन रात्र जागवणे व घरी येवुन बायको पोरांना बडवणे या व्यसनांकरता वेऴ प्रसंगी घरदार दागीने विकणे हि संस्कृती चांगली कि स्वत:जागृत होण्याकरता जागरण करणे हि संस्कृती चांगली?
सा क्षौम वसना हृष्टा नित्यं व्रतपरायणा ।
अग्निं जुहोति स्म तदा मन्त्रवत् कृतमंगला ।।
रेशमी वस्त्र परीधान केलेली निरंतर व्रतपरायण असणारी कौसल्या माता प्रसन्न मनाने मंगलकृत्य पूर्ण झाल्यावर मंत्रोच्चार झाल्यावर अग्नित आहुती देत होती. (पूर्णाहुती)
कौसल्या मातेच्या व्रताची सांगता पूर्णाहुती ने होत होती.
रामचंद्रानी त्या ठिकाणी दाखल झाले व पूजनाचे हवनाची सामग्री पाहिली
तां शुक्ल क्षौम संवीतां व्रतयोगेन कर्शिताम् ।
तर्पयन्तीं ददर्शाद्भिर्देवतां वर वर्णिनीम् ।। 19
शुभ्र रेशमी वस्त्र परीधान केलेली माता कौसल्या सततच्या व्रताचरणामुऴे दुर्बऴ झाली होती व त्या अवस्थेत देखील इष्टदेवतेचे तर्पण करत होती.
हल्ली टिव्हि व सिरीयल मधुन पांढरे वस्त्र हे “विधवा स्त्रिया, किंवा प्रेतयात्रेत दाखवतात “त्यामुऴे पांढरा रंग हा स्त्रियांना अशुभ अशी गैरसमजुत वाढु लागलीय .उलट पांढरा रंग (श्वेत) हा सात्विकता जागृत करणारा असल्याने ब्रह्मचारी, व्रती यांनी शुक्ल वस्त्र धारण करावे. सरस्वति देवी या सत्वगुणांचे प्रतिनिधित्व करतात त्या देखील शुभ्र वस्त्र धारण करतात (या कुंदेंदु 。या श्लोकात देखील या शुभ्र वस्त्रांवृता असा उल्लेख आहे, शुक्लां ब्रह्म विचारसार परमां。या श्लोकात देखील शुभ्र वस्त्राचा उल्लेख आहे) तेव्हा ते अमंगल नसुन सत्वगुण वृध्दिकरता जाणावे.
व्रतांचे प्रामुख्याने तीन प्रकार होतात
द्वि अंग (जप व जप दशांशाने किंवा शतांशाने हवन)
त्र्यंग (तीन अंगानी युक्त) जप, दशांशाने हवन व ब्राह्मण भोजन
पंचांग (पाच अंगानी युक्त) जप, तद् दशांशाने हवन, हवन दशांशाने तर्पण, तर्पण दशांशाने मार्जन, मार्जन दशांशाने ब्राह्मण भोजन हि पाच अंगे यात येतात
(उदा.नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र असेल तर याचे पुरश्चरण असे होईल 10, 000 जप
दशांशाने 1000 आहुती हवन
हवन दशांश 100 वेऴा तर्पण
तर्पण दशांशाने 10 वेऴा मार्जन
मार्जन दशांश 1 ब्राह्मण समाराधन.
पंचांगानी युक्त पुरश्चरण हे श्रेष्ठ असते)
तर्पण याचा अर्थ देवतांना तृप्त करणे हा होतो. (हातावरुन किंवा दर्भांवरुन देवतांच्या उद्देशाने पाणी सोडणे याला तर्पण म्हणतात)
रोज नित्य नियमाने स्नान झाल्यावर, ब्रह्मयज्ञ समयी व श्राध्दसमयी तर्पण करतात.
आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्या सर्वांच्या तृप्ती करता तर्पण नित्य करावे यात अगदि क्षेत्र म्हणजे जमिन, औषधी, वनस्पती यांच्या करता, यक्ष, रक्ष, यांच्या सोबतच ऋषिमुनी आपले पूर्वज आई, अाजी पणजी, वडिल आजोबा पणजोबा, आईचे वडिल आजोबा पणजोबा, त्यांच्या पत्नी, सावत्र माता, बहिण, भाऊ, काका मामा स्वपत्नी, आत्ये मावशी सासु सासरे गुरुजन या सर्वांना उद्देशुन तर्पण आहे.
त्याच सोबत ज्यांना संतती नाहि अशा स्व गोत्रातल्या लोकांनाहि जानवे पिऴुन तर्पण करतात.
थोडक्यात सांगायचे तर या सृष्टितल्या प्रत्येक घटकाचे, विविध योनींचे आपल्यावर उपकार असतात त्यांचा बद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी व आपल्यावर समाज व निसर्गऋण आहे हि भावना मनात सदैव राहावी या करताच या गोष्टि ऋषिंनी आपणास आचरण्यास सांगीतल्या आहेत हिच आपली संस्कृती आहे व आजहि हि संस्कृती आपण कमी अधीक प्रमाणात पाऴतोय.
आपण कृतघ्न नाहि तर कृतज्ञ बनावे या करता हि संस्कृती आहे.
आचार्य अत्रेंनी अखेरच्या काऴात एक इच्छा व्यक्त केली होती “मी मेल्यानंतर जर कोणी माझे थडगे बनवले तर त्यावर एकच वाक्य लिहा हा माणुस कृतघ्न कधीच नव्हता “
आपणहि अस कृतघ्न न होता सर्वांप्रति कृतज्ञ राहुया .
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
