176-4
सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ॥176॥
प्रलकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्यापुढे अभ्र काय बरे टिकणार, तूच सांग?
177-4
कीं पवनाचेनि कोंपें । पाणियेंचि जो पळिपें । तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठे काइ ॥177॥
अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो (पाणीसुद्धा जाळू टाकतो) तो अग्नी, गवत आणि काष्ठे यांनी दडपला जाईल काय?
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति॥4.38॥
भावार्थ :- या जगामध्ये परमात्मज्ञानानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान कर्मयोगी योग्य काळाने स्वतःच्या ठिकाणी स्वतःच मिळवितो.
178-4
म्हणोनि असे हें न घडे । तें विचारितांचि असंगडे । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥178॥
असो, हे बोलणे पुरे ! ज्ञानाने दोष नाहीसे होतात अथवा नाहीसे होत नाहीत, हा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्ञानाचा जो जो विचार करावा, तो तो असे दिसून येते की, ज्ञानाच्या योग्यतेची परमपवित्र वस्तू दुसरी कोणतीही नाही.
179-4
एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें के आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरे गा ॥179॥
या जगात ज्ञान हे उत्तम आहे, अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैत्यन्य नाही, त्याप्रमाणे (ज्ञानाशिवय जगात) उत्तम दुसरे कोठे आहे?
180-4
या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥180॥
सूर्याच्या कसोटीला लावून पाहता, त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे दिसून येईल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येऊ शकेल;
181-4
ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा ॥181॥
अथवा, योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर कांही मिळेल. तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा सापडेल.
182-4
म्हणूनी बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढती निर्धारिता । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥182॥
म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे, हे सिद्ध होते.
183-4
जरी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृतासारखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेसींचि ॥183॥
अमृताची चव ही इतर रसाहून निवडून पहिली असता ती अमृतासारखीच आहे, असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानानीच उपमा देणे भाग पडते.
184-4
आतां यावरि जे बोलणे । ते वायां वेळु फेडणें । तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे । जें बोलत असां ॥184॥
आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय, यावर अर्जुन म्हणाला महाराज(हे कृष्ण), आपण जे बोलत आहात ते खरेच आहे;
185-4
परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥185॥
पण तेच ज्ञान कसे जाणून घ्यावे? असे अर्जुन विचारणार होता आणि त्याचे मनोगत देवाने जाणले.
186-4
मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥186॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी सांगतो त्यागोष्टीकडे चित्त दे. ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला आता सांगणार आहे.
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः
। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥4.39॥
भावार्थ :- श्रद्धावान इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनात तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते आणि त्या वेळी त्याला भगवत-प्राप्तीरूप परम शांती लाभते.
187-4
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयां ठायीं इंद्रियां । मानु नाही ॥187॥
एकदा का आत्मसुखाची अमृतधुर गोडी निर्माण झाली, की मन सर्व इंद्रिया संबंधीविटून जाते आणि इंदर्यांचे महत्व राहत नाही.
188-4
जो मनाचि चाड न सांगे । जो प्रकृतीचे केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥188॥
जो मनातील इच्छा इंद्रियांना सांगत नाही, प्रकृतीने केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, ज्याचे हृदय श्रद्धेने भरून गेलेले असते, तो सुखी झालेला असतो.
189-4
तयातेंचि गिंवसित । हेंहें ज्ञान पांवे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥189॥
ज्या ज्ञानात अखंड शांती असते, ते ज्ञान त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्ती होत असते.
190-4
तें हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥190॥
ते ज्ञान हृदयात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर उमलू लागतो. मग आत्मज्ञानाची वेल मोठया प्रमाणात प्रगट होऊ लागते.
191-4
मग जेऊति वास पाहिजे । तेऊति शांतीचि देखिजे । तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां ॥191॥
मग जिकडे पाहावे तिकडे परमशांतीच दिसू लागते, आप-पर भाव संपून जातो आणि विचारकरून देखील शांतीची पैलतीरे समजू शकत नाहीत.
192-4
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगता असे अपारु । परि असो आतां ॥192॥
असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. त्याचे वर्णन करू लागलो, तर तो अपार आहे. परंतु हे सांगणे आता पुरे.
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥4.40॥
भावार्थ :- आत्मज्ञान प्राप्त न झालेला अज्ञानी, श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य नाश पावतो. त्याला इहलोक साधत नाही आणि परलोकही मिळत नाही, तसेच, त्याला आत्मसुखाची प्राप्तीही लाभत नाही.
193 -4
ऐकें जया प्राणियाचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥193॥
हे बघ, ज्यप्राण्याच्या अंतःकरणात अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? (त्याच्या जगण्याला काय म्हणावे)?, त्यापेक्षा मरण बरे.
194-4
शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ॥194॥
एखादे सामसूम घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेल्या माणसाचे जीवन भ्रममय असते.
195-4
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांही आहे । प्राप्तीचा पैं ॥195॥
आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसली, तरीपण त्या ज्ञानाची मनात इच्छा निर्माण झाली, तरी ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.
196-4
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण॥196॥
उलट ज्ञानाची गोष्ट कशाला करायची? जो मनुष्य आत्मज्ञानाची इच्छादेखील बाळगत नाही, तो संशयरुपी अग्नी मध्ये पडला, असे समज.
197-4
जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे । तैं मरण आले आलें असे फुडें । जाणों ये कीं ॥197॥
एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही, अशी अवस्था ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी त्याला निश्चित मरण आले आहे, असे समजावे.
198-4
तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥198॥
त्याप्रमाणे जो विषयसुखात रंगून गेलेला असतो, ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त असतो, तो संशयाच्या चक्रात सापडला जातो, यात शँका नाही.
199-4
मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जरी नासला । ति ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा ॥199॥
अशा प्रकारे जो संशयाच्या चक्रात गुंतून गेला, त्याच्या जीवनाचा निश्चितपणे घात झाला, असे समजावे. त्याला ऐहिक व परलौकिक सुखे प्राप्त होत नाहीत.
200-4
जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥200॥
ज्या माणसाला विषमज्वर झालेला असतो, त्याला शीत – उष्ण यातील फरक कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे समान मानतो.
