रामायणातले संस्कृतीदर्शन भाग 17

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

रामायणातले _संस्कृतीदर्शन 🌼भाग क्र.17🌼

🌷शब्दवेधी धनुर्धर संस्कृती व असत्य श्रावणबाऴाची सत्यकथा 🌷

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातील संस्कृतीदर्शन पाहु.अयोध्या कांडापासुन हा विषय आपण अभ्यासतो आहोत.
मागील भागात रामचंद्रांनी चित्रकुट पर्वतावर पर्णकुटि उभारुन वास्तुशांत केली या विषयीचा लेख व रामचंद्रांच्या मांसाहार भक्षणाचे खंडन पाहिले आज पुढे पाहु.
राम लक्ष्मण व सीता हे चित्रकुटावर वास्तव्य करु लागले तदनंतर काय झाले? गुह राजांच्या गुप्तचरांनी राम वनवासात सकुशल आहेत व चित्रकुटावर मुक्कामी आहेत हि बातमी आणल्यावर सुमंत्र गुह राजाचा निरोप घेवुन अयोध्येत परतले सर्वत्र औदासिन्य व दु:ख पसरले होते. त्यांनी दशरथ राजा कौसल्या व सुमित्रा देवींना रामांचा निरोप दिला व त्यांचा शोक दुर व्हावा या करता प्रयत्न केला दशरथांचा व कौसल्येचा शोक दुर करणे फार कठिण होते ते सतत रामचिंतनात मग्न व शोकाकुल राहु लागले व त्याच दु:खद समयी दशरथाला आपल्या हातुन एका तपस्वी मुनिकुमाराची हत्या झालेल्याचे स्मरण झाले(सुखाच्या समयी आपली पातके लक्षात येत नाहित मात्र वेऴ पालटली कि भूतकाऴ समोर उभा ठाकतो) ते कौसल्येला म्हणतात.


यथान्य:पुरुष:कश्चित पलाशैर्मोहितो भवेत् ।
एवं मयाप्यविज्ञातं शब्दवेध्यमिदं फलम् ।।63-13
हे सुंदरी जसा मुर्ख माणुस पऴसाची फुले पाहुन आनंदित होतो मात्र त्यांचा कडुपणा विषयी त्याला जाण नसते. तसच शब्दवेधी धनुर्विद्या मी आनंदाने शिकलो पण त्याचा भयंकर फऴाचे मात्र मला ज्ञान झाले नाहि. (एखादि विद्या शिकताना त्याचे फायदे व तोटे हे ज्ञात करुन घ्यावे लागतात.शस्त्र हे विवेकाने कसे वापरावे हे शिकणे गरजेचे आहे केवऴ शस्त्र चालवता येणे हे शस्त्र पारंगत या व्याख्येत बसत नाहि तर योग्य काऴी, योग्यवेऴी व योग्यस्थळी शत्रुवर प्रहार करता आला तरच तो विवेकी शस्त्रपारंगत ठरतो)
देव्यनूढा त्वमभवो युवराजो भवाम्यहम् ।
तत:प्रावृडनुप्राप्ता मम कामवर्धिनी ।।63-14
तारुण्यअवस्थेत युवराज असताना आपल्या विवाहाच्या आधी कामवर्धक वर्षा ऋतु आला .
वर्षाऋतुत मृगया (शिकार) करण्याकरता शरयु नदीच्या काठावर उंच वृक्षावर बसलो .
निपाने महिषं रात्रौ गजं वाभ्यागतं मृगम् ।
अन्यद् वा श्र्वापदं किंचिज्जिघां सुरजितेंद्रिय:।। 21
(शिकारीचा आवेग वर्षाऋतुचा सुखद आल्हाद व तारुण्याचा आवेश)यामुऴे मी इंद्रियांच्या आधीन झालो होतो रात्री जलप्राशनाकरता उपद्रवी रानरेडा, उन्मत्त हत्ती, वाघ सिंह वगैरे प्राणी त्या ठिकाणी येतील त्यांची शिकार करावी अशा विचारात होतो.
(शिकार निरुपद्रवी प्राण्यांची केली जात नाहि किंवा करु नये असे वचन आहे.)शिकार का करावी? त्याने कोणता पराक्रम साध्य होतो असे विचारणारे अनेक महाभाग आहेत अगदि कालीदासाच्या काऴात असे महाभाग होते कालीदासाने आपल्या महाकाव्यात यावर सुंदर भाष्य केलय .
कविश्रेष्ठ कालिदास शांकुतल नाटकात काय म्हणतो ते पाहा.


मेदच्छेद कृशोदरं लघु भवत्युत्थान योग्यंवपुु:।
सत्वानामपि लक्ष्यते विकृतिमच्चित्तं भयक्रोधयो:।।
उत्कर्ष:स च धन्विनां यदिषव: सिध्यन्ति लक्ष्ये चले ।
मित्थैव व्यसनं वदन्ति मृगयामीदृग् विनोद: कुत:।। (2.5)
एक विदूषक दुष्यंताबरोबर शिकारीला गेला व हि सर्व धावपऴ करुन तो दमला व त्यावेऴी तो “शिकार करणे “हे वाईट अस बोलत असताना सेना नायकाने त्याला हे शब्द ऐकवले. तेच या श्लोकात दिलेत


शिकारी मुऴे मेद झडतो, पोट सपाट होते, शरीर हलके व चपऴ होते. शिकारीच्या वेऴी पशूंच्या चेहर्यावरील क्रोधाचे व भयाचे भाव अभ्यासता येतात.धावत्या सावजावर बाण मारल्यानंतर धनुर्धार्याच्या धनुर्विद्येचे कौशल्य अभ्यासता येते.एवंगुण विशेष मृगयेला “व्यसन “म्हणणे हे चूक आहे हा मनोविनोद आहे.
पूर्वी राजे लोक शिकार याच कारणाने करायचे सैन्य नेहमी सज्ज हवे त्यांचा सराव व्हावा, शत्रूच्या चेहर्यावरील भावजाणणे हि कला आहे ती समजवुन घेण्याकरता व नेमबाजीचे कौशल्य टिकवण्याकरता, रानावनात, काट्याकुट्यात, उन वारा पावसात शिकार केली जात असे अचानक शत्रु समोर उभे राहुन लढता येत नाहि त्या करता सराव गरजेचा असतोच. त्यामुऴे उगीच गळे काढु नये हि पुरोगाम्यांना विनंती


रात्र संपुन उष:काल होत होता त्याचसमयी पाण्याचा आवाज झाला एखादा मदोन्मत हत्ती सोंडेत पाणी भरुन घेतो तसा आवाज झाल्यावर विषधर सर्पाप्रमाणे दीप्तिमान बाण दशरथांनी त्या आवाजाच्या दिशेने सोडला त्याच वेऴी माणसाचा विव्हऴण्याचा आवाज ऐकु आला. राजा दशरथ त्या व्यक्तिचा शोक ऐकु लागले व आवाजाच्या दिशेने त्या युवकापाशी पोचले.
हिंदुस्थानात शब्दवेधी धनुर्धरांची मोठि परंपरा व संस्कृती राहिलीय.
दशरथ, रामचंद्र, अर्जुनापासुन ते पृथ्वीराज चौहान यांच्यापर्यंत अनेक जण शब्दवेधी होते.
शब्दवेध हि कला रात्री, अंधारात, पावसात, धुक्यात किंवा डोऴे नसताना (शत्रुने डोऴे फो़डले किंवा डोऴ्यात तिखट वगैरे काहि टाकले तर) आत्मसंरक्षण व राष्ट्र संरक्षणाकरता शिकवली जात असे.


आपल्या पाठिमागुन किंवा लपुन छपुन कोणी शस्त्र अस्त्र किंवा अन्य काहि फेकले तरी आपणास त्याचा प्रतिकार करता यावा ते शस्त्र निष्प्रभ करता यावे हा यातला हेतु आहे आजहि केरऴ मधे काहि ठिकाणी हि विद्या शिकवतात.
पृथ्वीराज चौहान यांचे डोऴे महंमद घौरी ने काढले होते तरी देखील केवऴ कविराजांनी महंमद घौरीचे केलेले वर्णन ऐकुन व घौरीचा शब्द ऐकुन पृथ्वीराज चौहानांनी त्यांचा कंठवेध केला होता.
हि भारतीयांची एक महत्वाची कला मधल्या काऴात चुकिच्या “अहिंसक “तत्वज्ञानाने मागे पडली किंवा ती हेतु पुरस्सर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.शब्दवेध करणे हि भारतीय संस्कृती आहे हे मात्र नक्कि आहे
इषुणाभिहत:केन कस्य वापकृतं मया।
ऋषेर्हि न्यस्तदण्डस्य वने वन्येन जीवत:।।27
कथं नु शस्त्रेण वधो मद्विधस्य विधीयते ।
जटाभारधरस्यैव वल्कलाजिनवासस:।।28
को वधेन ममार्थी स्यात् किं वास्यापकृतं मया ।
एवं निष्फलमारब्धं केवलानर्थसंहतम् ।। 29


मला कोणी का बाण मारला? मी कोणाचे काय अहित केले होते? मी तर सर्व जीवांना त्रास देणार्या वृत्तीचा (स्वार्थी) त्याग करुन वनात राहुन फळ मुऴे खावुन जीविका चालवत आहे.मला कोणी का मारले असेल.मी तापसी वल्कले धारण केलेला संसाराचा त्याग केलेला मृगचर्मधारी तापसी आहे मी कोणाचे काय अहित केले? मला मारुन काय साध्य होणार आहे हे ऐकुन दशरथ त्या ठिकाणी आले त्यांचा शरीरातुन त्राण निघुन गेले होते ते तापसी युवकाची क्षमायाचना करु लागले.आपल्या हातुन ब्रह्महत्या झाली हे दु:ख ते बोलताच तो तापसी म्हणतो.
शुद्रायामस्मि वैश्येेन जातो नरवराधिप ।
इतीव वदत:कृच्छ्राद् बाणाभिहतमर्मण:।।51
हे राजा मी ब्राह्मण नाहि मी वैश्य पित्या पासुन शुद्रवर्णाच्या स्त्रीच्या गर्भापासुन जन्मास आलोय तुला ब्रह्महत्येचे पातक लागणार नाहि.
आता सर्वप्रथम हे पाहावे कि वाल्मिकी रामायणात तपस्वी युवकाचे नाव “श्रावणबाऴ”असे आले नाहि कथाकार कीर्तनकार वगैरे मंडऴींनी हे नाव त्याला दिले कदाचीत वर्षा ऋतुत हि हत्या झालीय त्यामुऴे “श्रावण ” हे नाव त्याला जोडले गेले असावे श्रावणमास हा वर्षा ऋतुत असतो.हि एक शक्यता आहे.
दुसरे सत्य तो आई वडिलांना “काशी यात्रेला ” कावडितुन वगैरे नेत होता तो ब्राह्मण होता हे देखील सत्य नाहि


तो तापसी होता याचा दुसरा अर्थ सर्व वर्णांना म्हणजे ब्राह्मण, वैश्य क्षत्रिय व शुद्र या सर्वांना तसच संकरज म्हणजे अनुलोम प्रतिलोम विवाहातुन जन्मास आलेल्या संततीला देखील तपाचरण करता येत होते हा तापसी त्याचेच उदा.होता याचे वडिल वैश्य व माता शुद्र वर्णातली होती.त्यामुऴे पूर्वीपासुन आजर्यंत तपाचरण हे सर्व वर्णांत केले जाते जो तपस्वी असतो तो कोणत्याहि वर्णातला असला तरी वंदनीय असतो.ऋषिचे मुऴ हे विचारात घेवु नये त्याचे तप पाहावे हि आपली संस्कृती आहे
त्यामुऴे कोणी काहि अफवा पसरवल्या तरी त्यावर विश्वास ठेवु नयेत वैयक्तिक उपासना करणे व तपाचरण करण्यास धर्माने कधीहि बंधने घातली नाहियेत.
पुढिल भागात आपण या विषयी अधीक माहिती घेवु तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading