26-8
तैसें समविषमत्व नेणों कैचें । वांयांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥26॥
त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यांत अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही; परंतु पाहूं गेले असता लक्षावधि जाति उत्पन्न झालेल्या दिसतात.
27-8
येरी जीवभावाचिय पालविये । कांही मर्यादा करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥27॥
या व्यतिरीक्त, नानाप्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून उत्पत्ति होते हे पाहूं गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे.
28-8
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांही नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढोंचि लागे ॥28॥
म्हणून, मूळांत कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी कांही कारणही नसतां मध्येच कार्याची आपोआप वृद्धि होते.
29-8
ऐसा करितेनवीण गोचरू । अव्यक्तीं हा आकारू । निपजे जो व्यापारू । तया नाम कर्म ॥29॥
अशा प्रकारे, अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यावांचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात.
अधिभूतं क्षरो भावःपुरुषश्चाधिदैवतम
। अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥8.4॥
30-8
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥30॥
आता, ‘ अधिभूत ‘ ज्याला म्हणतात ते संक्षेपाने सांगतो; ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात,
31-8
तैसें असतेपण आहाच ।नाहीं होइजे हें साच ।जयांतें रूपा आणिती पांचपांच ।मिळोनियां ॥31॥
✏ त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असुन खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूतें एकत्र होऊन रूपाला आणतात,
32-8
🌷भूतांतें अधिकरूनि असे ।आणि भूतसंयोगें तरि दिसे ।जे वियोगवेळे भ्रंशे ।नामरूपादिक ॥32॥
जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगानें दृष्टीस पडते, व विनाशकाली लय पावते, असे जे नामरूप, त्याला अधिभूत म्हणतात.
33-8
🌷तयातें अधिभूत म्हणिजे ।मग अधिदैवत पुरूष जाणिजे ।जेणें प्रकृतीचें भोगीजे ।उपार्जिलें ॥33॥
✏ मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतिजन्य भोगांचा उपभोग घेतो.
34-8
🌷जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥34॥
जो बुद्धिचा द्रष्टा, इंद्रियरूप देशाचा अधिपति, व शरीराच्या अंतकाली मनोरथरूप पक्ष्यांचा विसावा घेण्याचा वृक्ष,
35-8
जो परमात्माचि परि दुसरा ।जो अहंकारनिद्रा निदसुरा ।म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा ।संतोषें शिणे ॥35॥
जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकाररूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व शीणही होतो,
36-8
जीव येणें नांवें ।जयातें आळविजे स्वभावे ।तें अधिदैवत जाणावें ।पंचायतनींचें ॥36॥
आणि ज्याला जीव या नांवाने हाक मारतात, त्याला ‘ अधिदैवत ‘ असे म्हणतात; व तो पंचमहाभुतांनी बनलेल्या शरीरांतील मुख्य दैवत आहे.
37-8
आतां इयेचि शरीरग्रामीं ।जो शरीरभावातें उपशमी ।तो अधियज्ञु एथ गा मी ।पांडुकुमरा ॥37॥
आता, पंडुकुमरा, याच शरीररुप गांवांत जो शारीरिक उपाधीचा लय करितो, तो ‘ अधियज्ञ ‘ मी होय.
38-8
येर अधिदैवाधिभूत ।तेहि मीचि कीर समस्त ।परि पंधरें किडाळा मिळत ।तें काय सांके नोहे ॥38॥
✏ येरवी, अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हिणकसाला मिळविल्यावर ते डाकलग होत नाही का?
39-8
तरि ते पंधरेपण न मैळे ।आणि किडाळाचियाही अंशा न मिळे ।परि जंव असे तयाचेनि मेळें ।तव सांकेंचि म्हणिजे ॥39॥
तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही, व तें हिणकस सोन्यांतही मिळत नाही;परंतु जोपर्यत त्याच्याशी एकत्र असते, तोपर्यंत त्याला डाकलगच म्हणतात,
40-8
तैसें अधिभूतादि आघवे ।हें अविद्येचेनि पालवें ।झांकलें तंव मानावें ।वेगळें ऐसें ॥40॥
त्याचप्रमाणे अधिभूतादि सर्व हे अज्ञानाच्या पदराने जोपर्यत झाकले आहेत, तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत.
41-8
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥41॥
तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत काय?
42-8
पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळां । तवं भेदिली गमती ॥42॥
परंतू केसांची गुंडाळी करुन त्यांवर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पांहू गेले असता जशी भंगलेली दिसते,
43-8
पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें । तरि डांक देऊनि सांदिले । शिळेतें काई ॥43॥
पाठीमागुन ते केस बाजुस केल्यावर तिच्या चिरा कोणीकडे गेल्या हे समजत नाही; म्हणुन ती शीळ डाक लावून जोडली आहे का?
44-8
ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ॥44॥
नाही; तर ती मुळची अखंडीतच होती; परंतू (केसांच्या संगतीने) भंगलेली भासत होती,परंतू ते केस एके बाजुस केल्यावर ती शीळ जशी होती तशीच दिसते;
45-8
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥45॥
त्याचप्रमाणे, अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मुळचेच आहे; व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच.
46-8
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगीतलें कां जें काज । मनी धरूनि ॥46॥
हे पहा, जो हेतू मनांत धरून, ‘सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत ‘ म्हणून आम्ही पूर्वी (चौथ्या अध्यायांत) तुला सांगितले, तोच हा अधियज्ञ होय.
47-8
तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडव । दाविजत असे ॥47॥
हा सर्व जीवांचा विसांवा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो
48-8
पहिलें वैराग्याइंधनपरिपूर्ती । इंद्रियानळी प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनिया ॥48॥
प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नि पेटवून त्यांत विषयरूप द्रव्याची आहुति देतात;
49-8
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवी । शरीराच्या ॥49॥
मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळबंधमुद्रेचा ओटा करतात, त्यावर शरीराचा मांडव उभा करतात.
50-8
तेथ संयमाग्नीचीं कुंडे । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिजती उदंडे । युक्तिघोषे ॥50॥
त्या ठिकाणी इंद्रियनिग्रहरूप अग्नीच्या कुंडांत इंद्रियरूप होमद्रव्यें घालून योगमंत्राने हवन करतात.
