401-9
परि सर्वथा आपुलां जीवीं । केलियाची शंका कांहींचि नुरवीं । ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं । माझियां हातीं ॥401॥
परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनांत आठवणही राहूं नये इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर.
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥9.28॥
402-9
मग अग्निकुंडी बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेविं मुकलीं । तेवि न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥402॥
मग, ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाहीत, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही.
403-9
अगा कर्मे जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें । आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥403॥
अरे, जर कर्म उरले, तर त्याच्यापासून सुखदुःख भोगावे लागते, व ते भोगण्याकरितां जन्म घ्यावा लागतो.
404-9
तें उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरण जन्म । जन्मासवें श्रम । वरचिलही गेले ॥404॥
तेच कर्म जर मला अर्पण केले, तर लागलीच जन्ममरण चुकते; आणि जन्माबरोबर त्याच्या पुढील भोगावयास लागणारे श्रमही चुकतात.
405-9
म्हणऊनि अर्जुना यापरि । पाहेचा वेळु नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥405॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे आजचे काम उद्यावरटाकलेस तर फलप्राप्तीला वेळ लागणार नाही काय? म्हणून, सोपी अशी ही सर्व (कर्मफलाचा त्याग करण्याची) युक्ति तुला सांगितली.
406-9
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे । सुखें सुखरुपा घडिजे । माझिया आंगा ॥406॥
आतां या देहाच्या बंधनांत न पडतां व सुखदुःखाच्या सागरांत न बुडतां, अनायासाने, संतोषकारक असे जे माझे रुप, त्यांत मिसळून जा.
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्॥9.9॥
407-9
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥407॥
तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर सर्व भूतांचे ठिकाणीं नेहमी सारखा असून माझ्या ठिकाणीं ‘ माझे ‘ व ‘तुझे ‘ असा भेद नाहीं.
408-9
जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवें कर्मे करुनि । भजती मातें ॥408॥
जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात, व अहंकाराचा बीमोड करून कायावाचामनाने कर्मे करून मला भजतात,
409-9
ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझां ठायीं । आणि मी तयांचा हृदयीं । समग्र असें ॥409॥
ते जगांत देहाने जरी व्यापार करीत असले, तरी त्यांचे चित्त इकडे नसुन माझे ठिकाणीं असते, आणि मीही त्यांच्या ह्रदयांत पूर्ण भरलेला असतो.
410-9
सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥410॥
ज्याप्रमाणे विस्तारासह वडाचे मोठे झाड वडाच्या बीजांतच असते व बीज त्या झाडांतच असते,
411-9
तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचुनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥411॥
त्याप्रमाणे माझ्यांत व त्यांच्यांत केवळ नांवाचेंच अंतर असते, बाकी अंतःस्थितीचा विचार करून पाहतां ते व मी हे एकच आहो.
412-9
आतां जायांचें लेणें । जैसें आंगावरी आहाचवाणें । तैसें देह धरणें । उदास तयां चें ॥412॥
आता, लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ त्याचप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते.
413-9
परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देठीं । तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ दे ह ॥413॥
वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलांचा वास त्याचे मागोमाग जातो, व देठापाशी फुल जसे वासरहीत राहते, त्याप्रमाणे, आयुष्याची मुदत संपविण्यापुरतांच ते देह धारण करतात.
414-9
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरुढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥414॥
हे पांडवा; जो अभिमान म्हणून आहे, तो सर्व माझी भक्ति पावून माझ्या स्वरूपांतच मिळाला.
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥9.30॥
415-9
ऐसें भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे । तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥415॥
अशा प्रेमभावाने जे मला भजतात; व ज्यांना हे शरीर पुनः प्राप्त होत नाही, ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत;
416-9
आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा सेल वांटा । परि जीवित वेचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥416॥
आणी हे महावीरा त्यांचे आचरण जरी पाप करणाऱ्यांत पहील्या प्रतीचे असले, तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तीमार्गात केला आहे;
417-9
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥417॥
अरे अंतकाली जी मनाला बुद्धि होते तीच गति खरोखर पुढील जन्मी प्राप्त होते; म्हणून आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ जो माझ़्या भक्तीत घालवितो,
418-9
तो आधीं जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला ॥418॥
तो पुर्ववयांत जरी दूराचरण करणारा असला, तरी तो सर्वौत्तमच आहे असे समज.एखाद्या मनुष्यांने महापुरांतच नदी अलीकडील कांठी उडी घातली, मग जरी सर्व मनुष्यांस तो मेला असे वाटले,
419-9
तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती 419॥
तरी तो न मरता जसा पलीकडील कांठाला महापूरांतून बाहेर निघावा व तसा जो जिवंत निघाल्यामुळे जसे त्याचे बुडालेपण व्यर्थ व्हावे, त्याचप्रमाणे पुर्ववयांत केलेले पाप उत्तरवयांतील ज्ञानोत्तर भक्तीने नाहींसे होते.
420-9
यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला । तरि अनुतापतीर्थीं न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥420॥
याकरितां, पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चातापरूप तीर्थात न्हाऊन जर सर्वभावाने मला शरण आला,
421-9
तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ । जन्मलेया फळ । तयासीच जोडलें ॥421॥
तर त्याचे कुल पवित्र होते, तो निर्मल कुलीनपणास पावतो, व जन्मास आल्याचे फळ जी भक्ती तीही त्यालाच प्राप्तहोते.
422-9
तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥422॥
त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत होतात; त्याला तपाचेही आचरण केल्याचे श्रेय येते, व त्याला अष्टांगयोगसाधनाची सिद्धि मिळते.
423-9
हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं ॥423॥
पार्था, फार काय सांगावे? तो सर्व कर्माच्या झपाट्यांतून पार पडतो; व त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते.
224-9
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी । जेणें मजमाजीं किरीटी । निक्षेपिली ॥424॥
हे किरीटी, एकनिष्ठारूप पेटीत मनोबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्यामध्ये जो ठेवितो,
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥9.31॥
425-9
तो आतां अवसरें मजसारिखा होइल । ऐसाही भाव तुज जाइल । हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ॥425॥
तो कांही अवकाशाने मजसारखा होणार असा जर तुझा कदाचित् समज होईल, तर पहा की, जो अमृतांत वास करील त्याला मरण कोठून प्राप्त होणार?
