सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , ,

426-9
पै सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्र म्हणिजे । तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहे ॥426॥
हे बघ, ज्या वेळी सुर्य उदय पावत नाही, त्याच वेळेला रात्र असे म्हणतात; त्याचप्रमाणे, माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप नव्हे काय?
427-9
म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पांडुसुता । तेव्हांचि तो तत्वता । स्वरुप माझें ॥427॥
म्हणून हे पंडुसुता, त्याच्या चित्ताला जेव्हां माझा योग होतो, तेव्हांच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो.
428-9
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यांत पहीला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे, जो सर्व भावानें मला भजतो, तो मद्रूपच होऊन राहतो.
429-9
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें । 429॥
मग त्याला माझी स्थिति, माझी कांति व माझी नित्य शांति प्राप्त होते. फार तर काय, तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो.
430-9
एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगो किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥
पार्था, येथे वारंवार तेंच ते काय सांगुं ! पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल, तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नये.

431-9
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वहावा ॥431॥
अरे कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, चांगल्या जातीचीही अडचण नाही, आणखी मग विद्वत्तेचा तरी उगीच सोस पाहिजे कशाला?
432-9
कां रुपे वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥432॥
अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा डौल (ह्यापैकी कांही सुद्धा नको) एक माझ्या ठिकाणीं भक्ति नसली तर ही सर्व व्यर्थ.
433-9
कणेंविण सोपटें । कणसें लागलीं आथी एक दाटें । काय करावें गोमटें । वोस नगर ॥433॥
दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असती, अथवा सुंदर शहर असून ते जरओसाड असले; तर त्याला काय करावयाचे आहे?
434-9
नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें । कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥434॥
किंवा मोठा तलाव असुन तो जर आटला, तसेच रानांत एका दुःखकष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलांनी एखादे झाड फुलले असावे,
435-9
तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळजातीगौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥435॥
त्याचप्रमाणे सर्व वैभव, कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ होय.जसे सर्व अवयवांनी युक्त शरीर असून त्यांत फक्त जीव नसावा.

436-9
तैसें माझिये भक्तीविण । जळो तें जियालेंपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई ॥436॥
त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचें जीवन व्यर्थ होय. अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का?
437-9
पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली । तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥437॥
हे पहा हिवराची अगदी दाट सावली आहे; पण सज्जनांनी ती निषिद्ध मानली आहे, त्याचप्रमाणे जो माझी भक्ति करीत नाही, त्याला पुण्य डावलून (सोडुन) जाते.
438-9
निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥438॥
लिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने वांकला, तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांनाच सुकाळ होतो, त्याप्रमाणे माझी भक्ति न करणारा पापाचीच जोड करण्याकरितां जगतो.
439-9
कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां रात्री सांडिले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥439॥
किंवा ज्याप्रमाणे, षड्रस अन्नांनी भरलेले खापर चव्हाट्यावर ठेविले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते,
440-9
तैसें भक्तीहीनाचें जिणें । जो स्वप्नींही परि सुकृत नेणे । तेणे संसारदुःखासी आवंतणें । वोगरिलें गा ॥440॥
त्याप्रमाणे, जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण जाणत नाही, त्या भक्तिहीनाचे जिणे म्हणजे संसारदुःखाला ताट वाढून ठेवल्याप्रमाणेंच होय.

441-9
म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्याही व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशूचेंही लाभो ॥441॥
म्हणून, उत्तम कुल नसले अथवा जातीने अंत्यज असला, व पशूचाही देह प्राप्त झाला असला, (तरी चालेल पण भक्ति पाहिजे.)
442-9
पाहें पां सावजें हातिरुं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पातलिया मातें । । 442॥
पहा की नक्रानें गजेद्राला धरल्यावर त्यानें दीनपणाने माझे स्मरण केले, त्या वेळेस तो मजप्रत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्॥9.32॥

443-9
अगा नांवें घेता वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥
हे किरीटी, जी अधमाहून अधम, व तिचे नांव देखील घेणे उचित नव्हे, अशा पापयोनीत ज्यांनी जन्म घेतला आहे;
444-9
ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥444॥
जन्म तर अशा पापयोनीत व मूर्खपणाने केवळ दगड, परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे.
445-9
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रुप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥
ज्याच्या वाणीने माझा नामोच्चार होतो, जे दृष्टीनें माझ्याच रूपाचा उपभोग घेतात, व ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसsरा संकल्पच नसतो;

446-9
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥446॥
ज्यांचे कान माझा गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात, व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ़्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही;
447-9
जयांचें नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एऱ्हवीं मरण ॥447॥
ज्यांच्या बुद्धीला विषयांची आठवणही होत नाही, जे मला एकट्यालाच जाणतात, व ज्यांना या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे वाटते
448-9
ऐसा आघवाचि परि पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥448॥
हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून असतात;.
449-9
ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतुं कां । परि मजसीं तुकितां तुका । तुटी नाहीं ॥449॥
ते पापयोनीत जन्म घेतलेले असोतकिंवा शास्त्र देखील पडलेले नसोत, पण त्यांची माझ्याबरोबर तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाहींत.
450-9
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें । माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे ॥450॥
हे पहा कीं, भक्तीच्या महत्वाने दैत्यांनी देवांनाही मागे टाकले, व त्या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला.

, , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading